चेबिशॉव्ह, पफ्नूट्यई ल्यूव्हॉव्ह्यिच: (२६ मे १८२१ – ८ डिसेंबर १८९४). रशियन गणितज्ञ. त्यांचा जन्म ओकाटोव्हो येथे झाला. मॉस्को विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर १८५९–८० या काळात ते सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक होते. अविभाज्य संख्येसंबंधीचे त्यांचे लिखाण सुप्रसिद्ध असून ठराविक मर्यादेपर्यंत किती अविभाज्य संख्या येतात याविषयीचे त्यांनी मांडलेले गणित मनोरंजक आहे. गतीचे संक्रमण करण्यासाठी चार वा अधिक दंड एकमेकांना जोडून तयार केलेल्या शृंखलेच्या साहाय्याने सरल गती निर्माण करण्याच्या प्रश्नावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित करून तीन दंडांच्या शृंखलेच्या साहाय्याने ‘चेबिशॉव्ह समांतर गती’ म्हणून ओळखली जाणारी व जवळजवळ बरोबर असणारी सरल गती त्यांनी मिळविली. जात्य फलने[→ फलन], समाकलनाची उपपत्ती [→अवकलन व समाकलन], संख्या सिद्धांत, दंतचक्र, भूगोलीय नकाशे तयार करण्याच्या कृती, घनफळ काढण्याची सूत्रे इ. विषयांवरील त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे. संभाव्यता सिद्धांतातील केंद्रीय सीमा प्रमेय व मोठ्या संख्यांचा नियम यांसंबंधीचे त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे ठरले आहे [→संभाव्यता सिद्धांत]. त्यांनी १८८० च्या सुमारास प्राथमिक गणितकृत्ये करणारे एक संगणक यंत्र तयार केले होते. पीटर्झबर्ग ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्स, लंडनची रॉयल सोसायटी, बर्लिन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस इ. संस्थांचे ते सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लिखाण फ्रेंचमध्ये (१८९९–१९०७) आणि रशियनमध्ये (१९४६–५१) पाच खंडांत प्रसिद्ध झाले. ते सेंट पीटर्झबर्ग येथे मृत्यू पावले.

मिठारी, भू. चिं.