बीव्हरबीव्हर : हा जलचर, विशेषतः नदीमध्ये राहणारा प्राणी स्तनी वर्गातील कृंतक (अन्न कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या) गणाच्या कॅस्टॉरिडी कुलातील आहे. याच्या दोन जाती आहेत. एक जर्मनी, फ्रान्स, स्कॅंडिनेव्हिया आणि रशियात आढळणारी असून तिचे शास्त्रीय नाव कॅस्टॉर फायबर असे आहे. दुसरीचे नाव कॅ.कॅनडेन्सिस असून ती उत्तर अमेरिकेत आढळते. एके काळी दोन्ही जाती आपापल्या प्रदेशांत मुबलक असत पण हल्ली त्यांची संख्या फार कमी झाली आहे.

सगळ्यांत मोठ्या कृंतक प्राण्यांत याची गणना होते [कॅपिबारा हा यापेक्षा मोठा असा कृंतक प्राणी आहे ⟶ कॅपिबारा]. बीव्हर हा बुटका असून डोक्यासकट शरीराची लांबी ७५-१३० सेंमी. व खांद्यापर्यंतची उंची ३५ ते ४० सेंमी. असते. शेपटी २२ ते ३० सेंमी. लांब व चपटी असून तिच्यावर खवले असतात. संकटाच्या वेळी शेपटी पाण्यावर आपटून हा मोठा आवाज करतो व इतरांना संकटाची जाणीव करून देतो. याचे वजन सु. ३० किग्रॅ. असते. मागच्या पायाची बोटे पातळ कातडीने जोडलेली असून पोहताना त्याचा वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. दुसऱ्या बोटावरील नखी दुहेरी असून तिचा केस विंचरण्यास उपयोग होतो. याला २० दात असून पुढच्या चार बळकट दातांनी तो झाडाची साल सोलून काढतो व बुंधा कुरतडतो. तो या दातांनी १५ मिनिटांमध्ये १० सेंमी. व्यासाचा वृक्ष कुरतडून तोडून टाकू शकतो. इतर दातांचा उपयोग अन्नाचे चर्वण करण्यासाठी होतो. नर व मादीला कस्तुरी ग्रंथी असतात त्यांच्यातून स्रवणाऱ्या ’कॅस्टोरियम’ नावाच्या द्रवाचा उपयोग एकमेकांना आकर्षित करण्यासाठी होतो. हा चांगला पोहणारा (ताशी सु. ३ किमी. वेगाने) असून तो पाण्याखाली १५ मिनिटांपर्यंत राहू शकतो. याच्या अंगावरची लोकर (फर) मौल्यवान गणली जाते. तिचे दोन प्रकार आहेत : एक करड्या रंगाची दाट व मऊ आणि दुसरी तांबूस तपकिरी रंगाची, लांब पण जाडीभरडी असते. याचे आयुर्मान सु. १२ वर्षे असते, तथापि प्राणिसंग्रहालयात हा २० वर्षे जगल्याची नोंद आहे.

नर बहुपत्नीक असतो परंतु मादी मात्र एकाच नराशी एकनिष्ठ असते. बीव्हरचा गर्भावधी ४ महिन्यांचा असतो. एप्रिल-मे महिन्यात मादीला तीन वा चार पिले होतात. मादीला स्तनाच्या दोन जोड्या असून पिले एक महिना अंगावर पितात. पिले दोन वर्षांची होईपर्यंत आईजवळ राहतात व त्यांची लैंगिक वाढ पूर्ण झाली म्हणजे निराळा संसार थाटतात.

जगातील निरनिराळ्या भागांत याचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) आढळले आहेत. उदा. ऑलिगोसीन आणि प्लाइस्टोसीन (सु. ३.५ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळातील जीवाश्म उत्तर अमेरिकेत आढळले आहेत.

