हिरवा वृक्षमंडूकवृक्षमंडूक : झाडावर राहणाच्या सवयीमुळे या बेडकाला हे नाव देतात. त्याचे शास्त्रीय नाव हायला आर्बोरिया असून त्याचा समावेश हायलिडी कुलात होतो. या कुलात ५५० हून अधिक जाती आहेत. हायला प्रजातीत (वंशात) शेकडो जाती आहेत. सामान्यतः वृक्षमंडूक ही संज्ञा झाडांवर राहणारे बिनशेपटीचे उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी ओळखण्यासाठी वापरतात. ही संज्ञा किंवा वृक्षभैकेर ही समानार्थी संज्ञा विशेष अर्थाने हायलिडी कुलासाठी वापरतात. हा मंडूक मोरोक्को, फ्रान्स, द. स्वीडन, आशिया मायनर, भारत, जपान, द. चीन, दक्षिण व उत्तर अमेरिका, उ. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथे आढळतो [→प्राणिभूगोल]. वृक्षमंडुकाची लांबी छोटीशी असून ती क्वचितच ५ सेंमी. भरते. त्याची पाठ गुळगुळीत व चकचकीत असून तिचा रंग सामन्यतः चमकदार गवती हिरवा असतो परंतु तो आपला रंग पटकन सभोवतालच्या परिसराप्रमाणे पिवळा, तपकिरी, ऑलिव्ह किंवा काळा असा बदलतो [→ मायावरण]. दिवस असो वा रात्र, तो आपला रंग बदलू शकतो. त्याचा पोटाकडील रंग पिवळसर-पांढरा व कणीदार आणि मांड्यांवर गुलाबी असतो. जीभ काहीशी गोल असून तिच्या आतीलबाजूला खोबण असते व ती थोडीशी बाहेर फेकता येते. कर्णपटल (मध्य कर्ण व बाह्य कर्ण यांना विभागणारे पटल) स्पष्ट पण लहान असते. त्याच्या पायाच्या बोटांच्या खालच्या बाजू थाळीसारख्या पसरट असतात व त्यामध्ये पोकळी तयार होते. त्यातून एक चिकट द्रव्य स्रवत असल्यामुळे त्याला झाडांच्या गुळगुळीत पानांवर निश्चलपणे बसणे सहज शक्य होते. तो केळीची पाने, माक्याची पाने वगैरेंवर आरामशीरपणे बसतो व माश्या किंवा किडे यांसारखे भक्ष्य जवळ आल्याशिवाय हालचाल करीत नाही. पाऊस पडू लागल्यास तो पानांच्या खालच्या बाजूवर बसतो, मात्र पावसाळ्यात तो गवतात राहतो किंवा पाण्यात जातो. गवत्या साप त्याचा मोठा शत्रू आहे. मे महिन्यात वृक्ष-मंडुकाची मादी उथळ पाण्याच्या तळाला लहान गटाने सु. १,००० अंडी घालते. त्याचे भैकेर [अंड्यांतून बाहेर पडणारी पिले → भैकेर] त्यांच्या तपकिरी-हिरव्या ते ऑलिव्ह हिरव्या रंगावरुन ओळखू येतात.

पहा : बेडूक.                                        

जामदाडे, ज. वि.