हॉईल, फ्रेड : (२४ जून १९१५–२० ऑगस्ट २००१). ब्रिटिश गणितज्ञ आणि ज्योतिषशास्त्रज्ञ. स्थिर स्थिती विश्वाच्या सिद्धांताचे कट्टर समर्थक म्हणून प्रसिद्ध. या सिद्धांतामध्ये विश्व प्रसरण पावत आहे आणि अवकाशातील द्रव्याची सरासरी घनता स्थिर राहण्यासाठी सतत द्रव्यनिर्मिती होत असते, या दोन गोष्टी गृहीत धरल्या आहेत.

 

हॉईल यांचा जन्म बिंग्ले( यॉर्कशर, इंग्लंड) येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिज येथील इमॅन्युअल कॉलेज आणि सेंट जॉन्स कॉलेज या महाविद्यालयांत झाले. त्यांनी रडारच्या विकासाकरिता दुसऱ्या महायुद्धामध्ये सहा वर्षे ब्रिटिश नौदलात काम केले. ते केंब्रिज विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक (१९४५–५८), ज्योतिषशास्त्र व प्रायोगिक तत्त्वज्ञान विषयाचे प्लूमियन प्राध्यापक (१९५८–७२) आणि रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक (१९६९–७२) होते.

 

हॉईल, ज्योतिषशास्त्रज्ञ टॉमस गोल्ड आणि गणितज्ञ हेर्मान बाँडी यांनी १९४८ मध्ये विश्वरचनेचा ‘स्थिर स्थिती सिद्धांत’ मांडला. हा सिद्धांत मांडताना त्यांनी महास्फोटाच्या (बिग बँग) सिद्धांतातील काही उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केला. हा सिद्धांत ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या चौकटीत तयार करण्यात आला. हॉईल यांनी आइन्स्टाइनप्रणित सापेक्षता समीकरणात थोडे बदल करून संतत द्रव्य सृजन कसे होऊ शकते, हे दाखविले. [→ विश्वस्थितिशास्त्र].

 

१९५० च्या दशकाच्या शेवटी आणि १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला महास्फोट सिद्धांत विरुद्ध स्थिर स्थिती सिद्धांत हा वाद निर्माण झाला. दूरवरच्या दीर्घिकांची निरीक्षणे आणि इतर निसर्ग घटनायांचा महास्फोट सिद्धांताला पाठिंबा मिळत राहिला. सूक्ष्मतरंगांच्या पार्श्व-भूमीचा वेध स्थिर स्थिती सिद्धांताला मारक ठरत होता. या वादातून अनेक खगोलीय वेधांना चालना मिळाली. हॉईल यांच्यावर काही निष्कर्ष बदलण्याकरिता दबाव वाढत होता, तरी त्यांनी चिकाटीने नवीन पुराव्या-निशी सुसंगत असा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. १९९३ मध्ये हॉईल, जेफरी बर्बिज व जयंत विष्णु नारळीकर यांनी जुन्या स्थिर स्थिती सिद्धांताचे पुनरुज्जीवन केले आणि त्याचे नामकरण ‘स्थिरवत स्थितीचा विश्व सिद्धांत’ असे केले. या सिद्धांताची भाकिते हळूहळू तपासली जात आहेत. तसेच त्यातील प्रतिमानांची चाचणी फ्रीडमन प्रतिमानांप्रमाणे घेतल्यास ती सर्व चाचण्यांतून यशस्वी होत आहे. [→ स्थिर स्थिति विश्वाचा सिद्धांत].

 

हॉईल १९५६ मध्ये हॅली वेधशाळांच्या (आता माउंट विल्सन आणि पॅलोमार वेधशाळा) कर्मचारी वर्गात सामील झाले. १९५७ मध्ये त्यांची रॉयल सोसायटी या संस्थेवर सदस्य (फेलो) म्हणून निवड झाली. अमेरिकेतील विल्यम फाउलर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हॉईल यांनी ताऱ्यांचे उगम व ताऱ्यांमधील मूलद्रव्यांचे उगम यांसंबंधीचे सिद्धांत मांडले. [→ विश्वोत्पत्तिशास्त्र].

 

हॉईल हे केंब्रिज येथील इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरेटिकल ॲस्ट्रॉनॉमी या संस्थेचे संचालक होते (१९६७ –७२). ही संस्था स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना १९७२ मध्ये ‘सर’ (नाइट) हा किताब मिळाला. ते मँचेस्टर विद्यापीठ (१९७२–२००१) आणि युनिव्हर्सिटी कॉलेज कार्डिफ (१९७५–२००१) या ठिकाणी सन्माननीय संशोधक प्राध्यापक होते. ते अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१९६४), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अमेरिका १९६९) आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी (१९८०) या संस्थांचे सदस्य होते. ते रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष (१९७१–७३) आणि रॉयल आयरिश ॲकॅडेमीचे फेलो (१९७७) होते.

 

हॉईल यांना यूनेस्कोचे कलिंग पारितोषिक (१९६७), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक (१९६८), नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरीचे जान्स्की पारितोषिक (१९६९), रॉयल सोसायटीचे रॉयल पदक (१९७४), खगोल भौतिकी विषयाचे बाल्झन पारितोषिक (१९९४), रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे क्राफूर्ड पारितोषिक इ. पदके व पारितोषिके मिळाली. त्यांच्या सन्मानार्थ १९८६ मध्ये एका लघुग्रहाला ८०७७-हॉईल आणि त्यांच्या स्मरणार्थ २००९ मध्ये इस्रो शास्त्रज्ञांनी शोधलेल्या सूक्ष्मजंतूच्या जातीला जानीबॅक्टर हॉईली असे नाव देण्यात आले.

 

हॉईल यांनी द नेचर ऑफ द युनिव्हर्स (१९५१), ॲस्ट्रॉनॉमी अँड कॉस्मॉलॉजी (१९७५) आणि द ओरिजिन ऑफ द युनिव्हर्स अँड द ओरिजिन ऑफ रिलिजन (१९९३) हे ग्रंथ लिहिले. यांशिवाय त्यांनी अनेक कादंबऱ्या, नाटके आणि छोट्या गोष्टी लिहिल्या. त्यांनी द स्मॉल वर्ल्ड ऑफ फ्रेड हॉईल (१९८६) हे आत्मवृत्त लिहिले.

 

हॉईल यांचे बोर्नमथ (इंग्लंड) येथे निधन झाले.

 

सूर्यवंशी, वि. ल.