ट्युआटारा : ट्युआटारा या स्थानिक नावाने ओळखला जाणारा सरड्यासारखा प्राणी. सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गातील लेपिडोसॉरिया उपवर्गाच्या ऱ्हिंकोसीफॅलिया गणातील सध्या जिवंत असलेला हा एकच प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव स्फेनोडॉन पंक्टेटस हे आहे. पूर्वी हा न्यूझीलंडमध्ये विपुल होता, पण हल्ली तो न्यूझीलंडच्या परिसरातील काही लहान बेटांवरच आढळतो. प्राणिशास्त्राच्या दृष्टीने यांना विशेष महत्त्व असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने यांना संरक्षण दिले आहे.

ट्युआटारा

पूर्ण वाढ झालेल्या ट्युआटाराची लांबी ४८–७६ सेंमी. आणि वजन १ किग्रॅ. पेक्षा थोडे आधिक असते. रंग तपकिरी हिरवट किंवा निळसर करडा असतो. धडावर आणि पायावर बारीक पांढरट किंवा पिवळसर ठिपके असतात खालच्या बाजूवरील ठिपके पिवळसर असतात. त्वचा सैल असते. पाय चार असून ते मजबूत असतात प्रत्येक पायावर पाच बोटे असून त्यांच्या टोकांवर नख्या असतात. हे संथपणे चालणारे असून पुढील पायांच्या नख्यांनी जमीन उकरू शकतात. शेपटी दोन्ही बाजूंनी दबलेली असते. सर्व शरीर लहान-मोठ्या खवल्यांनी झाकलेले असते. वरच्या पृष्ठाच्या मध्यावर डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत गेलेली कंटकांसारख्या मोठ्या खवल्यांची ओळ असते. मान आणि पाठ यांवरील कंटक पिवळे आणि शेपटीवरील जवळजवळ तपकिरी असतात. यांच्या डोळ्यांना निमेषक पटल अथवा तिसरी पापणी असते. दोन डोळ्यांशिवाय यांच्या डोक्यावर (पार्श्वास्थींवर) तिसरा लहान डोळा असतो, त्याला ‘तृतीय नेत्र’ म्हणतात.

ट्युआटारा प्रथम ट्रायासिक कल्पात (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) उत्पन्न झालेले असल्यामुळे अतिप्राचीन होत. सरड्यांशी यांचे बाह्यतः जरी साम्य दिसले, तरी अनेक संरचनात्मक लक्षणांच्या बाबतीत, विशेषतः कवटीच्या संरचनेच्या बाबतीत ते भिन्न असल्यामुळे त्यांचा लॅसर्टीलिया उपगणात समावेश करता येत नाही.

ट्युआटारा जमिनीत बीळ करून त्यात राहतो. बिळाच्या आतल्या टोकाला एक ऐसपैस कोष्ठ असून त्याला गवताचे अस्तर असते. पुष्कळदा पेट्रेल हे सागरी पक्षी त्यांच्या बिळात त्यांच्याबरोबर राहतात. दिवसा हा आपल्या बिळात झोपून राहतो व रात्री परिसराचे तापमान सु. ७° से. असताना भक्ष्य मिळविण्याकरिता बाहेर पडतो. इतर सरीसृपांच्या मानाने याच्या शरीराचे तापमान भोवतालच्या तापमानापेक्षा कमी असते. हे प्राणी मांसाहारी असून किडे, कृमी, डिंभ (अळ्या), गोगलगाई, पिकळ्या, बेडूक, लहान पक्षी व त्यांची पिल्ले ते खातात. माओरी लोक यांना पकडून खातात त्याचप्रमाणे हे प्राणी रानडुकरे, कुत्री व मांजरे यांचे भक्ष्य होत.

ट्युआटारा भांडकुदळ पण सुस्त प्राणी आहे. त्याला पाण्यात पडून राहणे आवडते. हिवाळ्यात तो शीतसुप्ती (हिवाळ्यातील गुंगी) घेतो. उन्हाळ्यात केव्हा तरी मादी वाळूत किंवा जमिनीत उथळ बीळ करून त्यात ८–१२ अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरट असून ती सु. ६–७ सेंमी. लांब असतात आणि त्यांचे कवच चिवट असते. अंडी घातल्यापासून सु. १२–१३ महिन्यांनी त्यातून पिल्ले बाहेर पडतात. पिल्लांची नंतरची वाढ हळूहळू होते. ट्युआटारांचा एकूण जीवनक्रमच मंद असतो. ट्युआटारा सु. ५० वर्षे जगतो.

मध्यजीव महाकल्पातील ट्रायासिक कल्पाच्या मध्य (सु. २१.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात ऱ्हिंकोसीफॅलिया या गणातील प्राण्यांचा उदय झाला. त्याच महाकल्पात त्यांतील बरेच लुप्त झाले. बव्हंशी ट्युआटारासारखे असणारे प्राणीच ट्रायासिक कल्पाच्या शेवटी म्हणजे सु. २० कोटी वर्षांमागे जिवंत होते. स्थितिरक्षक प्रवृत्ती आणि क्रमविकासाची (उत्क्रांतीची) अतिशय मंद गती यांमुळे हा गण सु. २० कोटी वर्षांत न बदलता आजही केवळ ट्युआटारांमुळे अस्तित्वात आहे. प्राचीनत्व, अल्पविकसितता आणि काही लुप्त सरीसृपांशी असलेले साम्य यांमुळे ट्युआटाराला प्राणिविज्ञानात अनन्यसाधारण महत्त्व असून त्याला ‘जिवंत जीवाश्म’ असे सार्थपणे म्हणतात (अतिप्राचीन काळापासून असलेली व अन्यथा केवळ जीवाश्माच्या म्हणजे शिळारूप अवशेषाच्या रूपातच आढळली असती अशी परंतु हल्ली जिंवत असलेली जाती म्हणजे जिवंत जीवाश्म होय).

परांजपे, स. य.