पांडुरोग: (ॲनिमिया). रक्तातील ⇨ रक्तारुणाच्या (हीमोग्लोबिनाच्या) प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रमाणात घट होण्याला किंवा तांबड्या कोशिकांची (पेशींची) संख्या कमी होण्याला ‘पांडुरोग’ किंवा ‘रक्तक्षय’ म्हणतात [⟶ रक्त रक्तकोशिकाधिक्य]. तांबड्या कोशिका आणि रक्तारुण यांचा ऑक्सिजन वाहून नेण्याशी घनिष्ट संबंध असल्यामुळे पांडुरोगात ⇨ ऑक्सिजन-न्यूनता उद‌्भवण्याचा नेहमी संभव असतो. रक्तातील प्राकृतावस्थेतील तांबड्या कोशिकांची संख्या, रक्तारुणाचे प्रमाण आणि सांद्रित कोशिका घनफळ (हीमॅटोक्रीट नावाच्या उपकरणाच्या साहाय्याने सांद्रित केलेल्या रक्ताच्या नमुन्यातील कोशिकांचे घनफळ) पुढे दर्शिवल्याप्रमाणे असतात :

(अ)तांबड्या कोशिकांची संख्या :

 

पुरुष 

४·५–६·५ x १०/मिमी. 

स्त्रिया 

३·९–५·६ x १०/मिमी. 

मुले (१० ते १२ वर्षे) 

४·२–५·२ x १०/मिमी. 

(आ)रक्तारूण :

 

पुरुष 

१३·५–१८·० ग्रॅ./१०० मिलि. 

स्त्रिया 

११·५–१६·५ ग्रॅ./१०० मिलि. 

मुले (१० ते १२ वर्षे) 

११·५–१४·८ ग्रॅ./१०० मिलि. 

(इ)सांद्रित कोशिका घनफळ :

 

पुरुष 

४०–५४% 

स्त्रिया 

३५–४७% 

मुले (१० ते १२ वर्षे) 

३७–४४% 

जेव्हा रक्ततपासणीत वरील कोष्टकातील निम्न मर्यादादर्शक संख्यांपेक्षा कमी संख्या मिळते तेव्हा ‘पांडुरोग’ झाला असे म्हणतात.

रक्तातील घटकांची पातळी नेहमी एकसारखी ठेवण्याकरिता त्यांचे उत्पादन आणि नाश यांमधील संतुलन टिकविणे आवश्यक असते. तांबड्या कोशिकांचे आयुर्मान ठराविक (सु. १२० दिवस) असल्यामुळे त्यांचा सतत नाश चालू असतो. या नाशामुळे दररोज ६·२५ ग्रॅ. रक्तारुणाचा नाश होतो व त्यापासून २१ मिग्रॅ. लोह, २५० मिग्रॅ. पित्तरुण[बिलीरुबिन ⟶ पित्तारुण] आणि ६·२५ ग्रॅ. ग्लोबिन (रक्तारुणातील प्रथिन घटक) तयार होतात. यांपैकी लोह व ग्लोबिन नव्या तांबड्या कोशिकांच्या उत्पादनाकरिता वापरले जाते परंतु पित्तारुणाचे मूत्र आणि मलातून उत्सर्जन होते. जेव्हा तांबड्या कोशिकांची संख्या व रक्तारुणाचे प्रमाण घटते तेव्हा अस्थिमज्जेतील [⟶अस्थि] पूर्वगामी कोशिकांना अधिक उत्पादनाची चेतना मिळते व तांबड्या कोशिकांची प्राकृतावस्थेतील पातळी पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा उत्पादन आणि नाश यांच्या संतुलनात बिघाड उत्पन्न होतो, नाश अधिक आणि उत्पादन अपुरे पडते, तेव्हा पांडुरोग उद‌्भवतो. सुरुवातीसच हे लक्षात ठेवावयास हवे की, पांडुरोग हे एक लक्षण असून काही रोगांत ते प्रमुख लक्षण असते, तर काही रोगांत ते आनुषंगिक लक्षण असते.

कारणांचे वर्गाकरण : पांडुरोगाच्या कारणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : 

रक्तस्त्राव : (१) तीव्र, (२) चिरकारी. [⟶रक्तस्त्राव].

