फ्लेमिशकला : फ्लेमिश कलेचे स्थान यूरोपीय कलेच्या विकसनात अत्यंत महत्त्वाचे आहे. फ्लेमिश कला हे संबोधन सामान्यतः फ्लेमिश भाषा बोलणारा उत्तरेकडील फ्लँडर्स व फ्रेंच बोलीचा दक्षिणेकडील वालोनिअ हे प्रदेश मिळून होणाऱ्या बेल्जियम या यूरोपीय देशाच्या कलेसाठी वापरतात. फ्लँडर्सला सु. १२०० मध्ये कलाजगतात महत्त्व प्राप्त झाले. परंतु तत्पूर्वीही या प्रदेशाला कला व संस्कृती ह्यांचा एक वारसा होताच. मध्ययुगामध्ये फ्लेमिश कलेवर तत्कालीन आद्य ख्रिस्ती, कॅरोलिंजयन व रोमनेस्क कलांचा प्रभाव होता. सामान्यपणे पंधरावे ते सतरावे शतक हा फ्लेमिश कलेच्या वैभवाचा काळ मानला जातो. त्यानंतरची या प्रदेशातील कला बेल्जियम या सदराखाली येते.

 

चित्रकला : फ्लेमिशचित्रकलेची सुरुवात भित्तिचित्रे व धार्मिक हस्तलिखितांच्या सजावटीसाठी चित्रित केलेली सुनिदर्शने यांतून झाली. चौदाव्या शतकात फ्रेंच बादशहा सहावा चार्ल्स याच्या काळात फ्रान्स हे चित्रकलेचे प्रमुख केंद्र बनले. इटली व नेदर्लंड्स येथील अनेक चित्रकार येथे एकत्र आले. तसेच बेरीचा ड्यूक झां द फ्रांस व बर्गंडीचा ड्यूक फिलिप द गोल्ड यांचे वास्तव्य दिझाँ, मलं व बूर्झ या शहरातून असल्यामुळे तेथेही राजाश्रयासाठी अनेक फ्लेमिश चित्रकार आले आणि त्यांनी उत्तमोत्तम हस्तलिखिते निर्माण केली. अशा सुशोभित हस्तलिखितांत Les Tres Riches Heures du Due de Berry (म. शी. बेरीच्या ड्यूकचा अतिशय वैभवाचा काळ सु. १४१३ – १६) हे हस्तलिखित सुंदर सुनिदर्शनासाठी प्रसिद्ध असून ते लिंम्बर्ख बंधूंनी चित्रित केले. त्यातील वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील मानवी दिनक्रम व निसर्गदृश्ये यांची चित्रण करणारी दिनदर्शिकेची पृष्ठे विशेष उल्लेखनीय आहेत. (पहा : मराठी विश्वकोश : ५ चित्रपत्र ५८). त्यात वास्तववादी शैली व तपशीलवार चित्रण आढळते. तत्कालीन इमारती, अंतर्भागातील दृश्ये व निसर्गदृश्ये यांचा सुंदर मिलाफ त्यात आढळतो तसेच बेरीच्या ड्यूकच्या जीवनावरील दृश्यांत त्याचे व्यक्तिचित्र बारकाव्याने व हुबेहूब रंगविले आहे. सामान्य लोकांचे तसेच उमरावांचे जीवनही त्यात चित्रित केले आहे. सुंदर रंगसंगती, भरजरी वस्त्रे ल्यालेल्या मनुष्याकृती, त्यांच्या रूबाबदार वस्त्रांच्या चुण्या, पार्श्वभागाच्या निसर्गदृश्यांशी सुसंवादी मांडणी या सर्व घटकांतून आंतरराष्ट्रीय गॉथिक चित्रशैलीचा प्रभाव जाणवतो.

 

पंधराव्या शतकात जी वैशिष्ट्यपूर्ण फ्लेमिश चित्रशैली निर्माण झाली तिला ‘मास्टर ऑफ फ्लेमाल’ (सु. १३७८-१४४४) या नावाने ओळखला जाणारा अज्ञात चित्रकार (काहींच्या मते रॉबर्ट काम्पिन हाच मास्टर ऑफ फ्लेमाल असावा) व ⇨ यानव्हानआयिक हे दोन चित्रकार विशेष सहाय्यभूत ठरले. मास्टर ऑफ फ्लेमाल याने रंगविलेल्या चित्रात प्रकाशाचे विविध बारकावे, घन भासणाऱ्या आकृती, वस्त्रांच्या चुण्या व पोत यांचे सुंदर चित्रण आढळते. त्याच्या सर्व चित्रात मेरोदवेदिचित्र (ऑल्टरपीस) वैशिष्ट्यपूर्ण आहे.

