ट्रिपोली–१ : अरबी-ताराबुलुस एल् गार्ब. लिबियाची व त्याच्या ट्रिपोलिटेनिया प्रांताची राजधानी व प्रमुख बंदर. प्राचीन काळी एअ, लेप्टिसमॅग्ना आणि सॅब्रत या तीन गावांमिळून बनल्यामुळे याला ट्रिपोली हे नाव पडले. लोकसंख्या २,६४,००० (१९७०). भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील मरुभूमीतील हे शहर ट्रिपोलिटेनियाच्या व सायरेनेइकाच्या सर्व प्रमुख केंद्रांशी महामार्गांनी आणि दक्षिणेकडील विभागांशी लहान रस्त्यांनी जोडलेले असून पश्चिमेस झ्वारा आणि दक्षिणेस गारीयॅनपर्यंत लोहमार्ग जातो. येथून एस्पार्टो गवत, कातडी, खजूर, मीठ, स्पंज, हेन्ना आणि गालिचे निर्यात होतात. तंबाखूचे पदार्थ, साबण, बांधकाम साहित्य, मद्ये, पीठगिरण्या, ऑलिव्ह तेल, कातडी कमावणे, स्पंज आणि ट्यूना मासे पकडणे, धातुकाम, गालिचे विणणे इ. कारखाने आणि उद्योग येथे आहेत. गावाचा जुना व आधुनिक यूरोपीय पद्धतीचा असे भाग आहेत. जुना किल्ला लक्षवेधक आहे. अनेक मशिदी, मार्कस ऑरेलियसची कमान इ. प्रेक्षणीय आहेत. येथे अनुक्रमे कार्थेज, रोम, व्हँडाल, बायझंटिन, अरब, स्पॅनिश, सेंट जॉनचे सरदार, तुर्क व इटली यांच्या सत्ता होऊन गेल्या. तुर्की अंमलात हे चाच्यांचे ठाणे होते. दुसऱ्या महायुद्धात येथील अक्षराष्ट्रांचा तळ ब्रिटिशांनी बाँब वर्षाव करून उद्ध्वस्त केला व शहर घेतले. १९४८ मध्ये येथील विमानतळ अमेरिकेस हवाई ठाणे म्हणून दिला आहे.

लिबियाची राजधानी ट्रिपोली

लिमये, दि. ह. कुमठेकर, ज. ब.