प्रमाणापेक्षा जादा रक्तनाश : (१) कोशिकाबाह्य कारणे (२) कोशिकागर्त : (अ) जन्मजात व आनुवंशिक, (आ) उपार्जित (प्राप्त झालेला). 

अत्यावश्यक तांबड्या कोशिकाजनक पदार्थांची न्यूनता : (१) लोह, (२) ब१२ जीवनसत्त्व [⟶जीवनसत्त्व ब१२], (३) फॉलिक अम्ल, (४) प्रथिने, (५) इतर पदार्थ : तांबे, पिरिडॉक्सीन [⟶जीवनसत्त्व ब], क जीवनसत्त्व [⟶ॲस्कॉर्बिल अम्ल].

हट्टी पांडुरोग : (संप्राप्ती पूर्ण न समजलेले, लवकर बरे न होणारे). (१) सूक्ष्मजंतू संक्रामण. (२) चिरकारी वृक्क विकार [⟶वृक्क], (३) औषधे, किरणोत्सर्ग (काही विशिष्ट मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रातून बाहेर टाकले जाणारे भेदक कण वा किरण) वगैरे, (४) कर्करोग, (५) अंतःस्त्रावी ग्रंथींच्या विकृती [⟶अंतःस्त्रावी ग्रंथि], (६) प्लीहेच्या विकृती [⟶प्लीहा].


पांडुरोगाचे वर्गीकरण : हे वर्गीकरण तांबड्या कोशिकांच्या आकारवैज्ञानिक वर्णनावरून करता येते. पांडुरोगाच्या निदानाकरिता प्रयोगशाळेतील रक्ततपासणी अत्यावश्यक असल्यामुळे या प्रकारचे वर्गीकरण इलाज करण्याच्या दृष्टीने हितकारक असते. 

 महाकोशिक पांडुरोग : या प्रकारात तांबड्या कोशिकांचे आकारमान नेहमीपेक्षा मोठे असते. याचे दोन उपप्रकार आहेत : (अ) अस्थिमज्जेतील बृहत‌्कोशिकाजनकवृद्धिसहित आणि (आ) अस्थिमज्जेतील बृहत‌्कोशिकाजनकवृद्धिविरहित. पहिल्या उपप्रकाराचे आणखी पुढील उपउपप्रकार आहेत.  

(१) उष्ण कटिबंधी किंवा पोषणज पांडुरोग, गर्भिणी पांडुरोग, शैशव पांडुरोग.  

(२) मारक पांडुरोग : यात ब१२ जीवनसत्त्वाचे अभिशोषण होत नाही. 

(३)⇨संग्रहणी, अज्ञानहेतुक (ज्याचे निश्चित कारण सांगता येत नाही असा) वसापुरीष (मलातून मोठ्या प्रमाणात वसेचे म्हणजे स्निग्ध

पदार्थाचे उत्सर्जन होणे), उदरगुहीय रोग (ग्लुटेनजन्य आंत्रविकृती: गव्हातील ग्लुटेन नावाचे प्रथिन लहान आतड्याच्या श्लेष्मकलास्तरावर–बुळबुळीत अस्तरावर–दुष्परिणाम करून अप–अभिशोषणास कारणीभूत होते), आंत्र निकोचन (आतड्याचा मार्ग अरुंद होणे) किंवा आंत्र उच्छेदन (आतड्याचा बराच मोठा भाग काढून टाकलेला असणे).  

(४)जठर कर्करोग किंवा पूर्ण जठर उच्छेदन.  

(५)परजीवीजन्य (दुसऱ्या सजीवावर उपजीविका करणाऱ्या जीवामुळे होणाऱ्या) विकृती, उदा., माशातील डायफायलोबोथ्रियम लेटम  नावाचे पट्टकृमी ब१२ जीवनसत्त्वाची न्यूनता उत्पन्न करतात.  

(६)औषधे : डायलँटीन, प्रिमिडोन, फिनोबार्बिटोन यांसारखी औषधे फॉलिक अम्लाच्या चयापचयात (शरीरात होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडीत) बिघाड उत्पन्न करतात.  

