आ. १. शिश्नाचा उभा छेद : ( १, १ ) कुहरी कंद, ( २ ) छिद्रिष्ट कंद, ( ३ ) मूत्रमार्ग, ( ४ ) शिश्नमणी, ( ५ ) शिश्नमणिच्छद.

शिश्न : पृष्ठवंशी प्राण्यांच्या नरांमधील बाह्य जननेंद्रियाचा जो भाग वीर्यसेचन आणि मूत्राचे उत्सर्जन यांसाठी उपयोगात येतो, त्याला शिश्न म्हणतात. इतर प्राण्यांच्या अशाच स्वरुपाच्या पण मूत्रमार्गाचा समावेश नसलेल्या इंद्रियाला शिश्नक अशी संज्ञा आहे.

रचना व कार्य: मानवी शिश्नाचे मूळ, मुख्यांग व शिश्नाग्र असे तीन भाग करता येतील. मूत्राशयाच्या खालच्या बाजूस असलेल्या तीन कंदकार ऊतक पुंजांचे मिळून मूळ बनते. यांपैकी मध्यभागी असलेल्या छिद्रिष्ट कंदामध्ये (कायामध्ये) मुत्राशयापासून सुरू झालेल्या मूत्रमार्ग प्रवेश करतो व त्यातून शिश्नाच्या टोकापर्यंत जातो. ओटीपोटाखाली लोंबणाऱ्या शिश्नाच्या दृश्य भागामध्ये (मुख्यांगात) लांबट गोलाकार छिद्रिष्ट ऊतक मागील बाजूस किंवा अधर स्थित असते. इतर दोन कंदांपासून सुरू झालेले–उजवा व डावा–लांबट दंडगोलाकार ऊतक काय (कुहर काय) पुढील बाजूस म्हणजे पृष्ठस्थित असतात. त्यांची व्याप्ती शिश्नाग्राच्या अलीकडेच संपते.

शिश्नाग्राच्या भागात छिद्रिष्ट काय छत्रीसारखा पसरतो व त्याचे रुपांतर शिश्नमण्यात होते. त्याच्याच अधरीय पृष्ठभागावर टोकाशी मूत्रमार्गाचे लांबट फटीसारखे बाह्यद्वार असते.

संपूर्ण शिश्नात तीनही कायांभोवती प्रत्यास्थ (लवचिक) ऊतक-तंतूंच्या वर्तुळाकार धाग्यांनी विणलेले एक आवरण आढळते. त्यावर गडद रंगाच्या त्वचेचे सैलसे आच्छादन असते. शिश्नाग्राच्या भागात त्वचेची एक बाहीसारखी घडी शिश्नमण्यावर पसरलेली असते. या घडीखालील (शिश्नमणिच्छदाखालील) ग्रंथींमधून निघणारा शिश्नमल हा स्राव त्वचेची शिश्नमण्यावर होणारी सरकती हालचाल सुलभतेने घडवून आणतो.

रक्तपुरवठा वाढल्यावर फुगून ताठ होणाऱ्या उत्थानक्षम ऊतकांनी तीन कायांची अंतर्गत रचना घडलेली असते. या ऊतकांत विस्तीर्ण रिकाम्या पोकळ्या (कुहरे) असतात. त्यांचे लहानलहान पिशव्यांमध्ये विभाजन करणारे पातळ पडदे असतात. लवचिक ताणले जाणारे कोलॅजेन तंतू आणि सूक्ष्म स्नायुतंतू यांनी ते बनलेले असतात.

परानुकंपी तंत्रिका तंत्राच्या [⟶ तंत्रिका तंत्र] श्रोणीय तंत्रिकेतून येणाऱ्या आवेगांमुळे नायट्रिक ऑक्साइड या रासायनिक मध्यस्थ द्रव्याची निर्मिती होऊन या उत्थानक्षम ऊतकांतील रोहिणींचे विस्फारण होते व या ऊतकांचा रक्तपुरवठा वाढतो. कुहरांमध्ये वाढलेल्या रक्तसाठ्यामुळे नीलांवर दाब पडून रक्ताचे निस्सारण (निचरा) बंद होऊन दाब अधिक वाढतो व कुहर काय ताठ होतात. छिद्रिष्ट कायामध्ये कुहरे कमी ब सूत्रल ऊतक अधिक असल्यामुळे उत्थानक्षमता त्यामानाने कमी असते व तशा अवस्थेतील रक्तप्रवाह सुरळीत चालू असतो. लैंगिक उद्दीपनामुळे सुरू झालेली ही उत्थान प्रक्रिया मैथुनाच्या परमोच्चबिंदूपाशी पोहोचल्यावर अनुकंपी तंत्रिकामुळे रेताशयांचे आकुंचन होऊ लागते. रेताचे उत्सर्जन मूत्रमार्गावाटे होते व त्याच वेळी उत्थान प्रक्रिया थांबून कुहर कायांचा रक्तपुरवठा जवळजवळ पूर्णपणे थांबल्यामुळे आणि निचरा होऊ लागल्याने शिश्न शिथिल होते.

