रोमां द ला रोझ : जगदविख्यात फ्रेंच दीर्घकाव्य. गीयोम द लॉरीस (बहुधा तेराव्या शतकाचा पूर्वार्ध) आणि झां द म्यून ( ? – सु. १३०५) हे ह्या काव्याचे कर्ते होत. लॉरीसच्या जीवनाविषयी निश्चित स्वरूपाची अशी काही माहिती मिळत नाही. झां द म्यून हा विद्यावंत, व्यासंगी होता. त्याने व्हिजीशिअसच्या De re militari ह्या ग्रंथाचा, तसेच बोईथिअसच्या De Consolatione Philosophiae ह्या ग्रंथाचा फ्रेंच अनुवाद केला आहे.

ह्या दीर्घकाव्याचा पूर्वार्ध सु. ४,००० ओळींचा असून उत्तरार्ध सु. १८,००० ओळींचा आहे. पूर्वार्धाची रचना गीयोम द लॉरीस ह्याने १२२५-४० ह्या कालखंडात केली असावी, तर झां द म्यूनने ह्या काव्याचा उत्तरार्ध सु. १२७५-८० ह्या कालखंडात रचिला, असे दिसते.

ह्या काव्याचे स्वरूप थोडक्यात असे : कवीला एक स्वप्न पडते. त्यात एका उद्यानात आपण फिरतो आहोत असे कवीला दिसते. ह्या उद्यानातल्या एका सुंदर गुलाबकळीकडे तो आकृष्ट होतो आणि त्यामुळे कामदेवाच्या काबूत येतो. ही गुलाबकळी प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नांत काहीजण त्याला साहाय्य करतात, तर काहीजण अडथळे आणतात. ह्या सर्व व्यक्ती रूपकात्मक आहेत. उदा., कवीला गुलाबकळीकडे नेणारा सौजन्यपुत्र बॅल आक्‌यय हा सौजन्य ह्या गुणाचाच रूपकात्मक आविष्कार होय. सौजन्यपुत्राच्या मदतीने गुलाबकळीजवळ जाऊन तिचे चुंबन घेताच कवीच्या मागे निंदा, लोकापवाद, भीती, धोका हे लागतात आणि कवीला पळवून लावतात. गुलाबकळीच्या भोवती भिंती उभारल्या जातात. तिच्यावर सक्त नजर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. ह्या काव्याचा गीयोम द लॉरीसकृत पूर्वार्ध येथे संपतो.

रूपककथेत येणारी अटळ कृत्रिमता सोडता, ह्या काव्याची निवेदनशैली रंजक व रसरशीत आहे. मानवी स्वभावाचे, त्यातील गुणदोषांचे कवीने मार्मिकपणे चित्रण केले आहे. त्याच्या तीव्र कल्पनाशक्तीचा प्रत्ययही त्याच्या रचनेतून येतो. ऑव्हिडच्या ‘आर्ट ऑफ लव्ह’ (इं. शी.) ह्या काव्यग्रंथाचा गीयोम द लॉरीसवरील प्रभाव लक्षणीय आहे.

गीयोम द लॉरीसचे अपुरे राहिलेले हे काव्य झां द म्यूनने पूर्ण केले. तथापि त्याच्या रचनेचे स्वरूप अगदी वेगळे आहे. गीयोम द लॉरीस हा उमरावी श्रोतृवर्गासाठी एक रूपककाव्य लिहीत होता. झां द म्यूनने लिहिलेला ह्या काव्याचा उत्तरार्ध पाहिला, तर त्यात रूपकात्मकतेला तुलनेने गौणत्व आलेले दिसते. तसेच झां द म्यूनच्या समोर असलेला श्रोतृवर्ग सर्वसाधारणांचा आहे आणि दृष्टिकोणही मध्यमवर्गीय आहे. त्याच्यावर प्रबोधनकालाचा प्रभाग आहे. एखाद्या ज्ञानकोशकाराच्या भूमिकेतून तो कथौघात विविध विषयांवरील आपली मते, भाष्ये मांडतो. त्याचे विचार त्याने स्वतंत्र आणि प्रांजळ वृत्तीने मांडलेले आहेत. निसर्गाचे नियम पाळावे, हे त्याच्या तत्त्वज्ञानाचे सार दिसते. निसर्गाची रहस्ये बुद्धीच्या साहाय्याने समजून घेण्याची आवश्यकता त्याने प्रतिपादन केली. त्याच्यावर प्लोटो, ॲरिस्टॉटल, व्हर्जिल, हॉरिस इ. प्राचीनांप्रमाणे बोईथिअस, रॉजर बेकन, जॉन ऑफ सॉल्झबरी ह्यांसारख्यांचाही प्रभाव होता. त्याने आपले विचार मांडताना स्त्रियांवर उपरोधप्रचुर टीका केली. त्रूबदूरांनी स्त्रियांचे जे उदात्तीकरण केले होते, त्याविरुद्धची ही प्रतिक्रिया होती. निसर्ग आणि कला ह्यांचे संबंध, विज्ञान ह्यांवर त्याने लिहिले. त्याचप्रमाणे वंशपरंपरेने चालणारी सरदारकी, लग्नसंस्था, लोभी भिक्षुक ह्यांबद्दलचे आपले विचार त्याने परखडपणे व्यक्त केले. गुलाबकळीची कथा त्याने सुखान्त केली. कवीला गुलाबकळी लाभते.

हे काव्य म्हणजे फ्रेंच साहित्यातील पंडिती, वैचारिक काव्याचा आरंभीचा नमुना समजला जातो. ह्या काव्याची अनेक हस्तलिखिते उपलब्ध आहेत. चौदाव्या-पंधराव्या शतकांतील कवींवर ह्या दीर्घकाव्याचा मोठा प्रभाव पडला. १५३८ पर्यंत ह्या काव्याच्या जवळपास ४० आवृत्त्या निघालेल्या होत्या. विख्यात फ्रेंच कवी क्लेमां मारो (१४९६-१५४४) ह्याने १५२७ मध्ये रोमां ला रोझची आवृत्ती आस्थेने संपादून प्रसिद्ध केली. मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी जेफ्री चॉसर ह्याने ह्या दीर्घकाव्याचा इंग्रजी अनुवाद-रोमान्स ऑफ द रोझ-करून आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा आरंभ केला.

संदर्भ : 1. Gunn, A. M. F. The Mirror of Love : A Reinterpretation of the Romance of the Rose,  Lubbock, Texas, 1952.

           2. Langlois, E. Ed. Le Roman de la Rose, 5 Vols., 1914-24.

          3.  Lewis, C. S. The Allegory of Love, 1950.

          4. Poirion, D. Ed. Le Roman de la Rose, Paris, 1974.

टोणगावकर, विजया