दुसऱ्या उपप्रकाराचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) रक्त विलयनजन्य पांडुरोग : यामध्ये तांबड्या कोशिकांचे नेहमीचे आयुर्मान बरेच कमी होऊन त्या लवकर नाश पावतात. याशिवाय त्यांची नाश होण्याची गतीही वाढते. याचे तीव्र आणि चिरकारी प्रकार आहेत. तीव्र प्रकार बहुतकरून एखाद्या नुकत्याच होऊन गेलेल्या जंतुसंक्रमणानंतर उद‌्भवतो किंवा विशिष्ट औषधांच्या सेवनाचा परिणाम असतो. चिरकारी प्रकार सर्वसाधारणपणे आनुवंशिक असतो. दात्र–कोशिका पांडुरोग हा याचा विशेष महत्त्वाचा प्रकार असून त्याचे वर्णन खाली दिले आहे.  

दात्र-कोशिका पांडुरोग : हा एक आनुवंशिक रक्तविलयनजन्य पांडुरोग असून विकृत रक्तारुणापासून उद‌्भवतो. यामध्ये तांबड्या कोशिकांचा आकार अर्धचंद्राकृती (दात्राकार) बनतो. आफ्रिका, ग्रीस, दक्षिण तुर्कस्तान, इटली, सिसिली आणि अरबस्तानासहित इतर काही भूमध्यसागरीय देशांतून हा आढळतो. भारतात सर्वदूर विखुरलेल्या आदिवासी जमातींतून तो प्रामुख्याने आढळतो. उत्तर प्रदेशातील धनका, तमिळनाडूतील वेद्दा, पश्चिम भारतातील दुबळा, गामिट धोडिया, नायका आणि भिल्ल, मध्य भारतातील हरिजन, तेली आणि कुणबी, आसामातील काही जमाती या सर्वांमध्ये दात्र-कोशिका प्रवृत्ती आनुवंशिक असल्याचे आढळले आहे. उत्तर अमेरिकेतील निग्रोंमध्येही हा रोग मोठ्या प्रमाणात आढळला आहे. मानवी रक्तातील रक्तारुणाचा प्रकार मातापित्यांकडून मिळणाऱ्या प्रत्येकी एका जीनपासून [आनुवंशिक लक्षणे दर्शविणाऱ्या गुणसूत्रावरील एककापासून ⟶ जीन] तयार होतो. माता व पिता निरोगी असल्यास त्यांच्या अपत्यातील रक्तारुण दोन ए ए जीन मिळून बनत असल्यामुळे त्याला ‘ए ए रक्तारुण’ म्हणतात. परंतु दोघांपैका एक जीन दात्र-कोशिका प्रवृत्तिकारक असला, तर अपत्यात होणारे रुक्तारुण ‘ए एस’ प्रकारचे असते. माता आणि पिता या दोघांकडूनही विकृत जीन मिळून तयार होणारे रुक्तारुण ‘एस एस’ प्रकारचे असते. या अपसामान्य रक्तारुणामुळे तांबड्या कोशिकांचा नेहमीचा उभयांतर्गोल चकतीसारखा आकार बदलून त्या दात्राकार बनतात. या विकृत आकारबदलामुळे केशवाहिन्यांतून (सूक्ष्म रक्तवाहिन्यांतून) होणारी त्यांची हालचाल विस्कळित होते व ऊतकांच्या (समान कार्य व रचना असणाऱ्या कोशिकांच्या समूहांच्या) ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय येतो. कधीकधी त्यांचे गोळे बनून रक्तप्रवाहात व्यत्यय येऊन अंतरक्लथन (रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी अडकणे) होते व परिणामी अभिकोथ (रक्तपुरवठा थांबल्यामुळे ऊतकाचा होणारा मृत्यू) होतो. याशिवाय दात्राकार कोशिका अधिक भंगूर असतात व त्यामुळे पांडुरोग उद‌्भवतो. या रोगावर कोणताही गुणकारी इलाज सापडलेला नाही. या रोगाच्या रोग्यांनी समुद्रसपाटीपासून फार उंच प्रदेशात जाण्याचे आणि दाबरहित विमानातून प्रवास करण्याचे टाळावे. सर्वसाधारणपणे रोग्याची वयोमर्यादा चाळीस वर्षांचीच असते. 

(२) यकृताचे रोग उदा., यकृत-सूत्रण रोग [⟶ यकृत]. 

(३) अवटू ग्रंथिस्त्रावाचे न्यूनत्व [⟶ अवटु ग्रंथि].


प्राकृत-कोशिक पांडुरोग : यामध्ये तांबड्या कोशिकांच्या नेहमीच्या आकारमानात (सरासरी कोशिका व्यास ७·२ मायक्रॉन १ मायक्रॉन = १०-३मिमी.)बदल होत नाही. याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.  

