किंदी, अल्- : (सु. ७९६ – सु. ८७३). एक अरबी तत्त्वज्ञ. संपूर्ण नाव अबू युसुफ याकुब इब्न इशाक अल्-किंदी. त्याचा जन्म कूफा येथे एका खानदानी कुटुंबात झाला. ‘अरबांचा तत्त्ववेत्ता’ असा त्याचा गौरवाने उल्लेख करण्यात येतो. त्याचे वडील कूफा परगण्याचे सुभेदार होते. अल्-किंदीचे शिक्षण बसरा व बगदाद येथे झाले. अल्-मा मून (कार. ८१३ – ३३) व अल्-मुत्तासिम (कार. ८३३ – ४२) ह्या खलीफांच्या पदरी तो नोकरीला होता. अल्-मुत्तासिमच्या मुलाचा तो शिक्षक होतो. पण पुढे मुतवक्किल (कार. ८४७ – ६१) ह्या खलीफाची त्याच्यावर गैरमर्जी झाली. बगदाद येथे त्याचे निधन झाले.

अल्-किंदीचे ग्रीक भाषेवरही प्रभुत्व होते आणि विविध विषयांवर त्याने अरबी भाषेत विपुल लेखन केले आहे. नव-पायथॅगोरियन गणित हे सर्व शास्त्रांचा आधार आहे असे अल्-किंदी मानीत असे. नव-प्लेटो मताच्या धर्तीवर प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांच्या विचारांचा समन्वय साधण्याचा त्याने प्रयत्न केला. भौतिकीत त्याने गणिताचे उपयोजन केले त्याप्रमाणे वैद्यकशास्त्रातही केले. एक महान फलज्योतिषी अशीही मध्ययुगात त्याची ख्याती होती. रसायनशास्त्र आणि प्रकाशिकी (ऑप्टिक्स) ह्यांवर त्याने ग्रंथरचना केली असून प्रकाशिकीवरील त्याचा प्रमुख ग्रंथ बराचसा यूक्लिडच्या विचारांवर आधारलेला आहे. आकाशाचा रंग निळा का आहे, याचे स्पष्टिकरण करणारा त्याचा एक ग्रंथ आहे.  भरती-ओहोटीवरही त्याने एक ग्रंथ लिहिला आहे पण तो फक्त लॅटिन भाषांतरातच उपलब्ध आहे.

तत्त्वमीमांसेमध्ये आत्मा आणि बुद्धी (ग्रीक शब्द ‘नाउस’ ह्यांचे स्वरूप काय आहे, हा प्रश्न त्याने हाताळला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मानवी आत्मा हा विश्वात्म्यापासून नि:सरणाने अस्तित्वात येतो. शरीराशी संयोग पावल्याने कृती करण्याचे सामर्थ्य व स्वातंत्र्य त्याला प्राप्त होते. तेव्हा आपल्याला जर परमोच्च ज्ञान, शहाणपण, प्राप्त करून घ्यायचे असेल, तर आपण आपले लक्ष बुद्धीचे चिरंतन गुण, ईश्वराविषयी भीतियुक्त आदर, ज्ञान आणि सत्कृत्ये करण्याची प्रेरणा ह्या गोष्टींवर केंद्रित केले पाहिजे.

अल्-किंदीचे बरेचसे मूळ अरबी ग्रंथ लुप्त झाले आहेत परंतु त्यांची लॅटिन भाषांतरे मात्र उपलब्ध आहेत. तत्त्वज्ञानावरील त्याचे २४ ग्रंथ कैरो येथे १९५०–५३ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. अल्-किंदी हा इस्लामच्या आद्य धर्मशास्त्रवेत्त्यांपैकी एक असून अरबांचा तो आद्य तत्त्ववेत्ता मानला जातो.

फैजी, अ. अ. अ. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)