यांच्या टोळ्या असतात व यांचे जीवन झाडे, नद्या व तळी यांच्याशी निगडित असते. झाडाच्या साली हे खातात व उरलेल्या ओंडक्याचा वापर बांध आणि घरे बांधण्यासाठी करतात. झाडाची मुळे, कोवळ्या डहाळ्या, कंद इत्यादीही ते खातात. नदीचे अथवा ओहळाचे पाणी अडविण्याकरिता हे प्राणी वरीलसारखे ओंडके अथवा झाडाच्या फांद्या आडव्या टाकून बांध तयार करतात. हे बांध मजबूत असून मोठ्या कौशल्याने बनविलेले असतात. अशा तयार झालेल्या डबक्यांत किंवा लहान तळ्यांत राहण्यासाठी ते ओंडके, फांद्या आणि चिखल यांची घरे पाण्याच्या पातळीवर बांधतात. मात्र घरांत प्रवेश करण्यासाठी असलेले मार्ग या घराच्या बाजूने व पाण्यातून गेलेले असतात. बांधामुळे घराभोवती पाण्याची पातळी पुरेशी राहते. अशा प्रकारे या प्राण्यांनी जास्तीत जास्त ५०० मी. लांब व ४ मी. उंच बांध बांधल्याचे आढळले आहे. बांध बांधण्यात येणाऱ्या अडचणीचे ज्ञान त्यांना उपजतच असते. पाण्याचा दाब, प्रवाहाची दिशा वगैरे बाबी ते बांध व घरे बांधताना विचारात घेतात. ओंडक्याच्या व फांद्यांच्या मधील फटींतून पाणी वाहून जाऊ नये म्हणून ते त्यात चिखल, दगड वगैरे भरून त्या बुजवितात. पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी बांधाच्या भिंतीत वरच्या पातळीत छिद्रे ठेवलेली असतात. यांची घरे डबक्यांत बेटाप्रमाणे असतात. ती शंकूच्या आकाराच्या ढिगाऱ्याप्रमाणे दिसतात. लाकडाचे ओंडके वाहून आणण्यासाठी ते छोटे कालवेही तयार करतात. ही बांधकामाची अथवा दुरुस्तीची कामे ते उन्हाळ्यात करतात. तसेच उन्हाळ्यातच साली, कोवळ्या फांद्या वगैरे खाद्यपदार्थांचा राखीव साठाही घराजवळ पण पाण्याखाली ते करून ठेवतात. हिवाळ्यात ते घरातच राहातात. त्या वेळी घरे बाहेरून गोठली तरी घराचे प्रवेशमार्ग पाण्याखालून असल्याने न गोठता खुले राहातात. हे बांध व घरे कित्येक वर्षे टिकून राहिल्याचे आढळले आहे. काही बीव्हर किनाऱ्यालगतच्या जमिनीत बिळे करूनही राहतात.

पंधरा महिन्यांच्या कालावधीत २ बीव्हर प्राण्यांनी एकूण २६६ झाडे तोडली, असे आढळले आहे यांपैकी काही झाडांचा व्यास ३० सेंमी. होता. या काळात त्यांनी तीन बांध बांधले ३० घ.मी, आकारमानाचे एक घर बांधले आणि १० मी. x २.५ मी. x १ मी. एवढ्या आकारमानाचा लाकडांचा साठाही त्यांनी करून ठेवला होता. यावरून हे प्राणी किती उद्योगी आहेत, याची कल्पना येईल.

पूर्वी मांस, फर आणि कॅस्टोरियम यांच्यासाठी या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हत्या झाली. तथापि आता कायद्याने त्यांचे संरक्षण करण्याच्या योजना आखण्यात आल्या असून त्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे. बीव्हरची फर मौल्यवान असून त्याच्यापासून मिळणाऱ्या कॅस्टोरियम या द्रव्याचा वापर सुवासिक द्रव्यांमध्ये केला जातो. शिवाय यांनी बांधलेले बांध माणसाला काही ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले आहेत.

कानिटकर, बा. मो. ठाकूर, अ. ना.