ब्रह्मपुरी – १ : महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ११,८८३ (१९७१). चंद्रपूर-गोंदिया या अरुंदमापी लोहमार्गावरील हे शहर रस्त्याने चंद्रपूरच्या ईशान्येस सु. १२४ किमी. आहे. येथील खडकाळ भूपृष्ठामुळे शहरातून पाण्याचा निचरा उत्तम होऊन त्यामुळे रस्ते उत्तम व स्वच्छ राहण्यास मदत होते. आसमंत भाताच्या शेतीने व्यापला असून परिसरात अनेक तलाव बांधलेले आहेत. त्यांपैकी शहरालगतच्या कोट, लेंढा व बारई या तीन तलावांमुळे सु. ६० हे. क्षेत्राला पाणीपुरवठा होतो. पिण्याच्या पाण्याचा मात्र तुटवडा असतो. पूर्वी हे शहर तलम कापड, तांबे व पितळी भांडयांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. तथापि पुरेशा मागणीअभावी हा कलात्मक उद्योग आता ऱ्हास पावला आहे. शहरात बैलगाड्या, पादत्राणे व बिडीनिर्मिती, लाकूड कटाई व भातसडीचा व्यवसाय चालतो. शहरात महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक सोयी आहेत.

खांडवे, म. अ.