 

फ्लेमिश चित्रकलेच्या विकासात यान व्हान (सु. १३९०-१४४१) व ह्यूबर्ट व्हान (सु. १३६६-१४२६) या आयिक बंधूंचा वाटा मोठा आहे. तैलरंगाचा शोध त्यांनी प्रत्यक्ष लावला नाही, परंतु संपूर्ण चित्रासाठी एकमेकांवर पारदर्शक रंगांचे थर देऊन रंगविण्याची व यांतून अतिशय तजेलदार रंगाचा परिणाम साधण्याची पद्धत त्यांनी शोधून काढल्यामुळे त्यांना तैलरंग पद्धतीचे जनक म्हणून संबोधले जाते. फ्लेमिश चित्रशैलीत यान व्हान आयिकचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याची चित्रेही विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. सतेज रंगसंगती सुस्पष्ट रेखांकन वस्तू, निसर्ग व व्यक्ती यांचे मिश्रण लघुचित्राप्रमाणे बारकाव्याने करण्याची पद्धत रेषा, आकार, पोकळी यांच्यातील विविधता दर्शवून त्यांचा कौशल्याने केलेला वापर आणि साऱ्या घटकांची एकसंध मांडणी ही त्याच्या शैलीची वैशिष्ट्ये पुढे फ्लेमिश चित्रशैलीची सर्वसाधारण वैशिष्ट्ये ठरली. त्याच्या चित्रांतून छायाचित्रसदृश वास्तवतेचा प्रत्यय येतो. तसेच गंभीर व उदात्त भावदर्शन, भारदस्तपणा, प्रतीकांचा वापर, विविध तऱ्हेच्या पोतांचे कौशल्यपूर्ण चित्रण हे त्याच्या शैलीचे आणखी काही महत्त्वाचे गुण होत. आयिक बंधूंनी रंगविलेल्या गेंट येथील वेदचित्रामध्ये सु. वीस चित्रे असून खालच्या ओळीत मध्यभागी असलेले ॲडोरेशनऑफमिस्ि (१४३२) हे ख्रिस्ताचे उदात्त बलिदान सूचित करणारे चित्र व वरच्या ओळीतील दोन्ही कडेच्या आदम व ईव्ह यांच्या पुर्णाकृती विशेष उल्लेखनीय आहेत. आर्नोल्फिनीमॅरेजग्र (१४३४) या चित्रात त्याने विवाहाची शपथ गंभीर मुद्रेने घेणारा आर्नोल्फिनी व त्याची वधू दाखविली असून, छताला टांगलेल्या शामदानीतील जळणारी एकच मेणबत्ती, खिडकीतील सफरचंद, पायाशी असलेला कुत्रा, जोडे, पाठीमागील उंची बिछाना यांतून प्रतिकांचा सुंदर वापर केला आहे. तसेच विविध तऱ्हेच्या पृष्ठभागांचे पोत, प्रकाशाचा परिणाम, रंगांचा ताजेपणा व सूक्ष्मदर्शकातून पाहिल्याप्रमाणे प्रत्येक वस्तूचे बारकाव्याने केलेले चित्रण आढळते. ( पहा : मराठी विश्वकोश : २ चित्रपत्र ७०). यान व्हान आयिक याच्या शैलीचा मोठा प्रभाव नंतरच्या फ्रेंच व जर्मन चित्रकारांवर पडला. उदाहरणादाखल फूके ह्या फ्रेंच व ड्यूरर ह्या जर्मन चित्रकारांचे निर्देश करता येतील. रोगीर व्हान डर व्हायडन (१३९९-१४६४) हा दुसरा महत्त्वाचा फ्लेमिश चित्रकार असून त्याने प्रकाशाच्या परिणामाला महत्त्व देऊन चित्रण केले. अधिक काटेकोरपणा व तंत्रशुद्धता यांमुळे त्याच्या त्याच्या चित्रांतील चेहरे काहीसे कृत्रिम भासतात. चित्रांतर्गत आकार घनतेपेक्षा नाजुकपणाकडे अधिक झुकतात. निसर्ग दृश्यांतील बारकाव्याचे चित्रण लघुचित्रासारखे भासते. त्याच्या चित्रांपैकी माद्रिद येथील संग्रहालयातील

डिसेंट फ्रॉम क्रॉस हे चित्र विशेष प्रसिद्ध आहे.

