अपस्फीत-नीला : नीलांची एक विकृती. या विकृतीमध्ये नीला जाड, फुगीर, नागमोडी, लांब व गाठाळ बनतात. या विकृतीचे प्रमाण मांडी, पाय व उदराचा खालचा भाग या ठिकाणच्या नीलांमध्ये अधिक दिसते म्हणून ह्या लेखात पायातील त्वचेच्या खालच्या अपस्फीत नीलांची माहितीच विशेषत: दिली आहे.

कारणे : नीलांमधून रक्त्त परत हृदयाकडे जात असताना त्याला दोन गोष्टींचे साहाय्य होत असते. स्नायू आकुंचित होत असताना त्यांचा दाब नीलांवर पडल्यामुळे रक्त पुढे ढकलले जाते. नीलांच्या अंतर्भागांत असलेल्या कपाटांच्या (झडपांच्या) कप्प्यांची रचना रक्त्तप्रवाहाची दिशा हृदयाकडेच राहील अशी असते. ते परत जाऊ लागले तर हे कप्पे एकमेकांस भिडून रक्त खाली जाऊ शकत नाही. पायातील नीलांतील रक्त्तप्रवाह गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध असल्यामुळे तेथे ही विकृती अधिक दिसते.

 अपस्फीती उत्पन्न होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे काही जन्मजात दोषांमुळे नीलाभित्ती व त्यांतील कपाटे कमकुवत असल्यास रक्त्तप्रवाह विरुद्ध दिशेने होऊ लागल्यास तो रोखून धरण्याचे कार्य ती  कपाटे करू शकत नाहीत. त्यामुळे काही कुटुंबांत अपस्फीत-नीला-प्रवृत्ती अधिक दिसते. दुसरे कारण म्हणजे नीलांतर्गत रक्त्तदाब वाढणे हे होय. ज्या व्यक्तींना फार वेळ सारखे एका स्थितीत, हालचाल न करता उभे किंवा बसून काम करावे लागते, त्यांच्या पायांतील नीलांतर्गत रक्त्तदाब सारखा अधिक राहिल्यामुळे नीलाभित्तींवर ताण पडून त्या फुगतात. अशा वेळी नीला-कपाट-कप्पे पूर्णपणे बंद होऊ शकत नाहीत. नीलांवर बाहेरून दाब पडल्यासही हीच परिस्थिती उत्पन्न होते. गर्भिणीच्या ⇨श्रोणीत गर्भाशयाची वाढ होत असताना त्याचे वजन श्रोणी-नीलांवर पडत राहिल्यामुळे त्या नीलांतील रक्तप्रवाह मंद होऊन पायांतील नीलांवर ताण पडून त्या अपस्फीत होतात. अपस्फीत-नीलांचे प्रमाण स्त्रियांत अधिक असते. कृश व वृद्ध व्यक्त्तींमध्ये तसेच अतिस्थूल व्यक्त्तींमध्येही नीलांचा आधार कमी झाल्याने अपस्फीती होऊ शकते.

लक्षणे : अपस्फीत-नीलांची लक्षणे त्यांच्या आकारमानावर अवलंबून नसतात. फार मोठ्या अपस्फीत-

-नीलांमध्ये लक्षणे कमी दिसतात, तर त्यामानाने लहान नीलांच्या अपस्फीतीची लक्षणे अधिक असू शकतात. वेदना, पाय जड व थकल्यासारखे वाटणे, संध्याकाळी घोट्याभोवती सूज येणे ही लक्षणे असतात. घोट्या- भोवती लहान-लहान रक्तवाहिन्यांचे जाळे दिसते. नीला हाताला जाड व टणक लागते. अपस्फीती एकदा सुरू झाली की ती वाढतच जाते.

उपद्रव : नीलेवर आघात झाल्यास ती फुटून बराच रक्त्तस्राव होऊ शकतो. त्वचेला काही इजा होऊन त्यात जंतुसंसर्ग झाल्यास व्रणोत्पत्ती होते.

चिकित्सा :एका स्थितीत सारखे उभे किंवा बसून राहणाऱ्या व्यक्त्तीने मधूनमधून चालून पायाच्या स्नायूंना व्यायाम दिल्यास नीलांमधील रक्त्तप्रवाह अधिक चांगला होतो, म्हणून पायांची हालचाल करून तेथील स्नायूंना व्यायाम देणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. पायावर स्थितिस्थापक बंध वापरल्यास नीलांना बाहेरून आधार मिळतो. नीलेमध्ये काठिण्याकारी औषधे टोचली असता नीलेला शोथ (दाहयुक्त सूज) येऊन ती दोरीसारखी जाड होऊन बंद पडते पण हा परिणाम फार वेळ टिकत नसल्यामुळे अलीकडे नीलेत टोचून औषधे घालण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. शस्त्रक्रिया करून अपस्फीत-नीलेची दोन्ही टोके बांधून तिला मिळणाऱ्या लहान नीला बांधून टाकून विकृत नीला उपटून काढल्याने या विकारापासून कायमची मुक्त्ता होऊ शकते.

अपस्फीत-नीलांचे इतर प्रकार : यकृतातील प्रवेशिका नीलेमध्ये (आतडी, प्लीहा, अग्निपिंड व पित्ताशय यांमधील अशुद्ध रक्त्त यकृतात नेणाऱ्या मुख्य नीलेमध्ये ) रोघ उत्पन्न झाल्यास यकृतातील नीलांवर दाब येतो, त्यामुळे हृदय-नीलांतील रक्त्तप्रवाह परावर्तित होऊन यकृतातील रक्त्त अन्ननलिकेच्या भित्तीतील नीलांच्या वाटेच सार्वदेहिक रक्त्तप्रवाहात मिसळते. यामुळे त्या भित्तींतील नीलांवर दाब येऊन त्या अपस्फीत होतात. प्रवेशिका-नीलेतील रोघ बहुश: यकृत-सूत्रणामुळे उत्पन्न होतो [→ यकृत-सूत्रण रोग]. गुदांत्र (अन्नपचन मार्गाचे शेवटचे टोक) व गुदमार्गातील नीला अपस्फीत झाल्यास होणारे अर्श किंवा मूळव्याध, तसेच वृषण (प्रजोत्पादक ग्रंथी)-नीला-अपस्फीती हे नीलांच्या अपस्फीतीचे इतर प्रकार होत.

ढमढेरे, वा. रा.

अपस्फीत नीला