हॉल्डेन, जॉन स्कॉट : (३ मे १८६०?१५ मार्च १९३६). ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ. त्यांनी श्वसन तंत्रासंबंधी विशेष कार्य केले. श्वासोच्छ्वास आणि रक्त यांच्या शरीरक्रियावैज्ञानिक परिणामांचे अध्ययन करण्याकरिता तसेच शरीराने शोषलेल्या व उत्सर्जित केलेल्या वायूंचे विश्लेषण करण्याकरिता त्यांनी अनेक पद्धती विकसित केल्या. तसेच रक्तातील वायूंचे विश्लेषण करणारे हीमोग्लोबिनमापक उपकरण आणि वायूंच्या मिश्रणाचे विश्लेषण करणारी उपकरणे त्यांनी तयार केली. ही उपकरणे आजही मोठ्या प्रमाणात वापरली जातात. 

 

हॉल्डेन यांचा जन्म एडिंबरो (स्कॉटलंड) येथे झाला. त्यांचे शिक्षण एडिंबरो ॲकॅडेमी, एडिंबरो विद्यापीठ आणि जर्मनीतील जेना विद्यापीठ येथे झाले. त्यांना १८८४ मध्ये एडिंबरो विद्यापीठाची वैद्यक विषयातील पदवी मिळाली. ते डंडी येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये शरीरक्रियाविज्ञान विषयाचे प्रयोगनिर्देशक होते. तसेच ते ऑक्सफर्ड विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञान विषयाचे व्याख्याते (१९०७–१३) व बर्मिंगहॅम विद्यापीठात सन्माननीय प्राध्यापक (१९२१) होते. 

 

हॉल्डेन यांनी कोळशाच्या खाणीतील कामगारांना गुदमरून टाकण्यास कारणीभूत असणाऱ्या वायूंचे तसेच खाणीतील स्फोटानंतर निर्माण झालेल्या कार्बन मोनॉक्साइडाचे शरीरावर होणाऱ्या परिणामांसंबंधी अन्वेषण केले. १८९६ मध्ये त्यांनी खाणीतील स्फोट व आग यांच्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. तो अहवाल खाणीच्या सुरक्षिततेकरिता महत्त्वाचे योगदान ठरला. मेंदूमधील श्वसन केंद्रावर पडणाऱ्या रक्तामधील कार्बन डाय-ऑक्साइडाच्या ताणाच्या परिणामामुळे श्वासोच्छ्वासाचे नियमन नेहमी निर्धारित होत असते, हा मूलभूत शोध १९०५ मध्ये त्यांनी जाहीर केला. १९०७ मध्ये त्यांनी हवेच्या दाबात घट झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळणारी असंपीडन मंच पद्धत विकसित केली. त्यामुळे खोल समुद्रातील पाणबुड्यांना पृष्ठभागावर सुरक्षितपणे वर येणे शक्य झाले. १९११ मध्ये ते कोलोरॅडोमधील पाइक्स पीक या शिखराच्या वैज्ञानिक मोहिमेवर गेले. तेथे त्यांनी नीच वायुदाबाचा शरीरावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. 

 

हॉल्डेन प्रतिष्ठित विचारवंत होते. जीवविज्ञान, त्याचे भौतिकी व रसायनशास्त्र यांच्याशी असलेले संबंध आणि यंत्रणा व व्यक्तिमत्त्व यांच्या समस्या यांविषयी त्यांनी तत्त्वज्ञानात्मक दृष्टीने स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न आयुष्यभर केले. 

 

हॉल्डेन हे इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग एंजिनिअर्स या संस्थेचे अध्यक्ष (१९२४–२८) होते. त्यांचे १९२२ मध्ये रेस्पिरेशन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. ते रॉयल सोसायटीचे फेलो (१८९७) होते. त्यांना रॉयल पदक (१९१६) व कॉप्ली पदक (१९३४) देऊन गौरविण्यात आले. 

 

हॉल्डेन यांचे ऑक्सफर्ड येथे निधन झाले. 

वाघ, नितिन भरत