 

ह्यूगो व्हान डर गूस (१४३५-१४८२) याच्या चित्रांतून प्रभावी वास्तववादी चित्रण तसेच विषयाच्या हाताळणीतील वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो. त्याच्या चित्रापैकी पोर्टिनरी वेदिचित्राच्या मध्यभागी रंगविलेले ख्रिस्तजन्माच्या चिषयावरील ॲडोरेशनऑफशेफर्ड्‌ हे भव्य चित्र विशेष प्रसिद्ध आहे. विशेषतः ख्रिस्ताला वंदन करणाऱ्या धनगरांचे खेडवळ परंतु भक्तिभावाने फुलून आलेले चेहरे असाधारण कौशल्याने रंगविले आहेत. त्याच्याच काळातील हीएरोनीमस बॉस (सु. १४५०-१५१६) ह्या चित्रकाराच्या चित्रांतील भावपूर्ण व अद्भुतरम्य आशय मोठा लक्षणीय आहे.

 

सोळाव्या शतकातील चित्रकारांत थोरला पीटर ब्रगेल (सु.१५२५-१५६९) ह्याचे स्थान महत्त्वाचे आहे. त्याने मुख्यतः निसर्गदृश्ये व शेतकऱ्यांच्या जीवनातील प्रसंग याचे चित्रण केले. हे प्रसंग त्याने खास रंजक पद्धतीने रंगवले. तसेच समाजातील दोषांवर नर्मविनोदी चित्रेही रंगविली. अशा चित्रात त्याचे ब्लाइंडलीडिंगब्लाइंड हे चित्र उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जीवनावरील पेझंटवेडिंग हे व्हिएन्ना संग्रहालयातील चित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. अत्यंत सुलभ आकारात मांडणी, आकृतींच्या गतीमान अविर्भावातील लयबद्धता, विरोधी रंगच्छटांचा परिणामकारक वापर, प्रकाशाच्या चित्रणातील प्रभुत्व, रेषात्मक आकार, मांडणीतील एकसंघपणा ही त्याच्या शैलीची वैशिष्ट्ये आहेत.

 


 सतराव्या शतकातील म्हणजेच बरोक शैलीच्या चित्रकारांत ⇨पीटरपॉलरूबेन्स ( १५७७-१६४०) ह्याचे स्थान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे आहे. प्रबोधनकाळातील कलेचे गुणविशेष आधुनिक रूपात परावर्तित करण्याचे काम त्याने केले. रूबेन्सच्या चित्रशैलीचा प्रभाव केवळ सतराव्या शतकापुरताच नव्हे तर नंतरही अनेक शतके चित्रकलेच्या क्षेत्रात टिकून राहिला. व्हातो, बूशे, फ्रागॉनार, झां बातीस्त पातेअर, रन्वार, दलाक्र्वा तसेच अनेक आधुनिक चित्रकारांवरही त्याचा प्रभाव आढळतो. उच्च प्रबोधनकालीन चित्रप्रभूंचा, विशेषतः व्हेनीशियन चित्रकारांचा प्रभाव त्याच्या शैलीवर पडला. त्यांच्याप्रमाणे तेजस्वी रंगसंगती व फ्लेमिश शैलीप्रमाणे बारकावे दाखविण्याची पद्धत त्याने उचलली. प्रबोधनकालीन चित्रप्रभूंचे चांगले गुण उचलून त्याचा वापर त्याने अशा कौशल्याने व नावीन्यपूर्ण मांडणीद्वारा केला, की एक श्रेष्ठ रंगप्रभू म्हणून तो ओळखला गेला. रंगातील प्रवाही गुणांचा सुंदर वापर लाल, गुलाबी मोहक छटांचा उपयोग, आकारातील विलक्षण गतिमानता व त्याचबरोबर आलंकारिकता मायकेलअँजेलोच्या मानवाकृतींप्रमाणे पिळदार देहाच्या सामर्थ्यवान पुरुषाकृती तसेच गौर गुलाबी वर्णाच्या, सोनेरी केसाच्या, काळ्या विशाल नेत्रांच्या व पुष्ट बांध्यांच्या स्त्रिया त्याने आपल्या चित्रांतून रंगविल्या. झगझगीत रंगांची व विरोधी रंगच्छटांची रचना करून त्यांतून नाट्यमय परिणाम साधण्याचे त्याचे कसब अजोड होते. त्याच्या चित्रात जज्मेटऑफपॅरि, गार्डनऑफलव्ह, फेल्टहॅट इ. चित्रे विशेष प्रसिद्ध आहेत. फ्रासन्ची सम्राज्ञी मारीआ दे मेदीची हिच्या जीवनावर त्याने रंगविलेली चित्रेही उल्लेखनीय आहेत. त्याच्या चित्रांत धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा तऱ्हेच्या सर्व विषयांचा समावेश होता. तसेच निसर्गदृश्ये, व्यक्तिचित्रे, प्रसंगचित्रे इ. सर्व प्रकार त्याने हाताळले. काही चित्रांची मुद्रितरेखनेही त्याने केली.

