नाइटिंगेल

नाइटिंगेल: टर्डिनी या उप-पक्षिकुलात याचा समावेश होतो. याच्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव ल्युसीनिया मेगॅऱ्हिंका असे आहे. उत्कृष्ट गाणारा पक्षी म्हणून याची ख्याती आहे. इंग्लंड, यूरोप, पश्चिम आशिया आणि वायव्य आफ्रिकेत हा आढळतो याच प्रदेशात याची वीण होते. हिवाळ्यात हा आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात जातो.

नाइटिंगेल दाट जंगले, राखीव राने आणि नद्या असलेल्या खोऱ्यात राहतात. याची लांबी १६–१७ सेंमी. असते. पाठीकडची बाजू तांबूस तपकिरी शेपटी याच रंगाची पण जास्त गडद खालची बाजू फिक्कट करड्या तपकिरी रंगाची गळा आणि पोट जास्त पांढरट चोच आणि पाय तपकिरी. नर व मादी यांच्या बाह्य रूपात फरक नसतो.

एखाद्या ठेंगण्या झाडावर किंवा झुडपावर बसून हा गातो. याचे गाणे सुरेल व मधुर असून मनाला वेड लावणारे असते. त्याचे शब्दांनी वर्णन करणे शक्य नाही. हा दिवसा त्याचप्रमाणे रात्रीही गातो. याच्या गाण्याने कविमनाची कायमची पकड घेतलेली असून अनेक कवितांत त्याचा उल्लेख आढळतो.

हा भित्रा पक्षी आहे. कोणी जवळपास फिरकले की, एकदम झुडपात शिरून तो नाहीसा होतो. निरनिराळ्या प्रकारचे किडे याचे मुख्य भक्ष्य होय पण कोळी, कृमी व लहान फळेदेखील हा खातो. यांची वीण उन्हाळ्यात होते. दाट झुडपांमध्ये जमिनीसरसे किंवा जमिनीवरच पाने, गवत व केस वापरून मादी घरटे तयार करते. ती मे महिन्यात तपकिरी हिरवट रंगाची ४–५ अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम मादी करते. १३ किंवा १४ दिवसांनी अंड्यांतून पिल्ले बाहेर पडतात. नर व मादी दोघेही त्यांचे पोषण करतात.

कर्वे, ज. नी.