शांसाँ द रॉलां, ला : मध्ययुगीन फ्रेंच साहित्यातील एक श्रेष्ठ वीरकाव्य. त्याचे सर्वांत जुने हस्तलिखित बाराव्या शतकाच्या मध्यास इंग्लंडमध्ये तयार झाले. दहा मात्रांच्या एका वृत्तात हे रचले आहे. या काव्याच्या अखेरीस आलेल्या उल्लेखावरून तुरोल्दस हा वीरकाव्याचा कर्ता (किंवा कदाचित लेखनिकही) असावा असे दिसते. सम्राट ⇨शार्लमेन  याच्या कारकिर्दीतील काही ऐतिहासिक घटनांचा आधार या वीरकाव्यात घेतलेला दिसतो.

या वीरकाव्याचे कथानक थोडक्यात असे : शार्लमेन राजाने संपूर्ण स्पेन देश जिंकलेला असतो. मात्र सारागोस्साचा राजा मार्सिल हा पराभूत झालेला नसतो. शार्लमेनने स्पेन सोडून जावे, अशी त्याची इच्छा असते. मार्सिल राजाच्या या प्रस्तावाबाबत शार्लमेनच्या सरदार मंडळातील रॉलां आणि गानलों या सरदारांत मतभेद असतात. शेवटी मार्सिलशी वाटाघाटी करण्याचे ठरते. मात्र गानलों हा मार्सिल राजाशी संगनमत करून रॉलांचा घात करण्याचे कारस्थान रचतो. पुढे झालेल्या युद्धात शेवटी मार्सिलचा पराभव होतो, पण गानलोंच्या कपटकारस्थानामुळे त्या युद्धात रॉलां मात्र ठार होतो. शेवटी गानलोंला त्याच्या विश्वासघातकी कृत्याबद्दल कडक शासन केले जाते.

युरोपातील धर्मयुद्धांचा आणि मध्ययुगीन शिलेदारी युगातील शूरोदारतेचे आदर्श जोपासणाऱ्या तत्कालीन वीरकाव्यांपैकी हे उल्लेखनीय वीरकाव्य आहे. कालविसंगतीचे दोष तसेच अवास्तव वर्णने आढळतात. तथापि नाट्यपूर्णता, ठसठशीत व्यक्तिरेखा यांसारख्या गुणांमुळे हे वीरकाव्य वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. फ्रेंच राष्ट्रीय महाकाव्याचा मानही त्यास लाभला आहे. या वीरकाव्याचा इंग्रजी अनुवाद (द साँग ऑफ़ रॉलां) उपलब्ध आहे.

संदर्भ : 1. Brault, Gerard J. Ed. The Song of Roland : An Analytical Edition, 2 Vols., 1978.

            2. Daniel, Norman A. Heros and Saracens : A Reinterpretation of the Chanson de Geste, 1983. 

टोणगावकर, विजया