कालव : मॉलस्का ( मृदुकाय प्राण्यांच्या ) संघाच्या बायव्हाल्व्हिया ( शिंपाधारी ) वर्गातील गोडया पाण्यात वा समुद्रात राहणारा द्विपुट कवच असणारा प्राणी. बहुसंख्य कालवे सागरी असून काही गोड्या पाण्यात राहतात. सागरी कालवांना तिसरी असे सामान्य नाव आहे. येथे गोड्या पाण्यातील कालवांची संक्षिप्त माहिती दिली आहे. लॅमेलिडेन्स वंशाच्या कित्येक जाती भारतात सर्वत्र आढळतात.

ओढे, नद्या, तलाव यांतील पाण्याखालील चिखलात किंवा वाळूत कालवे सामान्यत अर्धवट पुरलेल्या स्थितीत राहतात. कालव काहीसे लंबवर्तुळाकार व चपटे असते. शरीर खंडरहित( भाग न झालेले ) व मऊ असून दोन पुटे असलेल्या कठीण कवचात सुरक्षित असते. पुटांचे बाहय पृष्ठ हिरवट तपकिरी असून त्यावर सकेंद्री( समाईक केंद्र असलेल्या ) वृध्दिरेखा असतात. बाहय पृष्ठावर एक चोचीसारखा उंचवटा असून त्याला ककुद म्हणतात. ककुद हा कवचाचा सर्वात जुना भाग असतो. पुटाचे आतले पृष्ठ गुळगुळीत व मोत्यासारखे चमकदार असते व त्यावर स्नायूंचे ठसे असतात. कवच तीन थरांचे असून कायटिन व कॅल्शियम कार्बोनेट यांचे बनलेले असते. दोन्ही पुटांच्या उत्तर कडा बंधनीने अथवा दातांनी एकमेंकीना बिजागरीप्रमाणे जोडलेल्या असतात पुटांच्या अधर( खालच्या ) कड्या सुट्या असतात. पुटांची उघडझाप अभिवर्तनी( अवयव किंवा भाग आतमध्ये अथवा दुसऱ्या भागाकडे ओढणाऱ्या ) स्नायूंमुळे होते. कालवाला डिवचल्यास ते पाद( पाय) आत घेऊन कवचाची पुटे घट्‌ट मिटून घेते. मेलेल्या कालवाची पुटे उघडी असतात. कवचाची पुटे काढून टाकल्यावर कालवाचे शरीर दृष्टीस पडते. सगळे शरीर पातळ प्रावाराने ( त्वचेच्या मऊ घडीने ) झाकलेले असून त्याच्याएका बाजूला एक असे दोन भाग असतात.

आ. १. सामान्य कालवाचे बाह्य दृश्य : (१) ककुद, (२) वृद्धिरेखा.

ते पुटांच्या आतल्या पृष्ठालगत असतात. प्रवाराच्या स्रावापासूनच पुटांचे तीनही स्तर उत्पन्न होतात. प्रावाराच्या दोन भागांच्या आत प्रावारगुहा असून तिच्यात( क्लोम ) कल्ले पाद व इतर अंगे असतात. कवचाच्या पश्च ( मागच्या) टोकशी किंचित बाहेर डोकावणारे अंतर्वाही व बहिर्वाही असे दोन निनाल( नळीसारख्या संरचना ) प्रावारापासून तयार झालेले असतात. अंर्तवाही निनालातून पाणी आत जाते आणि बहिर्वाही निनालातून बाहेर पडते. पाण्याचा प्रवाह क्लोम-दलांवर असलेल्या पक्ष्माभिकांच्या( केसांसारख्या बारीक तंतूच्या ) स्पंदनाने सतत चालू राहाते. आत येणाऱ्या पाण्यातून कालवाला ऑक्सिजन आणि अन्न मिळते, तर उत्सर्ग-पदार्थ व विष्ठा बहिर्वाही निनालातून पाण्याबरोबर बाहेर पडते.

आ. २. पुटाच्या आतल्या पृष्ठावरील स्नायूंचे ठसे : (१) ककुद, (२) बिजागरी, (३) पश्च प्रत्याकर्षक, (४) पश्च अभिवर्तनी, (५) प्रावाररेखा, (६)प्रकर्षक, (७)अग्र अभिवर्तनी, (८)अग्र प्रत्याकर्षक.

