शनिवार : आठवड्यातील सातवा वार वा दिवस. या दिवसाच्या पहिल्या होऱ्याचा अधिपती शनी असल्यामुळे या दिवसाला ‘शनिवार’ हे नाव पडले आहे. इतरत्रही शनी या ग्रहावरूनच याचे नाव आले आहे. (उदा., इंग्रजीत सॅटरडे). अँग्लो-सॅक्सन पद्धतीनुसार एका रोमन कृषिदेवतेवरून हे नाव आले असून रोमन देवतेचे नाव असलेला हा एकमेव दिवस आहे. या वाराचा अधिपती इंद्र व देवता ब्रह्या असून हा मारुतीचा वार समजतात. हा संपत्तिप्रद मानतात. या दिवशी तैल अभ्यंगस्नान करावे. तसेच या दिवशी गृहप्रवेश, गृहारंभ इ. स्थिर कृत्ये करावीत लोखंड, शिसे, पोलाद, कथील इ. धातूंचे व्यवहार फलप्रद होतात असे मानले जाते. या दिवशी केलेली अश्वत्थपूजा ही व्रतासारखी असते. फलज्योतिषानुसार शनी अनिष्ट असल्यास शनीची उपासना या दिवशी करतात. श्रावण महिन्यातील शनिवाराला ‘संपत शनिवार’ म्हणतात व त्या दिवशी व्रत करतात. प्रवास, नवीन कपडे घालणे, कोळसा, जळण, तेल वगैरेंची खरेदी-विक्री करणे, फुटाणे खाणे इ. गोष्टी या दिवशी वर्ज्य मानल्या जातात, चैत्र वद्य त्रयोदशीला शततारका नक्षत्र व शनिवार असेल, तर त्याला ‘महावारुणी योग’ म्हणतात.

आठवड्याचा हा शेवटचा दिवस ज्यू धर्मीय शब्बाथ म्हणजे धार्मिक उपासनेचा म्हणून विश्रांतीचा (किंवा साप्ताहिक सुटीचा) मानतात. पूर्वी खिश्चन लोकही शनिवार हा अशाच तऱ्हेने शब्बाथ डे म्हणून पाळीत. नंतर रविवार हा ख्रिश्चनांचा शब्बाथ डे झाला. तथापि काही ख्रिश्चिन लोक उदा., सेव्हन्थ डे अँडव्हेन्टिस्ट (इहलोकी राज्य स्थापन करण्यासाठी येशू ख्रिस्ताचे पुनरागमन होईल असे मानणाऱ्याला अँडव्हेन्टिस्ट म्हणतात) शनिवार शब्बाथ डे म्हणून पाळतात. ईस्टर-रविवार पूर्वीच्या पवित्र आठवड्यातील शनिवाराला होली (पवित्र) सॅटरडे म्हणतात.

ठाकूर, अ. ना.