साम्यूएल द शांप्लेशांप्लँ साम्युएल द : (? १५६७ – २५ डिसेंबर १६३५). फ्रेंच समन्वेषक, भूगोलज्ञ तसेच न्यू फ्रान्सचा व पर्यायाने कॅनडाचा प्रमुख शोधक. जन्म फ्रान्समधील सँतोंझ परगण्यातील ब्रूआझ या खेड्यात. त्याचे वडील जहाजावर कप्तान होते. धर्मयुद्धकाळात नॅव्हारचा हेन्री (चौथा हेन्री राजा) याच्याकडे काही काळ नोकरी केल्यानंतर वेस्ट इंडीज, मेक्सिको व पनामा संयोगभूमीकडे गेलेल्या स्पॅनिश सफरीतील जहाजांचे नेतृत्व शांप्लँने केले. या तीन वर्षांच्या (१५९९–१६०१) सफरीचा वृत्तांत त्याने फ्रेंच राजाला सादर केला. शांप्लँने अटलांटिक महासागर पार करून एकूण एकवीस वेळा न्यू फ्रान्सचा प्रवास केला. त्यापैकी न्यू फ्रान्सची पहिली सफर त्याने १६०३ मध्ये केली. त्या वेळी त्याने सेंट लॉरेन्स नदीचे तसेच लशीनजवळच्या द्रुतवाहांचे समन्वेषण केले. येथील स्थानिक लोकांशी केलेल्या संभाषणांवरून त्याने नायगारा धबधबा व पंचमहासरोवरांचे स्वरूप निश्चित केले. फ्रान्सला परतल्यानंतर त्याने हा प्रवासवृत्तांत प्रसिद्ध केला (१६०३). फर व्यापाराची मक्तेदारी असलेल्या स्यूर दे माँ या व्यापाऱ्याबरोबर १६०४ मध्ये तो पुन्हा अमेरिकेत गेला. या वेळी तो सेंट क्रोई नदीच्या मुखाजवळ उतरला होता. मात्र या सफरीत त्याच्या ७९ सहकाऱ्यांपैकी ३५ सहकारी मरण पावले. १६०५ मध्ये त्याने आपली वसाहत फंडी उपसागर पार करून ‘पोर्ट रॉयल’ म्हणजे सांप्रतच्या नोव्हास्कोशातील ॲन्नापोलिस रॉयल येथे हलविली. नंतरच्या तीन वर्षांत अमेरिकेच्या न्यू इंग्लंड किनाऱ्याचे नोव्हास्कोशापासून दक्षिणेकडे मार्थाज व्हिन्‌यार्डपर्यंतचे समन्वेषण करून तेथील मौंट डेझर्ट बेटाचा व मेनमधील बहुतेक सर्व मोठ्या नद्यांचा त्याने शोध लावला. तसेच तेथील किनाऱ्याचा पहिला सविस्तर आराखडा तयार केला. सेंट लॉरेन्स नदीच्या काठावर त्याने नवीन वसाहतीची स्थपना केली.

शांप्लँने १६०८ मध्ये क्वीबेकची फ्रेंच वसाहत स्थापन केली. तत्कालीन मोठ्या वसाहतींची ही राजधानी होती. १६०९ मध्ये त्याने शोधलेल्या सरोवराला त्याचेच नाव देण्यात आले. शांप्लँने इंडियन जमातींबरोबरचा फ्रेंचांचा फरचा व्यापर वाढविला. १६१० मध्ये फ्रान्सला आल्यानंतर राजाच्या सचिवाची मुलगी एलेन बूल हिच्याशी त्याचा विवाह झाला. १६१२ मध्ये शांप्लँला फर व्यापाराबाबतचे विशष हक्क व न्यू फ्रान्सचे व्हाइसरॉय पद देण्यात आले. १६१३ मध्ये पश्चिमेकडील सरोवरांचा त्याने प्रवास केला. त्याच वर्षी तो ओटावा नदीतील ॲलमेट बेटावर येऊन पोहोचला. १६१५ मध्ये कॅनडाच्या अंतर्गत भागात अतिशय धाडशी प्रवास करून तो जॉर्जियन उपसागरापर्यंत गेला. त्यानंतर आँटॅरिओ सरोवरमार्गे आग्नेयीकडे परत आला. इंडियन जमातींच्या दुसऱ्या एका गटाबरोबर आँटॅरिओ सरोवराच्या दक्षिणेकडील ऑननडागा (सध्या न्यूयॉर्कमध्ये) खेड्यावर तो हल्ल्यासाठी गेला असता, इरोक्वायन इंडियनांनी शांप्लँला जखमी केले. त्या वेळी इंडियनांनी हिवाळ्याच्या कालावधीत शांप्लँला सक्तीने आपल्या बरोबर राहणे भाग पाडले. त्यानंतरच्या काळात त्याने विशेष समन्वेषण केले नाही परंतु आपला संपूर्ण वेळ त्याने वसाहतीच्या विकासासाठी खर्च केला.

इंग्रजांनी १६२९ मध्ये अचानक क्वीबेक बळकावले व शांप्लँला चार वर्षांसाठी हद्दपार करून एक कैदी म्हणून इंग्लंडमध्ये आणले. तेथे त्याने आपल्या व्हॉयिजेस दे ला नोव्हेले फ्रान्स (१६३२)ची तिसरी आवृत्ती तयार केली. १६३२ मध्ये न्यू फ्रान्स हा प्रदेश फ्रान्सला परत मिळाल्यावर विस्कॉन्सिनपर्यंत फ्रेंच वसाहतीचा विस्तर करण्यासाठी, शांप्लँने झां नीकॉले याला पश्चिमेकडे पाठविले (१६३४). पुढच्याच वर्षी क्वीबेक येते शांप्लँचे निधन झाले. त्याच्या गौरवार्थ स्थापन झालेल्या शांप्लँ सोसायटीतर्फे (१९२२–२६) त्याच्या कार्याची माहिती देणारी पुस्तके इंग्रजीत व फ्रेंचमध्ये प्रसिद्ध करण्यात आली.

संदर्भ : Morison, Samuel Eliot, Samuel de Champlain, Father of New France, 1972.

चौधरी, वसंत