 

रूबेन्सप्रमाणेच सर्व जगभर ख्याती झालेला फ्लेमिश चित्रकार म्हणजे ॲन्थोनी व्हॅनडाइक (१५९९-१६४१) हा होय. रूबेन्सच्या हाताखाली साहाय्यक म्हणून काम करून त्याने वयाच्या विसाव्या वर्षीच नैपुण्य संपादन केले व स्वतःची अशी खास चित्रशैली निर्माण केला. त्याला मुख्यतः व्यक्तिचित्रणामुळे कीर्ती लाभली. त्याच्या चित्रणात एकप्रकारची सहजता व आत्मविश्वासाने मारलेले कुंचल्याचे फटकारे दिसतात. आकर्षक रंगसंगती, आकृतींचे रूबाबदार आविर्भाव, विविध तऱ्हेचे पोत रंगविण्याचे कौशल्य या वैशिष्ट्यांमुळे त्याने काढलेली राजेरजवाड्यांची व्यक्तिचित्रे लोकप्रिय झाली. त्याच्या शैलीचा प्रभाव इंग्लिश व्यक्तिचित्रणशैलीवर मोठ्या प्रमाणात पडला. त्याने रंगविलेल्या चित्रांत पॅरिस येथील लूव्ह्‌र संग्रहालयात असलेले पहिल्या चार्ल्सचे शिकारीच्या प्रसंगीचे व्यक्तिचित्र प्रसिद्ध आहे.

 

वास्तुकला: मध्ययुगापासून फ्लेमिश वास्तुकलेचे उत्तमोत्तम नमुने आढळतात. तेराव्या शतकातील ईप्र येथील ‘क्लॉथ हॉल’ ही वास्तू अत्यंत भव्य होती. लूव्हाँ येथील सभागृह (पंधरावे शतक) वास्तुकलादृष्ट्या उत्कृष्ट असून, तेथील शिल्पाकृतीही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सोळाव्या शतकाआधीच्या फ्लेमिश वास्तुकलेवर गॉथिक वास्तुशैलीचा प्रभाव जाणवतो. विशेषतः बाजारपेठा, नगरसभागृहे इ. लौकिक वास्तूंमध्ये तसेच चर्चवास्तू, घंटाघरे इ. धार्मिक वास्तूंमध्ये ह्याची प्रचीती येते. तूर्ने येथे बाराव्या शतकात रोमनेस्क शैलीतील कॅथीड्रल उभारण्यात आले. पुढे हळूहळू सोळाव्या शतकात प्रबोधनकालीन वास्तुशिल्पशैलीचा प्रभाव समतोल रचनाकल्प, अलंकरणातील ठळक संकल्पन, वर्तुळाकारातील शीर्षरचना, पानाफुलांचे उत्थित अलंकरण यांत दिसू लागला. या काळातील अँटवर्प येथील नगरसभागृह (१५६१-६५) भव्य व कल्पकतापूर्ण वास्तुकल्पासाठी प्रसिद्ध आहे. कॉरनेलिस फ्लोरिस हा तिचा वास्तुविशारद होता.

