महायुद्ध, दुसरे : (१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५). या दुसऱ्या  जागतिक महायुद्धाचा पाया पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस घातला गेला. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध आटोपले. १८ जानेवारी १९१९ रोजी पॅरिस येथे शांतता परिषद झाली. २८ जून १९१९ रोजी झालेला ⇨व्हर्सायचा तह याच्या कडक अटींचा तडाखा म्हणजे त्यांच्या पराजयाच्या खोल जखमेवर चोळलेले मीठ होते, या तहामुळे सगळ्या वसाहती गमवाव्या लागल्या. पहिल्या महायुद्धात काबीज केलेल्या ॲल्सेस-लॉरेन प्रांत परत द्यावा लागला. झार प्रांताला १९३९ सालापर्यंत आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. डॅन्झिग हे मुक्त शहर म्हणून जाहीर करण्यात आले. ऱ्हाईन खोऱ्यातील सुपीक व समृद्ध प्रदेश दोस्तांच्या काबूत गेला. हानीपूर्तीची रक्कम ६ अब्ज पौंड ठरविण्यात आली तिची फेड झाली नाही म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष प्वँकारेच्या अमदानीत ११ जानेवारी १९२३ रोजी कोळसा, लोखंड व उद्योग यांनी समृद्ध असलेला रूर प्रांत फ्रांन्स ताब्यात घेतला आपण हारलो हा जर्मन राष्ट्राला आश्चर्याचा व नामुष्कीचा धक्का होता. त्यामुळे १९२० साली स्थापन केलेल्या नाझी पक्षाचा पुढारी ⇨ॲडॉल्फ हिटलरने व्हर्साय तहाला गुलामगिरीचा तह म्हटले. या तहामुळे चिडलेल्या जर्मनांचा संताप पंधरा वर्षांच्या आत हिटलरने शिगेला पोहचविला.

राष्ट्रसंघ १९२० साली स्थापन झाला होताच. या संघासमोर राष्ट्राराष्ट्रांतील झगडे युद्धापूर्वी आणावयाचे ठरले. आर्थिक व लष्करी अणुशक्तीचे पाठबळ कागदावर असले, तरी अमेरिकेच्या अनुपस्थितीमुळे हा संघ पहिल्यापासून कमकुवत व अपरिणामकारी राहिला आणि सुरूवातीपासून अपयशाचा वाटेकरी ठरला.

जर्मनीच्या व इटलीच्या पराभवानंतर त्यांची लढाऊ वृत्ती पराजयामुळे वाढत गेली तर जय मिळून देखील झालेल्या अवाढव्य खर्च व मनुष्यहानी यांमुळे अमेरिका यूरोपीय झगड्यापासून अलिप्त राहिली. ब्रिटनमध्ये शांतताप्रेम, तर फ्रान्समध्ये निष्क्रियता व निष्फळवृत्ती आली. याचा परिणाम असा झाला की दोस्त राष्ट्रांत विशेषतः फ्रान्स व इंग्लंडमध्ये कसेही करून शांतता राखण्याची वृत्ती निर्माण झाली पण या वृत्तीचा फायदा जर्मन व इटलीने वाढत्या आक्रमणात तसेच आपली युद्धशक्ती वाढविण्यात करून घेतली. पहिले व दुसरे महायुद्ध या कालखंडात झालेल्या मुख्य घडामोडी लक्षात घेतल्या, की आंतरराष्टीय तारू दुसऱ्या महायुद्धाच्या खडकावर कसे अचूक जात होते ते लक्षात येईल.

या घडामोडींबरोबरच जापानची पूर्व व आग्नेय आशियावर आधिपत्य मिळविण्याची ईर्षा तसेच खटपट लक्षात घेतली पाहिजे. रशियासारख्या बलवान राष्ट्राचा पराभव (१९०४−०५) केल्यानंतर जपानची महत्त्वकांक्षा वाढतच गेली व संधी मिळताच पूर्वेवरील आधिपत्याकरिता तयारी करण्यास त्याने सुरूवात केली.

ॲडॉल्फ हिटलर, नाझीपक्ष व जर्मन जनता : युद्धोत्तर मंदीचा जर्मनीस मोठा फटका बसला होता ९० लाख व्यक्ती १९३१-३२ मध्ये बेकार होत्या कित्येक मध्यमवर्गियांचे दिवाळे निघाले होते. माझा लढा (Mein Camf) या हिटलरच्या पुस्तकातील विचारसरणी जर्मन जनतेला पूर्णपणे पटली. १९३२ पर्यंत हिटलरने स्थापिलेल्या नाझी पक्षास १४० लाख मतांचा पाठिंबा मिळाला. १९३३ रोजी हिटलरला जर्मनीचे पंतप्रधानपद (चॅन्सेलर) मिळाले. १९३३ च्या ‘राइस्टाग’च्या आगीनंतर जर्मनीतील ज्यू, उदारमतवादी, समाजवादी व कम्युनिस्टांविरूद्ध प्रचंड मोहिम नाझींनी सुरू केली. सैन्याच्या मदतीने नाझी पक्षाच्या या सैन्यसदृश्य संघटनेविरूद्ध ३० जून १९३४ रोजी कत्तलची रात्र (नाइट ऑफ द लाँग नाइव्हज) पुकारण्यात येऊन शेकडो ‘ब्राऊनशर्ट’ यांची कत्तल करण्यात आली. त्यात ब्राऊनशर्ट-प्रमुख कॅप्टन रोएम, जनरल फॉन श्लाय्खर व त्यांची पत्नी इ. होते. नव्या नाझी राजवटीत ⇨गेस्टापोचा जाच, ⇨दहशतवाद इ. प्रकार रोजचे होऊन बसले. मार्च १९३८ मध्ये हिटलरने ऑस्ट्रियाचे जर्मनीत जबरदस्तीने विलीनीकरण केले. पोलंडचा मेमल प्रांतही जर्मनीत विलीन केला. (२३ मार्च १९३८) आणि त्याबरोबरच डॅन्झिगची व दळणवळणासाठी छन्नमार्गाची धमकावणीयुक्त मागणी पोलंडकडे केली. हिटलरचे जबदस्ती धोरण व विलीनीकरण कारवाया पाहून ब्रिटन व फ्रान्स यांनी पोलंडबरोबर परस्पर साहाय्याचा करार केला (एप्रिल १९३९). तत्पूर्वी यूरोपात शांतता राहावी या उद्देशाने, ब्रिटन व फ्रान्सने २९ सप्टेंबर १९३८ रोजी हिटलरबरोबर म्यूनिक येथे ‘म्यूनिक करार’ केला. या करारान्वये चेकोस्लोव्हाकियाला सूडेटनलँड हा जर्मन भाषिकांचा प्रांत गमवावा लागला. चेकोस्लोव्हाकियाचा उर्वरित प्रदेश १०−१६ मार्च १९३९ या काळात जर्मनीला जोडण्यात हिटलर यशस्वी ठरला.

जर्मन रणगाडा (पँझर) दलाचे पोलंडवरील आक्रमण

पोलंडवर स्वारी : (१८ सप्टेंबर १९३९). पोलंडच्या स्वारीकरिता हिटलरने रशियाबरोबर दोस्ती केली होती (२५ ऑगस्ट १९३९). या शांतताप्रिय राष्ट्रावर हिटलरने स्वारी केल्यावर (१ सप्टेंबर १९३९) मात्र फ्रान्स व ब्रिटनला स्वस्थ बसणे शक्य नव्हते. ३ सप्टेंबर १९३९ रोजी सकाळी ११ वाजता ब्रिटनने व सायंकाळी ५ वाजता फ्रान्सने जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारले पण यामुळे पोलंडवरील आक्रमणावर काही परिणाम झाला नाही. कारण त्या देशाची मित्रराष्ट्रे त्यापासून फार दूर होती. १८ दिवसांत पोलंडची मोहीम संपली. १९ सप्टेंबर रोजी जर्मनी व रशियामध्ये पोलंडची वाटणी झाली. ६ ऑक्टोबरपर्यंत पोलंडचा प्रतिकार पूर्णपणे नष्ट झाला. पोलिश सरकार १८ सप्टेंबरलाच रूमानियात पळून गेले होते. ९ चिलखती डिव्हिजनविरूद्ध पोलंड अवघे १२ ब्रिगेड (जर्मनीच्या १/२ पेक्षा कमी) व थोडे हलके रणगाडे उभे करू शकले. जर्मन आरमाराने बाल्टिक समुद्राची नाकेबंदी केली होती. जर्मनीचे ⇨तडित् युद्धतंत्र या पोलंडला ठाऊक नसलेल्या रणनीतीने जर्मनीला त्याचा निःपात करणे सहज शक्य झाले. पूर्वेकडून रशियाच्या चढाईमुळे पोलंडचा पराभव झटपट झाला.

  फिनलंडवरील रशियाच्या सतत बाँबवर्षावामुळे भयभीत झालेली बालकेरशियाची फिनलंडवरील स्वारी : (३० नोव्हेंबर १९३९−१३ मार्च १९४०). रशियाची फिनलंडवरील स्वारी हा दुसऱ्या

महायुद्धाचा एक पार्श्वफलक म्हटला पाहिजे. युद्धनीतीकरिता आपल्याला हा मुलुख अगदी आवश्यक आहे, असे वाटून रशियाने ही स्वारी केली. रशियाचे सैन्य फिनलंडच्या तीसपट होते. त्याच्याजवळ ३,२०० रणगाडे व २,५०० लढाऊ विमाने होती. फिनलंडजवळ रणगाडे जवळजवळ नव्हतेच. जुनी कुचकामी १०० विमाने होती, तरी या चिमुकल्या देशाने प्रबळ रशियाशी साडेतीन महिने लढा दिला. रशियाने भर थंडीत फिनलंडसारख्या हिमव्याप्त मुलखावर हल्ला करण्याची चूक केली होती. धीराचा व निश्चयी प्रतिकाराचा हा धडा रशियाने लवकरच आत्मसात केला व स्टालिनने जनरल ट्यिमशेन्‌कॉला रशियन सैन्याची पुनर्रचना फिनलंडच्या प्रतिकारापासून शिकलेल्या धड्यावर करण्यास सांगितले. १३ मार्च १९४० रोजी मॉस्कोत फिनलंड व रशियाचा तह झाला आणि १५ मार्च रोजी रशियन सैन्याने लिथ्युएनिया, लॅटव्हिया व एस्टोनिया इ. देश व्यापले.


नॉर्वेविरूद्ध जर्मनीची मोहीम : (९ एप्रिल−२ मे १९४०). फिनलंडला रशियाने पादाक्रांत करण्याच्या काळातही जर्मनी आणि ब्रिटन व फ्रान्स यांच्यात युद्धास तोंड लागले नव्हते. युद्धनियोजनाच्या ह्या देशांमधील बैठ्या युद्धाला ‘फुसक्या आवाजा’चे (फोनी) युद्ध हे नाव पडले असले, तरी पुढील घनघोर युद्धाची ब्रिटन व फ्रान्स आपापल्या परीने तयारी करीतच होते. जर्मनीची यूरोपमधील आक्रमक कारवाई ही हिटलरच्या दूरदृष्टीचाच निर्देश करते. इतक्या स्वस्तात एवढा प्रचंड प्रदेश व त्यातील युद्धोपयोगी सामग्री आणि साधने मिळविल्याचे इतिहासातले हे पहिलेच उदाहरण असावे

नॉर्वे पादाक्रांत करावयास हिटलरला नॉर्वेतील ⇨पंचमस्तंभाची मदत झाली. हिटलरला ठाऊक होते, की प्रजासत्ताक राष्ट्रात जर शत्रूविषयी सहानुभूती उत्पन्न झाली, तर त्या राष्ट्राचे सैन्य शत्रूबरोबर लढण्यास निकामी ठरते. नॉर्वेत तर हिटलरच्या प्रचारामुळे पुष्कळ सहानुभूतीवाले तयार झाले होते. मेजर ⇨व्हिडकुन क्व्हिस्लिंग हा नॉर्वेजियन पंचमस्तंभीयांचा पुढारी होता. त्याच्या त्या पक्षाचे नाव ‘Narwegian Nasionul (National) Samling’ असे होते. त्याचे युद्धतांत्रिक बेत पुढीलप्रमाणे होते : (१) नॉर्वेच्या पश्चिम किनाऱ्यावर जर्मनीच्या वायू व नौसेनेची ठाणी प्रस्थापित करून ब्रिटिश नौसेनेच्या ताकदीला निर्बंधित करणे (२) उत्तर समुद्र व अटलांटिक महासागर, हे जर्मन नौसेनेच्या संचाराला मुक्त करणे (३) ब्रिटन व उत्तर रशिया यांदरम्यानच्या सागरी मार्गावर नियंत्रण ठेवणे आणि (४) पश्चिम स्वीडनमधील लोखंडाच्या खाणीपर्यंतचा सागरी मार्ग आपल्या ताब्यात ठेवणे.

जर्मन-आक्रमण नॉर्वेवर होण्याआधी ब्रिटनने त्यास प्रतिबंधक असे उपाय करण्याचे अर्धवट व निरर्थक प्रयत्न केले. त्यांपैकी एक म्हणजे ८ एप्रिल १९४० रोजी नॉर्वे सरकारच्या नकळत केलेल्या नॉर्वेच्या प्रादेशिक जलाशयातील सुरुंगपेरणीबद्दल नॉर्वे सरकारला निरोप देणे पण नॉर्वेच्या तटस्थतेचा हा भंग होता. जर्मनीने नॉर्वेत हस्तक्षेप केला तर नॉर्वेला मदत करण्याची दोस्त राष्ट्रांची सिद्धता नव्हती. ९ एप्रिल रोजी फ्रान्स व ब्रिटनच्या कृत्याला जर्मनीने चांगलाच जबाब दिला. ८ एप्रिल १९४० रोजी स्कॉटलंडच्या किनाऱ्यावरील स्कॅपा फ्लो येथील ब्रिटिश नाविक तळावर जोरदार हल्ला चढविला.

नॉर्वेतील बंदरे व विमानतळ ब्रिटिशांनी व्यापण्याअगोदर आपण ताबा घ्यावयाचा हा जर्मनीचा डाव होता. नॉर्वेतील पंचमस्तंभी याकरिता फार उपयोगी पडले. ऑस्लो राजधानीवर त्यांचा कबजा होताच. त्यातच त्यांना जर्मन छत्रीधारी सैनिकांचे पाठबळ मिळाले. ऑस्लो बंदरावर परिवहन नौकांतून सैनिक उतरू शकेल कारण त्यांना जर्मन नौसेनेची जोरदार मदत होती. ब्रिटिशांबरोबर झालेल्या संघर्षात जर्मनीचे १०,००० टनांचे एक क्रूझर बुडाले. ऑस्लोच नव्हे तर क्रिश्चनसँड, त्रॉनहेम, बर्गेन व स्टाव्हांगर या महत्त्वाच्या ठाण्यांवर पंचमस्तंभी तयार असल्याची वर्दी मिळाल्याबरोबर, ९ एप्रिल १९४० रोजी रात्री ही सगळी ठिकाणे जर्मनांच्या हातात गेली. या मोहिमेच्या सुरूवातीससुद्धा जर्मन सैनिकांना लोखंड, कोळसा, दगड इ. वाहून नेणाऱ्या व इतर व्यापारी तसेच वरवर तटस्थ दिसणाऱ्या जहाजांतून मोठ्या प्रमाणात नॉर्वेतील बंदरावर पोहोचविण्यात आले. १५ एप्रिल १९४० रोजी ब्रिटन जागे झाले तथापि यानंतर त्याची कारवाई उशिरामुळे निरर्थक ठरली.

ब्रिटिशांनी १५ एप्रिल ते ३ मेपर्यंत नॉर्वेत २-३ ठिकाणी आपले सैनिक उतरविले पण नौसेनेची मदत अपुरी पडल्यामुळे, वायुसेनेच्या उपस्थितीचा काही उपयोग होऊ न शकल्यामुळे व जर्मनांच्या ताब्यात उत्तर नॉर्वेमधील सर्व महत्त्वाचे विमानतळ असल्यामुळे नॉर्वेला मुक्त करण्याची ही ब्रिटिश मोहीम अपयशी ठरली. जर्मनीची युद्धप्रतिष्ठा खूपच वाढली. ७ मे १९४० रोजी नॉर्वेतील मोहीमेवर झालेल्या पार्लमेंटमधील कडक टीकेमुळे १० मे १९४० रोजी प्रधानमंत्री चेंबरलिनने राजीनामा दिला व ⇨विन्स्टन चर्चिलची प्रधानमंत्री म्हणून निवड झाली.

डेन्मार्क मोहीम : (९ एप्रिल १९४०). नॉर्वेवरील आक्रमणाबरोबर हिटलरने ९ एप्रिल रोजी डेन्मार्कचा राजा ख्रिश्चियन याला शरणागतीचा निर्वाणीचा खलिता पाठविला. याने शरणागती पतकरली. जर्मनीच्या छत्रीधारी व भू-सैनिकांनी ताबडतोब डेन्मार्क ताब्यात घतले. डेन्मार्कमधील विमानतळ आणि बंदरे यांची नॉर्वेवरील तसेच पुढे सुरू होणाऱ्या ब्रिटनवरील आक्रमणांसाठी आवश्यकता होती.

हॉलंड व बेल्जियम मोहीम : (१० मे−२८ मे १९४०). नॉर्वेवरील जर्मनीच्या चढाईचे वर्णन ‘वेडा जुगार’ म्हणून केले गेले पण पुढील घटनांवरून तो एक बुद्धिगम्य डाव ठरला त्यामुळे उत्तर समुद्र ब्रिटनला बेकाम झाला. नॉर्वेच्या पश्चिम किनाऱ्यावर जर्मनीच्या वायुसेनेची व पाणबुड्यांची ठाणी प्रस्थापित झाली. यापुढील जर्मनीचा युद्धतंत्रीय आवश्यकता म्हणजे इंग्लंडची खाडी ब्रिटनला निरूपयोगी करणे, ही होती. फ्रान्सवरील आक्रमण जर्मनीला फार महाग पडले. तसेच कालक्षेपामुळे युद्धाला तोंड देण्यास तयारी करता येईल, असे ब्रिटन व फ्रान्सला वाटले परंतु हा अंदाज अगदीच चुकीचा ठरला. महिन्याच्या आत चर्चिलसारख्या मुत्सद्याला व युद्धाभ्यासकाला देखील त्यामुळे एक नवा धडा शिकावा लागला.

त्याच सुमारास ७ मे १९४० रोजी जर्मनीच्या प्रखर हल्ल्याची चाहूल डच सरकारला लागली. त्याचा अंदाज येण्याअगोदरच ९ मेपर्यंत डच विमानतळांवर जर्मनांचे हल्ले झाले. अनेक छत्रीधारी जर्मन सैनिक डच पंचमस्तंभीयांबरोबर एक झाले. मास नदी व इतर नद्यांवरील अनेक पुलांचा त्यांनी कबजा घेतला आणि हेग या राजधानीचा उर्वरित हॉलंडशी संबंध तोडला. काही ठिकाणी डच सैनिकांनी त्यांना तीव्र विरोध केला. जर्मनीने तुफानी हवाई हल्ले व प्राणहानीच्या अफवा पसरविल्या. जर्मनीच्या तडित् युद्धतंत्रामुळे डच सेनाधिपत्य शिस्तबद्ध व सुसूत्रित प्रतिकारास असमर्थ ठरले. हॉलंड सरकारने १४ मे १९४० रोजी शरणागती पतकरली.

हॉलंडवर हल्ला झाला, याच वेळी जर्मनांनी बेल्जियमवरही तशाचप्रकारे हल्ला चढविला. एकीकडे बेल्जियमच्या विमानतळावर बाँबपर्षाव सुरू झाला की त्याचवेळी दुसरीकडे ब्रूसेल्स, अँटपर्व व नामुर या ठिकाणी छत्रीधारी अफवा पसरविण्याचे काम करीत. त्यांना ग्लायडरमधून उतरलेल्या सैनिकांचे पाठबळ मिळे. म्यूज व मास्ट्रिख्ट नद्यांवरील महत्त्वाचे पूल ह्यांनी असेच काबीज केले.

फ्रान्सवरील मोहीम व फ्रान्सचे पतन : (११ मे−१७ जून १९४०). ११ मे १९४० रोजी ॲल्बर्ट कालव्याच्या डाव्या बाजूला जर्मन पोहोचले व जो रस्ता मोकळा झाला होता, त्यांतून जर्मन चिलखती दले घुसली त्यामुळे बेल्जियमच्या चौथ्या आणि सातव्या डिव्हिजनांना अँटवर्प-नामुर रस्त्यापर्यंत माघार घ्यावी लागली व तेथे असलेल्या फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्यात त्या जमा झाल्या.

जर्मनांनी हॉलंड व बेल्जियम व्यापल्याच्या व त्यांतून उद्‌भवलेल्या अफवांमुळे फ्रेंच लोकांचे मनोधैर्य अजिबात नष्ट झाले होते. पळापळ सुरू होऊन रस्ते तुंबून गेले. त्यामुळे सैनिकी परिवहन अतिशय मुष्किलीचे झाले.

फ्रान्सचा पराभव तर निश्चितच होता. १० मे १९४० रोजी फ्रान्स सैन्याची पखरण पुढीलप्रमाणे होती. इंग्लिश खाडीवरील डंकर्कपासून तो मॅजिनो तटबंदीच्या उत्तरेकडील टोकापर्यंत (व्हर्डन) पहिला सैन्य गट (आर्मी ग्रुप) असून त्यात ४० डिव्हिजन होत्या. त्यांचा सेनापती जनरल बिलॉप हा होता. मॅजिनो तटबंदीवरील (व्हर्डन ते म्यूलूझ) दुसऱ्या गटात २६ डिव्हिजन असून त्याचा प्रमुख जनरल प्रेटॅल्ट हा होता आणि स्वित्झर्लंडच्या सीमेकडे तोंड करून व आल्प्स पर्वताच्या दक्षिण टोकापर्यंत तिसरा गट सून त्यातील ३६ डिव्हिजनचे नेतृत्व जनरल बासाँकडे होते. या १०२ डिव्हिजनपैकी ३२ डिव्हिजन राखीव म्हणून सबंध आघाडीवर विखुरलेल्या होत्या. त्यांमध्ये जनरल झीरो (फ्रेंच पहिली सेना), जनरल लॉर्ड गॉर्ट (ब्रिटिश सैन्य) इत्यादींसारखे प्रसिद्ध सेनापती होते. १० मे १९४० रोजी पहाटे साडेचार वाजता ब्रिटिश सैन्याच्या मुख्य कचेरीवर व पिछाडीच्या विमानतळांवर प्रचंड बाँबवर्षाव झाला. बऱ्याच मोठ्या सैन्याचा विभाग उजवीकडे वळला. काही अंटवर्पच्या बाजूला बेल्जियनांच्या मदतीला गेले, तर काही ब्रेडा गावाच्या बाजूला डचांच्या मदतीला गेले. लॉर्ड गॉर्टने अधिक लढाऊ विमाने व रणगाडे यांची मागणी केली पण ही मदत इंग्लंडहून आली नाही.


फ्रान्सचे सैन्य प्रचंड होते तथापि शत्रूशी तोंड देणारे लढवय्ये व राखीव सैन्य यांचे प्रमाण त्यात २ बरोबर ७ इतकेच होते. राखीव सैन्यात वयातील, अपुरी तयारी असलेले व शस्त्रसंभारात कमकुवत अशा सैनिकांचाच भरणा अधिक होता.

युद्धआघाडीवरील सु. २५ किमी. लांबीची फळी खड्या सैन्याने थोपविली होती. तर ६५ किमी. वर राखीव सैन्य होते. या दुसऱ्या आघाडीवर फील्ड मार्शल रुन्टश्टेटचा जर्मन ‘अ’ सेना गट हल्ला करणार होता. दक्षिण भागात ⇨गूडेरिआन याचे, तर उत्तर भागात जनरल राइनहार्ट याचे चिलखती सैन्य होते. पहिल्याकडे तीन रणगाडा (पँझर) चिलखती डिव्हिजन होत्या, तर दुसऱ्याकडे दोन शिवाय एक स्वतंत्र रणगाडा डिव्हिजन रोमेलकडे होती.

P - 1420 - 1

लॉर्ड गॉर्टने विनंती केलेली लढाऊ विमाने ब्रिटनकडून आली नाहीत. त्यांचा उपयोग पिछाडीस खुद्द जर्मनीवर हल्ला करण्याकरिता व ब्रिटनवरील शत्रूला संभाव्य बाँबहल्ल्यापासून बचाव करण्याकरिता ती स्वगृही ठेविण्यात आली होती. विमानाचा भरीव हल्ला जर आक्रमकांवर झाला असता व दोस्तसेनेच्या मदतीला पुरेसे चिलखती सैन्य मिळाले असते, तर या लढाईचा निकाल फार वेगळा लागला असता, असे एक मत आहे. त्यांच्या अभावी जर्मन चिलखती सैन्य, हे सूर मारणाऱ्या ‘स्टुका’ या बाँबफेकी विमानांच्या मदतीने दोस्तसैन्य कापीत धडाक्यात पुढे गेले. हा आघात इतका अनपेक्षित व प्रचंड होता, की फ्रेंच सैन्याची विरोधशक्ती ढासळली. युद्धाचे पूर्वीचे सर्व तंत्र निकामी ठरून जबाबी हल्ले करण्यास दोस्तसैन्याला उसंत मिळाली नाही. त्यांच्या आघाडीवरील भंग वाढतच गेला व १७ मे १९४० तारखेपर्यंत आघाडीतील भेग ८० किमी. रुंद झाली. तोपर्यंत जर्मनांनी पश्चिमेस आम्येंच्या बाजूला बेल्जियममधील फ्रेंच सैन्याचा त्याच्या बाकीच्या फ्रेंच सैन्याशी असलेला संबंध तोडला. दक्षिणेस मॅजिनोमधील फ्रेंच सैन्यांतील दळणवळण संपुष्टात आणले. तटबंदीतील सैन्य तेथेच अडकून पडले. १८ मे १९४० रोजी फ्रेंच प्रधानमंत्री रेनोने आपले मंत्रीमंडळ बदलले. जनरल पेतँला मंत्रिमंडळाचा उपप्रमुख नेमले. जनरल गाम्लॉच्या जागी जनरल व्हेगॉ याची नेमणूक केली (१९ मे १९४०). जर्मनांच्या तडित् युद्धतंत्रापुढे परंपरागत युद्धतंत्रपद्धतीत वाढलेले फ्रेंच पुढारी व सेनापती दिङ्मूढ झाले व फ्रेंच सैन्य एकदम निरूपयोगी ठरले.  

पूर्वेकडून तसेच दक्षिणेकडून जर्मन हल्ल्यामुळे दोस्तराष्ट्रांच्या सैन्याच्या विविध गटांमधील दळणवळण नष्ट झाले. २५ मे १९४० रोजी बेल्जियम सेना निष्क्रिय होण्यास सुरूवात झाली. सों नदीच्या दक्षिणेस असलेली फ्रेंच सेना ही उत्तरेस असलेली बेल्जियम सेना व ब्रिटिश सेना यांच्या मदतीला जाऊ शकत नाही, हे सिद्ध झाले. लॉर्ड गॉर्टला आदेश देण्यात आला, की ब्रिटिश सेना जी काही शिल्लक राहिली होती, तिने इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर पीछेहाट करावी. हे होत आहे, तोच २१ मे १९४० रोजी बेल्जियम राजा लीओपोल्ड याने शरणागती घेतली व राहिलेल्या दोस्तसेनेचा ३४ किमी. आघाडीवर निऊपोर्ट शहरापर्यंत चुराडा झाला.


