ललितपूर-१ : उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे तसेच तालुक्याचे मुख्यालय व अन्नधान्याची बाजारपेठ. लोकसंख्या ५६,४१७ ( १९८१ ). हे राज्याच्या दक्षिण भागात, झांशीच्या दक्षिणेस सु. ८८ किमी. वर शाहजादा नदीकाठी ( बेटवा नदीची उपनदी ) वसलेले असून रस्ते, लोहमार्गांनी झांशी व भोपाळ या शहरांशी जोडलेले आहे.

  

दक्षिणेकडून आलेल्या राजा सुमेरसिंगाची पत्नी ‘ललिता’ हिने हे शहर वसविले म्हणून त्याला ‘ललितपूर’ हे नाव देण्यात आले असे सांगितले जाते. सोळाव्या शतकात राजपूत सरदार गोविंद बुंदेला व त्याचा मुलगा रुद्रप्रताप यांनी हे शहर गोंडांकडून घेतले. त्यानंतर सु. १०० वर्षांनी या शहराचा समावेश चंदेरीच्या बुंदेले राज्यात करण्यात आला. १८०० च्या सुमारास येथे बुंदेले व मराठे यांच्यात मोठी लढाई होऊन ललितपूर शहर मराठ्यांच्या ताब्यात गेले. पुढे ब्रिटिशांनी केलेल्या जिल्हाविभागणीत हे शहर १८४४ मध्ये चंदेरी जिल्ह्याचे मुख्यालय करण्यात आले व १८६१ मध्ये शहराचे नाव जिल्ह्याला देण्यात आले. १८७० मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. १८९१ मध्ये झांशी व ललितपूर हे जिल्हे एकत्र करण्यात येऊन ललितपूरचा समावेश झांशी जिल्ह्यात झाला व हे शहर जिल्ह्यातील एका पाटविभागाचे मुख्य ठाणे करण्यात आले. १९७७ पासून ललितपूर हा वेगळा जिल्हा होऊन त्याचे ललितपूर हे मुख्यालय ठेवण्यात आले आहे (१९८१ ).

  

शहराजवळच शाहजादा नदीवर १२ मी. उंचीचे धरण बांधण्यात आलेले असून जिल्ह्यातील शेतजमिनीला त्याचा लाभ झाला आहे. ललितपूर शहर कडधान्ये, तेलबिया, कातडी, सुकविलेले मांस, तूप यांच्या व्यापारासाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. शहरात चंदेल्लांच्या काळातील मंदिरांचे अवशेष तसेच जैन मंदिरे असून वायव्येस सु. १८ किमी.वरील सिरोन येथे सापडलेल्या इ. स. ९०७ मधील शिलालेखावरून हा भाग काही काळ कनौजच्या आधिपत्त्याखाली होता, असेदिसते. परिसरातील पुरातत्त्वीय अवशेषांमुळे या शहराला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.

  

चौडे, मा. ल.