विकास व वाढ : भ्रूणाच्या चौथ्या आठवड्यातील अवस्थेपासूनच पुरुषगर्भाचे शिश्न आणि स्त्रीगर्भाची शिश्निका यांचा भिन्न पद्धतींनी विकास होऊ लागतो. शिश्नजनक ऊतकांची वाढ मूत्रमार्गाच्या नलिकेभोवती पसरून मूत्रमार्ग पूर्णपणे शिश्नात समाविष्ट होतो. सुमारे सातव्या आठवड्यात आद्य जननेंद्रिय गुलिका टेस्टोस्टेरॉन या पुं-हॉर्मोनाची (नर संप्रेरकाची) निर्मिती करू लागते. त्याच्या पुरेशा स्रावावर पुढील वाढ अवलंबून असते. बाल्यावस्थेत वाढीचा वेग शरीराच्या इतर भागांप्रमाणेच असतो. पौगंडावस्थेच्या आरंभी, १२ ते १४ वर्षांपर्यंतच्या वयात हा वेग वाढून शिश्नाचे प्रौढ स्वरूप दिसू लागते. त्याच वेळी होणाऱ्या मानसिक बदलांमुळे मुलाला लैंगिक क्रियांमध्ये अधिक स्वारस्य वाटू लागते. पोष ग्रंथी, तृतीय नेत्र ग्रंथी आणि अधिवृक्क यांच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा अर्बुदांमुळे (पेशींच्या अत्यधिक वाढीने बनलेल्या व शरीरास निरुपयोगी असलेल्या गाठींमुळे) पौगंडावस्थेतील शिश्नाची वाढ कमी किंवा जास्त वेगाने होऊ शकते.

आ. २. शिश्नाच्या मुख्यांगाचा आडवा छेद: (१) त्वचा, (२) त्वचेखालील सैल ऊतक, (३,३) कुहर काय, (४, ४) कुहर कायातील मध्यवर्ती रोहिणी, ५) छिद्रिष्ट काय, (६) मूत्रमार्ग, (७) उत्थानक्षम ऊतकांभोवती असलेली गभीर प्रावरणी.

दोष व विकार : उपजत दोषांपैकी शिश्नमणिच्छदाचे संकोचन हा दोष सर्वाधिक आढळतो. निरुद्धमणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या दोषात त्वचा मागे ओढणे अशक्य झाल्यामुळे मूत्रमार्गद्वार पूर्णपणे मोकळे रहात नाही व लघवीस अडथळा होतो. त्वचेचा शिश्नमण्यावरील भाग शस्त्रक्रियेने पूर्णपणे काढून टाकणे हाच त्यावर सोपा उपाय ठरतो. ⇨सुंता किंवा परिच्छेदनाची ही शस्त्रक्रिया काही समाजांमध्ये (उदा., मुस्लिम, ज्यू) धार्मिक आदेशानुसार सरसकट सर्वच लहान मुलांसाठी आवश्यक मानली जाते. मूत्रद्वाराचे तोंड अधरीय पृष्ठभागावर जास्त पसरलेले असणे, द्वाराचा अवरोध, मूत्रमार्गाच्या मधल्या भागाचा अवरोध यांसारखे उपजत दोषही कधीकधी आढळतात.

प्रौढावस्थेत लैंगिक संबंधातून होणारी संसर्गजन्य संक्रामणे महत्त्वाची ठरतात. यांत ⇨उपदंश म्हणजेच गरमीमध्ये शिश्नाच्या पृष्ठभागावर होणारा वेदनाहीन रतिव्रण आणि ⇨परमा किंवा पूयप्रमेहामुळे निर्माण होणारा पूययुक्त मूत्रमार्गशोथ (मूत्रमार्गाची दाहयुक्त सूज) हे अधिक गंभीर असतात. उपदंशासारखीच परंतु मृदू असा रतिव्रणाभ आणि वंक्षण कणार्बुध हे कमी गंभीर असतात. या सर्व संसर्गांवर पेनिसिलीन किंवा अन्य प्रतिजैव पदार्थांच्या मदतीने वेळीच उपचार केल्यास सार्वदेहिक परिणाम टाळता येतात.

