थायलर, मॅक्स: (३० जानेवारी १८९९–११ ऑगस्ट १९७१). द. आफ्रिकी सूक्ष्मजीववैज्ञानिक. १९५१ च्या वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. ⇨ पीतज्वरावरील लसीच्या शोधाबद्दल प्रसिद्ध.

थायलर यांचा जन्म प्रिटोरिया येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण ऱ्‍होड्स युनिव्हर्सिटी कॉलेज (ग्रेॲम्सटाउन) व युनिव्हर्सिटी ऑफ केपटाउन मेडिकल स्कूल येथे झाले (१९१६–१८). त्यानंतर इंग्‍लंडमधील सेंट टॉमस हॉस्पिटल व लंडन स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थांत शिक्षण घेऊन १९२२ मध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी मिळविली. त्याच वर्षी बोस्टन, मॅसॅचूसेट्स येथील हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्रयोगनिर्देशक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी १९३० मध्ये रॉकफेलर फाउंडेशनच्या इंटरनॅशनल हेल्थ डिव्हिजन या विभागामध्ये नोकरी पत्करली व पुढे १९५१ मध्ये त्या संस्थेच्या न्यूयॉर्क येथील मेडिसिन अँड पब्‍लिक हेल्थ या विभागाचे ते प्रमुख झाले. १९६४ मध्ये या पदावरून निवृत्त झाल्यावर ते फाउंडेशनच्या वैद्यक व निसर्गविज्ञानांच्या विभागाचे सहसंचालक व रॉकफेलर फाउंडेशन व्हायरस रिसर्च लॅबोरेटरीजचे संचालक झाले. त्याच वर्षी ते येल विद्यापीठात रोगपरिस्थितिविज्ञान व सूक्ष्मजीवविज्ञान या विषयांचे प्राध्यापक झाले.

हार्व्हर्डमध्ये त्यांनी आमांश, मूषकदंश ज्वर व पीतज्वर या विषयांवर संशोधनात्मक कार्य केले. लंडनला असतानाच पीतज्वराकडे त्यांचे लक्ष वेधले गेले होते. १९२७ मध्ये पीतज्वर सूक्ष्मजंतूंमुळे होत नसून निस्यंदी व्हायरसामुळे (ज्यातून सूक्ष्मजंतूसुद्धा जाऊ शकत नाहीत अशी सूक्ष्म छिद्रे असलेल्या गाळणीतून आरपार जाणाऱ्या व्हायरसामुळे) होतो, हे त्यांनी सिद्ध केले. पूर्वी या रोगावरील प्रयोगाकरिता माकडे वापरीत परंतु हा रोग प्रयोगशाळेतील पांढऱ्या उंदरांमध्ये उत्पन्न करता येतो हे त्यांनी दाखविल्यामुळे फार मोठी आर्थिक बचत झाली.

थायलर हे रॉकफेलर फाउंडेशनमध्ये दाखल झाले, त्या वेळी तेथेही पीतज्वरासंबंधी संशोधन चालू होते. थायलर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीतज्वर प्रतिबंधक लस तयार करण्यासंबंधी प्रयत्‍न करून १७–डी या नावाने ओळखण्यात येणारी निर्धोक व प्रमाणित लस शोधून काढली. ही लस सुलभतेने मोठ्या प्रमाणावर तयार करता येते व आजही हीच लस जगभर वापरली जाते.

रॉकफेलर फाउंडेशनमध्ये असताना त्यांनी ⇨ व्हायल रोग, ⇨ डेंग्यू ज्वर आणि जपानी मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) यांसंबंधी संशोधन केले. प्रयोगशाळेतील उंदरांमध्ये उद्‌भवणाऱ्या पोलिओसारख्याच एका रोगाचा त्यांनी शोध लावला व तेव्हापासून तो थायलर रोग या नावाने ओळखला जातो.

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसन अँड हायजीन या संस्थेचे चामर्स पदक (१९३९), हार्व्हर्ड विद्यापीठाचे फ्लॅटरी पदक (१९४५), लास्कर फाउंडेशनचे लास्कर पारितोषिक (१९४९) इ. सन्मान मिळाले. त्यांनी अनेक शास्त्रीय लेख लिहिले असून व्हायरल अँड रिकेटसिअल इन्फेक्शन्स ऑफ मॅन (१९४८) व यलो फीव्हर (१९५१) या दोन ग्रंथांतील काही भागही लिहिला आहे. ते न्यू हेवन, कनेक्टिकट येथे मरण पावले.

कानिटकर, बा. मो.