आयंटहोव्हेन, व्हिलेम : (२२ मे १८६० – २९ सप्टेंबर १९३०). डच शरीरक्रियाविज्ञ. १९२४ सालच्या वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. जावा बेटातील समरांग येथे यांचा जन्म झाला. १८८५ मध्ये ते वैद्यक विषयाचे पदवीधर झाले. त्याच वर्षी लायडन विद्यापीठात वैद्यक व शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी या जागेवर शेवटपर्यंत काम केले.

विजेवर चालणाऱ्या मापन उपकरणांची रचना, विकास व पूर्णता यांसंबंधी त्यांनी संशोधन केले. टांगत्या गॅल्व्हानोमीटरात त्यांनी महत्त्वाची सुधारणा केली. या उपकरणामुळे विजेच्या प्रवाहाची दिशा व त्याचे मान ओळखता येतात. याचा त्यांनी हृदयातील विद्युत् प्रवाहात होणारे फेरफार नोंदण्यासाठी उपयोग केला. विद्युत्-हृद्-लेखन-उपकरण शोधून काढून हृदयाच्या स्नायूंमधील विद्युत् प्रवाहात होणाऱ्या बदलांचे त्यांनी वर्णन केले. हृदयाच्या आकुंचनामुळे उत्पन्न होणारे आवाज नोंदविणारे व मोजणारे उपकरणही त्यांनी शोधून काढले. त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले.

उजवा दंड, डावा दंड आणि जघनास्थि-संधी (जांघेच्या हाडांचा सांधा) यांनी बनलेल्या काल्पनिक समभुज त्रिकोणाच्या मध्यभागी (विद्युत् मूल्याच्या दृष्टीने) हृदय असते असे त्यांनी मानले, म्हणून त्या त्रिकोणाला ‘आयंटहोव्हेन त्रिकोण’ म्हणतात. विद्युत्-हृद्-लेखना-करिता जी विविध ठिकाणे योजिली जातात त्यांपैकी पहिल्या व तिसऱ्या बंधस्थानी मिळून जे विद्युत् वर्चस् (विद्युत् स्थिती) असते ते दुसऱ्या बंधस्थानातील वर्चसाइतकेच असते, असे त्यांनी दाखविले. याला आयंटहोव्हेन सिद्धांत म्हणतात. लायडन येथे त्यांचा मृत्यू झाला.

कानिटकर, वा. मो.