खेकडा, शंखवासी : डेकॅपोडा (दशपाद) गणातील ॲनोम्यूरा उपगणातल्या पॅग्युरिडी कुलातील कवचधारी प्राणी. याला जरी खेकडा म्हणत असले, तरी हा खरा खेकडा नव्हे. जगातील बहुतेक समुद्रकिनाऱ्यांवर शंखवासी खेकडे आढळतात. याचे उदर मांसल व मऊ असून असममित (दोन सारखे भाग न पडणारे) असते. शरीराच्या या भागाचे रक्षण करण्याकरिता हा खेकडा एखाद्या उदरपादाचा (गॅस्ट्रोपॉड प्राण्याचा) रिकामा शंख शोधून काढून त्यात राहतो. शंखाच्या आकाराला अनुसरून उदराला मळसूत्राप्रमाणे वेटोळी पडलेली असतात. प्लवपादांची (सामान्यातः पोहण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या उपांगांची) सहावी जोडी आकड्यांप्रमाणे शंखाच्या स्तंभिकेची (मध्यभागी असणाऱ्या स्तंभाची) पकड घेते व त्यामुळे उदर शंखात घट्ट बसलेले असते. शरीराची वाढ झाल्यावर जुना शंख सोडून हा खेकडा त्याच्या आकारमानाजोगता नवा शंख शोधून त्यात राहू लागतो. यूपॅग्युरस बर्नहार्डंस  या सामान्य शंखवासी खेकड्याला उटंगळाच्या शंखात राहणे पसंत पडते.

शीर्षावर लघुशृंगिका, शृंगिका (सांधे असलेले लांब स्पर्शेंद्रिय), जंभ (भक्ष्याचे तुकडे करण्याकरिता असणारी संरचना) यांच्या जोड्या आणि जंभिकांच्या (विविध कार्यांसाठी ज्यांचे अनेक प्रकारे रूपांतर होते अशा जंभाच्या मागे असणाऱ्या उपांगांच्या) दोन जोड्या असतात वक्षावर जंभपादांच्या (अन्न मुखावाटे नेण्याच्या कामी मदत करणाऱ्या उपांगांच्या) तीन जोड्या व पायांच्या पाच जोड्या असतात पहिल्या जोडीतील पाय मजबूत असून त्यांना नखरपाद (नख्या असलेले पाय) म्हणतात. उजवा नखरपाद मोठा असून त्याच्या टोकावरील नखर मोठा व भक्कम असतो. सामान्यतः या खेकड्याचे उदर कायमचे शंखात असून शिरोवक्ष (डोके आणि छाती यांच्या एकीकरणाने तयार झालेला भाग) शंखाबाहेर असते  पण जरूर पडेल तेव्हा तो शिरोवक्ष शंखात ओढून घेतो आणि उजव्या नखराने शंखाचे द्वार बंद करतो. भक्ष्य पकडणे, शत्रूवर हल्ला करणे व स्वसंरक्षण ही नखरपादांची कामे होत. पायांची दुसरी आणि तिसरी जोडी लांब असून चालण्याकरिता उपयोगी पडते. चौथ्या आणि पाचव्या जोडींतील पाय आखूड असून शंखाच्या आतल्या भागाला घट्ट चिकटून असतात. शिरोवक्ष पृष्ठवर्माने (पाठीवरील आच्छादक कवचाने) झाकलेले असते.

उदर कायमचे शंखात असते. त्याच्या वरच्या पृष्ठावर पृष्ठकांचे (शरीराच्या खंडांच्या वरच्या पृष्ठांचे) अवशेष आढळतात. प्लवपादांची सहावी जोडी सोडून बाकीचे सर्व प्लवपाद सर्वसाधारणपणे कमीअधिक प्रमाणात नाहीसे झालेले असतात आणि असलेच तर फक्त डाव्या बाजूलाच असून तेही अतिशय लहान (विशेषतः नरात) असतात. मादी त्यांना अंडी चिकटविते. पुच्छखंड आणि पुच्छपाद (पुच्छखंडाच्या अलीकडच्या खंडावरील उपांगे) कॅल्सीभूत (कॅल्शियममय) असून शरीर शंखात घट्ट बसविण्यास उपयोगी पडतात.

शंखवासी खेकड्याच्या जीवनवृत्तातील प्राथमिक अवस्था समुद्राच्या पाण्यात पार पडतात. अंडी फुटून त्यातून झोइया डिंभ (भ्रूणांनंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्वावस्था) बाहेर पडतो. हा मुक्तप्लावी (स्वतंत्रपणे पोहणारा) असून इतर कवचधरांच्या झोइया डिंभांच्या शरीरावर असणारी सर्व उपांगे याच्या शरीरावर असतात. काही काळाने हा डिंभ मेटॅझोइया या पुढच्या डिंभावस्थेत जातो. याच्या पुढची डिंभावस्था ग्लॉकोथोइ ही असून खऱ्या खेकड्यांच्या जीवनवृत्तातील मेगॅलोपा या डिंभासारखाच हा असतो [→ डिंभ]. चारपाच दिवसांनंतर या अवस्थेचे खेकड्यात रूपांतरण होते.

कधीकधी शंखवासी खेकड्याच्या शंखाच्या बाह्यपृष्ठावर स्पंज, हायड्रॉइड किंवा समुद्रपुष्पांची बरीच वाढ झालेली दिसून येते. हे सगळे प्राणी शंखवासी खेकड्यानेच स्वसंरक्षणार्थ शंखावर स्थापन केलेले असतात. खेकड्याच्या अन्नातला काही भाग यांना मिळतो आणि हे शत्रूपासून खेकड्यांचे संरक्षण करतात.

उष्ण कटिबंधातील सीनोबॉयटिडी कुलातील शंखवासी खेकडे अनेकदा समुद्रापासून फार दूर जमिनीवर राहतात. पण मधूनमधून ते समुद्रात जातात.

कर्वे, ज.नी.