 

बरोक शैलीचा फ्लेमिश वास्तुशिल्पावर प्रभाव सतराव्या शतकाच्या सुरुवातीस जाणवू लागला. अलंकरणाने समृद्ध असलेले दर्शनी भाग आणि डामडौलाची सजावट असलेले अंतर्भाग हे राजवाडे, नगरगृहे यांसारख्या लौकिक वास्तूंमध्ये तसेच धार्मिक वास्तूंमध्येही दिसू लागले. अशा तऱ्हेचे पहिले अष्टकोनी घुमट असलेले चर्च अँटवर्पच्या वेन्झेल कोबेर्जे याने स्खेर्पन्हव्हल येथे बांधले. यानंतरच्या सर्व धार्मिक इमारतींवर या वास्तूशैलीचा प्रभाव पडला. यावरूनच पुढे जेझुईट धर्मसंघटनेचा सदस्य असलेल्या पीटर हॉयसेन्स या वास्तुविशारदाने अँटवर्प, ब्रूझ वगैरे ठिकाणी अनेक चर्चवास्तू उभारल्या. लूव्हाँ येथील सेंट मायकेल्स चर्चचा भव्य व समृद्ध अलंकरणयुक्त दर्शनी भागही बरोक शैलीचाच प्रभाव दर्शवतो. या काळातील रूबेन्सचे घर (सु. १६१०) ही एक उल्लेखनीय लौकिक वास्तू होय.

 

मूर्तिकलावकनिष्ठकला: मूर्तिकलेचा अविष्कार प्राय: चर्चवास्तूंच्या सजावटींच्या अनुषंगानेच झाला. प्रख्यात डच शिल्पकार क्लाउस स्लूटर (कार. सु. १३८०-सु. १४०६) याच्या रुबाबदार, चुण्या असलेली पायघोळ उंची वस्त्रे दाखविणाऱ्या वास्तववादी शिल्पाकृतींचा प्रभाव मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. फ्लेमिश कारागिरांनी रंगविलेली आणि सोनेरी मुलामा चढवलेली सुंदर वेदिचित्रे घडविण्यात मोठे कौशल्य साधले. अशा वेदिचित्रांची फ्रान्स, जर्मनी व स्वीडन येथे मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली. तसेच लाकडी कोरीव काम करणाऱ्या फ्लेमिश कारागिरांनी बनविलेली चर्चमधील व्यासपीठे व इतर फर्निचरवस्तू यांनाही मोठी मागणी होती. बाराव्या शतकात रेनियर दि वी, गॉड्फ्र्‌वा दी क्लेअर आणि निकोलस ऑफ व्हर्डन हे कारागीर धातुकाम व मिनेकारी यांच्या कौशल्यासाठी नाणावलेले होते. झाक दी जेरीन आणि पीटर दी बेकेर यांना सुंदर, ओतीव कलाकुसरीच्या धातुकामामुळे प्रसिद्धी लाभली. ब्रूझ येथील बर्गंडीच्या मेरीच्या कबरीवरील त्यांचे धातुकाम प्रसिद्ध आहे. पुढील काळात दिनां येथील धातुकामास एवढी मान्यता मिळाली, की फ्रेंच भाषेमध्ये ‘Dinanderie’ हा शब्द धातुकाम याअर्थी निर्माण झाला. चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) निर्मितिचीही मोठी परंपरा पंधराव्या शतकापासून आढळते. तूर्ने, ब्रुसेल्स, अँटवर्प इ. प्रमुख निर्मितीकेंद्रे होत. त्यासाठी मोठमोठ्या चित्रकारांनी मूळ ज्ञापके निर्माण केली. त्यांचा प्रभाव यूरोपमधील नंतरच्या विणकामावर पडला. हस्तिदंती कोरीव काम, गालीचे व लेस यांची निर्मिती, अम्लरेखन इ. क्षेत्रांतही फ्लेमिश कारागिरांनी वैशिष्ट्यपूर्ण, मौलिक निर्मिती केली आहे. (चित्रपत्र)

 

पहा : गॉथिक कला बरोक कला रोमनेस्क वास्तुकला.

 

संदर्भ : 1. Gaunt, William, Plemish Cities : Bruges, Ghent, Antwerp, Brussels, London, 1970.

    2. Puyvelde, Leo Van &amp Thierry Van Trans, Kendall, Alan, Flemish Painting, 2 Vols, New York, 1972.

    3. Whinney, Margaret D. Early Flemish Painting, London, 1968.

 

भागवत, नलिनी