(१)तीव्र रक्तस्त्रावजन्य पांडुरोग [⟶रक्तस्त्राव].  

(२)काही रक्तविलयजन्य पांडुरोग.  

(३)रक्तार्बुद (श्वेतकोशिकाजनक ऊतकाची अपसामान्य वाढ होणारी आणि रक्तातील श्वेतकोशिकांची संख्या व आकारमान यांत अपसामान्य वाढ होणारी अज्ञानहेतुक मारक विकृती) आणि इतर मारक विकृती.  

(४)गर्भिणी जलरक्तता (रक्तातील कोशिकांच्या संख्येत वाढ न होता फक्त रक्तरसाची वृद्धी होणे).  

(५) हट्टी पांडुरोग : यामध्ये अस्थिमज्जेतील कोशिकांच्या उत्पादनातच घट होते. रक्तातील तिन्ही प्रकारच्या (तांबड्या, पांढऱ्या व बिंबाणू) कोशिकांच्या संख्येत कमतरता उत्पन्न होते. यालाच ‘सर्व कोशिका न्यूनत्व ‘ असेही म्हणतात. अस्थिमज्जेतील कोशिका-उत्पादन कमालीचे मंदावत असल्यामुळे या प्रकारच्या पांडुरोगाला ‘अविकसित अस्थिमज्जायुक्त पांडुरोग’ असेही म्हणतात. ही विकृती अनेक कारणांमुळे विशेषेकरून वैयक्तिक रोग-सुग्राह्यतेमुळे उद‌्भवते. त्यांपैकी काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत : (अ) कोशिका विषारी (विशिष्ट अवयवांच्या कोशिकांच्या बाबतीत विषारी परिणाम करणारे) पदार्थ, क्ष-किरणे(आ) सल्फॉनामाइडे [⟶ सल्फा औषधे], क्लोरँफिनिकॉल, सल्फॉने व आर्सोनोबेंझॉल (इ) फिनिलब्युटाझोन आणि सोन्यापासून बनविलेली संधिवातावरील औषधे (ई) अपस्मारावरील हायडॅन्टॉइने व मेथॅडिओने (उ) अवटू ग्रंथीच्या विकृतीवरील काही ओषधे (ऊ) अधिहृषतारोधके (ॲलर्जीरोधक द्रव्ये) (ए) कीटकनाशके (ऐ) आर्सेनिकले, क्विनीन, ॲसिटाझोलामाइड (ओ) औद्योगिक उत्पादनकरिता वापरण्यात येणारी बेंझीन आणि ट्रायनायट्रोटोल्यूइन यांसारखी रसायने. 

साधा लघुकोशिक पांडुरोग : यामध्ये तांबड्या कोशिकांचे आकारमान नेहमीपेक्षा लहान असते परंतु रक्तारुणाचे प्रमाण कमी झालेले नसते. याचे खालील दोन उपप्रकार आहेत.  

(१)चिरकारी दाहयुक्त विकृती.  

(२)वृक्कशोथ [⟶ वृक्क]. 

लघुकोशिक हीनवर्णी पांडुरोग : याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.  

(१)लोहन्यूनताजन्य पांडुरोग : यात शरीरातील लोहाचा साठा कमी होणे हे मूळ कारण असते. 

(२)ब जीवनसत्त्व किंवा पिरिडॉक्सीन प्रतिसादक्षम पांडुरोग: या जीवनसत्त्वाचा तांबड्या कोशिकोत्पादनाशी घनिष्ठ संबंध असतो. त्याच्या न्यूनतेमुळे लोहाचा कोशिका उत्पादनात योग्य तो उपयोग केला जात नाही. पिरिडॉक्सीन दिल्यास रोग बरा होतो [⟶ जीवनसत्त्व ब]. 

(३)अर्भकातील ताम्रन्यूनताजन्य पांडुरोग: यामध्ये तांब्याशिवाय लोह आणि प्रथिने यांचीही कमतरता असल्याचे आढळते.  

