श्रावण : हिंदू कालगणनेनुसार हा पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्र असते म्हणून या महिन्याचे नाव श्रावण पडले आहे. या महिन्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो. या महिन्यात हिंदूंची वतवैकल्ये व सण सर्वाधिक असल्याने चातुर्मासातील या महिन्याला सर्वांत जास्त धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यात प्रत्येक वाराला काही ना काही व्रत असते. सोमवारी शिवपूजा व अर्धा उपवास करतात तसेच नववधू तांदूळ, तीळ, मूग, जवस व सातू या धान्यांची शिवामूठ सोमवारी शिवाला वाहतात. मंगळवारी नववधू मंगळागौरीची पूजा करून हा दिवस विविध वैशिष्टयपूर्ण खेळ खेळून साजरा करतात. बुधवारी बुधाची तर गुरूवारी बृहस्पतीची पूजा करतात. शुकवारी गौरीची पूजा करतात, सवाष्णीला भोजन देतात व त्याचप्रमाणे सुवासिनींना दूध-फुटाणे देऊन हळद-कुंकू लावतात. शनिवारी शनी, मारूती, नरसिंह व पिंपळ यांची पूजा करतात आणि मुंजा मुलास स्नान घालून भोजन देतात. रविवारी सूर्याची पूजा ( आदित्यपूजन ) करून त्याला खिरीचा नैवदय दाखवितात.

श्रावण महिन्यात अनेक सण असतात. उदा., शुदध्द पंचमीला नागपंचमी म्हणतात. त्या दिवशी नागाची पूजा करून त्याला दूध देतात. पौर्णिमेला समुद्रकिनारी वरूणाला प्रसन्न करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करतात. यावरून नारळी पौर्णिमा हे नाव आले आहे तर या दिवशी बहीण भावाला राखी बांधते म्हणून या दिवसाला रक्षाबंधन वा राखी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी सुताची पोवती पण हातात बांधण्याची प्रथा असल्याने पोवती पौर्णिमा हेही नाव या दिवसाला आहे. पौर्णिमेस श्रवण नक्षत्र असल्यास उपाकर्म करून पुरूष नवीन यज्ञोपवीत ( जानवे ) धारण करतात. या विधीला श्रावणी म्हणतात. उत्तर भारतात पौर्णिमेला राधाकृष्णाला झोक्यावर बसवून झोके देतात आणि त्यांची गीते गातात. श्रावण वदय अष्टमीला कृष्णाचा जन्म झाल्याने तिला कृष्णाष्टमी म्हणतात व त्या दिवशी रात्री कृष्णजन्मोत्सव साजरा करतात. उत्तर भारतात याच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा केला जातो. श्रावणातील अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. कारण या दिवशी संततिप्राप्तीसाठी पिठोरी वत केले जाते. काही भागांत या दिवशी बैलपोळ्याचा सणही साजरा केला जातो. श्रावण हा कवी, लेखक यांचा आवडता महिना असून बालकवी, सदानंद रेगे आदींच्या श्रावणावरील कविता मराठी साहित्यातील चैतन्यस्थळे आहेत. या महिन्यात वृक्षारोपणही करतात.

ठाकूर, अ. ना.