फ्रेंचांच्या पिछाडीवरील संरक्षक दलाच्या सहाय्याने व ब्रिटिश शाही विमानदलाच्या आवरणाखाली ३० मे ते ३ जून १९४० या दरम्यान ३,३५,००० ब्रिटिश सैन्य, सुखरूपपणे इंग्लिश खाडीच्या पैलतीरास पोहोचले. या पिछेहाटीस व इंग्लिश खाडी बऱ्याच सुखरूपपणे ओलांडण्याच्या कारवाईस ‘चमत्कार’ हे नामाभिधान मिळाले आहे पण खरोखरच परिस्थितीचे विश्लेषण केल्यावर तो चमत्कार नव्हता, हे दिसून येते. ब्रिटिश सेनेच्या सुखरूप निर्वासनाचे मुख्य कारण म्हणजे, तुरळक वैमानिक हल्ल्यांखेरीज त्या सैन्याचा पाठलाग करण्यास हिटलरने बंदी केली होती. हे होते. तसे त्याने केले असते, तर बहुतांश ब्रिटिश सेना जर्मनांची युद्धबंदी झाली असती.

इटलीने १० जून १९४० रोजी दोस्तराष्ट्रांविरूद्ध युद्धघोषणा केली. जर्मन सैन्याची फ्रान्समध्ये मुसंडी फार वेगाने होऊन १४ जून रोजी जर्मन सैन्य पॅरिसमध्ये घुसले. रेनोने प्रधानमंत्रीपदाचा राजीनामा दिला. फ्रान्सचा राष्ट्रपती ल ब्रने मार्शल पेतँला सरकार बनविण्यास सांगितले. पेतँने १७ जून रोजी जर्मनीकडे युद्धतहकुबीची याचना केली. २५ जून रोजी युद्धविरामाच्या करारावर जर्मन व फ्रेंचांच्या सह्या झाल्या. ३ जुलै १९४० रोजी ओरान (उत्तर आफ्रिका) येथील फ्रेंच आरमार ब्रिटिश नौसेनेने बुडवून टाकले. फ्रान्सवर विजय मिळविण्यासाठी जर्मनीला तौलनिक दृष्ट्या फार कमी किंमत द्यावी लागली. त्यात २७,००० जर्मन ठार, १,११००० जखमी व १८,००० च्या वर बेपत्ता झाले.

ग्रेट ब्रिटनवरील मोहीम : (८ ऑगस्ट−३० ऑक्टोबर १९४०). ब्रिटनवरील मोहिमेस ‘समुद्र सिंह’ (सी लायन) हे सांकेतिक नाव हिटलरने दिले होते. खंडीय यूरोपातील रशिया वगळता सर्व शत्रुराष्ट्रे जर्मन सैन्याने पादाक्रांत केली तथापि ब्रिटनला पादाक्रांत करणे उरले होते. ब्रिटनमध्ये भूसेना उतरविण्यासाठी इंग्लिनश खाडीवर प्रभुत्व स्थापणे आवश्यक होते. त्यासाठी ब्रिटिश वायुसेना हतबल करणे हे आद्य कार्य होते. हिटलरने ब्रिटनला युद्धातून परावृत्त होण्याबद्दल सांगितले परंतु चर्चिलने ते झिडकारले. परिणामतः इंग्लिश खाडीतील ब्रिटनची सागरी शक्ती आणि ब्रिटनच्या दक्षिण व पूर्व भागातील विमानदले तसेच विमानतळ खच्ची करण्यास जर्मनीने हवाई लढाई सुरू केली (८ ऑगस्ट १९४०). ही लढाई ‘ब्रिटनची लढाई’ (बॅटल ऑफ ब्रिटन) म्हणून प्रसिद्ध आहे. या लढाईचा आराखडा पुढीलप्रमाणे होता : (अ) ८ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट : व्यापारी जहाजांच्या ताफ्यांवर व किनाऱ्यांवरील लक्षावर हल्ला करणे. याचा हेतू हा की ब्रिटिश लढाऊ विमानांनी युद्धाकरिता तोंड द्यावे व सामान्यतः त्यांचा निःपात करावा (ब) १९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर : इंग्लंडच्या अंतर्देशीय विमान तळांवर मुख्यतः लढाऊ विमानांवर भरीव आधात करून तळावरच विमानांना नष्ट करणे आणि लढाऊ विमानांना युद्धास तोंड द्यावयास भाग पाडणे (क) ६ सप्टेंबरनंतर : शहरांवर, विशेषतः लंडनवर निर्घृण हल्ले चढविणे. याचा उद्देश अन्नसाठ्यांचा नाश व नागरिकी प्रतिकार इच्छेची समाप्ती करणे हा होता.

सर ह्यू डाऊडिंग यावेळी ब्रिटनच्या लढाऊ विमान कमान (कमांड) चा सेनापती होता. त्याच्याजवळ लढाऊ विमानांची ५९ पथके होती. अनेकदा जर्मन वायुसेनेची आक्रमक लढाऊ विमाने, ब्रिटिश युद्धोन्मुख विमानांच्या दुपटीपेक्षा अधिक असत. अशा परिस्थितीत डाऊडिंगने हाती असलेल्या सामग्रीचा योग्य उपयोग करून आणि वायुरणतंत्रात बदल करून जर्मन वायुसेनेला पराभव चारला. परिणामी हिटलरने ब्रिटनवरील स्वारी रद्द केली.

सागरी युद्ध : (१९३९-४०). आतापर्यंत या युद्धातील सुरूवातीच्या सागरी लढायांचा आढावा फारसा घेतला नाही. वास्तविक ही लढाई युद्ध पुकारण्याच्या दिवशीच (३ सप्टेंबर १९३९) सुरू झाली. त्या दिवशी जर्मन पाणबुडीने ब्रिटिश (उतारू) जहाज ‘अथेनिया’ हे बुडविले. खलाशी सैनिकांकरिता ‘आवाजी युद्ध’ (फोनी वॉर) कधीच नव्हते. जर्मन पाणबुड्यांनी व विमानांनी दोस्तराष्ट्रांची व त्यानंतर तटस्थ राष्ट्रांची व्यापारी जहाजे बुडविण्यास ताबडतोब सुरूवात केली, पण जर्मनांचे जोराचे सागरी युद्ध यानंतरच (१९४१−४३) व्हावयाचे होते. १९३९-४० साली सागरी युद्ध मुख्यतः मोठ्या नौसैनिकी जहाजांच्या दरम्यान झाले. जर्मनांनी लघु युद्धनौका (पॉकेट बॅट्‌लशीप) बांधल्या होत्या. त्यांना शत्रूच्या व्यापारी नौकानयनांवर हल्ला करण्यास हुकूम मिळाला. त्यांपैकी ‘ग्राफ स्पे’ या जर्मन युद्धनौकेने सगळ्यात अधिक यश मिळविले.

पूर्वीच्या तीव्र टेहळणीने मिळविलेल्या शत्रुपक्षाच्या लढाऊ जहाजांच्या माहितीमुळे ७−४७ या जर्मन पाणबुडीने स्कॉटलंडच्या उत्तरेस असलेल्या ऑर्कनी बेटांच्या समूहातील स्कॅपा फ्लो या खाडीत उभी असलेली एक ब्रिटिश युद्धनौका १० ऑक्टोबर १९३९ रोजी बुडविली, तर ग्राफ स्पे या युद्धनौकेने ब्रिटनची डिसेंबर १९३९ पर्यंत नऊ जहाजे बुडविली. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर ही नौका अनिर्बंध सागरात नौकासंहार करीत होती. एकूण ५०,००० टन वजनाच्या बोटी या एकट्या बोटीने स्वतःचा एकही खलाशी न गमविता, समुद्रतळास पोहोचविल्या. या नौकेची वर्दी मिळताच अनेक ब्रिटिश युद्धनोकांनी तिचा निःपात करण्याचा चंग बांधला. या पाठशिकवणीच्या लढ्यांत ब्रिटिशांची युद्धनौका एक्स्टर बरीच जायबंदी झाली व तिची मनुष्यहानी पण पुष्कळच झाली. ग्राफ स्पेच्या कप्तानाने ब्रिटिशांच्या जोरदार हल्ल्यापासून बचाव करण्याकरिता दक्षिण अमेरिकेच्या यूरग्वाय देशाच्या माँटेव्हिडिओ बंदरात ग्राफ स्पेला नेली. यूरग्वाय हे एक तटस्थ राज्य होते तथापि बहात्तर तासांच्या वर (आंतरराष्ट्रीय करारांप्रमाणे) यूरग्वायने त्यास त्या बंदरात रहावयाची परवानगी नाकारली म्हणून १८ डिसेंबर रोजी ती नौका बंदराच्या बाहेर आणून, सर्व खलाशी प्राणरक्षी नौकेतून वा तराफ्यावरून बोटीच्या बाहेर आले आणि त्यांनी बोटीला समुद्रात बुडवून टाकले. पुढे तीन दिवसांनी नौकेचा कप्तान लॅग्जडॉर्फ याने आत्महत्या केली व ग्राफ स्पेचा खलाशीवर्ग अर्जेटिना देशात युद्धकैदी म्हणून युद्धसमाप्तीपर्यंत बंदिस्त राहिला. ही लढाई ‘प्लॅमट नदीची लढाई’ म्हणून प्रसिद्ध आहे.

दोस्तराष्ट्रांची १९३९ वर्षाअखेर ५०,००० हून अधिक जहाजे शत्रूने बुडविली. नोव्हेंबरमध्ये निरिक्षकांना एक स्फोट न झालेला चुंबक सुरुंग गवसला. त्याच्या अभ्यासानंतर त्याच्या प्रतिकाराच्या पद्धती शोधण्यात आल्या व या सुरूंगापासूनचा नाश पुष्कळच कमी झाला.

लिबिया, पहिली मोहीम : (१३ सप्टेंबर−१६ डिसेंबर १९४०). १० जून १९४० रोजी इटलीचा हुकूमशाह मुसोलिनाने दोस्तराष्ट्रांविरूद्ध युद्ध पुकारले. ब्रिटनच्या ताब्यातील ईजिप्त बळकाविण्यासाठी त्याने लिबियातून ईजिप्तवर चढाई सुरू केली. इटालीचा सेनापती मार्शल बाल्बो हा होता. ईजिप्तमधील ब्रिटिश सेनापती जनरल वेव्हेल होता. वेव्हेलला ज्यांच्याशी सामना द्यावयाचा ते इटालियन सैन्य लिबियात २,१५००० इतके होते. शिवाय इटालियन पूर्व आफ्रिकेत ऑस्ताचा ड्यूक याच्या हुकमतीखाली १ लाख सैनिक होतेच. या दोन्ही प्रचंड सेना फ्रान्सचा प्रतिकार नष्ट झाल्यामुळे या मुलखातच कारवाई करण्यास मोकळा होत्या. त्याच्यापेक्षा पाचपट सैन्य या प्रचंड रणक्षेत्रात असल्यामुळे, वेव्हेलला इटलीच्या युद्धघोषणेच्या वेळी काही संरक्षक हालचाली करण्याची सुद्धा मनाई होती, कारण त्यामुळे इटालियन सैन्यास त्यावर हल्ला करण्यास चेतावणी मिळाली असती. त्यातच वेव्हेलला पुरवठा करणारे दोन्ही परिवहन मार्ग धोक्याचे व बेभरवशाचे होते. भूमध्य सागरातील मार्ग मध्यात इटालियनांनी रोखला होता, तर मॉल्टा व तेथील महत्त्वाच्या विमानतळ हे जिब्राल्टर व ईजिप्तच्या दरम्यानचे विरामस्थान एकाकी पडले, तसेच तांबड्या समुद्रावरील मार्गास शत्रूच्या युद्धनौकांचा व एरिट्रीया आणि इटालियन सोमालीलँडमधील इटालियन वायुसेनेला धोका होता. फ्रान्सच्या पराभवानंतरच्या पेतँच्या विशी सरकारास सिरिया व फ्रेंच सोमालीलँडकडून पाठिंबा मिळाला त्यामुळे उत्तर पॅलेस्टाइन व ब्रिटिश सोमालीलँड यावर प्रभुत्व टिकविणे काही काळ कठीण आले.

या अडचणीविरूद्ध यश मिळविण्यासाठी वेव्हेलने इटालियन सेनापतीच्या लढाईच्या उपक्रमशीलतेची वाट न पहाता स्वतःच हल्ला करण्याचे ठरविले. त्याने मोहिमेची योजना आखली नाही, तर आपल्या सैन्याच्या घटकांना स्थायी आदेश दिला. ‘हल्ला असा करा, की मोठ्या प्रचंड सैन्याचाच हल्ला होत आहे, असे इटालियनांना वाटावे’.

इटालियनांचा गुप्तचर विभाग फारच निकामी असला पाहिजे, कारण ब्रिटिश सैन्याच्या शीघ्रगामी हल्ल्यामुळे बाल्बो यास ब्रिटिशांचे सैनिकबल जेवढे होते, त्यापेक्षा कैक पटीने अधिक वाटले, ब्रिटिश सैनिक इटालियनांच्या ताब्यातील मुलखाच्या बाह्य चौक्यांवर (आउट पोस्ट) हल्ला करीत. हातात आलेला दारूगोळा उडवून टाकीत व माघार घेत. अशा रीतीने माद्दालेनाचा किल्ला पडला, नंतर कापूट्‌त्सो व सीदिअझिझ येथे ब्रिटिशांचे रणगाडे पटकन कोठून तरी येत व इटालियनांचा मोटारीच्या ताफ्यांचा फडशा पाडीत. संरक्षणाकरिता इटालियांनी उपाय केलेही, पण ते युद्धसामग्री व सैनिकांना बद्ध अवस्थेत ठेवीत आणि त्यांचा फायदा ब्रिटिश सैनिक घेत. बाल्बो यास वाटले, की आपल्याविरूद्ध चारपाच ब्रिटिश चिलखती डिव्हिजन आहेत त्यामुळे त्याने पीछेहाट घेतली. युद्ध-आघाडीवर पाठविलेल्या सैनिकांचे प्रमाण कमी केले व रोमकडे कुमकेची याचना केली.

टोब्रुक येथे ब्रिटिशांच्या एका विमानहल्ल्यात बाल्बो २८ जून रोजी ठार झाला व सैन्याचे नेतृत्व मार्शल ग्राझ्यानीकडे गेले. सप्टेंबरच्या मध्यात मुसोलिनीच्या आदेशामुळे त्याने आपले सैन्य मॅर्स मत्रूच्या १२० किमी. पश्चिमेस ईजिप्तच्या सरहद्दीवर सीदि बरानी येथपर्यंत पुढे नेले. तेथे तो  थांबला आणि अनेक किल्ल्यांची रांग बांधण्यास त्याने सुरूवात केली. 


वेव्हेलने ईजिप्तमधील ब्रिटिश सेनेचा सेनापती जनरल मेरलंड विल्सनला हल्ल्याची योजना आखण्यास फर्माविले. त्याच सुमारास हिटलरने जर्मनीच्या रूमानियावरील मोहिमेबाबत आपला सल्ला घेतला नाही म्हणून मुसोलिनी नाराज झाला मुसोलिनीने ग्रीसविरूद्ध युद्ध पुकारले. दरम्यान वेव्हेलला पूर्व भूमध्य समुद्रातील क्रीट बेट काबीज करण्याची आज्ञा चर्चिलने दिली याशिवाय वेव्हेलला ग्रीसच्या संरक्षणासाठी तिकडे दोन लढाऊ व तीन बाँबफेकी विमानपथके पाठवावी लागली. वरील कारणांमुळे विल्सनला इटालियन सैन्यावरील चढाई डिसेंबर १९४० पर्यंत स्थगित करावी लागली.

वास्तविक यावेळी ग्राझ्यानीने मुसोलिनीच्या ग्रीसवरील साह्याच्या बुरख्याखाली, वेव्हेलच्या सैन्यावर हल्ला करावयास हवा होता. त्याच्याजवळ ८० हजार सैनिक व ब्रिटिशांच्या तिप्पट मोठी वायुसेना होती पण त्याने हल्ल्याचा उपक्रम केला नाही. हल्ल्याचा प्रारंभ वेव्हेलने केला व शिथिलतेचा आणि चालढकलीचा पूर्ण फायदा घेतला.

या दोन सेनांमध्ये ११५ किमी. अंतर होते त्यामुळे सैन्यास लागणारा अनेक दिवस पुरेल इतका सर्व प्रकारचा पुरवठा ब्रिटिशांच्या क्षेत्रीय तटबंदीपासून ५० किमी. वर त्यांनी पोहोचविला. जनरल ओकॉनर हा या लढाईचा प्रमुख होता. एकदा हे ११५ किमी. चे अंतर कापल्यावर सातव्या चिलखती डिव्हिजनला सोफीआ येथील किल्ल्यातील इटालियन सैन्याला डांबून ठेवण्याचे काम त्याने दिले व नंतर ओकॉनरने आपली सेना उत्तरेस नेऊन नीबिया येथील इटालियन जनरल मॅलेतीच्या छावणीवर त्याने तोफांचा भडिमार केला. अर्ध्या तासात चिलखती डिव्हिजन व त्यामागून पायदळ तुटून पडले. त्यात इटालियन रणगाड्यांचा धुव्वा उडाला. एका तासात छावणी ओकॉनरच्या हातात आली आणि मॅलेती मरण पावल्याचे आढळून आले. यानंतर लवकरच आपल्या सैन्याची पुनर्रचना करून ओकॉनर उत्तरेस वळला आणि वरीलप्रमाणेच तुम्मार (पश्चिम) वर त्याने हल्ला चढविला. त्यानंतर त्याच सुमारास संपूर्ण तुम्मारवर प्रसिद्ध चौथी हिंदी पायदळ डिव्हिजन सातव्या चिलखती डिव्हिजनच्या संरक्षणाखाली आणखी उत्तरेस सरकली व तिने सीदि बरानी आणि बुकबुकमधील रस्ता तोडला. १६ डिसेंबर १९४० रोजी सीदि बरानी पडले. ब्रिटिश सेनेने इटालियनांचा पाठलाग सालूमपर्यंत करून १४,००० युद्धकैदी मिळविले.

अशा रीतीने या स्वारीचा पहिला टप्पा संपला. त्याची फलश्रुती म्हणजे ३८,००० पेक्षा अधिक युद्धकैदी, ४०० तोफा, ५० रणगाडे व इतर युद्धसामग्री ब्रिटिश सैन्याच्या हातात आली. दुसरा टप्पा मात्र कठीण होता. बार्दीया व टोब्रुक येथील मजबूत क्षेत्रीय तटबंदी यांविरूद्ध लढावयाचे होते. इटालियनांनी पेरलेल्या सुरंगांची जाळी ब्रिटिश सेनेने मोकळी केली, रणगाडे-प्रतिकारक मोठेमोठे खड्डे बुजविले, काटेरी तारांची कुंपणे तोडली आणि तोफांच्या भडीमाराचा पाठीमागून हल्ला करून दि. ५ जानेवारी १९४१ रोजी त्यांनी बार्दीया मिळविले. तशाच युद्धतंत्राने दि, २२ जानेवारी १९४१ रोजी टोब्रुक हस्तगत केले. इटलीचे ७५,००० युद्धकैदी, ७०० तोफा व सु. १०० रणगाडे ब्रिटिशांनी हस्तगत केले. तिसऱ्या टप्प्यात फक्त दोनच महत्त्वाची ठाणी हस्तगत करावयाची शिल्लक राहिली, ती म्हणजे सायरेनेइकातील डेर्ना व मेकीली. वेव्हेल आणि ओकॉनर यांची २७ जानेवारीच्या सुमारास भेट झाली. त्यावेळी हल्ल्याची रूपरेखा ठरली. त्याचप्रमाणे शत्रू अधिक ताकदवान असल्यामुळे त्याच्यावर पिछाडीकडून हल्ला करावयाची व चिलखती दलास मेकीलीवरून दक्षिणेस बेंगाझीस जाणाऱ्या रस्त्यावरून खेचित नेण्याची योजना नक्की केली. शत्रूने दि. ३० ला बार्चेपर्यंत पीछेहाट केली. त्यांच्या कुमकेची वा पुरवठ्याची व्यवस्थासुद्धा केली नव्हती. ५ फेब्रुवारीस ब्रिटिश सैन्याने बेंगाझीचा रस्ता दोन ठिकाणी कापल्यामुळे डेर्ना एकाकी पडले. त्याच दिवशी ५,००० इटालियन अनपेक्षितपणे ब्रिटिश चौथ्या चिलखती ब्रिगेडसमोर आले परंतु त्यांची कशाही प्रकारची युद्धसज्जलता नसल्यामुळे ब्रिटिश सेनेस समोर पाहून ते चकित झाले आणि तत्काळ ते ब्रिटिश सेनेला शरण गेले. पुढे सिद्रा आखाताच्या पूर्व किनाऱ्यावरील मीझूराटा (४ फेब्रुवारी १९४०), अल् अबियार (५ फेब्रुवारी), बेडा फोम्म (७ फेब्रुवारी) व बेंगाझी (९ फेब्रुवारी), ही लिबियासायरेनेइका प्रदेशातील इटलीची ठाणी ब्रिटिश सेनेने हस्तगत केली. या लढायांत एकूण १,५०,००० हून अधिक सैनिक इटलीला गमवावे लागले. वेव्हेलच्या नेतृत्वाखाली ६२ दिवसांत (९ डिसेंबर १९४० – ९ फेब्रुवारी १९४१) लिबियातील इटालियन सेनांचा धुव्वा उडविण्यात आला.

या निर्णायक यशानंतरही वेव्हेलने मोहिम पुढे का रेटली नाही, याचे कारण म्हणजे त्याला चर्चिलच्या आदेशाप्रमाणे अधिक मोहिमा करावयाच्या होत्या. शिवाय ग्रीस मदतीकरिताही एक चिलखती डिव्हिजन त्याला पाठविणे भाग पाडले. या मोहिमेत एक गोष्ट सिद्ध झाली ती ही की तटबंदीच्या आत नुसते बसून राहणे पुरेसे नाही, तर तिच्या बळकटीच्या साहाय्याने परिणामकारक हालचाली करणेही आवश्यक ठरते.

ॲबिसिनिया मोहीम : लिबियावरील मोहिमेशिवाय वेव्हेलला दोन आणखी मोहिमा पार पाडावयाच्या होत्या. त्याने जनरल प्लॅटच्या नेतृत्वाखाली हिंदी चौथी व पाचवी डिव्हिजन दिली, तेव्हा फेब्रुवारी ते मे १९४१ पर्यंत चार महिन्यांच्या अवधीत प्लॅटने ॲबिसिनियातील इटालियन सेनेचा पुरा पाडाव केला. यावेळी देखील सुरूवातीच्या अनपेक्षित हल्ल्यामुळे प्लॅकटच्या सेनेला साडेतीन लाख गॅलन पेट्रोल आणि एंशी हजार गॅलन विमानाच्या तेलाची लूट सापडली. त्यांची पुढील मोहीम पार पाडण्यास खूपच मदत झाली. याच सुमारास जनरल ⇨कनिंगहॅमने दक्षिण ॲबिसिनियातून केन्यातील मॉगाडिशू ते जिजीगापर्यंत कूच करून अदिस अबाबा ही राजधानी काबीज केली. त्याच्या सैन्याने १,७०० किमी. अंतर तीन महिन्यांत तोडले व स्वतःचे फक्त १,१३५ सैनिक गमावून शत्रूचे ५०,००० युद्धकैदी व ३,६०,००० चौ. मैल (सु. ९,३२,४०० चौ. किमी.) मुलूख मिळविला. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही, की १९३५-३६ साली इटालियन आक्रमण जनरल ग्राझ्यानी यास याच मार्गाचे शवटचे फक्त १०५ किमी. काबीज करण्यास सहा महिने लागले होते. याच मोहिमेत हिंदी सैन्यातील लेफ्टनंट प्रेमसिंग भगत (पुढे लेफ्टनंट जनरल) यांना व्हिक्टोरिया क्रॉस बहाल करण्यात आला.

वेव्हेलच्या दोन्ही सेनापतींनी मिळून चार महिन्यांच्या अवधीत सव्वादोन लाख शत्रुसैन्य धुळीस मिळविले व २६ लाख चौ. किमी. इतका मुलूख पादाक्रांत केला. इटलीच्या या पराभवाला आणखी दोन कारणे अशी, की ते शत्रूवर त्याच्या कमजोर ठिकाणी जोरात व एकसूत्रपणे हल्ला करू शकले नाहीत आणि ॲबिसिनियन गनिमी सैनिकांची ब्रिटिशांना कठीण डोंगराळ भागातून मदत झाली होती.

यूगोस्लाव्हिया व ग्रीस यावर जर्मनीचे स्वामित्व : १९४१ च्या प्रारंभी जर्मनीने बाल्कन व लगतच्या देशांवर प्रभूत्व मिळविण्यास सुरूवात केली. जानेवारीत रूमानियास गिळंकृत केल्यावर, त्याने बल्गेरियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जर्मनी, जपान आणि इटली या तीन जोरदार देशांत करार झाल्यानंतर जर्मनीने १ मार्च १९४१ मध्ये बल्गेरिया ‘शांततापूर्वक’ व्यापला. नंतर यूगोस्लाव्हियाची पाळी आली, त्यावेळी अल्बेनियात मुसोलिनीचे सैन्य निष्क्रियावस्थेत अडकले होते. तेव्हा त्या देशाच्या मदतीला जर्मनी आपल्यालाही उपद्रव देईल या भ्रमापोटी ग्रीसने ब्रिटनला त्याला दिलेल्या संरक्षण-वचनाची आठवण करून दिली व आपल्या मदतीस येण्याचे आव्हान केले. २४ मार्चपर्यंत यूगोस्लाव्ह सरकारने शरणागती पतकरली. त्यानंतर तीनच दिवसांत ग्रीक जनरल सीमोव्हिच याने या शरणागतीविरूद्ध इटालियन सैन्यावर अचानक हल्ला केला व ब्रिटिश ॲड्मिरल कनिंगहॅम याने मॅटापॅनच्या नाविक युद्धात सात इटालियन युद्धनौका बुडविल्या. ६ एप्रिल रोजी जर्मनीने यूगोस्लाव्हिया व ग्रीसवर स्वारी करून जोरात प्रत्याघात केला. यूगोरलाव्ह सैन्य डॅन्यूब नदीच्या आघाडीवर जर्मन व हंगेरीअन चिलखती रणगाड्यांच्या कात्रीत सापडले. दक्षिणेतील डोंगराळ मुलखात वेळेवर पीछेहाट करून आपला बचाव ते करू शकले नाही. १७ एप्रिल रोजी २८ यूगोस्लाव्ह डिव्हिजन शरण गेलेल्या जनरल सीमोव्हिच हा आपला राजा व त्याचे मंत्रीमंडळ यांच्यासमवेत ग्रीसमध्ये पळून गेला. हे होत असताना जर्मन सेनापती फील्ड मार्शल लिस्ट, सर्बीया व मॅसिडोनिया यांवर तुटून पडला.

