गोहाइन-बरुआ, पद्मनाथ : (९ नोव्हेंबर १८७१–? १९४६). आधुनिक असमियातील एक अष्टपैलू साहित्यिक. उत्तर लखिमपूर भागातील नकारी नावाच्या खेड्यात त्यांचा जन्म झाला व तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षणही झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण सिवसागर येथे व महाविद्यालयीन शिक्षण कलकत्ता येथे झाले. कलकत्ता येथे शिकत असतानाच बेणुघर  राजखोवा व कृष्णप्रसाद दुआरा यांच्या सहकार्याने त्यांनी बिजुली  हे मासिक सुरू केले. लक्ष्मीनाथ बेझबरुआ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जोनाकि  ह्या मासिकाचे प्रतिस्पर्धी म्हणून बिजुली  त्यांनी सुरू केले. १८९१ मध्ये पद्मनाथांनी आपली पहिली कादंबरी भानुमति  ही बिजुलीतून क्रमशः प्रसिद्ध केली. यानंतर एका वर्षाने त्यांची लाहरी (१८९२) ही दुसरी कादंबरी प्रसिद्ध झाली आणि असमियातील एक उदयोन्मुख कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली तसेच त्यांच्याबाबतच्या अपेक्षाही उंचावल्या. तथापि दुर्दैवाने ह्या अपेक्षा पुढे फलद्रुप होऊ शकल्या नाहीत. कारण नंतर ते कादंबरीलेखन सोडून काव्यलेखनाकडे व नाट्यलेखनाकडे वळले.

पद्मनाथ गोहाइन-बरुआ

लीला काव्य (१८९९), जुरणि (१९००) आणि फुलर चानेकि (१९१०) हे त्यांचे काव्यसंग्रह होत.  ते स्वच्छंदतावादी परंपरेतील कवी. त्यांनी आपल्या काव्यात निसर्गाच्या विशुद्ध सौंदर्याचे पोवाडे गायिले आहेत आणि विश्वातील सर्व चराचर सृष्टीवर होणाऱ्या प्रेमाच्या परिणामाचे गुणगान केले आहे. त्यांच्या वर्णनात कधी कधी उत्स्फूर्ततेचा व स्वाभाविक अभिव्यक्तीचा अभाव आढळतो.

त्यांनी शोकात्मिका व सुखात्मिका मिळून एकूण आठ नाटके लिहिली. त्यांतील चार  ऐतिहासिक, एक पौराणिक व तीन प्रहसनात्मक आहेत. गांवबुढा (१८९९), जयमती (१९००), गदाधर (१९०७), साधनी (१९११) व लाचित बरफूकन (१९१५) ही त्यांची नाटके विशेष उल्लेखनीय होत. कथानक आणि व्यक्तिचित्रण यांबाबतीत त्यांच्या नाटकांत वैशिष्ट्यपूर्णता नसली, तरी तत्कालीन असमिया नाटकांवरील बंगाली नाटकांचा अनिष्ट प्रभाव कमी करण्यात त्यांच्या नाटकांची बरीच मदत झाली.

पद्मनाथांच्या गद्यशैलीतील साधेपणा आणि सौंदर्य लक्षणीय आहे. श्रीकृष्ण (तीन खंडांत–१९३०) ह्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गद्यग्रंथावरून त्यांच्या कमावलेल्या शैलीचे व विद्वत्तेचे प्रत्यंतर येते. जीवनी संग्रह (१९१५) हा चरित्रग्रंथही त्यांनी लिहिला. बिजुलीशिवाय उषा  आणि असम बंति  ह्या मासिकांचेही त्यांनी काही काळ संपादन केले.

पद्मनाथ हे फार उच्च कोटीचे साहित्यिक नसले, तरी त्यांनी आंतरिक कळवळ्याने व मातृभाषेच्या प्रेमाने असमिया साहित्याच्या विविध क्षेत्रांत आपल्या परीने भर घातली.

सर्मा, सत्येंद्रनाथ (इं) सुर्वे, भा. ग. (म.)