मेअरिॲना खंदक : पॅसिफिक महासागरातील सर्वांत जास्त खोली असलेला खंदक. हा उत्तर पॅसिफिक महासागरात मेअरिॲना बेटांच्या पूर्वेस (ग्वॉम बेटाच्या आग्नेयीस सु. ४० किमी.) असून सु.२,५५० किमी. लांब व सरासरी ६९ किमी. रुंदीचा आहे. याच्या मुख्य भागात सरळ भिंतीप्रमाणे उभे उतार असलेली खोल दरी आहे. १८९९ मध्ये या खंदकातील ९,६६० मी. खोलीवरील ‘नेरो’ गर्तेचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सु. ३० वर्षांनी तिच्या जवळच्या भागाची खोली ९,८१४ मी. पर्यंत मोजण्यात आली. १९५७ च्या आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्षात रशियाच्या ‘व्हित्याझ’ या जहाजाने या खंदकातील त्यावेळेपर्यंतचा जास्तीत  जास्त खोल भाग (१०·९६८ मी.) ‘चॅलेंजर डीप’ हा शोधून काढला परंतु पुन्हा केलेल्या मोजणीत हा भाग ११,०३४ मी. जाहीर करण्यात आला. ‘चॅलेंजर डीप’ हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग समजला जातो. २३ जानेवारी १९६० रोजी स्विस संशोधक झाक पीकार व अमेरिकेच्या नाविक दलातील लेफ्ट. डॉन वॉल्श यांनी ‘ट्रिएस्ट’ या बॅथिस्कॅफ (गभीरतामापक पाणबुडी) मधून या खंदकात सु. १०,९१७ मी. पर्यंत जाण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

चौडें, मा.ल.