या अवधीत ग्रीक सेनाधिपती जनरल पपॅगॉस व इंग्रज जनरल विल्सन यांच्यामध्ये आगामी युद्धाच्या बाबतीत जर्मन सेनेला तोंड कसे द्यावयाचे, हे ठरले. त्यातील मुख्य तत्त्व हे होते, की जर्मन सेनेस क्रमाक्रमाने दोस्त सेनेवर आघात करण्याची संधी द्यावयाची नाही व काही विवक्षित माऱ्याच्या ठिकाणी त्यांच्यावर ताकदपूर्ण आघात करावयाचा, पण आयत्या वेळी ग्रीक सेनाधिपतीने ह्या निर्णयाविरूद्ध दोस्तसेनेची विभागणी केली. ग्रीक सैन्य मीटॅक्सस आघाडीवर व विल्सनचे सैन्य वार्दर नदीच्या पश्चिमेस ठेवले. यांमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व पोलिश सैनिकांचा भरणा होता (२४,००० ब्रिटिश व ३३,००० इतर). या विभागणीचा फील्ड मार्शल लिस्टने पूर्णपणे फायदा घेतला. अगोदर जोरदार बाँबहल्ला करून ६ एप्रिल रोजी लिस्टने यूगोस्लाव्ह सैन्य व त्यांच्या हजारो बैलगाड्या यांची वाताहत केली. ग्रीक सैन्याची हालचाल कुंठीत झाली. लारीसजवळचे अनेक विमानतळ जर्मनांच्या हातात गेले. पीट्‌स बंदरावरील बाँबहल्ल्यामुळे एका जहाजाने पेट घेतला व बंदराचा धुव्वा उडविला. त्याबरोबर ब्रिटिश ‘हॅरिकेन’ लढाऊ विमानांनी भरलेली जहाजेही बुडाली. सर्बीयामधील यूगोस्लाव्ह सैन्य निकामी झाल्यामुळे विल्सनच्या सैन्यावर जर्मन सरळ चालून गेले. आपला या हल्ल्यापुढे टिकाव लागणार नाही म्हणून विल्सनने पीछेहाट करून थर्मॅपिलीच्या घाटात आपले सैन्य नेले त्यामुळे अल्बेनियातून ईपायरस डोंगरात पीछेहाट होणारे ग्रीक सैन्य एकाकी पडले. १९ एप्रिल १९४१ रोजी जर्मन चिलखती सैन्य पिंडस घाटातून मेट्‌सॉव्हॉन येथे पोहोचले. त्यांना आपण थोपवून धरू शकणार नाही, हे ओळखून २१ एप्रिल १९४१ रोजी ग्रीक सैन्याने शरणागती पतकरली.

ब्रिटिश सैन्याला ग्रीकमधून शक्य तेवढ्या लवकर पलायन करण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नव्हता पण डंकर्कच्या निर्वासनापेक्षा ही हालचाल अधिक कठिण होती, कारण त्यावेळेसारखे ब्रिटिश सेनेला लढाऊ विमानाचे यावेळी संरक्षण नव्हते. त्याचवेळी जर्मनांच्या एका विमान परिवहित पथकाने कॉरिंथ कालव्यावरील पुलाचा कबजा घेतला. २६ व २७ एप्रिल रोजी ब्रिटिश सेनेचे ग्रीकमधून निर्वासन झाले. सुरूवातीच्या ५७,६६० ब्रिटिश सैन्यापैकी ४३,००० जर्मनांच्या कचाट्यातून निसटले, पण डंकर्कप्रमाणे सर्व भारी युद्धसामग्री गमावली. २७ एप्रिल १९४१ रोजी जर्मन सैन्य अथेन्समध्ये शिरले व ग्रीस जर्मनीच्या ताब्यात गेले (३० एप्रिल १९४१).

या मोहिमेमुळे तीन गोष्टी सिद्ध झाल्या : (१) वायुबळाची आघात व संरक्षणक्षमता (२) चिलखती सैनिकांचे प्रभुत्व व (३) या दोन्ही शक्ती एकत्रित झाल्या म्हणजे त्यांचे होणारे अजिंकत्व. याशिवाय ब्रिटिशांना आपल्या लढाऊ विमानांचा अर्थविहिन वापरदेखील लक्षात आला. लढणाऱ्या सैन्यास पाटिंबा देण्याएवजी, इतर ठिकाणी त्यांचा रणनीतीला धरून केलेला उपयोग निष्फळ ठरला. युद्धक्षेत्राच्या पिछाडीस १५ किमी. पर्यंत जर्मनांच्या समरतंत्रावर त्यांचा काही विपरीत परिणाम होऊ शकला नाही.


लिबिया, तिसरी मोहीम : (१२ फेब्रुवारी−२३ डिसेंबर १९४१) ग्राझ्यानीच्या सैन्याचा वेव्हेलच्या सैन्याने निःपात केल्यावर हिटलरला आपल्या दोस्तराष्ट्राच्या मदतीला येणे क्रमप्राप्त झाले. ज्यावेळी वेव्हेलने आपले आफ्रिकन सैन्य ग्रीसच्या मदतीला पाठवून आपली सेना कमकुवत करण्याची घोडचूक केली, त्याचवेळी जर्मन जनरल रोमेल याचे आघाडीचे सैन्य ‘आफ्रिका कोअर’ ट्रिपोलिटेनियात उतरत होते. (१० फेब्रुवारी −३१ मे १९४१). ६ फेब्रुवारी १९४१ रोजी रोमेलला आफ्रिका कोअरचे आधिपत्य मिळाले.

ही बातमी जरी कैरोतील ब्रिटिश मुख्य कचेरीत वेळेवर पोहोचली असली, तरी त्यावेळी ब्रिटिशांजवळ लांब अंतरापर्यंत उपयुक्त टेहळणी करण्याजोगी विमाने थोडी होती व त्यामुळे रोमेलच्या सैन्यबलाचा त्यांना अंदाज घेता आला नाही. त्यातच बेंगाझी बंदरावर जर्मनांनी इतका तीव्र बाँबवर्षाव करण्यास सुरुवात केली, की तेथे युद्धसामग्री व सैन्यांनी भरलेली जहाजे रिकामी करणे धोक्याचे झाले. कारण, बंदराचे संरक्षण करण्यापुरती लढाऊ विमाने व विमानप्रतिबंधक तोफखाना (ग्रीसला गेल्यामुळे) तेथे नव्हता शिवाय आठ हजार ट्रकही पाठविले होते. त्यामुळे दूर असलेल्या टोब्रुक बंदरात उतरवलेली ही युद्धसामग्री या युद्धक्षेत्रावर वेळेवर पोहोचविणे अत्यंत कष्टप्रद झाले. लढाईला तोंड देण्याइतकी शत्रूची तयारी होण्याअगोदरच, रोमेलने ३१ मार्च १९४१ रोजी ब्रिटिशांवर हल्ला केला व त्याच सुमारास, अगोदरच परिवहनाच्या अडचणीमुळे त्रस्त झालेल्या ब्रिटिशांचे पेट्रोलसाठे व पेट्रोल नेणारी वाहने यांवरही रोमेलने आपल्या वायुसेनेला अविरत हल्ले करण्याचा हुकूम सोडला.

हे सगळे पाहून बेंगाझी आघाडी लढविण्याऐवजी टोब्रुकचे संरक्षण करून तेथील युद्धसामग्री सुरक्षित ठेवण्याचा वेव्हेलने योग्य निर्णय घेतला त्यामुळे आघाडीवरील पुरवठा रोमेलला मिळू शकला नाही. रोमेलच्या सेनेचा सुरूवातीचा वेगदेखील संपुष्टात आला.

क्रीट वेट मोहीम : (२० मे−१ जून १९४१). रोमेलच्या उत्तर आफ्रिकेतील हल्ल्याच्या सुमारास ब्रिटिशांना इराक देशावर कबजा करावा लागला. इराकी प्रधानमंत्री रशीद अली जर्मनीच्या हेर होता. त्याच्या षड्यंत्रामुळे राजमुखत्यार (राजा वयाने अगदीच लहान होता) पळून गेला. रशीद अलीने बगदादच्या पश्चिमेस असलेल्या हॅब्‌बानीया येथील ब्रिटिशांच्या विमानतळावर १ जून १९४१ रोजी हल्ला केला. तो अयशस्वी ठरला व इराकचे नियंत्रण युद्ध संपेपर्यंत ब्रिटिशांच्या हातात राहिले. याच सुमारास क्रीट बेटावरील भविष्यकालीन युद्धनीतीचे द्योतक असे जर्मनांचे हवाई आक्रमण पूर्णपणे यशस्वी झाले. 

ब्रिटिशांनी या इजीअन समुद्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा बेटाला १ नोव्हेंबर १९४० रोजी व्यापले. मात्र पुढील सहा महिन्यांतसुद्धा ते शत्रूच्या संभाव्य हल्ल्यापासून त्याचे प्रभावी संरक्षण करू शकले नाही. बेटाच्या भोवताली अललेल्या विमानवाहू युद्धनौकांनाही संरक्षण नव्हते व सैनिकही असुरक्षित होते. ईजिप्तमधील विमानतळ ६४४ किमी. पेक्षा दूर असून तेथील लढाऊ विमाने क्रीटचे संरक्षण करण्यास असमर्थ होती. याउलट जर्मन आणि इटालियन विमानांचे तळ ग्रीस व त्याभोवतालच्या बेटांवर अनेक ठिकाणी होते. जी काही थोडी विमाने क्रीटमध्ये होती, त्यांची देखभालही ठीक होत नव्हती,   त्यामुळे त्यांना क्रीटमधून १९ मे १९४१ रोजी हलविण्यात आले.

प्रत्यक्ष वायुहल्लाप्रसंगी सोडलेला टेहळणी-झोत आणि विमानवेधी तोफगोळ्यांचा मारा.

क्रीट बेटावरील जर्मन मोहिमेचे नेतृत्व सेनाधिपती लिस्टकडे होते. त्याने या महत्त्वाच्या बेटावर तीनप्रकारे हल्ला चढविला : (१) विमानवहित ११ वे पथक व दोन डोंगरी डिव्हिजन आणि त्यांच्या  मदतीला, (२) वायुदल व (३) युद्धसामग्री नेण्याकरिता ६००−७०० प्रसिद्ध ‘युंकर्स’ विमाने त्याने ठेवली होती. २० मे १९४१ रोजी जोरदार बाँबहल्ल्याचा सहारा घेऊन त्याने छत्रीधारी सैन्य पश्चिम क्रीटमध्ये उतरविले. त्यांना लपण्यास मदत मिळावी म्हणून मालिमी विमानतळावर बाँबवर्षावाने मोठमोठे खड्डे केले. पुढील दोन दिवसांत जर्मन सैन्य ग्लारयडरमधून उतरले [⟶ ग्लालयडर व ग्लायडिंग]. याच वेळी समुद्रावरूनही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, पण हवाई मदत नसतानाही ब्रिटिश नौसेनेने तो हल्ला परतविला. विमानांच्या मदतीने जर्मनीवरील हल्ला मात्र पूर्णपणे यशस्वी ठरला. ३१ मे−१ जून १९४१ च्या रात्री ब्रिटिशांना क्रीट सोडावे लागले, तरी पण त्यांनी शत्रूला नेटाने तोंड दिले. त्यांचे १३,००० सैनिक मेले किंवा युद्धकैदी झाले, तर निदान १२,०००−१५,००० जर्मन सैनिक या मोहिमेत मारले गेले. या मोहिमेत जर्मनांची युद्धसंघटनेची  क्षमता व ब्रिटिशांची कमजोरी कल्पनाशक्ती एकाच वेळी सिद्ध झाली तथापि वायुसेनेच्या साहाय्याने प्रदेश जिंकण्याचे धारिष्ट हिटलरने परत केले नाही.


 P - 1425 - 1जर्मन-रशिया युद्ध : (२२ जून १९४१−७ मे १९४५). बाल्कम देश व ग्रीसवरील विजय तसेच इराक, सिरिया व इराणमधील जर्मन कारस्थाने आणि टर्कीबरोबर (तुर्कस्थान) केलेला १८ जून १९४५ चा तह यांवरून मध्यपूर्व हे आगामी लढाईचे क्षेत्र होणार हे स्पष्ट दिसत होते. जर्मनी रशियावर हल्ला करणार याची चाहूल लागली होती. वरील कारवायांमुळे हा हल्ला काही काळ दुरावला असला, तरी रशियनांचा सर्वनाश करण्याच्या जर्मन हेतूला, रशियामधील हवामान अत्यंत सोयीचे असणे आवश्यक होते. जूनचा मध्य याकरिता योग्य होता. जर्मन हल्ला मात्र अगोदर ठरल्यापेक्षा दहा दिवस नंतर झाला. रशियनांना हा हल्ला राजकीय दृष्टीने नसला तरी युद्धनैतिक दृष्टीने अनपेक्षितच होता. हिटलरने या मोहिमेला ‘बारबारोसा मोहीम’ हे सांकेतिक नाव दिले होते. रशियाचे इतिहास-लेखक मात्र त्याला ‘महान देशभक्ती युद्ध’ (ग्रेट पेट्रिऑटिक वॉर) असे संबोधतात.

   रशियाविरूद्ध जर्मनीने युद्ध करण्याची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे होती : (१) मॉस्को : हे उद्योगकेंद्र अत्यंत विकसित होते. ते रशियन रेल्वेचा मध्यबिंदू असून त्याच्या उत्तरेस आर्केजल व पूर्वेस सैबेरियन रेल्वे गेली होती, शिवाय नदी व कालव्यांच्या योगे कॅस्पियन आणि काळ्या समुद्राशी ते संलग्न होते. सोव्हिएट रशियाची राजधानी व शासकीय कार्यालये असल्याने त्या राष्ट्राचे नेतृत्व तेथेच होते (२) लेनिनग्राड : येथील औद्योगिकी करण वरच्या दर्जाचे होते. ते बाल्टिकवरील सर्वांत महत्त्वाचे बंदर असून उत्तरेस आर्टिक महासागरापर्यंत याची पोहोच होती (३) युक्रेन प्रांत व डोनेट्‌स खोरे : प्रचंड शेतीचा, औद्योगिक भरभराटीचा व खनिज संपत्तीचा हा मुलूख काळ्या समुद्राच्या निकट सून रूमानियाच्या कॉन्स्टांट्स बंदरापासून,जॉर्जियातील तेलशुद्धीकरणाच्या बाटूम बंदरापर्यंत सरळ सागरी मार्ग जात होता व (४) कूबान व कॉकेशसचा प्रांत : यांपैकी पहिला शेतीच्या बाबतीत समृद्ध तर दुसरा खनिज तेलाच्या उत्पादनाचा मुख्य रशियन पट्टा होता.

या चार उद्दिष्टांना जोडणाऱ्या कक्षे

(लेनिनग्राड−मॉस्को−स्टालिन−ग्राड−ॲस्ट्राखान) पर्यंत जर्मन सैन्य येऊन पोहोचले, तर त्या कक्षांतर्गतच्या अनेक क्षेत्रांतील उपज रशियाला गमवावी लागेल. जर्मनीच्या पश्चिम व आफ्रिकन आघाडीवरील युद्धास उपयोगी पडणारे कारखाने व तेलाचे साठे आपल्याला मिळविता येतील असा कयास होता तथापि त्यांपैकी तेलसाठ्यांशिवाय इतर तीन उद्दिष्टे मात्र पुरेशी सबळ नव्हती. एवढी वस्तुस्थिती असूनही प्रत्यक्षात हल्ला करताना, कॉकेशियन तेलक्षेत्र व्यापण्याच्या  उद्दिष्टाला आरंभी जर्मनीने दुय्यम स्थान दिले.

जर्मन−युद्धयोजना ही लेनिनग्राड−मॉस्को−कीव्ह-स्टालिनग्राड या आघाडीवर रशियाला जेरीस आणावयाचे व नंतर तेलक्षेत्रे व्यापावयाची, अशी होती, त्याकरिता १२१ जर्मन डिव्हिजन सुरूवातीच्या हल्ल्याकरिता वापरण्यात आल्या. त्यांपैकी १७ चिलखीत व १२ मोटरपरिवहित होत्या, ३,००० विमाने या युद्धाकरिता तयार होती. २२ जून १९४१ रोजी पहिला आघात लेनिनग्राड, स्मोलेन्स्क व कीव्ह या लक्ष्यावर केला गेला. जनरल हॉप्नार, गूडेरिआन व फील्ड मार्शल रून्टश्टेट यांसारख्या जबरदस्त अनुभवी सेनाधिपतींकडे याचे नेतृत्व होते. प्रसिद्ध रशियन मार्शल व्हरशिलॉव्ह, ट्यिमशेन्‌कॉ व  बुडयॉन्नी हे या हल्ल्याचा मुकाबला करणारे होते. रशियनांची खरी ताकद त्यांच्या राखीव सैन्यात होती. २२ जून त्यांच्या दृष्टीने एक ऐतीहासिक तारीख होती. ⇨नेपोलियनने १८१२ साली याच दिवशी रशियन स्वारीत नेमन नदी ओलांडली होती व त्याची रशियावरील मोहीम अयशस्वी ठरली होती. १८१५ साली त्याने राजपदाचा त्याग केला.

सुरूवातीस जर्मन हल्ल्यास मोठे यश मिळाले. जून २६ पर्यंत दोन सोविएट सेना घेरल्या गेल्या. ३० तारखेला रीगा बंदर पडले. १६ जुलै रोजी जनरल फोन बोक हा स्मोलेन्स्क शहराच्या वेशीवर पोहोचला. रशियन सैन्यात जरासुद्धा घबराट नाही याची जाणीव जर्मनांना लवकरच झाली. अर्थात हल्ल्याच्या प्रचंड स्वरूपामुळे रशियनांचे अपरिमित नुकसान झाले. साडेसहा लाखांवर रशियन सैनिक युद्धकैदी झाल्याचा जर्मनांचा दावा होता. २ ऑक्टोबरपर्यंत जर्मन आघाडी, लेनिनग्राड, मॉस्कोची वेस, खारकॉव्ह रॉस्टॉव्ह अशी झाली. फोन बोक व गूडेरिआनजवळ पंधरा लाख सैनिक होते. त्याने मॉस्कोवर हल्ला चढविला. १५ ऑक्टोबर रोजी जर्मन चिलखती डिव्हिजनने मॉस्कोपासून १०५ किमी. दूर असलेल्या मझ्‌डॉक गावावर आघात केला. या व इतर ठिकाणी त्यांना विजय मिळाला, पण यानंतर हल्ल्याचा वेग एकदम कमी झाला. कारण रशियन हिवाळा नेहमीपेक्षा तीन आठवडे अगोदर आला होता. मॉस्कोजवळील दलदल, चिखल, जंगल इत्यादींच्यापुढे प्रभावी जर्मन चिलखती सामर्थ्य ढिले पडले. मॉस्कोपासून ५५ किमी. दूर असलेल्या कालीनिन या गावी ५ डिसेंबर १९४१ रोजी जर्मन सैन्य कुंठीत झाले. दुसऱ्याच दिवशी मार्शल झूकॉव्हने जोराच्या प्रत्याघातास सुरूवात केली.


फोन लेपचा १९४१ च्या सप्टेंबर महिन्यातील उत्तरेकडील लेनिनग्राडवरील हल्ला रशियनांनी परतून लावला होता. त्या शहराच्या पश्चिमेकडील उपशहरे जरी जर्मनांच्या हातात आली, तरी ते लेनिनग्राडच्या कबजा घेण्यास असमर्थ ठरले. रशियन सैन्याची अपरिमित मनुष्यहानी होती, पण कोणत्याही आघाडीवर जर्मनांना युद्धनैतिक वर्चस्व मिळाले नव्हते. कॉकेशियन तेलक्षेत्रे दूर होती. ६ डिसेंबर १९४१ रोजी दोन्ही शत्रूपक्षांचा विजय किंवा पराजयाचा संभव समसमान होता. या हल्ल्यामुळे अमेरिकेला युद्धात पडण्यास कारण मिळाले, तर इंग्लंडला मध्यपूर्वेतील आपल्या विस्कटलेल्या आघाडीची सावरासावर करून रोमेलला तोंड देण्यास अवसर मिळाला. पराजित यूरोपीय देशांतून गनिमी काव्याचा उगम होऊ शकला आणि सगळ्यात दूरगामी परिणाम म्हणजे आतापावेतो अजिंक्य समजल्या जाणाऱ्या  जर्मन सैन्यात संशयात्मा निर्माण झाला व पराभवाची धास्ती त्यांच्या मनात नकळत शिरू लागली.

जपानचा युद्धप्रवेश, विजय व अपयश : (७ डिसेंबर १९४१−२ सप्टेंबर १९४५).पश्चिम आघाडीप्रमाणेच पूर्वेकडेही युद्धाची कारणे मुख्यतः आर्थिकच होती. जपान १८५३ पूर्वी स्वयंपूर्ण होते. त्यानंतर जेव्हा प्रथम ब्रिटन व अमेरिका यांच्याबरोबर संबंध आला, तेव्हा जपानला आंतरराष्ट्रीय परिस्थितीची दखल घेणे भाग पडले. त्यानंतर जपानचे औद्योगिकीकरण सुरू झाले. जर्मनीप्रमाणेच या देशाजवळ साधनसंपत्ती अपुरी होती त्यामुळे आपल्या सीमेच्या पलीकडे ती धुंडाळणे त्यांना क्रमप्राप्त झाले. परिणामी साम्राज्यशाहीच्या मार्गावर तो देश जाऊ लागला. १८७५−७९ साली जपानला कूरील, बोनिन आणि क्यूशू बेटे मिळाली, तर १८९१ साली ज्वालामुखी बेटे मिळाली व नंतर चीनविरूद्ध युद्धात त्याला फॉर्मोसा उर्फ तैवान व पेस्कदोरस बेटे आणि १९०४−०५ सालच्या रशियाविरूद्धच्या यशस्वी युद्धानंतर युद्धनैतीक महत्त्वाचे पोर्ट आर्थर बंदर, सॅकालीन बेटाचा दक्षिण भाग केरियावर त्याने नियंत्रण प्राप्त केले तर १९१० साली त्यावर प्रभुत्व व पहिल्या महायुद्धानंतर मेअरिअना, कॅरोलाइन व मार्शल बेटे इ. पॅसिफिक महासागरातील मुलूख जपानला मिळाला.

मंदीच्या महालाटेमुळे उत्कर्षाच्या अभिलापेने १९२९ साली जपानने मँचुरियावर हल्ला केला आणि त्यावर प्रभुत्व मिळविल्यावर त्याला ‘मंचुकुओ’ हे नवीन नाव दिले. त्यामुळे चीनबरोबर जपानचा संघर्ष सूरू झाला. ७ जुलै १९३७ रोजी जपानने चीनवर स्वारी केली. जर्मनीप्रमाणे पूर्व आशियात महासाम्राज्य बनविण्याची जपानची महत्त्वकांक्षा आता पूर्णपणे जागृत झाली होती. याचा विस्तार मँचूक्वो ते ऑस्ट्रेलिया आणि फिजी बेटे ते बंगालच्या उपसागरापर्यंत करण्याची योजना जपानने विचारात घेतली.

तत्कालिक कारण : चीनबरोबरील युद्धात जपानचे सैन्य मोठ्या प्रमाणात चीनमध्ये गुंतून पडले. एकतर ते युद्ध जपानला स्थगित करावे लागणार होते किंवा चीनचा पुरवठामार्ग बंद करणे तरी आवश्यक होते. याकरिता इंडोचायनामधील बंदरे बंद करावी लागणार होती. लॅश्यो ते चुंगकिंगचा ब्रम्हदेशामधून जाणारा रस्ता तोडावा लागणार होता. याचा अर्थ ब्रिटन आणि अमेरिकेबरोबर युद्ध करणे जपानला अपरिहार्य ठरले. जपानबरोबरच्या युद्धात अमेरिका चीनला सारखा पाठिंबा देत असल्याने ही पाळी आली होती. 

फ्रान्सच्या पराभवामुळे, ते राष्ट्र इंडोचायनाचे संरक्षण करण्यास असमर्थ होते. जपानने ते तात्पुरते व्यापावे यास व्हिशी फ्रान्सने २१ जुलै १९४१ रोजी कबुली दिली. तीनच दिवसानंतर जपानी युद्धनौका काम्रान्गो उपसागराच्या लगत दिसली पण जपानच्या या कारवाईला मुरड घालण्याच्या उद्देशाने अमेरिकेतील मालमत्ता (३३० लाख पौंड) गोठवली, याशिवाय ब्रिटनचे व नंतर हॉलंडने जपानबरोबरचे सगळे व्यापारी तह रद्द केले. हे खरोखरी आर्थिक युद्ध पुकारले गेले होते व संघर्षाची सुरूवात झाली होती. आर्थिक नाश पतकरण्याऐवजी जपानने युद्धाची तयारी दाखविली.

जपानी युद्धनीती : जपानन पॅसिफिक महासागरातील क्षेत्रीय परिस्थितीचा पूर्ण लाभ उठविला. त्या महासागरातील बेटांचे महत्त्व ओळखून ती काबीज करणे व अमेरिकेचे तेथील वर्चस्वाचे उच्चाटन करणे, अशी जपानची युद्धनीती होती. विमानवाहक बोटींचा उपयोग करून पॅसिफिकमधील २,५०० बेटांना त्याने बलिष्ठ अशा विमानवाहक नौसेनेचे स्वरूप दिले. पॅसिफिकमधील जपानी मोहीम या बेटांवर असलेल्या विमानांकरवी यशस्वी करण्यात आली. सुरूवातीचा हल्ला पर्ल बंदरात असलेल्या अमेरिकी आरमारावर होणार होता. त्यानंतर ब्रम्हदेश, मलाया, सुमात्रा, जावा व बोर्निओ ही बेटे पादाक्रांत करावयाची होती परंतु हे करण्याकरिता मधोमध मुख्य बेटांचा समूह. फिलिपीन्स, सेलेबीझ व न्यू गिनी व्यापणे आवश्यक होते. यांच्यावरील प्रभुत्वामुळे वेळ पडली तर अमेरिकेबरोबर सोयीस्कर वेळी तह करणे शक्य होणार होते. हा डाव साधण्याकरिता त्याने पुढीलप्रमाणे आघाडीची रेषा आखली होती : कूरील बेटाच्या समूहांतील उत्तरेचे पारामूशीरो बेटापासून दक्षिणेकडील वेक, मार्शल, गिल्बर्ट व एलीस बेटे, नंतर ही रेषा पश्चिमेकडे वळून सॉलोमन बेटे, न्यू गिनी, तिमोर, जावा, सुमात्रा बेटे ते उत्तर ब्रह्मदेशापर्यंत गेली. हिच्या पिछाडीस (पश्चिमेकडे) बोनिन बेटे (मॅगेव्हेल्स समूह), मेअरिॲना बेटे व ग्वॉम, तेथून याप, पलाव, मोरोताह, हॅल्माहेर ते अँबोइना व तिमोर बेटांपर्यंत राखीव आघाडी गेली. येथे दोन्हीही आघाड्या मिळाल्या. शिवाय या दोन आघाड्यांना जोडणारी खंदकासारखी रेषा, कूरील बेटापासून सुरू होऊन, पलाव, मार्शल व गिल्बर्ट बेटांपर्यंत गेली. ही रेषा अमेरिकी सागरी मार्ग, हवाई बेटे, मिडवे बेटे, वेक व ग्वॉलमवरून मानिला येथे लूझॉन बेटापर्यंत पोहोचणाऱ्या  रेषेच्या बगलेस होती.

