बॅथर्स्ट –२ : कॅनडाच्या न्यू ब्रंझविक परगण्यातील ग्‍लॉस्टर काउंटीचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १६,३०० (१९७६). शलर उपसागराला मिळणाऱ्या नपिझग्वत नदीच्या मुखाशी हे वसले आहे. १६१९ मध्ये फ्रेंचांनी येथे वसाहत केली. प्रारंभी नपिझग्वत व सेंट पीटर्स अशा दोन्ही नावांनी ते ओळखले जाई. १७५५ नंतर ते ब्रिटिशांच्या ताब्यात आले. ब्रिटिश युद्ध व वसाहत मंत्री तिसरा अर्ल हेन्‍री बॅथर्स्ट याच्या सन्मानार्थ, १८२६ पासून शहरास ‘बॅथर्स्ट’ हे नाव देण्यात आले. लाकूडतोड, खाणकाम व मासेमारीसाठी हे विशेष प्रसिद्ध आहे. आसमंतात तांबे, जस्त, शिसे, मँगॅनीज, पायराइट इत्यादींच्या खाणी आहेत. शहरात कागद कारखाने आणि लाकूड कापण्याच्या गिरण्या असून एक औष्णिक विद्युत् केंद्रही आहे. येथील निसर्गरम्य पुळणी पर्यटकांचे मोठेच आकर्षण आहे.

चौधरी, वसंत