(४)तनुकोशिक पांडुरोग: नेहमीपेक्षा बरीच कमी जाडी असलेल्या पातळ तांबड्या कोशिका असलेली ही विकृती कौटुंबिक स्वरूपाची असून तिचे ज्येष्ठ आणि कनिष्ठ असे दोन प्रकार आहेत. ज्येष्ठ प्रकाराला टी. बी. कूली या अमेरिकन बालरोगतज्ञांच्या नावावरून ‘कूली पांडुरोग’ म्हणतात. 

(५)अतिलोहमय कोशिका पांडुरोग: या अज्ञानहेतुक विकृतीमध्ये अस्थिमज्जेतील पूर्वगामी तांबड्या कोशिकांमध्ये लोहकण विखुरलेले असतात. रक्तारसातील लोहाचे प्रमाण बरेच वाढलेले असते. 


पांडुरोग : (अ) निरोगी रक्तातील तांबड्या कोशिका, (आ) पांडुरोगातील तांबड्या कोशिका, (इ) उपचारानंतर होणारा फरक, (ई) दात्र-कोशिका पांडुरोगातील दात्राकार तांबड्या कोशिका.

सर्वसाधारण लक्षणे : रोगवृद्धीची गती आणि रोगाचे गांभीर्य यांवर लक्षणे अवलंबून असतात. काही सार्वदेहिक लक्षणे सर्व प्रकारच्या पांडुरोगांत आढळत असली, तरी कारणपरत्वे इतर काही लक्षणेही उद‌्भवतात. रक्ताभिसरण तंत्रातच मूळ विकृती असल्यास पांडुरोगाची लक्षणे अधिक स्पष्ट दिसतात. पांडुरोग अनेक वेळा इतका हळूहळू वाढतो की, शरीर ऑक्सिजन-न्यूनतेशी अनुयोजित होते व रोगी बऱ्याच काळापर्यंत लक्षणविरिहित अवस्थेत राहून त्यास रोगाची कल्पनाही नसते. तीव्र रक्तस्त्रावामध्ये रक्ताचे घनफळ घटल्यामुळे उद‌्भवणारी व ऑक्सिजन-न्यूनताजन्य लक्षणे प्रमुख असतात. तांबड्या कोशिकांचा अतिजलद नाश होत असल्यास ज्वर, अंगदुखी, पाठदुखी, ⇨ कावीळ, रक्तारुणमूत्रता (मूत्रामध्ये रक्तारुण वा त्यापासून तयार होणारी रंगद्रव्ये असणे) आणि अल्पमूत्रता ही लक्षणे उद‌्भवतात. 

अशक्तता, लवकर दमणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, अतिसार, जठरांत्रमार्गाच्या अनिश्चित स्वरूपाच्या तक्रारी आणि सौम्य ज्वर यांचा बहुतेक सर्व प्रकारच्या पांडुरोगांत नेहमी आढळणाऱ्या लक्षणांत समावेश होतो. ओठांच्या कोपऱ्यावर प्रामुख्याने दिसणारा मुखशोथ, जिव्हाशोथ (जिभेची दाहयुक्त सूज), गुळगुळीत जीभ, तिची रंजकयुक्तता यांचा नेहमी आढळणाऱ्या लक्षणांत समावेश होतो. रोगी बहुतकरून गरम व मसालेयुक्त अन्नपदार्थ सहन न होण्याची तक्रार करतो. एकाग्रता न होणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अंधारी येणे यांसारख्या तक्रारी रोगी करतो. कधीकधी दृष्टिमांद्य व कानात आवाज होतात व हातपायांना अपसंवेदना (विपरीत संवेदना) जाणवतात.  

दृश्य लक्षणांमध्ये त्वचा, नखे, श्लेष्मकला फिक्कट दिसणे आणि त्वचा व श्लेष्मकला यांची रंजकयुक्तता कधीकधी आढळतात. ही रंजकता नासासेतूवर व जवळच्या दोन्ही बाजूच्या गालांवर पसरून, ती पंख पसरलेल्या फुलपाखरासारखी दिसते, म्हणून तिला ‘फुलपाखरी रंजकता’ म्हणतात. हातापायांची पृष्ठीय बाजू, कपाळ, भुजा व प्रबाहू यांवरही रंजकता दिसते. नखे खोलगट व वक्रता असलेली दिसतात. यालाच ‘दर्वी नखे’ (पळीसारखी खोल असलेली नखे) म्हणतात. काही वेळा नखांची नेहमीची बहिर्वक्रता जाऊन ती चापट बनतात. कधीकधी पावलांवर सूज दिसते व केस अकाली पांढरे झाल्याचेही आढळते. 