पर्ल बंदरावरील अनपेक्षित हल्ला व फिलिपीन्स मोहीम : (७ डिसेंबर १९४१−६ मे १९४२). पर्ल हार्बरवरील आघातावरून हे दिसून येते, की याबाबतीत अमेरिकेने अगदीच गलथानपणा दाखविला. जुलै १९४१ पासून त्याने सावध व्हावयास पाहिजे होते. नोव्हेंबर १९४१ मध्ये या राष्ट्रांमध्ये जो राजकीय पत्रव्यवहार झाला, त्यावरून जपान युद्धाकरिता तयारी करीत आहे, हे उघड होते. जपानने २९ नोव्हेंबर १९४१ पर्यंत त्यावर घातलेले प्रतिबंध व नाकेबंदी उठविण्याकरिता निर्वाणीची मुदत दिली होती. अमेरिकेचे उत्तर व सूचना जपानला मंजूर नसणार हे अगदी स्पष्ट असून, पॅसिफिकमधील अनेक ठिकाणच्या अमेरिकी संरक्षण दलांना सावध करावयाचे तर राहू द्या, पण जपानच्या निर्वाणीच्या खलित्याला किती महत्त्व द्यावयाचे याबद्दल अमेरिकन शासनातही मतभेद होते. शेवटचा खलिता जपानी हल्ल्याच्या थोडे तासच आधी पोहोचला होता पण रविवार असल्यामुळे सगळा कारभार थंडपणे चालला होता. पर्ल बंदरात नुकतेच शोधलेले ब्रिटिश रडार यंत्र होते. त्याच्या पडद्यावर आक्रमक विमानांची ती दूर असताना पडछाया दिसली व यंत्रचालकांनी त्याबद्दल सूचना दिली, पण तिची दखलही घेण्यात आली नाही.

याच्याविरूद्ध जपानी युद्धयोजना अंमलात येत होती. पॅसिफिक महासागरांवर असलेल्या अमेरिकी नौसेनेबद्दल इत्यंभूत माहिती जपानी शासनास होती. त्यावरील हल्ल्याची तालीम व प्रशिक्षण संबंधितांना देण्यात आले. १० ते १८ नोव्हेंबर दरम्यान आघात करणारे आरमार कूरील बेटात गोळा झाले. आरमारात चार मोठ्या आणि दोन लहान विमानवाहक नौका होत्या. त्यांवर ४५० लढाऊ विमाने होती. त्याचे संरक्षण करण्यासाठी ३ क्रूझर, ९ विमाशिका आणि २ मोठ्या युद्धनौका होत्या. या आरमारात एकूण ७२ युद्धनौका वगैरे असून आरमारी नौकांवरील रेडिओ बंद केले होते. इतर जपानी नौकांवरील रेडिओ वगैरे साधनांचा अमेरिकी गुप्त वार्तासंकलकांना चुकीच्या कल्पना देण्यात व हुलकावणी देण्यासाठी उपयोग केला जात होता. वरील आरमाराच्या भरीला १६ पाणबुड्या होत्या. त्यांचे काम अमेरिकी बंदरात घुसण्याचे आणि बंदरातून बाहेर पळू पाहणाऱ्या अमेरिकी नौकांचा समाचार घेण्याचे होते.

ॲड्मिरल नागुमोने कोणत्याही अमेरिकी बोटीच्या दृष्टीक्षेपात आपण येऊ नये, असा मार्ग आरमाराकरिता काढला. त्यावेळचे वाईट सागरी हवामान त्याच्या पथ्यावर पडले. एका अमेरिकी विनाशिकेला पाणबुडीचा परिदर्शक (दुर्बिण) दिसल्याचे वृत्त मिळाले, पण थोड्या शोधानंतर या वार्तेला कोणी महत्त्व दिले नाही. सुदैवाने, अमेरिकी विनाशिकेने एका जपानी पाणबुडीला पाहिले व जलभार स्फोटकाने तिला बुडविले. ॲड्मिरल किमेल (अमेरिकन नाविक सेनापती) याला ही बातमी मिळाली. त्याच सुमारास त्याला फोर्ड नावाच्या बेटावरील स्फोटाचा आवाज ऐकू आला. या बेटावरील नाविक विमानतळावर नागुमोच्या बाँबफेकी विमानांनी हल्ला केला होता.

जपानी विमानांचे ‘पर्ल’ बंदरावर हल्ल्यावर हल्ले झाले. मात्र अमेरिकी विमानवाहक नौका बंदरात नसल्यामुळे त्या बचावल्या. एकंदर १९ युद्धनौका निकामी झाल्या वा बुडाल्या. २०२ विमानांपैकी फक्त ५२ बचावली. सुमारे २,८०० सैनिक व अधिकारी ठार झाले. २६० जपानी विमानांपैकी २९ पाडण्यात आली. पाणबुड्या तळास     गेल्या, बंदराचे बरेच नुकसान झाले. अमेरिकन नौसेना शौर्याने लढली. याच वेळी ग्वॉम व वेक बेटांवर जपान्यांनी हल्ला केला आणि ती काबीज केली (१० व २४ डिसेंबर १९४१), परंतु मिडवे बेटत्यांच्या हातात जाऊ शकले नाही.

या नाविक लढाईमुळे एक महत्त्वाचे युद्धसत्य सिद्ध झाले, ते म्हणजे बंदरांतील मोठ्या तोफांचा संरक्षणाकरिता उपयोग अगदी मर्यादित होतो. मुख्यतः लढाऊ विमानेच कार्यक्षम ठरली. हवाई पाणतीर व सूर मारणारी बाँबफेकी विमाने ही हल्ल्याची मुख्य साधने ठरली. परिणामतः अमेरिकी नौसेनेने विमानवाहक नौकायुगात प्रवेश केला.

जपानी जनरल होम्माच्या नेतृत्वाखाली प्राथमिक हल्ल्यानंतर अनेक ठिकाणे १० डिसेंबरपासून जपानी सैन्याने व्यापण्यास सुरूवात केली. हे हल्ले थोपविण्याची अक्षमता ओळखून सरसेनापती ⇨मॅक्‌आर्थर याने आपले सैन्य फिलिपीन्सच्या बाटा द्विपकल्पावर नेले. येथे त्याला भयंकर जपानी हल्ले सहन करावे लागले. याशिवाय हजारो शरणार्थींनी गर्दी केल्यामुळे त्यांना पोसण्याचा प्रश्नदेखील उद्‌भवला. ९ एप्रिल १९४२ रोजी वाटा जपान्यांनी घेतले. कारेजिदॉरचा किल्ला बाटाच्या तोंडाशी होता. त्यावर इतर सेनेला बाटामधून पीछेहाट करावी लागली. १७ मार्च १९४२ रोजी मॅक्‌आर्थर ऑस्ट्रेलियात आला. नूतन नैर्ऋत्य पॅसिफिक विभागाचे त्याला कमांडर नेमण्यात आले. ६ मे १९४२ रोजी ते जपानी सेनेने काबीज केले.

जपानी युद्धतंत्र : या मोहिमेत जपानने स्वतःच विकसित केलेले युद्धतंत्र, युद्ध संपेपर्यंत अनुसरले. विविध ठिकाणी सैनिक उतरविले, ते शक्य तेवढ्या अधिकाअधिक संख्येत, सैनिक परिवाहक जहाजांना अगदी किनाऱ्यापर्यंत क्रूझर व विनाशिकांनी संरक्षण दिले. तेथे उतरण्याकरिता विशिष्ट प्रकारचे तराफे वापरण्यात आले. त्यांतून फक्त सैनिकच नव्हते, तर तोफखाना व जड युद्धसामग्रीही नेण्याची सोय होती. एकदा किनाऱ्यावर पाऊल पडले, की आक्रमक तेथील विमानतळांवर केंद्रित होत. कित्येक वेळा त्यांना या कामाकरिता छत्रीधारी सैनिकांची मदत मिळे. लढाऊ विमाने व सूर मारणारी बाँबफेकी विमाने या विमानतळांवर नंतर येत व तेथे त्यांच्यानंतर उतरणाऱ्या स्वविमानांचे संरक्षण करीत. प्रत्येक यशस्वी अवतरण पुढील अवतरणाची तयारी करीत असे. अशा प्रकारच्या उड्डाणतंत्रामुळे शत्रूच्या नाविक दलाला हस्तक्षेप करावयाला अवधीच मिळत नसे. पर्ल बंदर हल्ल्यानंतर अमेरिका व ग्रेट ब्रिटनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले (७ डिसेंबर १९४१).


मलायावरील मोहीम : (८ डिसेंबर १९४१−१५ फेब्रुवारी १९४२). फिलिपीन्सवरील स्वारीबरोबरच मलायावरील स्वारीस व  हाँगकाँगवरील हल्ल्यास सुरुवात झाली. हाँगकाँग ब्रिटिश साम्राज्यातील सर्वांत मोठ्या बंदरापैकी एक होते. सुरूवातीपासून त्याचा सर्वनाश निश्चित होता. या बेटावर विमानतळ तर नव्हताच, पण तेथील संरक्षणसेना १२,००० सैनिकांची होती व कोलून द्वीपकल्पाला एवढ्या सैन्याच्या जोरावर सुरक्षित ठेवणे अशक्य होते, कारण त्यावरच फक्त विमानतळ व त्याची भूमी आघाडी ८० किमी. लांबीची होती. शिवाय कोलून व हाँगकाँगची लोकसंख्या सात लाखांच्यावर असून ती शहरे फार दाटीची होती. २५ डिसेंबर १९४१ रोजी हाँगकाँग जपान्यांनी काबीज केले.

मलाया व सिंगापूरची परिस्थिती फार वेगळ्या स्वरूपाची होती. मलायाची लांबी १,२०० किमी. असून, त्याच्या दक्षिण टोकाला असलेले सिंगापूर अभेद्य समजले जात असे.

ब्रिटिश मलायाचा ३/४ भाग घनिष्ट उष्ण कटिबंधीय जंगल होता. परिवहन व्यवस्था अगदी मोजकी, पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर एकएक एकेरी रेल्वे मार्ग असून फक्त पश्चिम किनाऱ्यावरच बर्यापैकी रस्ता होता. बहुतेक लढाया याच भागावर लढल्या गेल्या. 

महायुध्द दुसरे. पॅसिफिक(पूर्व आशिया) आघाडी

आपल्या वायुसेनेचा तळ इंडोचायनामधील अनेक विमानतळांवर ठेवून, ८ डिसेंबर १९४१ रोजी जपानी सैन्याने मलायाच्या सीमारेषेजवळ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. इतर सैन्य लढाऊ नाविक पाठबळाच्या मदतीने सिंगोरा (सॉन्गक्ला) व पाट्टानी या दोन बंदरांत उतरले. त्याच वेळी जपानी आरमार मेनाम नदीच्या मुखाशी गोळा झाले व बँकॉक ८ डिसेंबर रोजी कबजात घेतले. थोड्याशा प्रतिकारानंतर २१ डिसेंबर रोजी सयामी सरकार शरण गेले. ह्या हालचालींच्या वेळीच ब्रिटिश मलायातील उत्तरेस असलेले विमानतळ नष्ट करण्यात आले. वायुयुध्दात जितकी ब्रिटीश विमाने जायबंदी झाली, त्याच्या चौपट जमिनीवर उभी असताना नाश पावली. बंदरातील गोद्यावर-विशेषतः सिंगापूर येथील−बाँबवर्षाव करण्यात आला, पण रस्ते व पुलांना त्यांनी सुखरूप ठेवले, कारण त्यांचा उपयोग पुढील कारवायासाठी करावयाचा होता.

सुरूवातीच्या वायुसेनेच्या श्रेष्ठतेमुळे, फ्रान्सप्रमाणेच सिंगापूर येथील ब्रिटिशांमध्येही घबराटीचे वातावरण उत्पन्न झाले. ८ डिसेंबर रोजी कोटाबारूचा विमानतळ जपान्यांच्या हातात आला. त्याच दिवशी सिंगापूरवर पहिला बाँबहल्ला झाला. यानंतर दोनच दिवसांनी जपानी वायुसेनेने ब्रिटिश मनोधैर्याला धक्का दिला. एक आठवड्यापूर्वीच सिंगापूर बंदरात पोहोचलेल्या दोन प्रचंड ब्रिटिश युध्दनौका  ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ व ‘रिपल्स’ यांना मोठ्या कौशल्याने व चातुर्यांने जपान्यांनी बुडविले होते. या अनर्थामुळे पश्चिम पॅसिफिक महासागर, चिनी समुद्र व हिंदी महासागरावरील युध्दशक्ति समतोल जपानी नौसेनेकडे झुकला.

पिनँग शहरावर ११ डिसेंबर रोजी बाँबवर्षाव झाला व तेथे अपरिमीत गोंधळ उडाला. गोऱ्या वसाहतवाल्यांच्या पलायनामुळे तेथील देशी रहिवाशांचे मनोधैर्य अजिबात नष्ट झाले. १८ डिसेंबर रोजी जपान्यांनी पिनँग व्यापले. यानंतर दोन्ही किनाऱ्यांवरील एकामागून एक मलायी शहरे जपानी सेनेने झपाट्याने व्यापली. त्यांच्या या अभूतपूर्व यशाचे मुख्य कारण ब्रिटीश सैनिकाला तोपर्यंत जंगलात लढण्याची मुळीच सवय नव्हती, हे होय. याउलट जपानी सैनिक त्या कामात तरबेज होते. ब्रिटिश सैनिकांची युध्दसामग्री अवजड होती व त्यांना मोटारीशिवाय आगेकूच करणे ठाऊक नव्हते. उलट जपानी सैनिकांची दोन मुख्य शस्रे मशिनगन दोन इंची (सु. पाच सेंमी.), उखळी तोफा ही दोन्ही खांद्यांवरून नेण्यासारखी होती. त्याचे मुख्य अन्न भात असल्यामुळे, कूच करताना मिळेल त्या अन्नावर तो आपला निर्वाह करू शके. ७ जानेवारी १९४२ पर्यंत ब्रिटीशांनी क्वालालुंपुरपर्यंत माघार घेतली. तेथे जपानी सेनेन मध्यम वजनाचे रणगाडे वापरून त्यांना चकित केले. ११ जानेवारी १९४२ रोजी क्वालालुंपुर पडले. त्यावेळेचा ब्रिटिश सेनेतील गोंधळ अवर्णनीय होता. ३० जानेवारीपर्यंत जपानी सैन्य सिंगापूरच्या उत्तरेस ३० किमी.च्या आत क्वाला येथे पोहोचले. दुसऱ्या दिवशी जोहोरच्या सामुद्रधुनीवरील पूल ब्रिटिशांनी उडविला व सिंगापूरच्या वेढ्यास सुरूवात झाली.


यदाकदाचित सिंगापूरवर आक्रमण झाल्यास ते समुद्रमार्गेच होईल, असा ब्रिटिश संरक्षण-नियोजकाचा होरा होता. त्यामुळे तेथील किनारा संरक्षक तोफांचा नेम दक्षिणेकडे होता, तर नाविक व विमान तळांचा वेध उत्तरेकडे, त्यामुळे मोकळी खाडी ओलांडण्याखेरीज जपानी सेनेस दुसरे साधन उरले नव्हते. सिंगापूर येथे ७०,००० सैनिक होते. तसेच दीर्घकालीन वेढ्याला पुरेशी शिधासामग्री व दोन मोठ्या जलाशयांत भरपूर पाणीही होते. ४८ किमी. रूंद खाडीचा              नैसर्गिक खंदक शत्रूच्या व त्यांच्या दरम्यान असल्यामुळे त्यांना सहा महिनेच वेढा लढविणे शक्य होते.

ब्रिटिश नेतृत्व कुचकामाचे व अनुत्साही ठरले. वेगाच्या पीछेहाटीनंतर ब्रिटिश सैनिकांत दम राहिला नव्हता. त्यांच्यात वैफल्याची वृत्ती पसरली होती तर देशी कामगांरात तीव्र असंतोष माजला होता. ४ फेब्रुवारीपासून जपानी तोफखान्याने बेटावर अवरित गोळाबारी केली आणि ८-९ तारखेच्या रात्री या कामाकरिता मुद्दाम तयार केलेल्या पोलादी तराफ्यातून जपानी सैनिक १६ किमी. लांबीच्या किनाऱ्यावर उतरले. त्यांनी दोन बाजूंनी किल्ल्यावर हल्ला केला. लौकरच पुलाची दुरूस्ती होऊन रणगाडे पुढे आले व त्यांच्या साहाय्याने १४ तारखेला दोन्ही जलाशये जपान्यांनी हस्तगत केली. त्याच दिवशी ७०,००० ब्रिटीश सैनिक जपानी सेनेला शरण गेले.

ब्रह्मदेश व इंडोनेशिया मोहिम : (१५ जानेवारी−१५ मे १९४२). ब्रिटीश ब्रह्मदेशावर जरी शंभरांहून अधिक वर्षे राज्य करीत होते, तरी त्यांना त्या देशाच्या संरक्षणाकडे जवळजवळ काहीच लक्ष दिले नव्हते. भारत-ब्रह्मदेश सीमेपार फक्त तीन खेचर मार्ग होते व ते सुध्दा पावसाळ्यात निकामी होत. देशाच्या आतदेखील रंगून−म्यिचीना, लॅश्यो व रंगून−प्रोमखेरीज रेल्वे दळणवळण नव्हते. मुख्य दळणवळण इरावती नदीमार्गेच चालत असे. सुमारे २,५६० किमी. लांबीच्या आघाडीवर त्यांच्या फक्त दोन पलटणी होत्या. युध्दकाली ब्रिटीश पीछेहाटीचा व जपानी आक्रमणाचा मुख्य प्रश्न वाहतुकीचा होता. त्यावेळी जपानी वायुसेना अग्रेसर असल्यामुळे ब्रिटिशांपुढे हा प्रश्न मोठा बिकट झाला होता. १५ जानेवारी १९४२ रोजी सयामच्या खाडीतून ब्रह्मदेशाच्या अगदी दक्षिण टोकावरील व्हिक्टोरिया टोक जपान्यांनी काबीज केले.

थोड्याशा प्रतिकारानंतर २० जानेवारी १९४२ रोजी जपानी सैन्य कॉकरेक खिंडीत उतरले व मौलमाइनवर चालून गेले. ब्रिटीशांनी, सॅल्वीन, बीलिन व सितांग नद्यांकडे क्रमाने पीछेहाट केली. बीलिनवरच काय ती चकमक उडाली. ७ मार्च रोजी रंगून खाली करण्याचा निर्णय ब्रिटीशांनी घेतला, कारण त्यावर जोरात बाँबवर्षाव होत होता. ब्रिटीश सेनापती, मेजर जनरल अलेक्झांडरने दोन विभागांत पीछेहाट करण्याचे ठरविले. एक घटक सितांग नदीमार्गे पाचव्या व सहाव्या चिनी सैन्यास जाऊन मिळणार होता, तर दुसरा इरावतीमार्गे उत्तरेस जात होता. पीछेहाट व अगेकूच दोन्ही त्वरेने झाली. जपानी प्रभावी हल्ल्यामुळे लोश्योपर्यंतचा मुलूख त्यांनी एप्रिल १९४२ अखेर काबीज केला. इंग्रजांनी तेलाच्या खाणींना आगी लावल्या व यंत्रसामग्री उद्ध्वस्त केली. सहाव्या चिनी सैन्याचा धुव्वा उडाला. चिनी व ब्रिटीश सेनेची सांगड परिणामकारक झाली नाही. पाचवी चिनी सेना स्वदेशाबरोबर सुत्रे कायम ठेवण्याकरिता अगदी उत्तरेच्या म्यिचीना रेल्वे स्टेशनकडे जाऊ लागली.

ब्रिटिश सैन्य पश्चिमेस चिंद्विन नदीकाठी कलेवाच्या रस्त्यापर्यंत पोहोचले. १ मे रोजी मंडाले रिकामे करावे लागले. इरावतीवरचा ‘अवा’ हा मोठा पूल उडविण्यात आला. कलेवा येथे ते १५ मे रोजी पोहोचल्यावर आपल्या सर्व अवजड सामग्रीचा त्यांनी नाश केला व जंगलातील पायवाटांनी हिंदूस्थानच्या पूर्व सीमेवर ते २८ मे रोजी पोहोचले. पाचवे चिनी सैन्य ठरल्याप्रमाणे उत्तरेस पोहोचण्याच्या अगोदरच, जपानी सैन्य पूर्वेकडून भामो येथे पोहोचले होते. जनरल लो ची इंग स्टिलवेल यांनी हिंदुस्थानात पीछेहाट करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी पीछेहाट करीत होमलिन येथे चिंद्विचन नदी छोट्या छोट्या बोटींनी पार केली. २० मे रोजी ही दोन्ही दोस्त सैन्य इंफाळ (मणिपूर) येथे पोहोचली. जनरल स्टिलवेलने आपण चांगलाच मार खाल्ल्याचे कबूल केले.

पॅसफिक आघाडी : फिलिपीन्स व ब्रह्मदेश पादाक्रांत करीत असतानाच जपानी सैन्य बोर्निओ, ताराकान, सेलेबीझ, सेराम (सेरंग), बाली व तिमोर बेटे व्यापण्यात गुंतले होते. जमिनीवर तर त्याचा प्रतिकार कोणीच केला नाही. सागरावरदेखील किरकोळ प्रतिकार झाला. २३ जानेवारी १९४२ रोजी मात्र चार दिवसांच्या नाविक युध्दानंतर माकॅसरच्या सामुद्रधुनीत अनेक जपानी वाहतुकीच्या बोटी बुडविल्या गेल्या आणि १४ फेब्रुवारी रोजी सुमात्रावर स्वारी होऊन जपान्यांनी पार्लेबांग व्यापले. येथे १७ जूनपर्यंत लढाई चालू राहिली. त्या दिवशी उर्वरित डच सेना शरण गेली. २७ जून रोजी जावा समुद्रात युध्द सुरू झाले. जपानी पाणबुड्या व वायुसेनेच्या उत्तम दर्जामुळे दोस्त राष्ट्रांचे आरमार जवळजवळ नष्ट झाले. दहा दिवसांत जावा बेटावरील डचांचा प्रतिकार संपुष्टात आला. भोवतालची इतर छोटीमोठी बेटे अगोदरच जपानच्या ताब्यात आली होती. याप्रमाणे फिलिपीन्समधील लढा संपण्याअगोदर दक्षिण पॅसफिक महासागरावरिल दोस्त राष्ट्रांचा प्रतिकार संपला होता. ऑस्ट्रेलिया व न्यू गिनीमधील टॉरस सामुद्रधुनीवर असलेले दक्षिण पापुआ बेट सोडून इतरत्र जपानी वर्चस्व प्रस्थापित झाले. पॅसिफिक आघाडी अखंड करण्याच्या उद्देशाने जपान्यांनी पोर्ट मोर्झ्‌बी बंदर हातात घ्यावयाचे ठरविले. तेथून न्यू हेब्रिडीझ व न्यू कॅलेडोनियावर कूच करून शत्रूचा. हवाई बेटे व पनामा ते ऑस्ट्रेलियापर्यंतचा सागरी वाहतूकमार्ग तोडण्यासाठी ते सिध्द झाले.

युध्दाच्या मध्यकालाचा आढावा : येथपर्यंत जपानी सैन्याने यशाचा अत्युच्च बिंदू गाठला होता परंतू चमत्कारिक योगायोग असा, की जपान्यांविरूध्द ज्यावेळी सर्व प्रतिकार नष्ट झाल्याचे व त्यांना हवे ते मिळणार असल्याचे दिसू लागले, त्याच वेळी त्यांच्या यशाची लाट ओसरू लागली. पश्चिमेस सर्व यूरोप जर्मनीच्या यशाची ओहटी सुरु झाली. या परिवर्तनास समान कारणे होती. पायाशी हतबल होऊन शरण आल्यासारखे वाटले आणि जर्मनीच्या बाबतीत असे, की बाँबफेकी विमानांवर लढाऊ विमानांचे वर्चस्व प्रस्थापित झाले व त्यामुळे त्यांच्या ताकदीने दोस्त राष्ट्रांचे सागरी सामर्थ्य अबाधित राहिले आणि जपानच्या बाबतीत असे, की बाँबफेकी विमानांनी युध्दनौकेवर कुरघोडी केली त्यामुळे भूमीवरील लष्करी वर्चस्व अगदी निष्कीय ठरले. दोन्ही देशांच्या विजयाची लाट दोस्तराष्ट्राच्या वायुसेनेच्या कर्तृत्वामुळेच ओसरू लागली.

प्रवाळ बेटांवरील लढाया : पर्ल हार्बर पडल्यानंतर अमेरिकेने पहिल्याने ऑस्ट्रेलियास सुखरूप राखण्यासाठी दक्षिण पॅसिफिक महासागरातून, अमेरिकेकडून हवाई बेटामार्गे सागरी मार्ग प्रस्थापित करण्यचा कौशल्यपूर्ण यशस्वी प्रयत्न केला (फेब्रुवारी ते एप्रिल १९४२). या मार्गाच्या उत्तरेस असलेल्या मार्शल, गिल्बर्ट, राबाउल, वेक, मार्क्स, सालामाउआ इ. जपान्यांच्या हातात असलेल्या बेटांवर विमानवाहकावरील विमानांच्या व बाँबफेकी विमानांच्या साहाय्याने हल्ले केले. जपानी सैन्याचे लक्ष या हल्ल्यांकडे वेधले गेल्यामुळे वरील सागरी मार्ग चालू झाला, याशिवाय जॉन्स्टन बेटावर विमानतळ स्थापला, इतर काही बेटांवरील विमानतळ अधिक बळकट केले. त्या अवधीत, फिजी, ख्रिसमस, फॅनिंग, कँटन बेटेही काबीज केली. न्यू हेब्रिडीझच्या द्वीपसमूहावर कुमक पाठविली. तेथे एक नवीन विमानतळ स्थापला व सॉलोमन बेटावरील विमानतळ मजबूत केला. जपानने तोपावितो आपली न्यू गिनी व न्यू ब्रिटन बेटांवरील ठाणी मजबूत केली होती. मे महिन्यात (१९४२) सुरूवातूस दोन्ही नाविक दलांचा सामना झाला. या युधादत जपानचे १ विमानवाहक जहाज, ३ भारू क्रूझर, १ हलका क्रूझर, २ विनाशिका व अनेक रसदबोटी बुडाल्या, तर २० नौका जायबंदी झाल्या. अमेरिकेचेदेखील तेवढेच नुकसान झाले  अर्थात हे सर्व लढाऊ विमानांमुळेच. युध्दनौकांनी आपापसात एकही गोळा डागला नव्हता.

दक्षिण पॅसिफिकमध्ये कुंठित झाल्यामुळे जपानने आपले लक्ष उत्तर व मध्य पॅसिफिककडे वळविले (जून १९४२). मिडवे बेट जिंकण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. हुलकावणी देण्यासाठी जपानने अल्यूशन बेटावरील अमेरिकन ठाणे असलेल्या ठिकाणी हल्ला केला. पण त्याची परिणती मिडवे बेटाच्या प्रसिध्द नाविक लढाईत झाली. जपानी हालचालींचा सुगावा लागून ३ अमेरिकी विमानवाहक नौका अगोदरच मिडवेकडे वळल्या होत्या. याशिवाय ७ भारी क्रूझर, १ हलके क्रूझर १४ विनाशिका व २० पाणबुड्या त्यांच्या मदतीला आल्या. जपानी आरमार दिसल्याबरोबर ३-४ जून रोजी मिडवेवर असलेल्या बाँबफेकी विमानांनी त्यावर जोराचा हल्ला चढविला. आणखी एका जपानी आरमाराविषयी बातमी लागताच असलेले अमेरिकी आरमार गोळा झाले व जमिनीवरून आणि विमानवाहकावरून सारखे विमानहल्ले सुरू ठेवले व शत्रूच्या तीन विमानवाहकांवर त्यांनी हल्ला चढविला. जपानी विमानांनी अल्यूशन द्वीपसमूहाच्या बेटावर जोरात हल्ला केला असला, तरी अमेरिकन नौसेनेची विभागणी अमेरिकी नाविक सेनापती ⇨निमित्स याच्या हुशारीमुळे झाली नाही मात्र ४ विमानवाहक, २ मोठे क्रूझर, ३ विनाशिका व इतर बोटी यांशिवाय ३ युध्दनौका, ३ भारी क्रूझर व इतर अनेक जपानी युध्दनौका बुडाल्या वा त्यांचे जबरदस्त नुकसान झाले (४-५ जून १९४२). हे युध्द निर्णयात्मक होते. युध्दनौकांची आपापसात गोळाबारी झाली नाही. युध्दाचा निर्णय हवाई शक्तीमुळे लागला. जपानच्या नाविक शक्तीला मोठा धक्का बसला आणि यानंतर ते अमेरिकी नाविक शक्तीबरोबर मुकाबला करण्यास असमर्थ ठरले.


