गिधाड : हा पक्षी अक्सिपिट्रिडी पक्षिकुलातील आहे. याच्या पाचसहा जाती भारतात आढळतात त्यांपैकी काळे गिधाड आणि बंगाली गिधाड या दोन प्रमुख असून त्या सगळीकडे आढळतात. काळे गिधाड हिमालयात १,५२५ मी. उंचीपर्यंत व बंगाली गिधाड २,४४० मी. उंचीपर्यंत आढळते. काळे गिधाड बरेच मोठे आणि रुबाबदार असल्यामुळे त्याला ‘गृध्रराज’ म्हणतात. याचे शास्त्रीय नाव टॉरगॉस काल्व्हस  आणि बंगाली गिधाडाचे जिप्स बेंगॉलेन्सिस  असे आहे.

काळे गिधाड : गृध्रराजाचे शरीर अवाढव्य आणि काळ्या रंगाचे असते डोके आणि मान शेंदरी रंगाची असून त्यांवर पिसे नसतात पाय शेंदरी, मांड्यांच्या वरच्या भागावर प्रत्येकी एक मोठा पांढरा ठिपका मानेच्या बुडाशी पांढरा पट्टा डोळे पिवळे किंवा तांबूस तपकिरी चोच मोठी, मजबूत, टोकाशी वाकडी आणि काळसर. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक एकटे असतात.

आ. १. गृध्रराज (काळे गिधाड)

   

मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर हे उपजीविका करतात. खेड्यापाड्यांच्या किंवा गावांच्या आसपास फेकून दिलेल्या मेलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता तेथे गिधाडे, घारी, कावळे वगैरे गोळा होतात आणि मांसावर ताव मारतात. थोड्याच वेळात हे पक्षी मेलेल्या जनावराचा फक्त सांगाडाच शिल्लक ठेवतात.

यांचा विणीचा हंगाम डिसेंबरपासून एप्रिलपर्यंत असतो. घरटे बरेच मोठे व काटक्यांचे केलेले असून उंच झाडावर जमिनीपासून ९—१२ मी. उंचीवर असते. मादी दर खेपेस पांढऱ्या रंगाचे एकच अंडे घालते. 

बंगाली गिधाड : हे गिधाड गृध्रराजाएवढेच असते. वरची बाजू मळकट काळसर तपकिरी पाठीवर शेपटीच्या बुडाच्या पुढे रुंद पांढरा पट्टा छाती व पोट तपकिरी काळे डोके व मान भुरकट काळी त्यांवर पिसे नसतात डोळे तपकिरी चोच व पाय काळसर. हे गिधाडदेखील मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर उदरनिर्वाह करणारे आहे. याची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे आकाशात उंचावर घिरट्या घालीत असताना जमिनीवर पडलेले मेलेले जनावर याला सहज दिसते. ते दिसताक्षणीच बरीच गिधाडे त्या ठिकाणी जमतात आणि मांसाचा फडशा पाडतात.

ह्यांची वीण ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत होते. घरटे गृध्रराजाच्या घरट्यासारखे असते व मादी एकच पांढरे अंडे घालते. 

ईजिप्शियन गिधाड : ॲक्सिपिट्रिडी या पक्षिकुलात वरील गिधाडांशिवाय आणखी एका प्रकारच्या गिधाडाचा समावेश केला आहे. याला ईजिप्शियन गिधाड किंवा पांढरे गिधाड म्हणतात. याचे शास्त्रीय नाव निओफ्रॉन परक्नॉप्टेरस  असे आहे. दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात हे आढळते. आसामखेरीज भारताच्या सर्व भागांत ते आढळते.आ. २. ईजिप्शियन किंवा पांढरे गिधाड

  

याचा आकार घारीएवढा असतो. सगळे शरीर मळकट पांढऱ्या रंगाचे असते डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात चोच पिवळी उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात शेपटी पाचरीसारखी पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक एकटे किंवा जोडप्याने राहतात.

याला माणसाची मुळीच भीती वाटत नाही. मनुष्यवस्तीत किंवा तिच्या आसपास, विशेषतः जेथे केरकचरा व घाण साठलेली असेल अशा ठिकाणी, हे नेहमी भक्ष्य शोधीत असलेले दिसून येते. एक एक पाऊल टाकीत डुलत डुलत हे चालते. ही गिधाडे सर्व प्रकारची घाण आणि विष्ठा खातात. कधीकधी मेलेल्या जनावराचे कुजणारे मांसदेखील ही खातात. यांच्या घाणेरड्या सवयीमुळे बहुतेक लोक या पक्ष्यांकडे तिरस्कारानेच पाहतात, पण हा एक उपयुक्त पक्षी आहे यात शंका नाही.

यांची वीण फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत होते. घरटे काटक्या, चिंध्या, केस वगैरे पदार्थांचे बनविलेले असून ते खडकाच्या कपारीत, पडक्या इमारतीत, पडीक तटबंदीतील कोनाड्यात वगैरे ठिकाणी असते क्वचित वडासारख्या मोठ्या झाडावरही असते. मादी दर खेपेस दोन अंडी घालते ती पांढरी किंवा फिक्कट विटकरी असून त्यांवर तांबूस तपकिरी किंवा काळे डाग असतात. घरटे तयार करणे, अंडी उबविणे आणि पिल्लांना भरविणे ही कामे दोघेही करतात.

कर्वे, ज. नी.