बरॅकपूर : कलकत्त्याचे हे उपनगर प. बंगाल राज्याच्या चोवीस परगणा जिल्ह्यात आहे. लोकसंख्या ९६,८८९ (१९७१). ‘चानक’ हे त्याचे स्थानिक नाव. बरॅकपूर कलकत्त्याच्या उत्तरेस २४ किमी., हुगळी नदीच्या पूर्व काठावर वसले असून ते रस्ते व लोहमार्ग यांनी कलकत्ता व भाटपाडा या शहरांशी जोडलेले आहे.

ब्रिटिश अमदानीत ‘बरॅकपूर पार्क’ येथे व्हाइसरॉयचे निवासस्थान होते. ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या काळापासून येथे लष्करी छावण्या (बराकी) होत्या. म्हणूनच १७७२ पासून या भागाचे नाव ‘बरॅकपूर’ असे पडले. ⇨ब्रह्मी युद्धाच्या वेळी बंगाली सैन्याचा बंडाला या शहरातूनच सुरूवात झाली (१८२४). ⇨अठराशे सत्तावनचा उठाव ज्या काडतूस-प्रकरणामुळे झाला ते प्रकरण येथील छावण्यांतच उद्‌भवले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात येथे अमेरिकेचा हवाई तळ होता.

शहरात १८६९ साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. परंतु टिटाघर आणि पनिहाटी येथील नगरपालिकांच्या स्थापनेमुळे (अनुक्रमे १८९५ व १९००) बरॅकपूरचे क्षेत्र कमी करण्यात आले. शहराचे उत्तर, दक्षिण व त्यांदरम्यानचे कँटोनमेंट असे तीन भाग आहेत. शहरात भात सडणे, तागावर प्रक्रिया करणे तसेच लाकूड कापणे, विणमाल इ. उद्योग चालतात. येथे घोड्यांच्या शर्यतींचे मैदान, विमानतळ, सरकारी कृषिसंस्था, कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेली तीन महाविद्यालये इ. सोयी उपलब्ध आहेत.

चौंडे, मा. ल.