जर्मनीचा उत्तर आफ्रिका युध्दात भाग : आफ्रिकेत इटालियन सैन्याचा धुव्वा उडालेला पाहून त्याच्या मदतीला हिटलर गेल्याचे व रोमेलला आफ्रिका कोअरचे नेतृत्व देऊन पाठविल्याचे यापूर्वी सांगितले आहेच. लिबियन मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात (२४ मार्च १७ जून १९४१) आफ्रिकेत आल्याबरोबर रोमेलला यश मिळाले होते. 

चौथी लिबियन मोहिम : (जुलै−ऑक्टोबर १९४१). चौथी मोहिम सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही युध्दोन्मुख सेनांनी (ब्रिटीश सेनाधिपती जनरल सर क्लॉड ऑकिन्लेक) आपली साधनसामग्री, शस्रास्रे इत्यादींची पुनर्घटना केली. महत्त्वाची बाब म्हणजे संचारसुलभतेची गरज दोघांनीही ओळखली होती. रोमेलचे सैन्य युध्दक्षेत्रापासून खुष्कीच्या मार्गाने ट्रिपोलीहून १६० किमी. दूर होते, तर बेंगाझीहून ६०० किमी. होत आणि सागरमार्गे या दोन्ही बंदराचे अंतर मेसीनाच्या सामुद्रधुनीपासून अनुक्रमे ५६० व ७०० किमी. होते. या सागरी मार्गावर मॉल्टा बेटाचे प्रभूत्व होते. तेथून ट्रिपोली ४८६ किमी., बेंगाझी ५७९ आणि क्रीट ८०० किमी. इतक्या अंतरावर होते. मॉल्टाचा नायनाट करण्याची युध्दनैतिक आवश्यकता व टोब्रुक ताब्यात घेण्याची युध्दनैतिक गरज रोमेलने जर्मन युध्दनिर्देशकांच्या नजरेस आणली तथापि त्यांना ती उमगली नाही. रोमेलची ही लंगडी बाजू ऑकिन्लेकच्या ध्यानात आली आणि त्याने त्याचा पूर्ण फायदा घेण्याचे ठरविले. आफ्रिका कोअरला भूमध्य सागरातून येणारा साधनसामुग्रीपुरवठ्याचा बराचसा भाग ऑगस्ट १९४१ मध्ये ब्रिटीशांना बुडविता आला. ऑक्टोबरमध्ये रसदमारीचे प्रमाण प्रमाणाबाहेर गेल्याने जर्मन शासनाने या प्रश्नास हात घालण्याचा प्रयत्न केला. २५ यू पाणबुड्या मध्यसमुद्रात नेल्यामुळे ब्रिटीश विमानवाहक (१३ नोव्हेंबर १९४१ रोजी) जर्मन नौसेना बुडवू शकली.

मध्यंतरी ऑकिन्लेकने आपल्या सेनेची पुरर्घटना केली. ही ती सुप्रसिध्द विजयी आठवी आर्मी. यात हिंदी चौथी डिव्हीजन होती. राखीव सैन्यात २९ वा हिंदी पायदळ ब्रिगेड गट होता. ब्रिटीशांखेरीज इतर ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड व दक्षिण आफ्रिकन होते. रोमेलचे सैन्य जर्मन आफ्रिका कोअर व इटालियन होते. जर्मन विमानतळ संख्येने अधिक होते व त्यांच्या रणगाडाविरोधी तोफा ब्रिटीश लोकांपेक्षा कार्यक्षम होत्या.

हे युध्द मुख्यतः मरूभूमिवरील [⟶मरूभूमी युध्दतंत्र] रणगाड्यांमध्ये झाले. ब्रिटीश हल्ला १८ नोव्हेंबर १९४१ रोजी ठरला होता (क्रुसेडर कार्यवाही) पण १७ रोजी फार मोठे वादळ झाल्यामुळे एकही ब्रिटिश विमान विमानतळ सोडू शकले नाही. ब्रिटिशांच्या हल्ल्याच्या वेळी रोमेल रोमला गेला होता. जर्मनांवर हा हल्ला अगदी अनपेक्षित झाला. १९ नोव्हेंबर रोजी ब्रिटीश हल्ला जर्मन व इटालियन सैन्यावर वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे याची विभागणी झाली होती. याचाच रोमेलने फायदा घेतला. २२-२३ नोव्हेंबर रोजी सीदि रेझेग येथे चिलखती रणगाड्यांची मोठी लढाई झाली. ब्रिटिश सेनेला तेथे माघार घ्यावी लागली, पण चौथ्या हिंदी डिव्हिजनने सीदी ओमार व्यापिले. दोन्ही सैन्याच्या रणगाड्यांची खूप नासधूस झाली, पण रोमेलची रणगाडा दुरूस्तीची व्यवस्था अधिक कार्यक्षम असल्यामुळे, ब्रिटीशांना रणगाड्यांचे नुकसान तीव्रपणे जाणवले. रोमेलने १५ वी व २१ व्या रणगाडा (पँझर) डिव्हिजनच्या मदतीने ब्रिटिश सैन्यावर घुसून एवढा जोराने आघात केला की ते सैन्य इतस्ततः विखुरले गेले व त्याच्या सेनापतीने माघार घ्यावयाचे ठरविले. ऑकिन्लेतक जातीने युध्दक्षेत्री उपस्थित झाला व चौथ्या हिंदी डिव्हिजनला त्याने रोमेलला थोपवून ठेवण्याची आज्ञा दिली. तिने हे काम इतके चांगले केले, रोमेलला आपल्या रणगाडा डिव्हिजन टोब्रुक व बार्दीयाच्या दरम्यान असलेल्या पुरवठातळावर मागे घ्याव्या लागल्या. २६ नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड डिव्हिजनने जर्मनांना सीदि रेझेगमधून हुसकावून लावले, पण तिथे तिने पाया रोवण्याअगोदरच तिच्यावर जर्मनांनी प्रतिहल्ला चढविला. न्यूझीलंड सैन्यास ते स्थान सोडावे लागले तथापि त्यामुळे इतर ठिकाणी काही परिणाम झाला नाही. रोमेलची रणगाडा डिव्हिजन ब्रिटीश सेनेच्या कात्रीत सापडल्यामुळे ती बार्दीया व हॅल्फाया घाटामधील जर्मन संरक्षक सैन्यास जो वेढा पडला होता, तो उठवू शकली नाही. या सुमारास दोन्ही सैन्यांची जोरात चकमक उडाली. ब्रिटीश रणगड्यांच्या आघातामुळे व आयत्या वेळी चौथ्या डिव्हिजनची कुमक मिळाल्यामुळे दोन्ही रणगाडा डिव्हिजनना माघार घ्यावी लागली. हिंदी सैन्य व चौथ्या चिलखती ब्रिगेडने त्यांचा पाठलाग केला. रोमेलला एल् आगेलापर्यंत माघार घ्यावी लागली. १७ जानेवारी १९४२ पर्यंत बार्दीया व हॅल्फाया येथील जर्मनांना हार खावी लागली. त्याबरोबरच ही अत्यंत गुंतागुंतीची मोहीम एकदाची संपली. जर्मन व इटालियन सैन्याचे २४,५०० सैनिक मेले व ३६,५०० युध्दकैदी झाले. ब्रिटिशांची हानी १८,००० सैनिक इतकी होती.

पाचवी लिबियन मोहीम : (२१ जानेवारी−जुलै १९४२). या मोहिमेत जर्मन सैन्य आक्रमक होते व इटालियनचे प्रभुत्व भूमध्य सागरावर होते. तोपर्यंत केप ऑफ गुड होप या दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला वळसा घेऊन ईजिप्तमध्ये दोस्त राष्ट्रांची युध्दसामग्री अनिर्बंधितपणे पोहोचत होती. जर्मन पाणबुड्यांनी भूमध्य सागरात धुमाकूळ घातला होता. त्यांनी ‘आर्करायल’ खेरीज ब्रिटिशांच्या अनेक युध्दनौका बुडविल्या. शिवाय क्विन एलिझाबेथ व वलिएंट या प्रचंड युध्दनौका जर्मन नौकांनी बुडविल्या. जर्मनांची कुमक आता निर्वेधपणे उत्तर आफ्रिकेत पोहचू लागली होती. चौथी मोहीम संपल्यानंतर चार दिवसांनी रोमेलने मोहिमेस प्रारंभ केला (२१ जानेवारी १९४२) व ७ फेब्रुवारी १९४२ पर्यंत ब्रिटिश सैन्य ठिकठिकाणी पाय रोवून बसण्याअगोदर त्याच्या विखुरलेल्या स्थितीची फायदा घेऊन,त्याची आणखी वाताहत केली. चौथ्या हिंदी डिव्हिजनलादेखील उत्तरेकडे डेर्ना येथे पीछेहाट करावी लागली. चौथ्या मोहीमेच्या पराजयामुळे हतबल न होता, परत रोमेलने एल् गाझाला येथे आपला पाय रोवला. अगोदरच्या युध्दातून गमावलेल्या रणगाड्यांची भरपाई भरून ब्रिटिशांना शत्रुविरूध्द नेट धरणे अशक्य झाले. ब्रिटिश वायुसेनेच्या भूसेनेबरोबर आवश्यक तितका संपर्क राहू शकला नाही. या मोहिमेतील महाग धडा पूर्णपणे शिकावयास ऑक्टोबर १९४२ उजाडावा लागला.

सहावी लिबियन मोहीम : ह्या मोहिमेच्या निकालावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. उत्तर आफ्रिकेतील प्रभूत्व शेवटी कोणाला मिळणार, हे त्यामुळे ठरणार होते. भूमध्य सागरावरचे नियंत्रणही त्यावरच अवलंबून होते व इतर आघाडीवरील सैनिकांच्या मनोधैर्यास हिच्यातील यशामुळे आधार मिळणार होता.

हिच्या प्रारंभीच जर्मनीने मॉल्टावर जोरदार हल्ला करण्यास सुरूवात केली, पण ह्या हालचालींना अगोदरच उशीर झाला होता. ८ एप्रिल १९४२ पर्यंत मॉल्टाने २,००० विमानहल्ले सहन केले, परंतु तेथील जनरल विल्यम डॉबीच्या नेतृत्वामुळे तटबंदीच्या सैनिकांच्या तसेच नागिरकांच्या मनोधैर्यास धक्का पोहोचला नाही.

आठव्या आर्मीचा जनरल रिची याने उत्तर आफ्रिकेत अखंडित आघाडीवर शत्रूस तोंड देण्याऐवजी, रणक्षेत्रीय तटबंदीची पेटी (बॉक्स) या नावाने ओळखली जाणारी पध्दत अमलात आणली. एल् गाझाला ते बीर हाकेम या त्याच्या ६५ किमी. आघाडीवर संरक्षणोपयोगी नैसर्गिक स्थाने नसल्यामुळे, त्याने सु. ४ ते ९ चौ. किमी. चौकोनात ठिकठिकाणी दीर्घ वेढ्याला तोंड देता येईल अशा रीतीने संरक्षण सामग्रीची व सैनिकांची उभारणी केली. जरूर पडेल तेव्हा एका पेटीकडून दुसऱ्या पेटीकडे कुमक पाठविण्याची व शत्रूच्या बगलेवर आक्रमक हल्ला करण्याची सोय ह्या पध्दतीत सामावली होती. रोमेलचा डाव असा होता, की आघाडी इटालियन सेनेने लढावयाची व जर्मन चिलखती सामर्थ्य आघाडीच्या बगलांकडून फिरवावयाचे म्हणजे शत्रूचे चिलखती सैन्य व पेट्या क्रमाक्रमाने हतबल होतील. रोमेलच्या या समरतंत्रास चांगलेच यश मिळाले, पण ब्रिटीश सैन्याचा सर्वनाश जनरल रिचीने होऊ दिला नाही. ब्रिटीश वायुसेनेला शत्रूवर आघात करावयास लावून ३/४ ब्रिटीश व फ्रेंच सैन्य सुखरूप ठिकाणी पोहचू शकले. २७ मे १९४२ पर्यंत ब्रिटिशांना सारखी माघार घ्यावी लागली. शेवटचे तीन दिवस परिस्थिती इतकी नाजूक होती, की जनरल ऑकिन्लेकने थेट ॲलेक्झांड्रियांपर्यंत पीछेहाटीची तयारी केली पण तोपर्यंत रोमेलचे सैनिक बरेच थकले होते व त्यांची युध्दसामग्री-विशेषतः रणगाडे-इतकी कामास आली की, ही यशस्वी चढाई ॲलेक्झाड्रियांपासून ७५ किमी.वर कुंठीत झाली. जुलै १९४२ अखेरपर्यंत दोन्ही बाजूंना स्थिरस्थावर होण्यास वेळ लागला.

यानंतर युध्दाची उपक्रमशीलता रोमेलच्या हातातून निसटत गेली. त्याची कारणे अशी : त्याचा पुरवठ्याचा मार्ग फार लांब झाला. भूमध्य समुद्रावरील जर्मन प्रभूत्व अमेरिकन विमानवाहक नौकेच्या आगमनाने खिळखिळे झाले त्यामुळे मॉल्टाला पुरवठा करणारी दोस्त जहाजे तेथे पोहचू शकली. अनेक ब्रिटीश युध्दनौका व व्यापारी जहाजे जरी जर्मनांनी बुडविली, तरी त्यांची जागा घेणाऱ्या दुसऱ्या नौका सिध्द झाल्या. जर्मन-यशाच्या भरतीची लाट आता ओसरू लागली. रोमेलचे प्रभावी व्यक्तीमत्त्व व नेतृत्वदेखील या ओहोटीला थोपवू शकले नाही.

रशिया-जर्मन युध्द : (रशियाचे प्रतिहल्ले). ७ डिसेंबर १९४१ रोजी जर्मनीस दोन धक्के बसले. अमेरिका युध्दात पडली हा एक व मॉस्को आघाडीवर थंडीची लाट आली, हा दुसरा. त्यामुळे जर्मन सैनिकांत चलबिचल सुरू झाली. त्यांना नेपोलिंयनचा रशियातील पराभव आठवला.


जर्मनीने थंडीला तोंड देण्याच्या निमित्ताने आफ्रिकेमधील पेट्यांची ब्रिटीश संरक्षण पध्दत अमलात आणली पण रशियनांना तीव्र थंडीची सवय होती. त्यांच्याजवळ बर्फावरून जाणारी अगणित वाहने होती आणि जर्मनांना सारखे सतावून सोडण्याचे त्यांचे रणतंत्र होते. शत्रूच्या पिछाडीस व बगलेस ते पोहचू शकत. हिवाळ्याच्या मध्यात, बर्फाची जमिनीवरील जाडी वाढल्यावर, रशियन सैन्याने आराम घेण्याऐवजी, शत्रूच्या पेट्यांना त्रस्त करण्याचे तंत्र कायम ठेवले. लॅडोगा तळे गोठून गेले होते, पण त्यावर रस्ता करून रशियनांनी लेनिनग्राडशी संपर्क प्रस्थापित केला आणि सोळाव्या जर्मन सैन्याचा नाश घडवून आणला. अशा रितीने मध्य आघाडीवर फेब्रुवारी व मार्च १९४२ मध्ये रशियनांनी आपले युध्दक्षेत्रीय लाभ स्थिरस्थावर केले. फक्त दक्षिणेत क्रिमिया द्वीपकल्पावर जर्मनांचे प्रभुत्व बऱ्यापैकी राहिले.

जर्मनांची रशियन मोहिम : (मे−जून १९४२). या मोहिमेत हिटलरने सैन्य व शस्रसंभारपुरवठ्याच्या बाबतीत आपली शिकस्त केली. रशियन सैनिकी व नाविकीस्वरूपाची मनुष्यहानी फार झाली असली, तरी इतर रशियाव्याप्त देशांतील सैनिक रशियाच्या मदतीला आले होते. मॉस्कोचे नियंत्रण जर्मनांना शेवटपर्यंत मिळू शकले नाही तर दक्षिणेस ते स्टालिनग्राड व्यापू शकले नाहीत. त्यामुळे जरी जर्मन आघाडी डॉन नदीच्या पश्चिम काठापर्यंत व तेथून स्टालिनग्राड ते मझडॉक (कॉकेशस) व नोव्होरोसिस्क (काळा समुद्र) पर्यंत आली, तरी हा विजयच त्यांना महाग पडला होता. कारण परिवहन फार कठीण व लांबचे होऊन बसले होते. रशियनांना मात्र दोस्त राष्ट्रांकडून उत्तरेच्या आर्केजल बंदरातून भरीव मदत होत होती. हिटलरने यावेळी चुकीचा निर्णय घेतला व तोच त्याच्या रशियातील अंतिम पराभवास कारणीभूत ठरला. मॉस्कोवर जोर करण्याऐवजी जर्मनांनी आपले सर्व लक्ष स्टालिनग्राडवर रोखले. त्यांनी आपला पूर्वीचा योग्य निर्णय मागे घेतला. त्यामुळे त्यांनी जरी १ जुलै रोजी क्रिमिया संपूर्णपणे काबीज केले, तरी युध्द लांबविण्याखेरीज त्याचा काही उपयोग त्यांना झाला नाही.

जपानी माघार : मिडवेच्या यशस्वी नाविक युध्दानंतर आपली युध्दयोजना दोस्तराष्ट्रांनी काळजीपूर्वक आखली. त्यांच्या सुदैवाने जपानने आपले हातपाय पॅसिफिक महासागरात एवढे पसरले होते, की व्याप्त मुलुखावर युध्दनीतीच्या दृष्टीने त्यांचे वर्चस्व असूनही मातृभूमीचे संरक्षण करणे जपानला शक्य नव्हते. ती ताकद जर जपानमध्ये असती, तर या युध्दाला वेगळेच स्वरूप मिळाले असते.

दोस्त राष्ट्रांचा डाव थोडक्यात असा होता : राबाउल बेटास हतबल करून, जपानी आघाडीच्या दक्षिणेच्या टोकाचा भंग करावयाचा व तिला आग्नेयेकडे पसरू द्यावयाचे नाही नंतर वेक बेटे व गिल्बर्ट बेटांमधील उत्तरेच्या बगलेचा भंग करावयाचा व हे केल्यावर मोरोताइ व ग्वॉममधील आतील आघाडीवर हल्ला करावयाचा व तेथून फिलिपीन्सवर चढाई करावयाची. त्यामुळे जपानने नुकतेच मिळविलेले पॅसिफिक महासागरांतील साम्राज्य नष्ट होणार होते. नंतर फिलिपीन्सवरून खुद्द जपानवर हल्ला चढवावयाचा. त्यासाठी ज्या मुख्य लढाया झाल्या त्या खालीलप्रमाणे होत्या.

ग्वादल कनॅल व पापुआवरील मोहीम : (१९४२-४३). मिडवे बेटाच्या लढाईनंतर पोर्ट मोर्झ्बीवरील हल्ले परत सुरू करण्याकरिता जपान्यांनी दक्षिण सॉलोमन समूहातील ग्वादल कनॅल या बेटावर विमानतळ उभारण्याचा निर्णय जुलै १९४२ मध्ये घेतला. हा बेत विफल करण्याच्या उद्देशाने, न्यूझीलंडमध्ये असलेले अमेरिकी सैन्य, या बेटावर व जवळच्या फ्लॉरीडा बेटावर विशेष विरोध न होता ७ ऑगस्ट रोजी उतरले व अर्धवट तयार झालेल्या विमानतळाचा         त्यांनी कबजा घेतला. या युध्दात आलेल्या अपयशामुळे जपानी लष्करी शासनाला आपला महत्त्वाकांक्षी बेत आखडावा लागला.

राबाउलवरील मोहीम आणि न्यू गिनीवर विजय : (ऑगस्ट १९४२− ). जपानी आक्रमानापासून मुक्त केलेल्या उत्तर पापुआ व दक्षिण सॉलोमवर दोस्तराष्ट्रांची अनेक ठाणी उभारली गेली. त्यांवर चार अमेरिकन व सहा ऑस्ट्रेलियन डिव्हजन ठेवण्यात आल्या. त्यानंतर राबाउलवरील जपानी प्रभाव नष्ट करण्याकडे दोस्त राष्ट्रांचे लक्ष वेधले. लढाऊ विमानांच्या तळांची साखळी न्यू गिनी व ग्वादल कनॅल बेटांवर निर्माण करून रेंडोव्हा, न्यू जॉर्जिया, मूंडा, कॉलॉम्बांगारा, व्हेला लाव्हेला व ट्रेझरी द्वीपसमूह अशी एकापाठीमागून एक बेटे त्यांनी ऑक्टोबर १९४२ अखेरपर्यंत काबीज केली.

पापूआ बेटावरील हूआन द्वीपकल्प अजून जपान्यांच्या हाती होते. वरील मोहिमा चालू असतानाच १,७०० अमेरिकी छत्रीधारी सैनिक मार्कम नदीच्या उत्तरेस उतरले. मुलूख जसजसा ताब्यात येत गेला, तसतसे लष्करी शासन व युध्दसामग्री विमानांतून उतरवली गेली. पहिल्याने सालामाउआ व ले ठाणे घेतल्यानंतर (११−१६ सप्टेंबर १९४३) एक एक ठाणी घेत, जानेवारीच्या सुरूवातीस (१९४४) संबंध हूआन द्वीपकल्प दोस्त राष्ट्रांनी व्यापले.

या भागातील इतर लढाया याच धर्तीच्या होत्या. अमेरिकन विमानांच्या अवरित व सागरी पायदलाच्या हल्ल्यांना जपान्यांजवळ उत्तर नव्हते. फेब्रुवारी १९४४ च्या मध्यापर्यंत सॉलोमनमधील जपानी व्याप्ती जवळजवळ नष्ट झाली. मोठ्या व महत्त्वाच्या ब्रिटिश बेटांवर १० मार्च रोजी पहिली अमेरिकन सेना उतरली व लवकरच राबाउल फक्त ४१५ किमी. दूर असलेल्या विमानतळावर त्यांनी आपले ठाणे स्थिर केले. 

सागरी युध्दात जपानी युध्दनौका व व्यापारी जहाजांची मोठी हानी होऊ लागली होती. शिवाय जपानी नौसनेची इतस्ततः इतकी पखरण झाली होती, की पुरेशी जहाजे असली तरी शत्रूच्या हालचालींमुळे त्यांना हवी तितकी कुमक व पुरवठा योग्य वेळी त्या त्या स्थळी पोहोचविणे अशक्य झाले असते. आता मॅक्आर्थरचे युध्दतंत्र म्हणजे एका पाठीमागून एक ठाणे क्रमाने घेण्याऐवजी उड्या मारीत, पॅसफिक महासागरातील बेटांवर दोस्त राष्ट्रांचे सैन्य आपले तळ प्रस्थापित करू लागले. बिस्मार्क द्वीपसमूहाच्या पश्चिमेस ॲडमिरॅल्टी बेटांवर पहिली उडी ही न्यू गिनीच्या ४०० किमी. उत्तरेस होती. त्यावर २९ फेब्रुवारी १९४४ रोजी अमेरिकेने बस्तान बसविले. त्यामुळे न्यू ब्रिटनमधील राबाउल बेटावरील महत्त्वाचा जपानी तळ आणखी कमजोर झाला. जपान्यांनी राबाउलचा आता टिकाव लागणार नाही, हे ओळखून मुख्य कचेरी डच न्यू गिनीमधील हालँडीआ बंदरात नेण्याचे ठरविले पण मॅक्आर्थरने त्यांचा हा डाव हेरून आपली दुसरी उडी (पश्चिमेस सु. ९६० किमी. दूर असलेल्या) हालँडीआवरच मारण्याचे ठरविले. हा पवित्रा जपान्यांना अगदीच अनपेक्षित होता. २२ एप्रिल रोजी ही उडी घेतली गेली व ३० पर्यंत भोवतालचे विमानतळ दोस्त राष्ट्रांच्या हातात गेले, ५०,००० जपानी पूर्वेकडे एकाकी होऊन उघडे पडले. पश्चिमेकडे दोस्त सैन्य चढाई करीत गेले व १७ मेच्या नव्या दोस्त सैन्याच्या अविरोधी अवतरणामुळे, त्यास आणखी जोर चढला पण ८,००० जपानी सैनिकांच्या कडव्या विरोधामुळे वाक्टा नावाच्या छोट्या बेटाला घेण्यास देखील २२ जूनपर्यंत अमेरिकेला अवधी लागला तथापि या बेटावरील कबज्यामुळे तेथील तीन विमानतळांच्या मदतीने पश्चिम न्यूगिनी व त्याभोवतालची लहान बेटे ३० जुलैपर्यंत अमेरिकेच्या हातात आली. या लांब उड्यांमुळे मधल्या मुलुखांतून १,३५,००० जपानी सैनिक, विमोचनाच्या आशेशिवाय अडकून पडले. १५ सप्टेंबर १९४४ रोजी या समुहातले शेवटचे बेट मोरोताइ हे अमेरिकेच्या हातात आले. तेथून फिलिपीन्स अवघे ५६० किमी. अंतरावर राहिले होते.

मध्य पॅसिफिक मोहिम : ही मोहीम ॲड्मिरल निमित्सच्या नेतृत्वाखाली असून तिची योजना चौफेर होती. सुरूवातीची तयारी झाल्यावर वेक बेटांवर २४ व २७ जुलै रोजी विमानवाहकांवर असलेल्या लढाऊ विमानांनी हल्ला केला व त्या वेळेपासून ऑक्टोबर १९४४ अखेरपर्यंत अमेरिकी विमानहल्ले सर्व महत्त्वाच्या बेटांवर झाले. सगळ्यात रक्तरंजीत युध्द तारावा बेटावर झाले. तेथे ३९,००० जपानी सैनिक होते, पण त्यांनी अमेरिकी सैन्य किनाऱ्यावर उतरत असताना एवढा विरोध केला, की हजारोंवर जपानी सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले. ॲड्मिरल निमिस्तनेदेखील एका बेटावरून दुसऱ्या बेटावर हल्ला करण्याचे तंत्र अवलंबिले व अशाप्रकारे महत्त्वाची बेटे हस्तगत केली. मेअरिॲना समूहावर मोठे वायुयुध्द झाले. जपानी हालचालींचा सुगावा लागल्यामुळे, अमेरिकन वैमानिकांना विमान वाहकांवरून−जपानी विमानांवर सोयीप्रमाणे आघात करायला अवसर मिळाला. त्यांनी ३३५ जपानी विमानांचा नाश केला व १८ विमाने विमानवाहकांवरील तोफांनी खाली पडली. साइपॅन बेटावरील युध्द २५ दिवस चालले आणि ९ जुलै १९४४ पर्यंत जरी संघटित प्रतिकार संपुष्टात आला, तरी बेटावरील उरलेल्या जपान्यांना शरण आणण्यास यानंतर अनेक महिने लागले. ग्वॉमवर अमेरिकी सैन्य २१ जुलै १९४४ रोजी, टिनीअनवर २४ जुलै रोजी व पालाऊ समूहातील पेलेल्यू बेटावर ८ सप्टेंबर १९४४ रोजी उतरले व ती बेटे त्यांनी काबीज केली. आता फिलिपीन्सना परत जिंकून घेण्याचा टप्पा येऊन ठेपला होता.