पाद अग्र भागाकडे असून स्नायुमय व नांगराच्या फाळासारखा असतो. तो कवचाबाहेर काढता येतो व आत ओढून घेता येतो. पादामूळे कालवाचे चलन होते पण त्याची गती अगदी मंद असते. पाद चिखलात अगर वाळूत घट्‌ट रोवून तो एके जागी स्थिर राहू शकतोत्र आहारनालाचे मुख,ग्रसिका (घशापासून जठरापर्यंत अन्न नेणारी नलिका ),जठर, आंत्र (आतडे), गुदद्वार इ. भाग असून अन्नाचे जठरात पचन होण्याकरिता पाचक रस स्रवणारीपचन ग्रंथीही असते. डायाटम, इन्फ्युझोरिया इ. सूक्ष्म जीव व इतर जैव पदार्थ हे यांचे अन्न होय. आत येणा-या पाण्याच्या प्रवाहातील अन्न मुखाच्या दोन्ही बाजूस असलेल्या ओष्ठीय स्पर्शकांवरील ( संवेदी उपांगांवरील ) पक्ष्माभिकांच्या द्वारे मुखात ढकलले जाते. क्लोम ही मुख्य श्वसनांगे असून शरीराच्या दोन्ही बाजूंना त्यांची एकेक जोडी असते. त्यांना रक्तवाहिन्यामंधून रक्ताचा भरपूर पुरवठा होतो. क्लोमांमधून पाणी वहात असताना वायूंची देवाण घेवाण होते. प्रवाराचाही श्वसनाकरिता थोडाफार उपयोग होतो. परिह्रदयात ( ह्रदयाभोवती असणाऱ्या गुहेत ) असणारे ह्रदय, महारोहिणी, महाशिरा आणि इतर वाहिका यांच परिवहन तंत्र (शरीरात रक्त खेळविणारा व्यूह) बनलेले असते. ह्रदयात दोन अलिंद ( अभिवाही रक्तवाहिन्या निलयाशी जोडणारा ह्रदयाचा अग्र कोष्ठ ) व एक निलय ( ह्रदयाचा मुख्य संकोचशील कोष्ठ ) असतो. रक्त रंगहीन असते. उत्सर्जन तंत्रात परिह्रदाखाली असलेल्या दोन वृक्कांचा मूत्रपिडांचा समावेश होतो. प्रमस्तिष्क (मेंदूच्या पुढच्या भागातील) पार्श्वगुच्छिका, पाद गुच्छिका, आंतरांग-गुच्छिका (गुच्छिका म्हणजे मज्जापेशींचा पुंजका) आणि त्याच्यापासून निघणाऱ्या संयोजी( दोन गुच्छिकांना  जोडणाऱ्या ) व परियोजी ( दोन भागांना जोडणाऱ्या) तंत्रिका (मज्जातंतू ) व त्यांच्या शाखा यांचे तंत्रिका तंत्र ( मज्जासंस्था ) बनलेले असते.

आ. ३. कालवाची आंतर संरचना : (१) अग्र महारोहिणी, (२) निलय, (३) आलिंद, (४)पश्च महारोहिणी, (५) मलाशय, (६)गुदद्वार, (७) पश्च अभिवर्तनी, (८) आंतरांग-गुच्छिका, (९) उत्तर निनाल, (१०) अधर निनाल, (११) क्लोम, (१२) प्रावार, (१३) वृक्क, (१४) पाद, (१५)जनन ग्रंथी, (१६) पाद-गुच्छिका, (१७) ओष्ठीय स्पर्शक, (१८) मुख, (१९) प्रमस्तिष्क-गुच्छिका, (२०)अग्र अभिवर्तनी, (२१) जठर, (२२) पचनग्रंथी, (२३) आंत्र.


कालवात ज्ञानेद्रिंये थोडीच असून त्यांचा विशेषसा विकास झालेला नसतो. आत येणाऱ्या पाण्याची परीक्षा करण्याकरिता आंतराग-गुच्छिकेजवळ जलेक्षिका( पाण्याचे परीक्षण करणारे ज्ञानेंद्रीय )असते प्रत्येक पाद-गुच्छिकेला लागून शरीराचा तोल सांभाळण्याकरिता कधीकधी एक संतुलनपुटी(शरीराचा तोल सांभाळणारे ज्ञानेंद्रिय) असते त्याचप्रमाणे स्पर्श व प्रकाशसंवेदनाकरिता संवेदी कोशिका (पेशी) असतात.

गोड्या पाण्यातील कालवे एकलिंगी असून वृषण( पुं-जनन ग्रंथी ) पांढुरके तर अंडाशय किंचित लालसर असतात.

आ. ४. मुक्त ग्लोकीडियम डिंभ : (१) अस्थायी सूत्र, (२) अंकुश, (३) ज्ञानेंद्रिये, (४) कवच-पुट, (५) अभिवर्तनी स्नायू.

 अंडी पक्व झाल्यावर ती अवस्करात( आतडे,मुत्र व जनन-वाहिन्या एकत्र उघडणाऱ्या शरीराच्या मागील भागातील समाईक कोष्ठात ) जमा होतात व तेथेच पाण्यातून आलेल्या शुक्राणूंमुळे त्यांचे निषेचन ( फलन ) होते. निषेचित अंडी बाह्य क्लोम-दलांच्या गुहांत जमा होतात. तेथे त्यांची वाढ होऊन शेवटी ग्लोकीडियम डिंभ [ विकासातील एक अवस्था → डिंभ] तयार होतो. अशा प्रकारे बाह्य क्लोमदलांच्यागुहा भु्रण कोष्ठाचे कार्य करतात. ग्लोकीडियम डिंभाला द्विपुट कवच, दात, स्नायू चिकटण्याकरीता एक लांब सूत्र, शूकगुच्छ (राठ केसासारखा झुपका) इ. संरचना असतात. कालांतराने हे डिंभ कालवातून बाहेर पडून माशांच्या त्वचेला, परांना (हालचालीस उपयुक्त असणाऱ्या स्नायुमय त्वचेच्या घड्यांना) किंवा क्लोमांना चिकटतात. या ठिकाणी परजीवी म्हणून जगत असताना त्यांचे पुटीभवन (कवच तयार होण्याची क्रिया) होते आणि काही काळानंतर कालवांत रूपांतरण होते. 

पहा : बायवहाल्व्हिया मॉलस्का.

परांजपे, स.य