गॅस्ट्रोट्रायका : हा सूक्ष्म प्राण्यांचा एक समूह असून तो ॲस्केलमिंथिस संघातील एक वर्ग मानला जातो. पुष्कळ शास्त्रज्ञांना हे वर्गीकरण मान्य नसून ते त्याला स्वतंत्र संघाचा दर्जा देतात. या समूहात सु. २०० जाती आहेत. काही जाती सर्व जगभर आढळतात. यांच्या काही जाती गोड्या पाण्यात आणि काही समुद्रात राहणाऱ्या असून त्या बहुधा शैवलांत आढळतात. कीटोनोटस मँक्झिमस ही एक प्रारूपिक (नमुनेदार) जाती आहे.

शरीर ०·०६–०·५ मिमी. लांब असते सगळे शरीर उपत्वचेने (बाह्यत्वचेवर असणाऱ्या निर्जीव संरक्षक स्तराने) आच्छादिलेले असून तिच्यावर लहानमोठे कंटक असतात. शरीर सडपातळ व लवचिक असते. वरचे पृष्ठ कमानदार आणि खालचे (अधर) सपाट असते. अधर पृष्ठावर पक्ष्माभिकांच्या (हालचालीस उपयोगी पडणाऱ्या केसासारख्या वाढींच्या) दोन अनुदैर्घ्य (उभ्या) ओळी असतात. या पक्ष्माभिकांचा उपयोग हळूहळू घसरत जाण्याकरिता होतो. पश्च (मागचे) टोक द्विशाखित असून प्रत्येक शाखेत एक संश्लेष ग्रंथी (एक प्रकारचा चिकट पदार्थ उत्पन्न करणारी ग्रंथी) असते. या ग्रंथीच्या स्रावाने हा प्राणी एखाद्या पदार्थाला तात्पुरता चिकटू शकतो.

कीटोनोटस (गॅस्ट्रोट्रायका) : (१) मुख-संपुट, (२) संवेदी रोम, (३) ग्रसनी, (४) जठरआंत्र, (५) उपत्वचीय कंटक, (६) द्विशाखपुच्छ.

सूक्ष्म वनस्पती व प्राणी हे यांचे भक्ष्य होय. पोहत असतानाच बहुतेक प्राणी आपले भक्ष्य गिळतात. मुख अग्र (पुढच्या) टोकाशी असून ते शूकांनी (लहान राठ केसांसारख्या रचनांनी) आणि सूक्ष्म संवेदी केसांनी वेढलेले असते ते स्‍नायुमय ग्रसनीत (मुखगुहेच्या मागे असलेल्या अन्ननलिकेच्या स्‍नायुमय भागात) उघडते. आंत्र (आतडे) सरळ आणि साधे असून गुदद्वाराने पश्च टोकावर उघडते. देहगुहेला (शरीरातील पोकळीला) विशेष प्रकारचे अस्तर नसते. सामान्यतःअनुदैर्घ्य स्‍नायूंच्या सहा जोड्या असतात. वृक्कक (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारी नळीसारखी इंद्रिये, उत्सर्जनांगे) दोन असून कुंडलित (वेटोळी पडलेली) असतात. त्यांची सुरुवात ज्वालाकोशिकांपासून (पोकळ आणि आत सतत हालत असलेल्या पक्ष्माभिकांचा जुडगा असतो अशा उत्सर्जक कोशिकांपासून) होते आणि ते गुदद्वाराजवळ अधर पृष्ठावर उघडतात. अग्रभागात एक तंत्रिका-गुच्छिका (ज्याच्यापासून मज्‍जातंतू निघतात असा मज्‍जांचा पुंजका) असून तिच्यापासून दोन पार्श्व अनुदैर्घ्य तंत्रिका निघालेल्या असतात आणि संवेदी केसांना तंत्रिका तंतू गेलेले असतात.

गोड्या पाण्यात राहणाऱ्या जातीत नर नसतात सगळ्या माद्याच असतात. यामुळे नवीन जीवांची उत्पत्ती अनिषेकजननाने (शुक्राणूचा अंड्याशी संयोग न होता अंड्यापासून नवीन प्राणी तयार होण्याच्या क्रियेने) होते. समुद्रात आढळणाऱ्या जाती उभयलिंगी  (द्विलिंगी) असतात. अंडाशयाने देहगुहेचा बराच भाग व्यापिलेला असतो. अंडाशयापासून एक ते पाच मोठी अंडी उत्पन्न होतात त्यांचे कवच चिवट असते काही अंड्यांवर आकडे असल्यामुळे ती पाण्यातील पदार्थांत अडकतात. विकास सरळ असून अंड्यातून बाहेर पडणारे पिल्लू प्रौढासारखेच पण लहान असते.

पहा: ॲस्केलमिंथिस.

कर्वे, ज. नी.