अल्यूशन बेटांवरील मोहीम : जपानी युध्दनीतीमधील एक दुवा म्हणजे अलास्का व कॅमचॅटका द्वीपकल्पांमधील अल्युशन बेटे. मँचुक्वोचे संरक्षण व जपानी मुख्य बेटांवर उत्तरेकडून अलास्कारमधून अमेरिकी विमानहल्ला थोपवून धरण्याकिरता या बेटांची व्याप्ती जपानला आवश्यक वाटली. जून १९४२ मध्ये विमान वाहकांवरील आक्रमक विमानांचा हल्ला डचहार्वर या बेटावरील अमेरिकी नाविक तळावर त्यांनी केला. तो यशस्वी झाला नाही, पण या द्वीपसमूहातील पश्चिमेकडील इतर बेटे त्यांना मिळाली. नंतर जपान जेव्हा दक्षिण व मध्य पॅसफिक महासागरातील अमेरिकी आक्रमक हालचालींत व्यग्र झाले, तेव्हा त्यांना १९४३ मधील या बेटांवरील अमेरिकी प्रत्यघातास तोंड देणे शक्य झाले नाही व ऑगस्ट १९४३ मध्ये त्यांनी ही बेटे पूर्णतः सोडली. अमेरिकनांनी ताबडतोब त्यांवर अनेक विमानतळ बांधून कूरील बेटांवर बाँबहल्ले सुरू केले.

ब्रह्मदेश मोहीम : (१९४२−४४). सिंगापूरकडून जाण्यायेणाऱ्या सागरी परिवहनास संरक्षण देण्याकरिता जपान्यांनी अंदमान व निकोबार बेटांना व्यापले परंतु पॅसिफिकमधील युध्दामुळे बंगालच्या उपसागरात जपानला विशेष प्रभुत्व प्रस्थापित करता आले नाही. दोस्त राष्ट्रांनी आणखी एका युध्दनैतिक डावाने जपानी औद्योगिक साधने व नौवहन यांवर अधिकच दबाव आणला. जपान्यांच्या चीन बरोबरच्या युध्दात जपानला डांबून ठेवले. त्यात जपानचे १/३ भूसैन्य अडकून पडले. यासाठी जनरल स्टिलवेलने चीनला कुमक व सामग्री पोहोचविण्याकरिता हिमालयावरून विमान-वाहतूकव्यवस्था प्रस्थापित केली. परिणामी ब्रह्मदेशातील घनदाट जंगलामुळे, वाहतुक-मार्गाच्या अभावामुळे व अनेक नद्यांच्या अडथळ्यांमुळे लहान अंतराकरितासुध्दा विमानांची वाहतूक, सैनिक व सामग्री यांच्या वाहतुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. सुप्रसिध्द डकोटा विमानांचा या कामाकरिता फार मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. या विमानांच्या मदतीने ब्रह्मदेशातील जपानी सैन्यावर जनरल विंगेटच्या चिंडिट्स म्हणून प्रसिध्द पावलेल्या सैन्याने पिछाडीवरून शत्रूवर अवरित हल्ले करून त्याला सळो की पळो करून सोडले. विंगेटच्या अपघाती मृत्यूनंतर २५ मार्च १९४४ रोजी जनरल लेंटेन याने ही पिछाडी मारण्याची कारवाई पूर्ण केली (मे १९४४).


ब्रिटनवरील जर्मन हवाई हल्ल्यांचा जोर कमी झाल्यावर थेट जर्मनीवर हवाई हल्ले करण्यास दोस्त राष्ट्रांनी सुरूवात केली. या हल्ल्यांचा जोर इतका वाढला की एका दिवशी हजारोंच्यावर विमाने हल्ला करू लागली. (उदा., कोलोन ३०.३१ मे १९४४) या हल्ल्यात जर्मनीतील अनेक मोठी शहरे उद्ध्वस्त झाली व लष्करी ठाण्यांपेक्षा शहरांतील नागरिक लाखोंनी मेले, कित्येक जखमी झाले, तर त्यांची घरेदारे जमीनदोस्त झाली. इतके होऊनही जर्मन नागरिकांच्या मनोधैर्याला विशेष धक्का पोहोचला नाही तथापि हिटलर व त्याचे मुख्य हस्तक यांचा बुध्दीभ्रंश झाला आणि त्यांच्याकडून नाशास उत्तेजक अशा चुका वरचेवर होत गेल्या. या दोस्त राष्ट्रांच्या हवाई हल्ल्यामुळे जर्मनीतील एक लाखावरील वस्तीची ६१ शहरे व अडीच कोटी लोकसंख्या यांना झळ पोहोचली. ३६ लाखांवर घरे नाश पावली, तीन लाख लोक मेले व आठ लाख जखमी झाले.

रशियावरील जर्मनीच्या आक्रमणाचा जोर कमी व्हावा म्हणून दोस्त राष्ट्रांनी (अमेरिका व ब्रिटन) पश्चिम यूरोपात दुसरी आघाडी उघडण्यासाठी स्टालिनने रूझवेल्ट व चर्चिल यांच्याकडे नेट लावला तथापि पुरेशा सिध्दतेच्या अभावी दुसरी आघाडी उघडण्यास दोस्त राष्ट्रे असमर्थ होती. १९ ऑगस्ट १९४२ रोजी दोस्त राष्ट्रांच्या एका सैनिकी पथकाने फ्रान्सच्या किनाऱ्यावरील दीएप बंदरावर धाड घातली. तेथील व इतरत्र फ्रान्सच्या किनाऱ्यावरील जर्मनांच्या ⇨किनारासंरक्षण व्यवस्थेचा अंदाज घेण्यासाठी ही धाड घालण्यात आली होती.

एल् अलामेनची पहिली लढाई : (१−२२ जुलै १९४२). रोमेलच्या आफ्रिका कोअरच्या हल्ल्यापुढे तग न लागल्याने ऑकिन्लेहकने माघार घेऊन एल् अलोमेन गावापासून ‘क्वटारा डिप्रेशन’ पर्यंत उत्तर-दक्षिण अशी संरक्षक फळी तयार केली. या संरक्षक फळीचा भेद करून वा तिला वळसा घालून ईजिप्तमध्ये घुसता येणे शक्य आहे, असे रोमेलला वाटले. म्हणून रोमेलने १ जुलै १९४२ रोजी हल्ला सुरू केला तथापि त्याच्या लढाईला  ‘रूविसात वरंबा’ व  ‘टेल एल् इसा’ येथे आठव्या सेनेने प्रखर विरोध केला. रोमेलने २२ जुलै १९४२ रोजी लढाई थांबविली व आफ्रिका कोअरची पुनर्संघटना करण्यास प्रारंभ केला. ऑकिन्लेपकला चर्चिलच्या म्हणण्याप्रमाणे सप्टेंबर १९४२ पूर्वी प्रतिहल्ला करण्यास नकार दिला. चर्चिलने   ऑकिन्लेकला  पदच्युत करून ⇨मंगमरी याला आठव्या सेनेचा सेनापती केला.

अलम एल् हल्फा लढाई : (३० ऑगस्ट−४ सप्टेंबर १९४२). रोमेलने परत ३० ऑगस्ट रोजी एल् ॲलामेनची फळी उधळून लावण्यासाठी चढाई सुरू केली. अलम एल् हल्फा येथे आफ्रिका कोअरला माघार घ्यावी लागली. ‘रूविसात वरंबा’ येथील पाचव्या हिंदी पायदळ डिव्हीजनच्या संरक्षक मोर्च्यावरील इटालियन हल्ले हिंदी सैन्याने परतवून लावले. रोमेलने ४ सप्टेंबर १९४२ रोजी माघार घेतली व पुढील चढाईसाठी त्याने एल् अलामेनच्या पश्चिमेस ब्रिटिश संरक्षक फळीला समांतर अशी मोर्चेबंद संरक्षक फळी खडी करण्यास आरंभ केला.

एल् अलामेनची दुसरी व निर्णायक लढाई : (२४ ऑक्टोबर−२ नोव्हेंबर १९४२). ऑकिन्‍लेकने चर्चिलच्या अव्हेर केला म्हणून त्याऐवजी मंगमरीला आठव्या सेनेच्या नेतृत्व देण्यात आल्याचे वर सांगितले आहेच. मंगमरीनेही पूर्ण तयारी झाल्याशिवाय शत्रूवर हल्ला करण्याची घाई केली नाही. लढाईची पूर्ण तयारी झाल्यावर आठव्या सेनेने शत्रूवर २४ ऑक्टोबर १९४२ रोजी रात्री चढाईस आरंभ केला. या लढाईत रोमेलकडे १,०४,००० सैनिक, ४८९ रणगाडे, १,२१९ तोफा व ६७५ लढाऊ विमाने होती तर मंगमरीकडे ३,९५,००० सैनिक, १,०२९ रणगाडे, २,३११ तोफा व ७५० लढाऊ विमाने होती. रसदपुरवठ्याच्या दृष्टीने ब्रिटीश सेना परिपूर्ण होती. या लढाईत रोमेलला हार खावी लागून त्याने माघार सुरू केली (२ नोव्हेंबर १९४२).

मशाल कारवाई : (ऑपरेशन टॉर्च−८ नोव्हेंबर १९४२). ८ नोव्हेंबर १९४२ रोजी फ्रेंच उत्तर आफ्रिकेत अमेरिकी व ब्रिटिश सैन्य, कॅसाब्लांका, ओरान व अल्जीरिया येथे उतरविण्यास सुरूवात झाली. या कारवाईमुळे उत्तर आफ्रिकेतील सैन्याची ईजिप्तकडून व वायव्य आफ्रिकेकडून कोंडी होण्यास आरंभ झाला. हिटलरने मशाल कारवाईवर कुरघोडी करण्यासाठी विशी (Vichy) सरकारकडील दक्षिण फ्रान्स व्यापले व तूलाँ बंदरात असलेले फ्रेंच आरमार बुडवून टाकले. त्याने ट्युनिसमध्ये इटालियन व जर्मन सैन्य ताबडतोब पाठविण्याची व्यवस्था केली. अमेरिकी सैन्याचा सर्वोच्च सरसेनापती जनरल ⇨आयझनहौअर होता. वर्षअखेर रोमेलचा पाठलाग करीत ब्रिटिश सेना ट्रिपोलीपर्यंत पोहोचली होती. जानेवारी १९४३ मध्ये कॅसाब्लांका येथील दोस्त राष्ट्रांच्या परिषदेत रूझवेल्ट व चर्चिलेच्या भेटीत आयझनहौअरला दोन्ही सैन्याचे सर्वोच्च आधिपत्य देण्यात आले. या मोहिमेत रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे ट्युनिशियातील डोंगराळ प्रदेशातील कष्टदायक हालचालींमुळे दोस्त सेनेला फार त्रास झाला. मार्च १९४३ च्या अखेरीस अमेरिकी सेनेन कॅसेरीन खिंडीतून जर्मन संरक्षक फळी फोडली, तेव्हा कोठे दोस्त राष्ट्रांची या आघाडीवर सरशी होण्यास सुरूवात झाली. यानंतर विमानांच्या मदतीने व भूजल संयुक्त हालचालींमुळे [⟶ संयुक्त सेनाकारवाई] तसेच ताजी कुमक असल्यामुळे १२ मे १९४३ पर्यंत ट्युनिशियातील युध्दात दोस्त राष्ट्रांशी सरशी होत गेली व अडीच लाखांवर जर्मन-इटली सैन्य त्यांना शरण आले.

स्टालिनग्राडची लढाई व जर्मनांची माघार : १९४२ च्या उन्हाळ्यातील बऱ्याच अंशी यशस्वी युध्दानंतर जर्मन सैन्य थकले. त्याचे पुरवठा मार्ग इतके लांबले, की हिवाळ्यात त्यांना माघार घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. याला आणखी एक कारण हे की रशियन सैनिकाला अधिकाधिक युध्दानुभव येत गेला. व्होल्गा नदी व उरल पर्वतापलीकडील युध्दसामग्रीचे उत्पादन करणारे कारखाने पूर्ण उत्पादनास समर्थ झाले होते. शिवाय महत्त्वाचे सराटव्ह ठाणे (व रेल्वे प्रस्थानक) रशियाच्या हातात राहिले होते. जर्मनव्याप्त रशियात गनिमी रशियाची [⟶गनिमी युध्दतंत्र] लढवय्यांकडूनही जर्मनांचे मनोधैर्य खच्ची करणारा उपद्रव होई. रशियन सरसेनापतीने स्टालिनग्राडच्या वेढ्यात गुंतलेल्या जर्मन सैन्यावर कडक थंडीच्या नोव्हेंबर १९४२ ते जानेवारी १९४३ याकाळात हल्ले चाली ठेवले. या लढाईत ९१,००० जर्मन सैनिक कैदी झाले व लाखांवर युध्दात किंवा आजाराने कामास आले. युध्दसामग्रीचा नाश फार झाला. उदा., रणगाडे व विमानंची संख्या अनुक्रमे ७,००० व ५,००० होती. दुसऱ्या रशियायी आघाडीवरही, (डोनट्स खोरे व क्रिमिया) जर्मनांना माघार घ्याली लागली.

यावेळी जर्मन सैन्याचे नेतृत्व जनरल मानश्टाइनकडे गेले होते. त्याने मात्र आगेकूच करण्याऐवजी कौशल्याने माघार घेत, शत्रूला जेरीस आणण्याचे युध्दतंत्र अंमलात आणले आणि योग्य समयी एकूण २५ डिव्हिजनची (ज्यांत १२ रणगाडा डिव्हिजन होत्या) बलिष्ठ शक्ती उपयोगात आणून १२ मार्च (१९४३) पर्यंत खॉरकॉव्ह     परत मिळविले. जर्मन सैन्यालाथोडा विसावा मिळाला, पण तो फार वेळ टिकणारा नव्हता.

उत्तर आफ्रिका मोहिम : (जानेवारी १९४३). कॅसाब्लांका येथील अमेरिकी, ब्रिटन व रशिया इ. राष्ट्र-प्रमुखांच्या परिषेदेत शत्रूकडून बिनशर्त शरणागती घ्यावयाचे ठरले. हे ध्येय योग्य होते की नाही हा प्रश्न वेगळा, पण त्याकरिता जी अनेक प्रकारची कार्यवाही झाली त्यात सिसिलीवरील स्वारी अंतर्भूत होती. कारण त्यामुळे इटली-जर्मन कक्षावर मर्माघात होणार, असे चर्चिलला वाटत होते. याकरिता अमेरिकन जनरल पॅटनच्या नेतृत्वाखाली अडीच डिव्हिजन आणि ब्रिटिश जनरल अलेक्झांडरकडे आठव्या सेनेच्या साडेचार डिव्हिजन होत्या. अमेरिकन सैन्य सिसिलीच्या दक्षिण किनाऱ्यावरील बंदरांजवळ आणि ब्रिटिश सैन्य पूर्वेकडील किनाऱ्यावर उतरले. ९ जुलै १९४३ मधील या कारवाईत ४०० वाहतूक विमानांनी व १३७ ग्लायडरने भाग घेतला. १० जुलै १९४३ रोजी सागरमार्गे दोस्त सैन्य उतरविण्यात आले. २ सप्टेबर १९४३ रोजी ब्रिटीश सैन्य इटलीच्या दक्षिण टोकावर रेदज्यॉ दी कालाब्रीआ येथे चढाईसाठी उतरविण्यात आले. जनरल (नंतरचे फील्डमार्शल) फ्रिडो सेंगरच्या आधिपत्याखाली इटलीत कुमक आली व १६ ऑगस्ट १९४३ रोजी सिसिली-मोहिम अवध्या ३८ दिवसांत आटोपली. यापूर्वी २४ जुलै १९४३ रोजी मुसोलिनने राजीनामा दिला होता व याच्या जागी आलेल्या मार्शल कॉव्हाल्येरोने २ सप्टेंबर १९४३ रोजी बिनशर्त शरणागती पतकरली. इटलीत आता जर्मन सेना दोस्त राष्ट्रसेनांना तोंड देण्यास उरली होती.

इटलीवर स्वारी : सिसिलीवर स्वारीचा अंतिम उद्देश इटली काबीज करणे व त्या राष्ट्राला आणि तेथील जर्मन वर्चस्वाला युध्दातून अजिबात नाहीसे करणे हा होता परंतू हे उद्दीष्ट इटलीचा उंचसखलपणा व थंडीचा कडका यांमुळे जून १९४४ पर्यंत साध्य झाले नाही. १२−१४ सप्टेंबर १९४३ रोजी दोस्त सैन्य मेसीनाची खाडी ओलांडून गेले. त्यावेळी त्यांचे संपूर्ण वायूसैन्य शत्रूवर सोडण्यात आले होते. शत्रूचा धुव्वा उडविल्यानंतर १६ सप्टेंबर १९४३ रोजी अमेरिकन व ब्रिटीश सैन्यांची युती झाली. दोस्त सैन्य नेपल्सपर्यंत झपाट्याने (१ ऑक्टोबर १९४३) पोहोचले. त्यानंतर मात्र शत्रूचा विरोध जोरावला व त्याने नैसर्गिक अडथळ्यांचा पूर्ण फायदा घेतला. पर्वतावर लढाया करण्यास अजून दोस्त सैन्य शिकले नव्हते. म्हणून त्यांना भारी किंमत द्यावी लागली. दोस्त सैन्यास जर्मन जनरल केसेलरिंगने व्हाल्तूर्नॅ, त्रॉनीना व सांग्रॉ या आघाडीपर्यंत येऊ देऊन नंतर तेथे आपल्या पध्दतीने तोंड देण्याचे ठरविले. या आघाडीवर दोस्त राष्ट्रांनी पुष्कळ नुकसान सोसल्यावर ५०,००० ताजे दोस्त सैन्य २२ जानेवारी रोजी (१९४४) पश्चिम किनाऱ्यावरील अँझीओ बंदरात उतरले. या कारवाईचा जर्मन गुस्टाव्ह संरक्षण फळीच्या पिछाडीस उतरून शेम व  गुस्टाव्ह फळीत पाचर मारणे हा होता त्यामुळे कास्सीनॉ येथील कडव्या जर्मन मोर्चेबंदीचा नाशही झाला असता. परंतु दोस्त सैन्य स्थिरस्थावर होण्यात गुंतल्यमुळे जर्मन परिवहनास, ताबडतोब असा धोका नव्हता, त्यामुळे आरंभी केसेरलिंगने जोराच्या प्रतिहल्ल्याने या मोठ्या दोस्त सैन्यासदेखील निष्किय केले. फ्रन्समधील पहिल्या महायुध्दाच्या धर्तीच्या अनेक लढाया होत राहिल्या. अखेरिस जर्मन गुस्टाव्ह फळी आणि कास्सीनॉ यांचा पाडाव झाला. या कारवाईत चौथ्या हिंदी पायदळ डिव्हिजनने कास्सीनॉ जिंकण्यात अतुल पराक्रम केला. मराठा पलटणींनी [⟶मराठा रेजिमेंट] लढवय्येपणाबद्दल ख्याती मिळवली. रोममध्ये ४ जून १९४४ रोजी ब्रिटीश व अमेरिकी सेनांनी प्रवेश केला. यानंतर ६ जून १९४४ रोजी फ्रान्सच्या उत्तर किनाऱ्यावर दोस्त राष्ट्र सेनांनी पदार्पण केले (ओव्हर लॉर्ड कारवाई).


रशियातील मोहिम : १९४२-४३ च्या हिवाळ्यात झालेल्या वाईट स्थितीतून हिटलरने आपल्या हातात युध्दाची सूत्रे परत घेतली व अंतिम जयाची लक्षणे जरासुध्दा दिसत नसतानादेखील रशियातील आघाड्यांवर एक प्रचंड चढाई करण्याचे ठरविले. त्या करिता त्याने ऑरेल, बायेलगोराड आघाडीवर ५ लाखांचे सेन्य जमविले. त्यात १७ रणगाडा डिव्हिजन होत्या. कूर्स्क शहराच्या पूर्वेस रीम्झ गावावर उत्तर व दक्षिणेकडून हल्ले करण्याचे ठरविले पण हा हल्ला यशस्वी झाला नाही. १ ऑगस्ट १९४२ पर्यंत जर्मनांना वरील आघाडीवरून पीछेहाट करावी लागली. रशियन सैन्याने आपली धडकी चालूच ठेवली व हिवाळा सुरू होण्याच्या अगोदरच शत्रूला त्यांनी नीपर व ड्यियस्ना  नदीच्या पलीकडे, पश्चिमेकडे हुसकावून लावले तथापि आपल्या युध्दआघाडीचा जर्मनांनी भंग होऊ दिला नाही. हिवाळ्यात शत्रूस तोंड देण्याची तयारी केली.

हिवाळा व वसंत ऋतूतील रशियन मोहिम : १९४३ मधील युध्दातील रशियनांचे अप्रतिम यश व इटलीमधील जर्मन सेनांचे पतन, जर्मनव्याप्त देशांतील वाढता प्रतीकार, जर्मन पाणबुडीचा उतरता (अटलांटिकमधील) प्रभाव, जर्मन व जपान या राष्ट्रांचे खचते मनोधैर्य व विशेषतः दोस्त राष्ट्रांची पश्चिम यूरोपवरील आगामी स्वारी (६ जून १९४४) या सर्वांवरून, पश्चिमेकडील युध्दाचा हा शेवट असल्याचे उघड दिसत होते. दोस्त राष्ट्रांकडील अफाट युध्दसामग्रीची मदत आणि रशियायी सैनिकांचे शौर्य व सैनिकी नेतृत्व यांमुळे रशिया विजयाची वाटचाल करू लागला होता पण जर्मनांच्या पराभवाचे राजनैतिक रूपांतर, पूर्व यूरोप आपल्या कबजात घेण्याच्या ध्येयात, रशियनांना झाले.

या वेळच्या रशियन प्रतिमोहिमेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : (१) तिन्ही जर्मन सेनांना एकत्र येऊ न देणे (२) उत्तरेकडील जर्मन सेनेला लेनिनग्राडहून कूच करून घेरणे (३) त्यासाठी दक्षिणेस नॉव्हगोरॉडजवळून आणलेले जादा रशियन सैन्य वापरात आणणे आणि (४) मध्यभागावर असलेल्या जर्मन सैन्यास जनरल मॅलिनोस्कीच्या सैन्याने दुभागणे.त्याच सुमारास मार्शल झूकॉव्हने पश्चिम भागातील सैन्याचे नेतृत्व घेतले व १० मार्च १९४४ रोजी जर्मन सैन्यावर ऊमन्य येथे अनपेक्षित हल्ला करून जर्मनांचे ५०० रणगाडे व १२,००० मोटारगाड्या हस्तगत केल्या. या हल्ल्यामुळे जर्मन सैन्याची भितीने वाताहात झाली. जर्मनांच्या हातात असलेली ठाणी एका पाठीमागून एक रशियनांच्या हातात असलेली ठाणी एका पाठीमागून एक रशियनांच्या हातात गेली. एप्रिल १९४४ च्या मध्यापर्यंत रशियन आघाडी नीपर नदीपर्यंत आली व ओडेसा आणि डूबसारी ही महत्त्वाची गावे त्यांच्या हातात गेली. दक्षिणेकडे जर्मनांनी व्यापलेले क्रिमिया देखील १२ मे १९४४ पर्यंत त्यांच्या हातातून पूर्णतः गेले व तेथील जर्मन सैन्याने शरणागती पतकारली.

जर्मनव्याप्त फ्रान्सवर दोस्त राष्ट्रांची मोहीम : २४ डिसेंबर १९४३ रोजी जनरल आयझनहौअर व त्याच्या मदतनीसांना फ्रान्सवरील मोहिमेवरील (कारवाई ओव्हरलॉडे) तयारीकरिता पाचारण करण्यात आले. या मोहिमेच्या सुरूवातीची तयारी कॅसाब्‍लांका परिषदेपासून सुरू झाली होती. उत्तर फ्रान्सच्या किनाऱ्यावरील पदार्पणाचा दिवस ५ जून १९४४ हा ठरविण्यात आला होता व ५ डिव्हिजनांनी यात भाग घेण्याचे मुक्रर झाले होते. मोहिमेची योजना अशी होती : सेन नदीच्या उपसागरी किनाऱ्यावर (नॉर्मंडी) प्रथम उतरावयाचे व त्या मुलुखातील विमानतळ काबीज करावयाचे व मग कॉतेंते द्वीपकल्पाच्या उत्तर किनाऱ्यावरील शेअरबुर्ग आणि नंतर ब्रिटनी या प्रांतांवर चालून जाऊन व नँट्सच्या दक्षिणेची बंदरे हस्तगत करून शेवटी ल्वार नदीमार्गे पॅरिसवर आगेकूच करावयाचे असा तो बेत होता.

जर्मन फील्ड मार्शल रून्टश्टेटचा दुय्यम सेनापती रोमेल याच्यावर (नॉर्मंडी फळीवर) प्रतिकाराची जबाबदारी होती, पण समरतंत्राच्या बाबतीत त्यांच्यात मतभेद झाला. पहिल्याने पीछेहाट घेऊन दोस्त सेना आत आली की, तिच्यावर तीव्र प्रतिहल्ला करावयाचा, हे रून्टश्टेटचे म्हणणे तर आवतरण किनाऱ्यावर शत्रूशी मुकाबला करून त्याला समुद्रात परत ढकलून देणे रोमेलला ठीक वाटले. शेवटी रून्टश्टेटची योजनाच कार्यवाहीत आणण्याचे ठरले. ६ जून १९४४ च्या पूर्वी पासूनच दोस्तांच्या हवाई हल्ल्यामुळे जर्मन चिलखती दले किनाऱ्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले होते. हिटलरच्या आज्ञेप्रमाणे जर्मन सेनेच्या हालचालींवर हिटलरच्या आज्ञेप्रमाणे जर्मन सेनेच्या हालचालींवर हिटलरचे निर्बंध होते त्यामुळे जर्मन पायदळ पुढे गेले व चिलखती सामर्थ्य मागेच राहिले. परिणामतः पायदळ व चिलखती कारवायांचे सुसूत्रीकरण जमले नाही.

दोस्त राष्ट्रांच्या प्रचंड वायुबलामुळे त्यांचा पाय किनाऱ्यायवर रोवला गेला. रेल्वे व पुलांवर फार जोराचा आघात करण्यात आला होता त्यामुळे प्रसंगोचित कुमक पाठविणे जर्मनीला शक्य झाले नाही. प्रत्यक्ष पदार्पण, हवेच्या वाईठ परिस्थितीमुळे २ जून ऐवजी ५ जून रोजी झाले. त्या दिवशीसुध्दा हवा फारच प्रतिकूल होती पण अनपेक्षितपणा साधण्याकरिता आयझनहौअरने ६ जून १९४४ रोजी पहाटे ४ वाजता मुख्य हल्ला करण्याचे ठरविले. सर्व दृष्टींनी विचार करता ही मोहीम खूपच यशस्वी झाली व जुलैअखेर, नॉर्मंडी आणि ब्रिटनी परगण्यांवर दोस्त राष्ट्रांचा संपूर्ण कबजा बसला.

