डुबडुबी :  या पक्ष्याचा समावेश पोडिसिपिडी पक्षिकुलात केलेला आहे. संस्कृत भाषेतील नाव वंजुल. इंग्रजी नाव लिटल ग्रीब किंवा डॅबचिक. याचे शास्त्रीय नाव पोडिसेप्स रूफिकॉलीस आहे. भारतातील पाणपक्ष्यांमध्ये हा सगळ्यांत लहान आहे.

 डुबडुबी साधारणपणे कबुतराएवढी, बसकट बांध्याची व गुबगुबीत असते. तिचा रंग भुरा असून पोटाकडचा भाग पांढरा  व मऊ असतो. तिला शेपूट नसते आणि चोच काळी, चपटी, आखूड व अणुकुचीदार असते. डोळे लाल तपकिरी आणि पाय काळसर हिरव्या रंगाचे असतात. विणीच्या हंगामात डोके व मान दाट तपकिरी व काळसर तांबूस होतात. पाठकडचा भाग किंचित फिक्कट असतो. नर व मादी दिसायला सारखीच असतात.

डुबडुबी

हा पक्षी भारतात सगळीकडे आढळतो, डोंगराळ भागात १,५२४ मी. पेक्षा जास्त उंचीवर तो दिसून येत नाही. पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश आणि ब्रह्मदेशातही तो आढळतो. सरोवरे, तलाव, खोल तळी आणि डबकी यांत तो राहतो. यांची जोडपी अथवा टोळकी असतात. हा उत्तम पोहणारा आणि पाण्यात बुड्या मारण्यात वाकबगार असल्यामुळे त्याला डुबडुबी हे नाव मिळाले असावे. पोहत असताना संकटाची यत्किंचितही शंका आल्याबरोबर तो क्षणार्धात पाण्यात बुडी मारून दिसेनासा होतो. याची शिकार करताना पुष्कळदा असा अनुभव येतो की, बंदुकीतून सुटलेली गोळी याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आताच तो पाण्याच्या पृष्ठाखाली गेलेला असतो. हा जमिनीवर केव्हाही येत नाही. याचे पंख जरी लहान असले, तरी तो वेगाने फार दूर उडत जाऊ शकतो.

पाणकिडे, भैकेर, बेडूक, झिंगे, लहान मासे इ. प्राण्यांवर हा उपजीविका करतो. पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करून तो त्याला पकडतो.

यांचा विणीचा हंगाम मेपासून सप्टेंबरपर्यंत असतो. तलावाच्या काठी अर्धवट पाण्यात असलेल्या गवताळ जमिनीवर किंवा लव्हाळ्यावर हा पक्षी पाणवनस्पतींचा ढीग करतो हेच याचे घरटे होय पुष्कळदा हे पाणवनस्पतींचे घरटे पाण्यावर तरंगणारेही असते. मादी ३–५ पांढऱ्या रंगाची अंडी घालते, पण भक्ष्य मिळविण्याकरिता जाताना ती पाणवनस्पतींनी अंडी झाकते, त्यामुळे अंड्यांना तपकिरी रंग येतो. अंड्यातून बाहेर पडल्यावर पिल्ले उपजत बुद्धीने पाण्यात पोहू लागतात.

कर्वे, ज. नी.