सूर्यपक्षि : याचा समावेश नेक्टॅरिनिइडी या पक्षिकुलात केलेला आहे. सूर्यपक्षाच्या ३– ४ जाती भारतात आढळतात यांपैकी नेक्टॅरिनिया एशियाटिका ही एक जाती सगळीकडे आढळते. हिमालयात सस.पासून १,५२५ मी. आणि द. भारतातील डोंगरात सस.पासून २,२८५ मी. उंचीपर्यंत ती आढळते. हा पक्षी बागा, राई, शेते, मळे व झुडूपांच्या जंगलांत राहतो. संस्कृत भाषेत नराला शिंजिर आणि मादीला शिंजिरिका म्हणतात.

सूर्यपक्षी (नेक्टॅरिनिया एशियाटिका) : नर व मादी.

सूर्यपक्षी अतिशय सुंदर असा छोटा पक्षी आहे. याची लांबी सु. १० सेंमी. असून चिमणीपेक्षाही तो लहान असतो. चोच लांब, वाकडी, अणकुचीदार व काळी असून पाय काळे असतात. विणीच्या हंगामात (उन्हाळ्यात) नराचे सबंध डोके, मान, संपूर्ण पाठ, गळा, छाती जांभळ्या रंगाची व त्यात हिरव्या, निळ्या छटा पंख तपकिरी काळे शेपटी निळसर काळी छातीवर एक तांबूस तपकिरी आडवा पट्टा (परंतु कधीकधी हा नसतो) पोटाकडची बाजू मंद जांभळट काळी प्रत्येक पंखाखाली किरमिजी व पिवळ्या पिसांचा एक झुपका असतो. विणीचा हंगाम नसताना (सप्टेंबर ते डिसेंबर) नराचा रंग मादीच्या रंगासारखा होतो परंतु हनुवटीपासून पोटापर्यंत जांभळ्या रंगाचा पट्टा असतो. मादीची वरची बाजू, पंख, डोके आणि मान हिरवट तपकिरी शेपटी गडद तपकिरी खालची बाजू पिवळी असते. (मराठी विश्वकोश, खंड ९ : चित्रपत्र ४६).

सूर्यपक्षाची जीभ लांब व बारीक नळीसारखी असून तिने तो सर्व प्रकारच्या फुलातील मध चोखतो. फूल फार मोठे असले तर फुलातील मधाच्या पेल्याच्या थोडे वर चोचीने भोक पाडून त्यातून तो मध चोखून घेतो. फुलांवर असलेले कीटक व कोळी देखील तो खातो.

सूर्यपक्षाचा आवाज कानाला गोड वाटतो. विणीच्या हंगामात एखाद्या ठिकाणी बसून नर आपले पंख खाली-वर करत गोड सुरात गात असतो. याचा प्रजोत्पादनाचा काळ मार्चपासून मेपर्यंत असतो. याचे ⇨ घरटे फार सुरेख असून मोठ्या कौशल्याने बनविलेले असते. जमिनीपासून सु. २ मी. उंचीवर ते एखाद्या वेलीला किंवा झुडूपाला टांगलेले असते. या लोंबत्या घरट्याला जाण्या-येण्याकरिता एका बाजूस वाटोळे भोक असून त्याच्यावर पोस्टाच्या पेटीसारखे झाकण असते. मादी २-३ पांढरी अंडी घालते त्यांवर करडे ठिपके असतात. घरटे बांधणे व अंडी उबविणे ही कामे मादी करते. पिलांना नर व मादी दोघेही भरवितात.

इतर जाती : सूर्यपक्षाच्या सु. ९५ जाती असून बहुतेक जातींतील नराचे रंग भडक व आकर्षक असतात.

जांभळ्या बुडाचा शिंजिर : याचे शास्त्रीय नाव ने. झेलोनिका आहे. हा पक्षी भारतात आढळतो. नराचे डोके, वरचा भाग व छाती चकचकीत (धातूसारखी) हिरवी, नारिंगी, किरमिजी आणि जांभळी या रंगांची असते. बूड निळसर जांभळे असते. खालचा भाग गर्द पिवळा असतो. मादी जांभळ्या शिंजिराप्रमाणे दिसते, परंतु हनुवटी व गळा राखट पांढरा आणि खालचा भाग गर्द पिवळा असतो.

स्प्लेनडीड सनबर्ड : ही आफ्रिकेत आढळणारी सूर्यपक्षाची जाती आहे. तिचे शास्त्रीय नाव सिनिरिस कॉसिगॅस्टर असे आहे. या पक्षाचे डोके जांभळे, पाठ हिरवी आणि पंख व शेपटी काळसर असते.

स्पायडर हंटर : ही सूर्यपक्षाची जाती दक्षिण-पूर्व आशियात आढळते. या पक्षाची चोच लांब व शेपटी आखूड असते.

कर्वे, ज. नी. पाटील, चंद्रकांत प.