उन्हाळ्यातील रशियन मोहिम : (१९४४). फ्रान्स व इटली आघाडीवरील व्यग्रतेमुळे, रशियामधील जर्मन हल्ला १९९४४ च्या उन्हाळ्यात योग्य कुमकेच्या अभावी पुष्कळच कमजोर झाला. यशस्वी समरतंत्रामुळे जर्मन सैन्य दुभंगण्यात रशियाला यश आले होते. जी काही कुमक मिळाली होती, त्यांतील सैनिकांचा युध्दानुभव व प्रत अगदी कमी दर्जाची होती. रशियनांनी असा निश्चय केला होता, की केवळ युध्दच जिंकावयाचे नाही, तर त्याबरोबर पूर्व यूरोप आपल्या बाजूने करावयाचा, याकरिता सर्व राजकिय स्वरूपाचे प्रयत्न त्यांनी अंमलात आणले. तोपर्यंत रशियनांनी चांगली तयारी केलेल्या ३०० डिव्हिजन उभ्या केल्या होत्या. जर्मनाच्या २०० डिव्हिजन असल्या, तरी त्यांत नवशिक्यांचा भरणा बराच होता. पूर्वी सांगितल्याप्रमाणे वरचढ संख्याबलाने जर्मन बलाचा पाडाव करीत जाणे, हा रशियन डाव होता. त्यांनी उत्तरेस फिनिश आघाडीपासून तशी सुरूवात करून बाल्टिक सागराभोवतालचा मुलूख १० जून १९४४ पर्यत मोकळा केला. अशाप्रकारे रशियन विजयाचा रथ अनिर्बंधपणे पुढे चालला असता नॉर्मंडी येथील मोहिमेच्या वेळी त्यांनी जर्मन आघाडीवर विशेष जोरात आघात करण्यास सुरूवात केली. ऑगस्टअखेर रूमानिया आणि बल्गेरिया हे दोन्ही देश या युध्दातून निवृत्त झाले. यानंतर जर्मनांनी घाईने ग्रीसमधून मघार घेण्यास सुरूवात केली.

जर्मनीवरील दूरगामी हवाई हल्ले : दोस्त राष्ट्रांनी जर्मन शहरांवर केलेल्या यापूर्वीच्या बाँबहल्ल्यांचा दूरगामी दृष्टीने फारसा उपयोग झाला नाही. वायुसेनेचे प्रमुख सेनाधिपती टेडर यांच्या सल्ल्यानुसार हा हल्ला जर्मन रेल्वे, कोळशाच्या खाणी व पेट्रोलकारखाने यांकडे वळविण्यात आला. परिणामतः जानेवारी १९४४ मध्ये कृत्रीम पेट्रोलमध्ये रोजच्या २१,००० वाघिणी कोळसा वाहण्यकिरता उपलब्ध होत्या. आता त्यांची संख्या संप्टेंबरमध्ये १२,००० वर आली व त्यापैकी फक्त ३−४ हजारच लांब पल्ल्याच्या वापरण्यायोग्य राहिल्या. फेब्रुवारी १९४५ पर्यंत रूर प्रांतातून कोळसा वाहणे अजिबात बंद झाले. 

रूमानिया व हंगेरियन तेलखाणीवरील १९४३ मधील वायुहल्ला खाणीच्या विखुरलेल्या परिस्थितीमुळे बेताचाच प्रभावी ठरला, पण ऑगस्ट १९४४ पर्यंत रशियनांनी त्यांचा कबजा घेतल्यावर तेलाकरिता, जर्मन सैन्यास स्वदेशी असलेल्या १८ कृत्रिम तेल कारखान्यांवरच अवलंबून राहवे लागले. सबंध १९४४ मध्ये त्यांच्यावर झालेल्या अविरत विमानहल्ल्यांमुळे, मेमधील ३ लाख टनांपेक्षा अधिक असलेले उत्पादन सप्टेंबरमध्ये केवळ १७,००० टनांवर आले. विमानाचे इंधन पावणे दोन लाख टनांवरून केवल ५,००० टनांवर आले. अशा रीतीने सगळ्या जर्मन आघाडीवर ह्या दूरगामी बाँबवर्षावाचा अनिष्ट परिणाम घडून आला.


स्वयंचलित बाँब व क्षेपणास्रे : जर्मन सैन्याची सगळ्या आघाड्यांवर पीछेहाट होत असताना जर्मन वैज्ञानिकांनी क्षेपणास्राचा शोध लावला. हिटरलने १२-१३ जून १९४४ रोजी इंग्लंवडवर पहिल्याने ‘व्ही−१’ या रॉकेटचा मारा केला. त्याचा विशेष रोख शत्रूचे मनोधैर्य खच्ची करण्याकडे होता. हे अस्र आवाजाशिवाय किंवा प्रत्यक्ष दिसल्याशिवाय अनपेक्षितपणे पोहोचत असल्यामुळे त्याचे संभाव्य परिणाम त्याचा पूर्ण विकास झाल्यावर अधिकच वाढले. ‘व्ही−१’ पेक्षा  ‘व्ही−२’ हे रॉकेट पुष्कळ परिणामकारक होते. त्याचे एकूण वजन १५ टन असून त्यात १ टन स्फोटक द्रव्ये होती व वेग ताशी ५,६३२ किमी. तर पल्ला सु. ३२० किमी. होता. या दोन्ही अस्रांमुळे १०,००० ब्रिटिश नागरिक मेले व २५,००० जखमी झाले, पण रडारच्या मदतीने आणि तोफखान्याच्या साहाय्याने त्या अस्रांचा नाश करता येऊ लागला. फ्रान्सवरील आक्रमणानंतर अनेक क्षेपणतळ दोस्तांच्या हातात आले.

दोस्त राष्ट्रांचा जर्मनीवरील संपूर्ण विजय : फ्रान्समधील जर्मन सेनेस दोन्ही बाजूंनी वेढण्याकरिता दक्षिण फ्रान्सवरदेखील स्वारी करणे आवश्यक होते. नॉर्मंडीवरील चढाईच्या वेळी ही स्वारी करणे शक्य नव्हते. शिवाय रोम पादाक्रांत करणे पूर्वी वाटले इतके सहजसाध्यही नव्हते. दोस्त राष्ट्रांच्या नेत्यांमध्ये नॉर्मडीशिवाय आणखी दुसरी आघाडी कोठे उघडावयाची याबद्दलही मतभेद उत्पन्न झाले होते. या सर्व कारणांमुळे ही स्वारी १५ ऑगस्ट १९४४ पर्यंत स्थगित झाली पण त्यानंतर स्वारीकरिता मार्सेच्या पूर्वेकडील से-राफाएलपासून ८ किमी. अंतरावरील अगे किनारा मुक्रर करण्यात आला. दोस्तांच्या १० डिव्हिजनच्या मदतीला फ्रेंच स्वातंत्र्यसैनिक होते. जर्मन सैन्य १० डिव्हिजन असून त्यांपैकी फक्त ३ डिव्हिजन इतपत सैन्य किनाऱ्यालगत होते. दोस्तांची ५,००० विमाने व ४४ स्क्वॉड्नही कॉर्सिका बेटावरील १४ विमानतळांवर पखरलेली होती आणि दोस्त आक्रमक सेना, एकंदर २,११० बोटींमधून नेपल्स व ऑरे बंदरातून रवाना होणार होती. दोस्त वायुसेनेने १२,५०० टन बाँबचा वर्षाव करून, शत्रूचा संभाव्य प्रतिकार खिळखिळा केला. तेव्हा १५ ऑगस्ट १९४४ रोजी रात्री १२−३० ला स्वारीची सुरूवात झाली. पहाटेच्या सव्वाचारपर्यंत ३९६ सैनिकवाहक विमानांनी दोस्त सैन्य योग्य ठिकाणी उतरविले. हवाई संरक्षणाच्या मदतीने सकाळी ८ वाजता बोटीमधून ते सैनिक किनाऱ्यावर उतरू लागले. २८ ऑगस्टपर्यंत तूलाँ व मार्से ही बंदरे दोस्त सेनेने व्यापली. ८ सप्टेंबरपर्यंत या सैन्याची अमेरिकी जनरल पॅटनच्या सैन्याबरोबर युती झाली. १५ तारखेपर्यंत स्वारीची ६५,४८० वाहने ३,६०,३०० टन सामग्री व ४ लाखांवर सैन्य दक्षिण फ्रान्समध्ये पोहोचले होते.

याच सुमारास इटलीमधील दोस्त सेनेने रोम व्यापले. जनरल अलेक्झांडरने यानंतर रोमच्या उत्तरेस जोरात कूच करण्याचा प्रयत्न केला, पण जर्मन सेनेने जिद्दीने प्रतिकार केला. घनघोर प्रतिकारामुळे १० अमेरिकी डिव्हिजन वाया गेल्या. त्यांची जागा ग्रीक व इटालियन सैनिकांनी घेतली. इटलीतील जर्मन आघाडीचा पूर्ण भेद करावायास दोस्तांना २६ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर १९४४ पर्यंत अत्यंत कडाक्याचे  युध्द करावे लागले. तेव्हा कोठे इटलीतील ज्रमन प्रतिकार संपला. डिसेंबर १९४४ मध्ये दोस्तांची ८ व सेना ग्रीसमध्ये गेली व फेब्रुवारी १९४५ मध्ये ब्रिटिश व कॅनेडियन सेनेच्या ४ डिव्हिजन फ्रान्सकडे वळविल्या गेल्या.

फ्रान्सवर पुनर्विजय : जुलै १९४४ पासून जर्मनांनी फ्रान्समध्ये कुमक आणण्यास सुरूवात केली होती. रून्टश्टेटच्या जागेवर फील्ड मार्शल फोन क्लूगे आला. (रोमेल १७ जुलै रोजी गंभीरपणे जखमी झाला होता). शेअरबुर्गच्या दक्षिणेस असलेल्या आव्हरश बंदरावर हल्ला करून क्लू.गेने जनरल पॅटनची रसद तोडण्याचा प्रयत्न केला, पण अमेरिकी कट्टर प्रतिकारामुळे तो यशस्वी झाला नाही. जर्मन रणगाड्यांचा धुव्वा उडाला. ७ ऑगस्ट रोजी कॅनेडियन सैन्याने रातोरात जर्मन सैन्याचा प्रतिकार हाणून पाडला. १३ ऑगस्टपर्यंत जर्मन पीछेहाटीस सुरूवात झाली. जर्मनांचे जूनपासून २५ ऑगस्टपर्यंत ४ लाख सैनिक (मृत, युध्दकैदी अथवा जखमी) १,३०० रणगाडे २०,००० वाहने व २,४०० विमाने यांची हानी झाली. तरी त्यांचे मनोधैर्य पूर्णपणे खचले नव्हते. दोस्त सैन्य १३ ऑगस्ट रोजी आग्यें येथे, ३ सप्टेंबर रोजी ब्रूसेल्स येथे आणि ४ सप्टेंबर रोजी अँटवर्प येथे पोहोचले. मात्र यावेळेस माघार घेणाऱ्या जर्मनांचा पाठलाग पेट्रोलच्या अभावी दोस्त सेनेला काही काळ स्थगित करावा लागला.

पावसाळ्यात रशियन मोहिम : (१९४४). रूमानिया रशियास येऊन मिळाल्यानंतर रशियायी सैन्याने डॅन्यूब नदीचे खोरे तीन मोहिमांत काबीज केले. याचवेळी बाल्टीक समुद्रालगतच्या देशांतून मोहिमा चालू होत्या (लॅटव्हिया−लिथ्युएनिया).

ऑक्टोबर १९४४ च्या मध्यापर्यंत केनिग्झबर्गच्या आघाडीवर रशियन सैन्याने जोरात मुसंडी मारून अनेक शहरे मिळवली पण २२−२४ ऑक्टोबरला जर्मन सैन्याने इतका जोराचा प्रत्याघात केला की रशियनांना माघार घेऊन संरक्षक भूमिका पतकरावी लागली.

जर्मन, पश्चिम आघाडिवरील युध्दे : (१९४४). फ्रन्सवर प्रभुत्व मिळविल्यानंतर जनरल आयझनहौअरने संपूर्ण ऱ्हाईन नदीची आघाडी बनविली व दोस्त सेनेला आगेकूच करण्याचा आदेश दिला. १७ सप्टेंबर १९४४ रोजी जनरल मंगमरीने आर्नहेमवर मोठ्या प्रमाणात आघात करण्यास सुरूवात केली (मार्केट गार्डन कारवाई) पण त्यावेळेस हवा एकदम बिघडली व लढवय्या डिव्हिजनचा आवश्यक संयोग योग्य वेळी  होऊ शकला नाही. परिणामी २५ तारखेला दोस्त सैन्यास माघार घ्यावी लागली. यूरोपमधील युध्दाच्या या शेवटच्या टप्प्यातदेखील जर्मनांनी आपली लढाऊ वृत्ती जागी ठेवून रून्टश्टेटच्या प्रभावी नेतृत्वाखाली आर्देन या डोंगराळ व जंलमय प्रदेशात दोस्त सैन्याशी चांगलाच मुकाबला केला पण अत्यंत घनघोर युध्दानंतर वर्षअखेर (३१ डिसेंबर १९४४) दोस्तांनी जर्मनांची चढाई मोडून काढली. ही लढाई ‘बॅटल ऑफ दी बल्ज’ (फुगवट्याची लढाई) म्हणून प्रसिध्द आहे.

हिवाळा व वसंत ऋतूतील रशियन मोहिम : (१९४५). फ्रान्सवर स्वारी होऊनही त्याचा अनुकूल परिणाम रशियन आघाडीवर जानेवारी १९४५ पर्यंत झाला नाही. त्यानंतर मात्र रशियन नेत्यांनी सैन्याची पुनर्घटना केली. व्हिएन्नापर्यंत कूच करीत ते गेले. त्यांच्या या प्रचंड सैन्यात ३०० डिव्हिजन असून त्यांत २५ केवळ रणगाड्यांच्याच होत्या. रशियाचे अवजड रणगाडे जर्मन सैन्याला मागे हटवीत व्हएन्नास १३ एप्रिल १९४५ रोजी पोहोचले.

जर्मनीवर अंतिम विजय : वास्तवीक जनरल रून्टश्टेटच्या आर्देनच्या पराभवानंतर हिटलरने युध्द थांबविण्यास हवे होते, पण दोस्तांच्या बिनशर्त शरणागतीच्या उद्दिष्टामुळे पश्चिम आघाडीवर लढणारी दोस्त राष्ट्रे जर्मनांना अत्यंत कडक अटीही (तहाकरिता) देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना आगेकूच करणे प्राप्त झाले. १४ फेब्रुवारी १९४५ पर्यंत ऱ्हाईन नदीवर दोस्त सैन्य पोहोचले. १ मार्चपर्यंत त्यांनी ड्यूसलडॉर्फपासून समुद्रापर्यंतचा बहुतेक मुलूख मिळविला. ५ मार्च रोजी अमेरिकन पहिले सैन्य कोलोन शहरात घुसले. ९ मार्च रोजी त्यांचा व तिसऱ्या सैन्याचा समन्वय झाला. २२ मार्चला विशेष प्रतिकार न होता जनरल पॅटनचे सैन्य ऑपनहाइम येथे ऱ्हाईन नदी उल्लंघून गेले व २५ मार्च पर्यंत जर्मनांचा संघटित प्रतिकार संपुष्टात आला.


शेवटपर्यंत जर्मन सैन्य लढत राहिले. झार खोऱ्यात त्याना शेवटचा परिणामकारक पराभव सहन करावा लागला. दोस्तांचा हा हलाला धीटपणा, वेग व निश्चय यांकरिता प्रसिध्द आहे. ऱ्हाईन नदी ओलांडण्याकरिता फार मोठ्या प्रमाणात विमानवाहक व ग्लायडर वापरण्यात आले होते. शेवटच्या टप्प्यात पश्चिम जर्मनीतील औद्योगिक शहरांतून जर्मन जनरल मॉडेलने बारा दिवस जोरात प्रतिकार केला पण एप्रिल १९४५ मध्ये तो सव्वातीन लाख सैनिकांसमवेत दोस्त राष्ट्रांना शरण गेला. इतके होऊनही घाईने पुढे जाऊन जनरल आयझनहौअर बर्लिनवर चालून गेला नाही, त्याचे कारण ते शहर त्याच्या दृष्टीने लष्करी महत्त्वाचे राहिले नव्हते व रशियन सैन्य तेथून फक्त ५० किमी. अंतरावर असल्यामुळे आपण बर्लिन घेतल्यास रशिया व इतर दोस्त राष्ट्रे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होण्याची शंका त्यास आली. म्हणून तो बर्लिनऐवजी ब्रेमन व टोब्रुकवर चालून गेला. याच सुमारास इतर जर्मन शहरे दोस्त सैन्याने काबीज केली.

झूकॉव्ह व कॉनिव्हच्या सैन्यांनी बर्लिनवर चढाई केली. एकाचे सैन्य ओडर नदीपासून पश्चिमेकडे आले, तर दुसऱ्याने निसे नदीच्या उत्तरेकडून बर्लिनला २५ एप्रिल १९४५ रोजी संपूर्णपणे घेरले. तेथे रस्त्यारस्त्यांवर हातघाईच्या जोरदार लढाया झाल्या. २९ एप्रिलपर्यंत अनेक जर्मन शहरांतही अशीच प्रतिक्रिया घडून आली. ३० एप्रिल रोजी हिटलरने आत्महत्या केली व बर्लिनमधील शिल्लक राहिलेल्या जर्मन सैन्याने २ मे १९४५ रोजी शरणागती पतकरली.

इकडे इटलित जर्मन सैन्याचेही पतन झपाट्याने झाले. बोलोन्या शहर जनरल अलेक्झांडरने २१ एप्रिल रोजी घेतले, तर २६ एप्रिल रोजी व्हेरोना घेते. २८ एप्रिल रोजी मुसोलिनी व त्याची प्रेयसी क्लारेत्ता पेत्सी ही दोघे स्वित्झर्लंडमध्ये पळून जात असता इटालियन भूमिगतांनी कामो तळ्याजवळ डागा येथे त्यांचा खून केला आणि जर्मन जनरल हाइन्रिख हा १० लाख सैनिकांसकट २९ एप्रिल १९४५ रोजी फील्ड मार्शल अलेक्झांडरला शरण गेला.

ल्यून्यबुर्ख येथे ४ मे रोजी जर्मन नौसेनेचा मुख्य ॲड्मिरल फ्रिडबर्ग हा जनरल मंगमरीस शरण गेला. दुसऱ्या दिवशी त्याने संपूर्ण जर्मन सैन्याच्या शरणागतीचा आपल्यास आदेश मिळाल्याचे सांगितले. ५ मे रोजी सकाळी ८ वाजता युध्दविरामाचा कर्णा वाजविण्यात आला व ७ मे रोजी रीम्झ येथे युध्दविरामाच्या मसुद्यावर सह्या झाल्या आणि दोन दिवसांनी त्याला बर्लिन येथे निश्चित करण्यात आले. अशा रीतीने यूरोमधील हे प्रदीर्घ युध्द संपले.

पॅसिफिकमधील दोस्त राष्ट्रांचा अंतिम विजय : जर्मनीच्या पराभवानंतर जपानची युध्दनैतिक परिस्थिती अगदी आशाविहीन होती, त्यामुळे त्या राष्ट्रानेही लौकरच शरणागती पत्कारली असती, पण दोस्त राष्ट्रांचे ‘बिनशर्त शरणागती’चे उद्दिष्ट त्याच्या आड आले व पूर्वेकडील युध्द आणखी काही महिने चालू राहिले.

ब्रह्मदेशाची पुनर्व्याप्ती : जनरल स्टिलवेल याच्या म्यिचीनापर्यंतच्या प्रगतीमुळे तसेच जपानी सैन्यांच्या आराकान, कोहिमा व इंफाळ येथील पराभवानंतर, दोस्त सैन्याने आक्रमक धोरण स्वीकारले. त्यांनी अंतिम यशाकरिता मध्य ब्रह्मदेश पादाक्रांत करणे आवश्यक   होते. ॲड्मिरल माउंटबॅटनच्या नेतृत्वाखाली जनरल सिमलच्या चौदाव्या आर्मीने मणिपूरवरून मांडलेच्या वायव्येवरील विमानतळांसाठी हल्ला केला व स्टिलवेलने, चीनी मार्शल वी-ली-युगांगच्या मदतीने भामोवर ईशान्येकडून हल्ला चढविला. रंगूनवर याच सुमारास आकाशमार्गे व सागरामार्गे हल्ला करण्याचे ठरविले. अर्थात हे हल्ले पूर्णपणे यशस्वी करण्यास १९४४ चा पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागली.

असा हा तिहेरी हल्ला, दोस्त सेनेची शिस्तशीर पूर्वतयारी आणि हवाई संरक्षक आक्रमक पाठिब्यांमुळे, जपानी प्रतिकार पूर्ण नष्ट करण्यास दोस्त सेनेस ब्रह्मदेशासारख्या कठीण प्रदेशातदेखील फार वेळ लागला नाही. या हालचालींत अनेक हिंदी डिव्हिजन आणि हवाई स्क्वॉड्रन लढत होत्या. त्यांनी अनेक लढायांतून शौर्य गाजविले. फेब्रुवारीत एक एक महत्त्वाचा जपानी तळ परत घेण्यास दोस्त सेनेने जी सुरूवात केली, ती अगदी यांत्रिक पध्दतीने २ मे (१९४५) रोजी रंगून व्यापल्यावरच संपली. त्यानंतर ब्रह्मदेशभर इतस्ततः असलेल्या तुरळक जपानी तुकड्यांना हुसकून लावणे शिल्लक राहिले होते.

फिलिपीन्सचा पुनर्कबजा : न्यू गिनी व मेअरिॲनाच्या यशस्वी मोहिमानंतर १९४४ च्या मध्यापर्यंत जनरल मॅक्आर्थर व ॲड्मिरल निमित्सचे आरमार यांचा समन्वय जपानी अंतररेषा, मोरोताइ व पेलेल्यू बेटांजवळ झाला परिणामतः फिलिपीन्सवरील आयोजीत स्वारी डिंसेबरऐवजी ऑक्टोंबर १९४४ मध्ये सुरू करण्याचे ठरले.

अमेरिकेच्या वायुसेनेने ओकिनावा व फॉर्मोसा बेटांवरील विमानतळांवर १० ऑक्टोबर १९४४ रोजी जोरदार आघात केला. अशाचा प्रकारचा आघात फिलिपीन्समधील लूझॉन विमानतळावरही केला. त्याशिवाय यावेळेस अनेक जपानी वाहतुकी जहाजे या हल्ल्यात सापडली. या जहाजांतून जपानी सैन्य सिंगापूरहून निघाले होते. २४ ऑक्टोबर रोजी ही जपानी जहाजे दोस्त आरमारास दिसली. २५ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांच्यावर पाणतीरांचे (टार्पेडोचे) अनेक हल्ले करण्यात आले व लेटी बेटाच्या दक्षिणेस सूरीगाव सामुद्रधुनीच्या अरूंद भागात शत्रूला कोंडीत पकडले. अविरत तोफगोळ्यांच्या माऱ्यात, फक्त एक जपानी विनाशिका शिल्लक राहिली. ३१ डिसेंबर १९४४ पर्यंत ही कारवाई चालू होती. तोपर्यंत भोवतालची अनेक लहान बेटे दोस्तांच्या हातात आली. फिलिपीन्स परत जिंकून घेण्याकरिता यानंतर दोन महिने अमेरिकेला झगडावे लागले.

जपानच्या आसमंतात दोस्तांचे आक्रमण : जपानी बेटांवर स्वारी करण्यापूर्वी त्याकरिता उपयुक्त तळ हस्तगत करणे आवश्यक होते. फॉर्मोसा, ओकिनावा व ईवोजीम बेट ही तीन या कामाकरिता निवडली गेली.

ईवोजीमाचे क्षेत्रफळ सु. ६५ चौ.किमी. आहे. त्यावरील जपानी संरक्षकव्यवस्था अभेद्य असल्यासारखी होती. या बेटाला युध्दनीतीच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व होते. कारण मेअरिॲनावरून जपानवर हल्ले करून परत येणाऱ्या बाँबफेकी विमानाचे हे आश्रयस्तान होणार होते. १९ फेब्रुवारी १९४५ रोजी सुरू झालेल्या दोस्तांच्या हल्ल्यांना जपानी सैन्याने १६ मार्च १९४५ पर्यंत प्रतिकार केला. अमेरिकी सैनिकी हानी जपानी सैनिकांएवढीच (२१,०००) झाली. फक्त १०० जपानी युध्दकैदी त्यांच्या हातात आले.


ओकिनावा बेटावरही जपानी प्रतिकार जोराचा होता. याशिवाय या लढाईत जपान्यांनी प्राणर्पण करणारे [⟶कामिकाझे] २,५५० हवाई हल्ले केले. त्यांपैकी शेकडा १८% यशस्वी झाले. या लढाईत दोस्त राष्ट्रांच्या एकूण २६ युध्दनौका बुडाल्या व ३६८ नौकांना हानी पोहोचली. लढाईत प्रथमच ७,००० जपानी युध्दबंदी करण्यात आले. एक लक्षावर जपानी सैनिक ठार झाले. जपानी नागरिकांचीही हानी फार झाली. वरील ओकिनावाची लढाई १ एप्रिल ते २१ जूनपर्यंत झाली.

जपानमधील मुख्य शहरांवर १९४३−४५ मध्ये जे दूरगामी हवाई हल्ले करण्यात आले, त्यांत युध्दसामग्री व मनुष्यबळ या स्वरूपात फार मोठी किंमत अमेरिकेला द्यावी लागली. युध्दसमाप्तीच्या दृष्टीने याचा कितपत उपयोग झाला हा प्रश्न अगदी वेगळा आहे. जपानी मनुष्य हानी मात्र औद्योगिक हानीच्या मानाने फार झाली.

वरील बेटे मिळाल्यामुळे १९४५ मार्चनंतरचे हल्ले फार परिणामकारक झाले. फक्त टोकिओ येथे १,७०० टन आगलावे बाँब टाकल्यामुळे १,८५,००० लोक जळून मेले वा जखमी झाले. ९ जूनपर्यंत टोकिओ येथिल ७,६७,००० घरे जमीनदोस्त झाली तर ३१ लाख लोक बेघर झाले. योकोहामा, नागोया, कोबे व ओसाका या मोठ्या शहरीही सेच नुकसान झाले.

नागासकी शहरावरील अणुबाँबचा स्पोटइतके करूनही जपानी शरणागतीची वाट न पाहता ऑगस्ट १९४५ मध्ये हीरोशीमा व नागासकी (९ ऑगस्ट) या शहरांवर अणुबाँब टाकण्यात आले. [⟶अणुयुध्द शस्रसंभार]. १० ऑगस्ट रोजी लगेच टोकिओवरील आकाशवाणीवरून सांगण्यात आले की जपानी सरकार दोस्त राष्ट्रांच्या अटी मानण्यास तयार आहे आणि त्याबरोबरच १४ ऑगस्ट १९४५ रोजी हे मानवी इतिहासातील सर्वांत कठोर, निर्घृण व मनुष्यमात्राला मान खाली घालायला लावणारे युध्द संपले.

महायुध्दाची व्याप्ती, वित्त सामग्री व मनुष्यहानी : दुसरे महायुध्द खरोखरच जागतिक होते. जगातील बहुतेक सगळ्या देशांना कोणत्याना कोणत्या प्रकारे त्याची झळ पोहोचली. संपूर्ण यूरोप, उत्तर व पूर्व आफ्रिका आणि पश्चिम आफ्रिकेतील कित्येक देश व प्रदेश, पश्चिम आशिया, हिंदुस्थान, ब्रह्मदेश, जपान, आग्नेय आशियातील बहुतेक सर्व देश, अटलांटिक पॅसिफिक व हिंदी महासागर त्यातील नौकानयनाचे मार्ग, सर्व महत्त्वाची बेटे या सर्वांनाच युध्दाचे कठोर व निर्घृण तडाखे सहन करावे लागले. महायुध्दामुळे अनेक देशांच्या व वसाहतींच्या आकारात, नकाशात आणि शासनात अनपेक्षितपणे राजकीय स्वरूपाचे फेरफार घडून आले तर वित्त, स्थावर-जंगम मालमत्ता व मनुष्यहानीही अतोनात झाली.

