चालट : नोटॉप्टेरिडी मत्स्यकुलातल्या नोटॉप्टेरस वंशातील मासा. याचे शास्त्रीय नाव नोटॉप्टेरस नोटॉप्टेरस आहे. नोटॉप्टेरस वंशाच्या दोन जाती भारतात आढळतात, त्यांपैकी चालट ही सामान्य जाती होय. दुसरी जात चितळ ही असून ती बंगालमध्ये पुष्कळ आढळते. तिचे शास्त्रीय नाव नोटॉप्टेरस चिताला असे आहे. वरील दोन्ही जाती भारताखेरीज थायलंड, ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा आणि मलाया द्वीपकल्पात आढळतात. हे मासे तलाव व नद्यात राहतात. गोड्या पाण्याप्रमाणेच मचूळ पाण्यातही ते राहू शकतात.
चितळ या जातीची जास्तीत जास्त लांबी १२२ सेंमी. असते. वरचे पृष्ठ बरेच उत्तल (बहिर्गोल) असून पाठ अगदीच अरुंद असते. तिचा रंग ताम्रवर्णी तपकिरी किंवा करडा असतो पाठीच्या मध्य रेषेच्या दोन्ही बाजूंना १५ रुपेरी तिरकस पट्टे असतात.
हे मासे दिवसा विश्रांती घेतात व रात्री भक्ष्य मिळविण्याकरिता हिंडतात. कीटकांचे डिंभ (प्राण्याची भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी आणि प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था), कृमी, लहान मासे हे यांचे भक्ष्य होय.
यांचे प्रजोत्पादन पावसाळ्यात संथ अथवा वाहत्या पाण्यात होते. मादी सु. २००–१,००० अंडी घालते. त्यांचे लहान लहान गट असून ते पाणवनस्पतींना चिकटलेले असतात. संथ पाण्यात या माशांची चांगली वाढ होते.
कर्वे, ज. नी.
“