संगीत स्तंभ : संगीताचा नादध्वनी निर्माण करणारे पाषाणस्तंभ. हे दक्षिण भारतातील काही देवालयांमध्ये आढळतात. हे स्तंभ म्हणजे वास्तुकला व संगीत यांतील कला-कौशल्याचा आविष्कार घडविणारे चमत्कारच होत. लोहकणाश्मांनी (फेरस ग्रॅनाइट) बनलेले हे स्तंभ छताला आधार देण्याचे सर्वसाधारण स्तंभांचे उद्दिष्ट साध्य करतातच शिवाय त्यांतून संगीतसदृश ध्वनीही निर्माण होतात. प्रचंड आकाराच्या नाद-धर्मयुक्त, लोहकणमिश्रित पाषाणामधून हा स्तंभगुच्छ कोरून काढतात. टोकांना घनगोलक असलेल्या दोन छडयंनी हे स्तंभ वाजवितात. स्तंभांच्या परस्परविरूद्ध दिशांना समोरासमोर उभे राहून वादक या स्तंभांवर स्वतंत्र वादन करतात, किंवा धार्मिक संगीताच्या कार्यक्रमात साथसंगत करतात. त्यांवर ‘जती’ही (बोल) वाजविले जातात. या पाषाणस्तंभांतून निघणाऱ्या स्वरांची जात जलतरंगांच्या स्वरांच्या जाती-सारखी असते. हे संगीत-पाषाणस्तंभ वेगवेगळ्या मंदिरांतून कलात्मक आकारांमध्ये घडविलेले आढळतात. उदा., दंडगोलाकार, चौरस, अष्टकोनी, पन्हाळीयुक्त, पीळदार. संगीताचा वास्तुकलेशी कसा सुंदर मेळ साधता येतो, त्याचे हे निदर्शक आहे. ह्यातील एखादया स्तंभावर आघात केला, तर त्याच्या विरूद्ध दिशेच्या त्याच तारत्वाच्या स्तंभातून अनुकंपने निघत असल्याचे जाणवते आणि ती ऐकूही येतात. हंपी येथील पंपापती, चौडेश्वरी आणि विठ्ठल यांची देवालये तसेच लेपाक्षी, ताडपत्री, मदुराई, अळगरकोइल, अळवार तिरूनगरी, तिरूनेलवेली, कलक्काड, शुचींद्रम् आणि त्रिवेंद्रम येथील देवालयांमध्ये संगीतध्वनी निर्माण करणाऱ्या पाषाण-स्तंभांचे उत्कृष्ट नमुने विद्यमान आहेत. या संगीतमय पाषाणस्तंभांची उंची साधारणत: १.२ मी. पासून २.१ मी. पर्यंत आहे. या स्तंभांतून निघणारे स्वर शंकराभरण (बिलावल), हरिकांबोजी (खमाज), करहरप्रिया (काफी) यांतील एखादया रागस्वरावलीशी साम्य दर्शवितात.

दिंडिगळनजिक ताडीकोंबु येथील सौंदर वल्ली तायार देवतेच्या समोरील मंडपाच्या कोपऱ्यात तीन संगीत-पाषाणस्तंभ आहेत. त्यांतून ‘उदात्त, अनुदात्त स्वरित’ या वैदिक ऋचांची अचूक स्वरावली निर्माण होते, असे मत आहे .येथील स्तंभांतून बाहेर पडणाऱ्या संगीताच्या साथसंगतीने वैदिक स्तोत्रांचे पठन होत असे.

तंजावर जिल्ह्यातील कुंभकोणम्जवळच्या दारासुरम् येथील देवालयात जे बलिपीठ आहे, त्याच्या पायऱ्यांतून संगीताचे स्वर निघतात. तसेच आंध्र प्रदेशातील सिंहाचलम् येथील देवालयात जे स्तंभ आहेत, त्यांच्या शिरोभागी असलेल्या पाषाणमय वेलपत्तीमधूनही स्वर ऐकू येतात.

सांबमूर्ति, पी. (इं.) मंगरूळकर, अरविंद (म.)