मालेर्ब, फ्रांस्वा द : (१५५५–१६ ऑक्टोबर १६२८). फ्रेंच कवी व समीक्षक, कां येथे एका प्रॉटेस्टंट कुंटुबात जन्मला. शिक्षण कां आणि पॅरिस येथे, तसेच बाझेल व हायडल्‌बर्ग विद्यापीठांत. त्याच्या वडिलांचा व्यवसाय वकिलीचा परंतु त्याने तो केला नाही. प्रॉव्हांसच्या प्रशासकाच्या (गव्हर्नर) सेवेत काही काळ घालविल्यानंतर फ्रान्सचा राजा चौथा आंरी (हेन्री) ह्याच्या दरबारी त्याला कवी म्हणून आश्रय मिळाला (१६०५). पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

मालेर्बची काव्यरचना थोडी आहे. तथापि सोळाव्या शतकातील ⇨ ला प्लेयाद ह्या कविमंडळाच्या काव्यविषयक भूमिकेस विरोध करून कवितेसंबंधी स्वतःची भूमिका मांडणारा म्हणून फ्रेंच कवितेच्या इतिहासात तो ख्याती पावला आहे. ह्या कविमंडळातील कवींच्या रचनांतील शब्दकळा, त्यांनी वापरलेली वृत्ते ह्यांचा त्याने उपहास केला आणि काव्यरचनेचे कठोर नियम स्वतः घालून दिले. विशुद्ध शैली आणि नेमकी, सामर्थ्यशील शब्दकळा ह्यांचा मालेर्बने पुरस्कार केला. फ्रेंच भाषा शुद्ध करण्याचा व तिची शुद्धता राखण्याच ध्यास त्याने घेतलेला होता. त्या दृष्टीने परकी, ग्राम्य, तसेच नव्या शब्दनिर्मितीलाही त्याने विरोध केला. मालेर्बच्या काव्यविषयक विचारांनी काही काळ फ्रेंच कवितेवर अंमल गाजविला, त्याला अनुयायी लाभले. ओनोरे द ब्यूएय राका आणि फ्रांस्वा मेनार हे त्यांतील उल्लेखनीय असे कवी होत. पुढे सतराव्या शतकात अवतरलेल्या अभिजाततावादी युगाचा मार्ग मालेर्बने तयार करून ठेवला, असे म्हटले जाते. फ्रेंच अभिजाततावादाला तात्विक बैठक देणारा ब्वालो-देप्रेओ ह्याने आपल्या लार पोयेतिक ह्या ग्रंथात केलेली मालेर्बची प्रशंसा ह्या संदर्भात लक्षणीय ठरते. 

मालेर्बनच्या स्वतःच्या कवितेत कल्पनाशक्ती आणि उत्स्फूर्तता ह्यांचा अभाव आढळतो. प्रगल्भ विचाराला तोलून धरणारी डौलदार शैली व उदात्त सूर ह्यांचा प्रत्यय मात्र त्यांच्या काही उत्कृष्ट कवितांतून येतो. 

लिव्ही आणि सेनीका ह्यांच्या काही साहित्याचा फ्रेंच अनुवाद मालेर्बने केला आहे.

संदर्भ : 1. Rubin, David Lee, Higher Hidden Order, Design and Meaning in the odes of Melherbe, Univ, of N. C. Press 1972.

             2. Winegarten Renee, French Lyric Poetry in the Age of Malherbe, 1954.

कुलकर्णी, अ. र.