राणा कुंभ : (कार. सु. १४३३ – ६८), गुहिलोत वंशातील एक पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजा. त्याच्या जन्ममृत्युंच्या तारखा उपलब्ध नाहीत. मोकल हा त्याचा पिता. त्याच्या खुनानंतर तो मेवाडच्या गादीवर आला. त्याचा उल्लेख राणाकुंभ, कुंभकर्ण, कुंभवर्ण इ. भिन्न नामांतरांनी करतात. प्रथम त्याने आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड उगविला. त्यात त्यास आजा रणमल्लाची काही अंशी मदत झाली. पुढे रणमल्ल खूपच बेजबाबदारपणे वागू लागल्यामुळे कुंभास त्यालाही बाजूस सारावे लागले.

कुंभाविषयी विविध शिलालेखांतून व तत्कालीन वाङ्‍मयातून माहिती मिळते. कुंभाने चितोडमध्ये उभा केलेला कीर्तिस्तंभ आजही प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतो. पित्याच्या वधाचा सूड घेतल्यानंतर, कुंभाने अबूचा किल्ला सौसमल्ल याजकडून काबीज केला. त्यानंतर माळव्याचा सुलतान मुहम्मदशाहवर त्याने स्वारी केली. घनघोर लढाई होऊन तेथे खलजीस पराभव झाला. खल्‌जीस कुंभाने कैद करून चितोडच्या किल्ल्यात ठेवले पण पुढे त्याजजवळून खंडणी वगैरे काही न घेता त्यास सोडून दिले. यांमुळे खल्‌जी महाराणा कुंभकर्णशिरजोर झाला व त्याने गुजरातच्या सुलतानाबरोबर करारनामा करून संयुक्तपणे कुंभावर आक्रमण केले. कुंभाने एकेकास गाठून पराभव केला. नागौरचा किल्ला हस्तगत केला. अशा प्रकारे मुसलमानांच्या वाढत्या शक्तीस व अत्याचारास कुंभाने आळा घातला. त्याने आपल्या सर्व शत्रूंना नेस्तनाबूत करून संबंध राजस्थानचा प्रदेश आपल्या शासनाखाली आणला होता. रामपूरच्या शिलालेखात त्याच्या राज्यविस्ताराविषयी खालील माहिती मिळते, “कुंभकर्णाने सारंगपूर, नागपूर (नागौर), नरामक, अजमेरू, मंडोर, मंडलकर, बुंदी, खाटु इ. दुर्भेद किल्ल्यांना लीलेने जिंकले. गुजरातच्या सुलतानांनी त्याला छत्र नजर केले व ‘हिंदुसुरवाण’ ही पदवी बहाल केली.” यांवरून माळवा, जयपूर, जोधपूर, बुंदी, कोटा इ. सर्व भाग त्याच्या राज्यात मोडत असावा हे दिसते.

कुंभास महाराजाधिराज, रायराय, राणेराय, महाराणा व त्यांशिवाय राजगुरू, दानगुरू, शैलगुरू, मरमगुरू वगैरे पदव्या दिलेल्या आढळतात. कुंभाने शिल्पकला व विद्या यांना उत्तेजन दिले. मेवाडात त्याने एकंदर बत्तीस किल्ले आणि अनेक विहिरी, तलाव, बगीचे, रस्ते, कोट व वाडे बांधले. त्याच्या योग्यतेविषयी गौरीशंकर ओझा म्हणतात, ‘कुंभ मोठा विद्यानुरागी, विद्वानांचा सन्मानकर्ता, साहित्यप्रेमी, संगीताचार्य, नाट्यकलाकुशल, कविशिरोमणी, वेदशास्त्रज्ञ व शिल्पानुरागी होता. त्याने बांधलेले कुंभळगड आणि चितोड किल्ल्यांतील कीर्तिस्तंभ यांनी त्याची कीर्ती अजरामर केली आहे’.

कुंभास अखेरीस उन्माद रोग झाला. त्या स्थितीचा फायदा घेऊन १४६८ मध्ये त्याच्या उदयकर्ण नावाच्या राज्यलोभी मुलाने कट्यार भोसकून त्यास ठार मारले.

पहा : गुहिलोत वंश राजपुतांचा इतिहास.

संदर्भ : १. गहलोत, जगदीशसिंह, राजपूतानेका इतिहास, पहला भाग, जोधपूर, १९३७.

२. देशपांडे, ह. वा. राजपूत राज्यांचा उदय व ऱ्हास, नागपूर, १९३८.

देशपांडे, सु. र.