ऑक्सिजन-न्यूनतेमुळे थोड्याही श्रमानंतर कष्टश्वसन व छातीत धडधडणे ही लक्षणे उद‌्भवतात. गंभीर पांडुरोगात हृद्शूल आणि सविरामी (अधूनमधून येणारे) पेटके ही लक्षणे आढळतात. जलद नाडी, छातीच्या पुरोहृद भागात ऐकू येणारे हृद्गुंजन हृदयाच्या उजव्या निलयाची निष्फलता व त्यामुळे यकृतवृद्धी, मानेतील नीला फुगणे इ. लक्षणे उद‌्भवतात. अनेक वेळा प्लीहावृद्धी होते. स्त्रियांमध्ये गंभीर पांडुरोगात अनार्तव (विटाळ बंद होणे) किंवा मासिक अतिस्त्राव ही लक्षणे उद‌्भवतात. गंभीर पांडुरोगामुळे लहान मुलांची शारीरिक व लैंगिक वाढ खुंटते.  

निदान : पांडुता (फिक्कटपणा) म्हणजेच पांडुरोग हा गैरसमज आहे. पांडुरोगाचा प्रकार आणि गांभीर्य यांच्या निदानाकरिता रक्ततपासणी अत्यावश्यक असते. कारण शोधून काढण्याचा प्रयत्न सर्वतोपरी केलाच पाहिजे. नकळत होणाऱ्या रक्तस्त्रावाकडे, उदा., ⇨ अंकुशकृमी  रोगातील रक्तस्त्राव, ⇨ मूळव्याध, गर्भाशयजन्य रक्तस्त्राव वगैरे, विशेष लक्ष पुरविले पाहिजे. याशिवाय आहाराच्या योग्यतेकडे आणि अभिशोषणाकडे लक्ष दिले पाहिजे. योग्य त्या तपासणीने वृक्क (मूत्रपिंड) विकृती चिरकारी संक्रामण किंवा मारक रोगांचे निदान केले पाहिजे. लहान मुलामध्ये ज्याचे निश्चित कारण सापडत नाही असा पांडुरोग पुष्कळ वेळा रक्तारुणातील आनुवंशिक संश्लेषण (शरीरात तयार होणाच्या क्रियेतील) दोषामुळे उद‌्भवलेला असतो. अशा वेळी कुटुंबातील इतर नातलगांची रक्ततपासणी, वंश आणि राहण्याचे मूळ स्थान यांबद्दल माहिती गोळा करावी लागते. 

यकृतवृद्धी, प्लीहावृद्धी, लसीका ग्रंथिवृद्धी [⟶ लसीका तंत्र], छातीच्या उरोस्थीमधील स्पर्शासह्यत्व व कावीळ ही लक्षणे रक्तजनक तंत्रातील विकृती दर्शवितात.

 रक्ततपासणीमध्ये तांबड्या कोशिकांची संख्या, रक्तारुणाचे प्रमाण, सांद्रित कोशिका घनफळ, पांढऱ्या कोशिकांची संख्या व विभेदी गणना (रक्तातील निरनिराळ्या पांढऱ्या कोशिकांची संख्या), तांबड्या कोशिकांच्या आकारमानातील व आकारातील बदल, बिंबाणू संख्या या बाबी कळू शकतात व सूक्ष्मदर्शकीय तपासणीत परजीवी (उदा., हिवतापाचे परजीवी) दिसू शकतात. रक्तासातील लोह, ब१२ जीवनसत्त्व आणि फॉलिक अम्ल यांचे प्रमाण तपासता येते. जरूर तेव्हा अस्थिमज्जेची ⇨ जीवोतक परीक्षा करावी लागते. मलतपासणीत रक्तस्त्राव आणि परजीवी दिसतात. कधीकधी अस्थी, पचनमार्ग आणि मूत्रमार्ग यांची क्ष-किरण तपासणी करावी लागते. 