एड्स [AIDS ⟶ रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग] या लैंगिक संक्रमणात शिश्नावर कसलेही चिन्ह अथवा लक्षण आढळत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. व्यक्तिगत शारीरिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शिश्नमणिच्छदाखाली स्राव साठून तेथे जंतुजन्य शिश्नाग्रशोथ होणे लैंगिक संबंधाशिवायही शक्य असते. शिश्नाग्राची त्वचा किंवा तिच्याखालच्या छिद्रिष्ट कायाचा अंतिम भाग यांमध्ये अधिस्तरार्बुध या कर्करोगाची वाढ होऊ शकते. त्याची द्वितीयक वृद्धी जांघेतील लसिका ग्रंथीत [⟶ लसिका तंत्र] दिसू लागते. लहानपणीच सुंता केलेल्या व्यक्तींमध्ये असे अर्बुद क्वचितच निर्माण होते.

पूर्णपणे निर्दोष रचना असलेल्या पुरुषात कधीकधी कार्यात्मक उणिवेमुळे शिश्न अंशतः आणि पूर्णतः उत्थानहीन असते. हॉर्मोनांची कमतरता, तंत्रिकीय दोष, मधुमेहासारखे चयापचयी (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींशी निगडीत) विकार, औषधांचे दुष्परिणाम अथवा केवळ मानसिक कारणे यांमुळे अशी षंढता येऊ शकते. योग्य त्या उपचारांनी ती बरी होणे शक्य असते. श्वेतकोशिकार्बुद, दात्रकोशिका पांडुरोग, इतरत्र असलेल्या अर्बुदांपासून होणारी द्वितियक वाढ किंवा मानसिक कारणांमुळे आलेले नपुंसकत्व यांसारख्या विकारांमध्ये लैंगिक उद्दीपन नसतानाही दीर्घकाळ टिकणारे, वेदनापूर्ण उत्थान कधीकधी दिसून येते. अशा रीतीने शिश्नात दिसणारी लक्षणे शरीरातील इतरत्र आढळणाऱ्या

विकारांची निदानकारक चिन्हे ठरु शकतात. [⟶ लैंगिक वैगुण्ये].

इतर पृष्ठवंशी प्राण्यांतील शिश्नरचना : वर मुख्यतः मानवी शिश्नाचे वर्णन आले असून ते उच्चतर पृष्ठवंशी सस्तन प्राण्यांना पुष्कळसे लागू पडते. सस्तन प्राण्यांव्यतिरिक्त इतर पृष्ठवंशी प्राण्यांत शिश्न एवढे विकसित झालेले नसते. उदा., मगर, कासव व काही पक्षी यांच्यातील शिश्न मूलतः सस्तन प्राण्यांतील शिश्नासारखे पण अल्पविकसित असते. असे शिश्न अवस्कर नावाच्या कोटरात (कप्प्यात) असते. उद्दीपित झाल्यावर असे शिश्न अवस्करातून बाहेर येते व मैथुनक्रियेत सहभागी होते.

बहुतेक पक्ष्यांत शिश्न अल्पविकसित असते किंवा नसतेही, मैथुनक्रियेच्या वेळी नरमादींचे अवस्कर एकमेकांलगत येतात व त्यांच्यावर दाब दिला जातो. बदके, हंस यांसारख्या काही थोड्या पक्ष्यांत शिश्न वलयाकार असते. मादीच्या अवस्काराच्या एका बाजूवर असलेल्या लैंगिक छिद्रापर्यंत शिश्न पोहोचण्याचा दृष्टीने हा आकार साजेसा झालेला आहे.

सरपटणाऱ्या प्राण्यांत नराच्या अवस्करातून शिश्न बहेर येऊन मादीच्या अवस्करात जाते आणि शिश्नाच्या पृष्ठभागावरील खोबणीतून वीर्य वाहत जाते. साप, पाली, सरडे यांच्या मैथुनांगात अवयवांची एक जोडी असते. या अगदी वेगळ्या अवयवांना अर्धशिश्न (हेमिपेनिस) म्हणतात. कोशासारखे हे अवयव अवस्कराच्या पश्च भित्तीत असतात. प्रवेशी अंग म्हणून हे अवयव कार्य करतात व ते आतून बाहेर वळू शकतात. त्यांच्यात उत्थानक्षम ऊतक नसते आणि ते स्नायूंद्वारे आत ओढून घेतले जातात.

इतर पृष्ठवंशी प्राण्यांत शिश्न नसले, तरी शिश्नाचे कार्य करणारे अवयव त्यांच्यात असू शकतात. उदा., शार्क माशाच्या श्रोणिपक्षावरील घट्ट आवळून धरणारे आलिंगक भाग, ठराविक अस्थिमत्स्यांच्या गुदपक्षावरील युग्मक पाद (गोनोपोडिया) वगैरे. काही कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या शिश्नात बारीक हाड असून त्यामुळे शिश्नाला बळकटी येते.

पहा : जनन तंत्र.

संदर्भ : 1. Guyton, A. C. Hall, J. E. Textbook of Medical Physiology, Philadelphia, 1996.     

          2. William, P. L.  Warwich, R., Eds., Gray’s Anatomy, London, 1989.

                                                                 श्रोत्री, दि. शं.