फेब्रुवारी : ग्रेगरियन पंचांगातील दुसरा व सर्वात लहान महिना. हा महिना २८ दिवसांचा असतो मात्र लीप वर्षात याचे २९ दिवस असतात. रोम्युलस यांनी तयार केलेल्या जुन्या रोमन पंचांगात वर्षाचे मार्च ते डिसेंबर असे दहाच महिने होते. न्यूमा पाँपिलिअस यांनी इ.स.पू. ७०० च्या सुमारास डिसेंबरनंतर फेब्रुवारी व जानेवारी हे दोन जास्त महिने घालून वर्ष बारा महिन्यांचे केले. इ.स.पू. ४५२ मध्ये रोमच्या कायदे करणाऱ्या दहा जणांच्या मंडळाने फेब्रुवारी व जानेवारी यांचा क्रम बदलून फेब्रुवारी हा बारावा महिना केला. तेव्हा या महिन्याचे ३० दिवस असत. पुढे ज्यूलिअस सीझर यांनी वर्षाचा प्रारंभ मार्चऐवजी जानेवारीपासून धरण्यास सुरूवात केल्याने फेब्रुवारी हा वर्षाचा दुसरा महिना झाला. नंतर त्यांनी व ऑगस्टस यांनी फेब्रुवारीतील एकेक दिवस कमी करून तो आपल्या नावांवरून ओळखण्यात येणाऱ्या जुलै व ऑगस्ट या महिन्यांत घातला. त्यामुळे फेब्रुवारीचे २८ दिवस झाले. पुढे सौर वर्षाची भरपाई करण्यासाठी दर चार वर्षांनी एक जास्त दिवस फेब्रुवारीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम हा जादा दिवस २४ तारखेच्या अगोदर घालीत. पुढे फेब्रुवारी २९ तारखांचा मानण्यात येऊ लागला. पूर्वी हा वर्षाचा शेवटचा महिना होता म्हणून तो शुद्धीकरण संस्कारांचा व मृतांविषयी आदर दाखविण्याचा महिना गणला जाई. त्यामुळे शुद्धीकरण अर्थाच्या लॅटिन शब्दावरून याचे फेब्रुवारी हे नाव पडले आहे. काहींच्या मते याच्या १५ तारखेस येणाऱ्या रोमन सणाच्या वेळेस वापरण्यात येणारे फेब्रुआ हे वाद्य किंवा शुद्धीकरणाची रोमन देवता फेब्रुअस हिच्यावरून फेब्रुवारी हे नाव पडले आहे. अँग्लो-सॅक्सन लोक याला ‘केल मंथ’ तर इंग्लंडमध्ये याला ‘फिल-डाइक’ म्हणत. फेब्रुवारीच्या २ तारखेस रोमन कॅथलिक लोक कँडल मास दिन आणि १४ तारखेला ख्रिश्चन देशात व्हॅलेंटिन दिन साजरा केला जातो. जमुनिया (ॲमेथिस्ट) हे फेब्रुवारीचे रत्न आणि प्रिमरोझ अथवा व्हायोलेट हे या महिन्याचे फूल मानले जाते. हिंदू पंचागांप्रमाणे फेब्रुवारी सामान्यपणे माघ-फाल्गुनात येतो. फेब्रुवारीच्या १२-१३ तारखेस सूर्य कुंभ राशीत प्रवेश करतो.

ठाकूर, अ. ना.