अगदी अलीकडील नव्या प्रयोगशाळेतील तपासण्यांमध्ये किरणोत्सर्गी समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या किरणोत्सर्गी प्रकारांचा) उपयोग पांडुरोग निदानात फार उपयुक्त ठरला आहे. सर्व तांबड्या कोशिकांचे एकूण वस्तुमान आणि तांबड्या कोशिकांची अतिजीविता (टिकाव धरण्याची क्षमता) यांचे मापन करण्याकरिता क्रोमियम (५१) या समस्थानिकाचा सोडियम क्रोमेट या स्वरूपात वापर करतात. किरणोत्सर्गी समस्थानिकांचा उपयोग करून, त्यांच्या किरणोत्सर्गाचे योग्य उपकरणांच्या मदतीने क्रमवीक्षण (क्रमाक्रमाने बारकाईने निरीक्षण) केल्यास तांबड्या कोशिकांचे उत्पादन आणि नाश यांविषयी माहिती मिळून पांडुरोगाच्या निदानास मदत होते. 

चिकित्सा  : वरील विवेचनावरून हे स्पष्ट होते की, पांडुरोगाची विविध कारणे आहेत आणि चिकित्सा ही कारणावर अवलंबून असल्यामुळे प्रथम कारण शोधून काढलेच पाहिजे. अंदाजी योजिलेले उपाय नेहमी अयोग्य मानावे. सर्वसाधारण उपायामध्ये त्रुटिजन्य पांडुरोगात (उदा., लोह) योग्य त्या पदार्थाचा पुरवठा करावा लागतो. सूक्ष्मजंतू संक्रामणे, कर्करोग यांसारख्या मूळ विकृतींमध्ये तांबड्या कोशिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. म्हणून मूळ विकृतीवर प्रथम इलाज करावे लागतात. रक्तविलयनजन्य पांडुरोगात प्रथम रक्तविलयन थांबवण्याकरिता उपाय योजावे लागतात. त्याकरिता रक्तविलयनाचे मूळ कारण (उदा., विशिष्ट औषधाचे सेवन) शोधावे लागते. त्यानंतर औषधी उपचार किंवा प्लीहा-उच्छेदन शस्त्रक्रिया यांसारख्या उपचारांचा विचार करावा लागतो. तीव्र रक्तस्त्रावाकरिता ⇨ रक्तधानाची तातडीने उपाययोजना करावी लागते. चिरकारी प्रकारच्या रक्तस्त्रावामुळे रक्तारुणाचे प्रमाण ६ ग्रॅमपेक्षा कमी झाल्यास रक्ताधानाचा विचार करावा लागतो. काही हट्टी पांडुरोगांमध्ये (उदा., अविकसित अस्थिमज्जायुक्त पांडुरोग) वारंवार रक्ताधान करावे लागते. याशिवाय तांबड्या कोशिकांच्या उत्पादनास चेतना देणारी ॲड्रीनोकॉर्टिकोस्टेरॉइडे आणि पुं-जनित हॉर्मोने[⟶हॉर्मोने] यांसारख्या औषधांचा उपयोग करतात. गंभीर पांडुरोगात, विशेषेकरून हृदयक्रिया आणि श्वसनक्रिया यांमध्ये बिघाड उत्पन्न झाल्यास, पूर्ण विश्रांती घेणे (किंवा रुग्णालयात दाखल होणे) आवश्यक असते.

ढमढेरे, वा. रा.

भालेराव, य. त्र्यं. 

आयुर्वेदीय वर्णन : ह्या रोगामध्ये आहारविहाराने पित्तभूयिष्ठ दोष, रक्त व मेद क्षीण होऊन शरीर निर्बल होऊन इंद्रिये शिथिल होतात आणि त्वचेचा स्वाभाविक वर्ण बदलतो. तो फिकट दिसू लागतो. त्यात पिवळी, पांढरी किंवा काळी अशी छटा आधिक्याने दिसते. त्याला पांडुरोग असे म्हणतात. काही कारणाने रक्तस्त्राव होऊन फिकटपणा येतो किंवा रक्तपरिपोषक द्रव्येच आहारात गेली नाहीत तरी तो येतो, ह्यालाही पांडुरोग म्हणतात पण त्याला रक्तक्षय म्हणणेच योग्य होय. [⟶ आतुर चिकित्सा].

पटवर्धन, शुभदा अ. 

संदर्भ : 1. Davidson, S  Macleod, J., Ed. The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

   2. Scott, R. B., Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1973.

   3. Thorn, G. W. and others, Ed. Harrisson’s Principles of Internal Medicine, Tokyo, 1977.

   4. Vakil, R. J., Ed. Textbook of  Medicine, Bombay, 1969.