तौलनिकदृष्टा पाहिले तर असे दिसून येईल की, रशियाच्या व्यापारी जहाजांचे नुकसान जगाच्या नुकसानीच्या सु. ४५%, अमेरिकेचे ७.५%, जर्मनीचे १४ %, व जपानचे १८% होते. पहिल्या महायुध्दातील नुकसानीच्या (टनांमध्ये) हा आकडा तिप्पट आहे.

युध्दहानीच्या संदर्भात युध्दनौका व सर्व प्रकारची विमाने या दोन बाबतींत अमेरिकी राष्ट्राची सगळ्यात अधिक हानी झाली तर केवळ विमानांच्या बाबतीत जर्मनीची हानी सर्वांत (जवळजवळ ४०%) मोठी आणि त्याखालोखाल ब्रिटनची होती. त्यावेळी हिंदुस्थानात विमानदल नवीन असून, त्याची संख्या फक्त ८−१० स्क्वॉड्रन इतकी  होती, तर विमानहानी ५२७ झाली. यावरून हिंदी वैमानिकांच्या युध्दकार्याचा व्याप लक्षात येऊ शकेल.

या महायुध्दात मनुष्यहानीही प्रचंड प्रमाणात झाली. मृत, जखमी वा बेपत्ता झालेले सैनिक तसेच नागरिक यांचा स्थूलमानाने विचार केला, तर तो आकडा ४,१२,१८,९६८ एवढा होता. यावरून सैनिकांबरोबरच सामान्य नागरिकांनाही या महायुध्दाची झळ किती प्रमाणात पोहोचली हे दिसून येते. सुरूवातीस रशिया व नंतर जर्मनांकडून नागरिकांचा पध्दतशीर महासंहार कसा झाला याचे प्रत्यंतर पोलंड, रूमानिया तसेच जपानमधील प्रचंड अणुबाँबहल्ल्यामुळे झालेल्या हानीवरून कळून येते. नाझी जर्मनीकडून ५९ लक्ष ज्यूंचे शिरकाण झाले. एकट्या पोलंडमध्येच २९ लक्ष ज्यूंची हत्या करण्यात आली [⟶बंधनागार].


याखेरीज ठोकळ हिशोब केल्यानंतर आकडेशास्रज्ञांना असे आढळून आले, की या महायुध्दातील मनुष्यसंहारामुळे निर्माण कार्यातील आर्थिक शक्तीचे जवळजवळ चार अब्ज पौंडांचे वार्षिक नुकसान झाले, तर वयोमानाचा विचार करता, मृतांच्या व गंभीरपणे जखमी झालेल्यांच्या कुटुंबाचे एकंदर शंभर अब्ज पौंडांइतके नुकसान झाले.

दुसऱ्या महायुध्दाच्या प्रत्यक्ष खर्चाचे वर दिलेले आकडे पाहाता त्यांची मर्यादा भविष्यकालीन महायुध्दापुढे अगदी कमी वाटेल यात शंका नाही तथापि त्या काळाला अनुसरून झालेला हा खर्चही भयानक आहे, यात संशय नाही, ब्रिटनवर क्षेपणास्र सोडण्याकरिता जर्मनीने तयार केलेल्या (१९४४) आणि तसल्याच क्षेपणास्रांच्या विकासाकरिता ४,००० कामगार आणि शास्रज्ञ खपत होते, तर त्यावर २०० लाख पौडांवर खर्च झाला होता. अमेरिकेच्या पहिल्या अणुबाँबच्या विकासाकरितादेखील ६५,००० माणसे खपत होती व त्यावर ५,००० लाख पौंड खर्च झाले. सध्या तर अमेरिकेच्या अणुशक्तीवर याच्या दुप्पट वार्षिक खर्च करीत आहे व क्षेपणास्रांवर यांचे कोट्यवधी डॉलर खर्ची पडत आहेत. रशियाचा खर्चही याच तोडीचा असण्याचा संभव आहे.

गेल्या महायुध्दाच्या या महासंहारातून आशाजनक असे काही निष्पन्न झाले असेल, तर तो संयुक्त राष्ट्रसंघाचा जन्म [⟶संयुक्त राष्ट्रे]. युनेस्कोसारख्या संस्थेमुळे मानवी हिताच्या विशेषतः मागासलेल्या राष्ट्रांची सुधारणा, निर्वासितांचे पुनर्वसन, स्वाथ्य व विकास इत्यादींकरिता अनेक क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी पार पडली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नामुळेही काही युध्दे भडकण्याचे थांबले तर पुकारलेली युध्दे स्थगित झाली.

फलश्रुती : दोस्तराष्ट्रांकडून पहिल्या महायुध्दानंतर झालेल्या जर्मनीच्या मर्मभेदी मानभंगामुळे व आर्थिक कोंडमाऱ्यामुळे दुसऱ्या महायुध्दाचा जन्म झाला. त्यालाच पूरक जर्मनी व जपानची जगज्जेते होण्याची महत्त्वकांक्षा हीदेखील होती. या युध्दानंतर अमेरिका व रशिया हे लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलवान देश बनले. या दोन राष्ट्रांच्या चढाओढीमुळे, शस्रास्रवाढ व शर्यत सुरू झाली. अणुयुध्दाची टांगती तलवार सर्व जगावर लटकत आहे. ‘शीत युध्दामुळे’ जगात पाश्चात्त्य राष्ट्रांचे दोन तट पडले. विकसनशील व अविकसित राष्ट्रांचे  ‘तिसरे जग’ निर्माण झाले आणि ‘अलिप्ततावादी चळवळ’ दृढ झाली. पूर्वीचे ब्रिटिश साम्राज्य व फ्रान्स इ. देश पुष्कळच मागे पडले. ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कायमचा मावळला. त्यांच्या वसाहती व अंकित देश एकापाठोपाठ एक स्वतंत्र झाले. राष्ट्रकुल कसे तरी तग धरून राहिले आहे. फ्रान्स, डच, जपान इ. देशांची आफ्रिका, आशिया व पॅसिफिकमधील साम्राज्ये नष्ट झाली. पाश्चिमात्य देशाची जी भीती पौर्वात्य देशांतील जनतेच्या मनात होती, तिचा मागमूस राहिला नाही. पूर्ण पराभवानंतरही दोस्तराष्ट्रांच्या विशेषतः  अमेरिकेच्या मदतीमुळे तसेच स्वतःच्या कर्तबगारीने, उद्योगशीलतेने आणि अविरत श्रमाने जर्मनी व जपान ही राष्ट्रे युध्दोत्तर जगातील अग्रेसर औद्योगिक देशांत, वीस वर्षाच्या आत वर आली आहेत.

रशियाने पूर्व यूरोपवर आपले व कम्युनिझमचे वर्चस्व बसविले. प्रचंड चीन देश पराकाष्ठेचा कम्युनिष्टवादी बनला. युध्दोत्तर जगातील अनेक जुन्या व नव्या देशांवर विचारसणीच्या बाबतीत आपल्याप्रमाणे बनविण्याची कम्युनिझम व लोकशाहीवादी या मुख्य दोन राजकीय गटांची आपापसात अहमहमिका लागली. महायुध्दात उपयोगी पडलेल्या शास्रीय व तांत्रिक ज्ञानाचा विकास कल्पनेच्या पलीकडे गेला. नव्या सुखसोयी निर्माण झाल्या. विमानोड्डाणाचा वेग, बिनतारी संदेशवहन व दूरदर्शन यांच्या विकासामुळे जग जवळ येत चालले तरी पण लोकांच्या मनातील अनिष्ट प्रवृत्ती मात्र या महायुध्दाच्या क्रुरतेमुळे फोफावल्या व देशोदेशीच्या स्वातंत्र्याबरोबरच निर्घृण जातिसंहाराची उदाहरणेही जागजागी दृग्गोचर होऊ लागली.

टिपणीस, य. रा.

दुसरे महायुध्द व हिंदुस्थान : दुसऱ्या महायुध्दात हिंदुस्थानचा सहभाग सर्वदृष्टिने लक्षणीय होता. हिंदुस्थानचा स्वतंत्र्यलढा व स्वातंत्र्यप्राप्ती (१५ ऑगस्ट १९४७) या घटनांचा संबंध अप्रत्यक्षपणे हिंदी सैन्याचा सहभाग आणि आर्थिक साहाय्य यांच्याशी येतो. ⇨आझाद हिंद सेना ब्रिटिशांविरूध्द लढली तरीही स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यात तिचा हातभार लागला होता. या सहभागाचा ठोकळ तपशील पुढीलप्रमाणे आहे : महायुध्दारंभीच्या व त्याच्या अखेर हिंदी संरक्षण सेनांचे संख्याबल किती होते, याचा तपशील ⇨भारत (संरक्षणव्यवस्था) या नोंदीत दिला आहे. भारतीय भूसेनेने उत्तर आफ्रिका, (ईजिप्तधरून) इराक, इराण, ईशान्य हिंदुस्थान, ग्रीस, ब्रह्मदेश व मलाया येथील युध्दांत लढाया मारल्या. युध्दोत्तर काळात मलाया, इंडोनेशिया व इंडोचायना येथील अस्तिर परिस्थितीला मार्गावर आणण्याची कामगिरी त्यांनी केली.

सैनिकांची प्राणहानी : या महायुध्दात झालेली भूसैनिकांची प्राणहानी इत्यादींच्या विवक्षित बाबी पुढीलप्रमाणे आहेत : मृत्यू : १५, २९१. जखमी : १०,३७१. युध्दबंदी : ७२,८५८. जपान विरूध्दच्या लढायांत, इतर लढायांपेक्षा सैनिकांची हानी (मृत्यू, जखमी, युध्दबंदी व बेपत्ता) फार मोठी झाली. ती अशी : (अ) मलाया : ६२,१७५ (सैनिक) (आ) ब्रह्मदेश : ४०,४५८ (सैनिक) (इ) इटली : २२,४९७ (सैनिक) (ई) ऊत्तर आफ्रिका १५,२४८ (सैनिक) (उ) सूदान व एरीट्रिया : ४,७८५ (सैनिक) (ऊ) इराक व इराण : ५४१ (सैनिक) (ए) ग्रीस : ३१४ (सैनिक).

समुद्रावर एकूण ४९९ सैनिक मृत्यू, जखमी व युध्दबंदी झाले. भारतीय वायुसेनेने आसाम व ब्रह्मदेश येथील लढायात भाग घेतला होता. तिच्या हानीची विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. भारतीय नौसेनेने प्रामुख्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कामगिरी केली. तिच्याही हानीची विश्वासार्ह माहिती मिळत नाही.

मान-सन्मान पारितोषिके : दुसऱ्या महायुध्दात हिंदी सैनिक व अधिकारी यांनी प्रशंसनीय मर्दुमकी गाजविली. अत्युच्च धैर्य व मर्दुमकीचे पदक (व्हिक्टोरिया क्रॉस) एकतीस सैनिकांना व अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले : (१)  लेफ्टनंट परमिंदरसिंग भगत : ⇨मुंबई सॅपर्स व मायनर्स, ॲबिसिनिया, जानेवारी-फेब्रुवारी १९४१. (२) सुभेदार रिचपालराम (मरणोत्तर) : चौथी पलटण, राजपुताना रायफल्स, एरीट्रिया, फेब्रुवारी १९४१. (३) ले. क. कमिंग्ज : बारावी फ्राँटियर फोर्स रेजिमेंट, मलाया, जानेवारी १९४२. (४) हवालदार प्रकाशसिंग : पाचवी पलटण, आठवी पंजाब रेजिमेंट, ब्रह्मदेश, जानेवारी १९४३. (५) सुभेदार लालबहाद्दूर थापा : दुसरी गुरखा रायफल्स, ट्युनिस, एप्रिल १९४३. (६) हवालदार-मेजर छेलुराम (मरणोत्तर): सहावी राजपुताना रायफल्स, ट्युनिशाया, एप्रिल १९४३. (७) हवालदार गजेघाले : पाचवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, मे १९४३. (८) नाईक नन्दसिंग : अकरावी शीख रेजिमेंट, ब्रह्मदेश, मार्च १९४४. (९) जमादार अब्दुल हाफीज (मरणोत्तर) : नववी जाट रेजिमेंट, इंफाळ (हिंदुस्थान), एप्रिल १९४४. (१०) सैनिक कमलराम : आठवी पंजाब रेजिमेंट, इटली (कास्सीनॉ) मे १०४४. (११) कॅ. ऑलमंड. (१२) सैनिक गंजू लामा : इंफाळ, जून १९४४. (१३) सुभेदार तेजबहाद्दूर थापा (मरणोत्तर) : पाचवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, जून १९४४. (१४) नाईक अगनसिंग राय : पाचवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, जून १९४४. (१५) मेजर ब्लेकर : नववी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, जून १९४४. (१६) नाईक यशवंत घाडगे (मरणोत्तर) : पाचवी मराठा लाइट इन्फंट्री, इटली, जुलै १९४४. (१७) सैनिक तुलबहाद्दूर पुनः सहावी गुरखा रायफल्स. ब्रह्मदेश, जून १९४४. (१८) सैनिक शेरबहाद्दूर थापा (मरणोत्तर) : नववी गुरखा रायफल्स, इटली, सप्टेंबर १९४४. (१९) सुभेदार रामसरूपसिंग (मरणोत्तर): ब्रह्मदेश, ऑक्टोबर १९४४. (२०) सैनिक थम गुरंग (मरणोत्तर) : पाचवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, नोव्हेंबर १९४४. (२१)सैनिक भंडारीराम: दहावी वलुच रेजिमेंट, इटली, नोव्हेंबर १९४४. (२२) हवालदार उमरावसिंग, तोफखाना, ब्रह्मदेश, डिसेंबर १९४४. (२३) लान्सनईक शेरशाह : सोळावी पंजाब रेजिमेंट, ब्रह्मदेश, जानेवारी १९४५. (२४) जमादार प्रकाशसिंग (मरणोत्तर) : तेरावी फ्राँटियर फोर्स रायफल्स ब्रह्मदेश फेब्रुवारी १९४५. (२५) नाईक ग्यानसिंग : पंधरावी पंजाब रेजिमेंट, ब्रह्मदेश, मार्च १९४५. (२६) नाईक फझल दिन : दहावी बुलूच रेजिमेंट, ब्रह्मदेश, मार्च १९४४. (२७) सैनिक भाणभगत गुरंग : दुसरी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, मार्च १९४५. (२८) ले. करमसिंग जज (मरणोत्तर) : पंधरावी पंजाब रेजिमेंट, ब्रह्मदेश, मार्च १९४५. (२९) सैनिक नामदेव जाधव : पाचवी मराठा लाइट इन्फंट्री, इटली, एप्रिल १९४५. (३०) सैनिक अली हैदर : तेरावी फ्राँटियर फोर्स रायफल्स, इटली, एप्रिल १९४५. (३१) सैनिक लछमनसिंग गुरंग: आठवी गुरखा रायफल्स, ब्रह्मदेश, मे १९४५ [⟶मानचिन्ह].


औद्योगिक व आर्थिक साहाय्य : हिंदुस्थानने या महायुध्दात दोस्त राष्ट्रांच्या युध्दकार्याला भरीव साहाय्य केले होते किंबहुना आफ्रिका व आशियातील (पॅसिफिक महासागर युध्दक्षेत्र वगळून) सेनांना औद्योगिक उत्पादन, कपडालत्ता आणि जीवनोपयोगी सामग्री पुरविणारा हिंदुस्थान हा एकमेव तळ झाला होता. हिंदुस्थानातच आशियातील युध्दसंचालनाची प्रमूख कार्यालये होती. साहाय्याचा स्थूल आराखडा पुढीलप्रमाणे आहे : (१) लोखंडी व पोलादी तक्ते (सुरुंग, रणगाडे व जहाजांची दुरूस्ती) (२) पोलादी नळ (३) रेल्वेचे रस्ते बांधकाम-साहित्य वाफेची रेल्वे एंजिने, वाघिणी, रूळ (४)लाकूड (५)तारायंत्राचे खांब (६) लघु युध्दनौका व बोटी (७) अन्नधान्य, फळफळावळ इत्यादी (८) कपडालत्ता, तंबू, पादत्राणे (९) छत्रीधारी सैनिकांच्या छत्र्या (१०) चिलखती लढाऊ वाहने (११) औषधे (१२) रबर व रबरी माल (१३) तोफगोळ्याचे कोश (१४) तागाच्या वस्तू, स्पोटके व दारूगोळा.

युध्दसामग्रीच्या उत्पादनासाठी अनेक नवे कारखाने उभारण्यात येऊन त्यांतील उत्पादनाचा पुरवठाही करण्यात आला. 

या युध्दापायी रू. ४६.१८ कोटी (१९३८-३९) पासून रू. ३९७.२३ कोटी (१९४५) पर्यंत खर्च वाढला. ब्रह्मदेशातील युध्दासाठी अमेरिकेने सु. ५१५ कोटी रूपये हिंदुस्थान सरकारला (तत्कालीन ब्रिटिश सरकारला) उधार-उसनवारीच्या (लॅन्ड-लिज) स्वरूपात पुरविले होते तर अमेरिकेलाही हिंदुस्थानकडून अन्नधान्न, खाद्यपेये, निवास, कपडालत्ता, बंदरे-गोद्या इत्यादींच्या स्वरूपात परत साहाय्य (रू. १२५ कोटी) मिळाले होते. युध्दकाळात हिंदुस्थान सरकारने रू. ८३३ कोटी कर्ज उभारले. भारताला सु. आठ अब्ज स्टर्लिंग पौडांची रक्कम युध्दापोटी ब्रिटनकडून मिळाली होती.

राजकीय दृष्ट्या तत्कालीन भारतातील राष्ट्रीय नेत्यांना फॅसिस्ट व नाझी प्रणालीचा नायनाट करण्याचे महत्त्व, लोकशाही पाश्चात्त्य राष्ट्रांच्या व समाजवादी राष्ट्रांच्या नेत्यांप्रमाणे पटले होते त्यामुळे हिंदुस्थानाने युध्दात भाग घ्यावा म्हणून जवाहरलाल नेहरूंसारखे हिंदी नेते उत्सुक होते तथापी हा सहभाग देताना, हिंदुस्थानच्या राजकीय आकांक्षा व उद्दिष्टे तसेच हिंदुस्थानचे सहभागातील स्थान दोस्त राष्ट्रांच्या बरोबरीने असले पाहिजे, असा हिंदी नेत्यांचा आग्रह होता. दुर्दैवाने, ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल यांस हा आग्रह अमान्य होता. ९ ऑगस्ट १९४२ रोजी हिंदी नेत्यांना नजरबंद करण्यात आले. हिंदुस्थानला वॉशिंग्टन व लंडन युध्दसमितीत जरी स्थान देण्यात आले असले तरी युध्दकार्यनिर्देशनात मात्र हिंदुस्थानला वगळण्यातच आले होते. संपूर्ण हिंदीकरणास युध्दपूर्वकालात ब्रिटिश राज्यकर्ते मुळीच अनुकूल नव्हते तथापि वर वर्णिल्याप्रमाणे हिंदुस्थानचा संपूर्ण सहभाग−मनुष्यबळ, आथिक व औद्योगिक बाबी−यांतूनच हिंदी सेनांचे हिंदीकरण झाले व त्यातूनच आगामी स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय संरक्षक सेनांचा पाया घातला गेला.

नाझी जर्मनी व त्याच्या दोस्त राष्ट्रांच्या पराभवाची मीमांसा : मूलतःच इटली व जपान यांना मोठ्या प्रमाणात युध्दपयोगी व जीवनोपयोगी पदार्थांची आयात करावी लागत असे. रबर, कापूस, निकेल धातू यांचा जर्मनीत तुटवडा होता. १९४४ नंतर तेल−वंगणाचा वगैरेंचा दुष्काळ होता. लवकर युध्द संपले असते, तर वरील तुटवड्याचा परिणाम फारसा भासला नसता तथापि १९४० सालातील ‘ब्रिटनच्या लढाईने’ यूरोपातील पश्चिम आघाडी अमेरिकेच्या पदार्पणापर्यंत जागृत राहिली. युध्द व रणतंत्रातील चुकांनी जर्मनीच्या शत्रूंना धडे शिकवले. १९४२ पासून त्यांना जर्मनीच्या तडित् युध्दतंत्रावर मात करण्याचे तंत्र समजले. वायुबल व विमानवाहक युध्दनौकांचे आक्रमकात्मक व संरक्षणात्मकदृष्ट्या महत्त्व अमेरिका व ब्रिटन यांना पटले आणि त्यांच्या उपयोगामुळे जर्मनी व जपानची पीछेहाट झाली. (अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर कारवाया). सागरी व हवाई वर्चवास्वामुळे ब्रिटन व अमेरिका हे जर्मनी व जपानची नाकेबंदी करू शकले.

आरंभीच्या विजयामुळे आणि जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने जर्मनी व जपानने युध्दक्षेत्र वाढविले आणि त्यामुळे त्यांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ब्रिटन व अमेरिकी बळाला तोंड द्यावे लागले. ब्रिटनवरील हल्ला म्हणजे ब्रिटिश साम्राज्यावरचा हल्ला हे त्यांना उमगले नाही. जर्मनी व जपानला मनुष्यबळ तसेच युध्दसामग्रीचा तुटवडा पडू लागला. जर्मनीच्या बाजूने झालेला इटलीचा युध्दातील सहभाग जर्मनीला फार महाग पडला. 

अमेरिका व रशिया यांच्याकडील युद्द साधनसामग्री, औद्योगीक उत्पादन व संपत्ती इतकी होती, की जितके युध्द लांबले तितक्या प्रमाणात जर्मनी व जपान यांच्या विजयाची आशा दुरावली.

जपान व जर्मनी यांनी युध्दतंत्राच्या दृष्टीने मोठ्या घोडचुका केल्या. विमानवाहक नौकांचे महत्त्व जपान विसरून गेले. त्यांच्याऐवजी प्रचंड युध्दनौकांच्या (बॅटलशिप) उत्पादनावरच भर देण्यात आला. ह्या युध्दनौकांचा धुव्वा अमेरिकी विमानवाहक नौकांवरील विमानांनी  उडविला. रशियातील हिवाळी मोहिमेसाठी योग्य ती तयारी करण्याकडे हिटलरने अजिबात दुर्लक्ष केले. त्याने जर्मन सैन्याला प्रतिकूल परिस्थितीतही माघार घेण्याची मनाई केली. त्यामुळे स्टलिनग्राड लढाईतील भयंकर पराजयासारखे पराभव व न भरून येणारी हानी त्याला पतकरावी लागली. परिणामतः उत्तर फ्रान्सच्या नॉर्मंडी आघाडीचे (जून १९४४) संरक्षण लंगडे पडले. सर्वांत मोठी घोडचूक म्हणजे जेट लढाऊ विमानांच्या उत्पादनाऐवजी व्ही−१ व व्ही−२ रॉकेटच्या उत्पादनावर हिटलरने भर दिला. परिणामी १९४४-४५ सालातील दोस्त वायुसेनांच्या भयंकर विध्वंसक अशा हवाई हल्ल्यांना परतविण्यात जर्मन वायुसेना निर्बल ठरली.

महायुध्दाचे परिणाम : या युध्दातील हानीचा तपशील वर दिलाच आहे. जी काही हानी झाली व त्याग करावा लागला त्याची परतफेड फॅसिझम्−हुकूमशाही व नाझीवाद यांच्या नायनाटाच्या स्वरूपात मिळाली, असे म्हणता येईल. व्हर्सायच्या तहाप्रमाणे सर्वंकष असा शांतताप्रधान समझोता विजयी रांष्ट्रांमध्ये झाला नाही. याचे कारण युध्दाच्या शेवटीशेवटी समाजवादी रशिया व पश्चिमी लोकशाही राष्ट्रांमध्ये निर्माण झालेला एकमेकांविषयीचा संशय व अविश्वास हे होय. प्रत्येक राष्ट्राने आपले आपापले वेगवेगळे तह केले. यूरोप व आशियातील राजकीय बदल व देवाण-घेवाणीमुळे पुढे राजकीय गुंतागुंत वाढली.

पहिल्या महायुध्दापेक्षाही, दुसऱ्या महायुध्दामुळे सामाजिक व वैज्ञानिक क्षेत्रांत झपाट्याने विकास झाला. वैज्ञानिक संशोधक व संशोधन यांवर राजकीय वर्चस्व व नियंत्रण प्रस्थापित झाले.

आगामी शतकातील घटनापटाची दिशा पुढील प्रसंगांना घालून दिली : (१) ब्रिटन व फ्रान्स यांचे जागतिक प्रभुत्व संपुष्टात येऊन, अमेरिका व रशिया यांचे प्रभुत्व आणि यांच्यातील चढाओढ सुरू झाली. वॉशिंग्टन व मास्को येथून आंतरराष्ट्रीय संबंध ठरू लागले. चीन व जपान ह्यांनाही महत्त्व आले. आशियायी जनतेने परत यूरोपीय राष्ट्रांच्या जोखडाखाली राहायला विरोध केला. काही काही राष्ट्रांना मुक्तीयुध्द लढावे लागले (उदा., इंडोनेशिया, इंडोचायना-व्हिएटनाम, अल्जीरिया इ.) तर काही राष्ट्रांची फाळणी झाल्यानंतर त्यांना स्वातंत्र मिळाले. उदा., भारत काही स्वतंत्र राष्ट्रे परतंत्र झाली उदा., लॅटव्हिया, एस्टोनिया व लिथ्युएनिया तर आफ्रिकेतील ईजिप्त, लिबिया, ट्युनिशिया इ. राष्ट्रे स्वतंत्र झाली तथापि त्यांच्यात कलह मात्र सुरू झाला. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली.

पहा : चिलखत नाविक युद्धतंत्र फ्रँको-प्रशियन (जर्मन) युद्ध महायुद्ध पहिले युद्ध व युद्धप्रक्रिया रणगाडा रणनिती वायुवाहिनी सेना व युध्दतंत्र क्षेपणास्र.

दीक्षित, हे. वि.

संदर्भ :

1. Buttler, sir James, History of the Second World War, 6 Vols., London, 1972.

2. Calvocoressi, Peter Guywint, Total War, Harmondsworth, 1972.

3. Cooper, Mathew, The German Army: 1939-45, London, 1978.

4. Cruuickshank,Charles, Decetion in world War II, Oxford, 1981.

5. Irving, David, Hitler’s War 1939-42, London, 1983.

6. Irving, David, Hitler’s War 1942-45, London 1983.

7. Irving, David, The War Path: Hitler’s Germany, 1933-39. London, 1983.

8. Liddell Hart, B. H. History of the Second World War, London, 1976.

9. Liddell, Hart, B. H. Strategy : The Indirect Approach. London, 1967.

10. Manstain, Erich Von, Lost Victories, Chicago, 1958.

11. Palit, D. K.Maj. Gen. The Malays Compaign.

12. Pospelov, P. N. History of the Great Patriotic War. 6 Vols., Moscow. 1961-65.

13. Prasad, Bisheswar, Official History of the Indian Armed  Forces in the Second World War 1939-45, Govt. of India, in 20 Vols., 1958.

14. Seaton, Albert, The Russo-German 1941-45. London, 1971.

15, Taylor, Telford. The Breaking Wave.New York, 1967.

16. Trevor, Roper, Hisler’s War Directives : 1939-45, London, 1964.

१७. चर्चिल, विन्स्टन, अनु. वि. वा. कुवाडेकर, दुसरे महायुध्द, मुंबई, १९७८.