याक : या प्राण्याचे शास्त्रीय नाव बॉस ग्रुनिएन्स हे असून याचा समावेश बोव्हीडी या कुलातील समखुरी सस्तन प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला या गणात होतो. रानटी स्थितीत हा प्राणी लडाख, सिक्कीम, तिबेटचे पठार आणि चीनच्या कान्सू प्रांताचा काही भाग यांत प्रामुख्याने आढळतो. भारताच्या प्रदेशात लडाखच्या चांगचेन्मो खोऱ्यात, जम्मू व काश्मीरमध्ये पश्चिमेस सतलज नदीच्या खोऱ्यात, हिमाचल प्रदेशात पूर्वेस कुमाऊँच्या खिंडीत आणि सिक्कीममध्ये यांची वस्ती आहे. या डोंगराळ प्रदेशाची उंची सु. २,५०० मी. इतकी आहे. १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे भारतात यांची संख्या सु. २४,००० होती. यांच्यापासून निर्माण झालेल्या संकरित प्राण्यांची संख्या याच्या दुप्पट होती.

पूर्ण वाढ झालेला नर खांद्याजवळ १·७ मी. कधीकधी १·८५ मी. पर्यंत उंच असतो पण माद्या व माणसाळविलेले याक यापेक्षा कमी उंच असतात. नराचे वजन १८० ते ८०० किग्रॅ. (सरासरी ५५० किग्रॅ.) असते. नराची शिंगे वक्र असून सरासरी ९० सेंमी. लांब असतात. मादीची शिंगे आखूड व बारीक असतात. शिंगे फाकलेली असतात. याचा बांधा जाडजूड असून मान पुढे वाकलेली असते. हा डोके खाली करून उभा राहतो. याला वशिंड असते पण पाठ सरळ असते. याचे पाय आखूड पण दणकट असतात. याचे केस काळे, लहान व राठ असून ते खांदे, छाती व मांड्या व अर्धे शेपूट यांवर असतात. याच्या कपाळावर दोन्ही शिंगांत राठ केसांचा झुपका असतो. शेपटीवरील केस लांब असतात. केसांमुळे त्यांना ऊब मिळते. वसंत ऋतूत त्यांचे केस कातडीवरून गळले, तरी खाली पडत नाहीत ते इतर अवयवांवर गुंतून अडकून राहतात. याक दोन तीन महिन्यांचा होईपर्यंत त्याच्या अंगावर लांब केस येत नाहीत.

 याकचा रंग काळा-तपकिरी असून तोंडाचा भाग पांढुरका असतो. पाळीव याकच्या छातीवर व शेपटीवर मधूनमधून पांढरे ठिपके असतात. पाळीव आणि रानटी याक यांच्यातला फरक सहजासहजी लक्षात येत नाही. याक हा गाईबैलांचा जवळचा नातेवाईक आहे. हा गवत खातो व गाईबैलांप्रमाणे रवंथ करतो. ते लहान झुडपांची कोवळी पानेही खातात. चरण्याकरिता हिवाळ्यात ते २,००० ते ३,००० मी. उंचीवर, उन्हाळ्यात ५,००० मी. उंचीवरही जातात. गवतावर बर्फ पडले, तर मुस्कटाने बर्फ बाजूला करून त्याखालील गवत खातात. पाणी दुर्मिळ झाले, तर बर्फ खाऊन ते आपली तहान भागवितात. जमिनीवरील खारट मातीही हे खातात. थंडीत अन्न न मिळाल्यामुळे बरेच याक मृत्युमुखी पडतात. यांना चांगले पोहता येते. वाहत्या पाण्यात डुंबणे यांना फार आवडते.

 रानटी याक कळप करून राहतात. माद्या, तरुण नर व वासरे यांचा एक कळप असतो व त्यात शंभरावर प्राणी असतात. प्रौढ नरांचा निराळा कळप असतो. मोठे कळप करून राहिल्यामुळे त्यांना लांडग्यासारख्या शत्रूपासून स्वतःचे रक्षण करता येते. शिंगे हे यांचे स्वसंरक्षणाचे साधन आहे. यांचे घ्राणेंद्रिय फार तीक्ष्ण असते. धोक्याचा संशय आला की, सर्व कळप वेगाने पळून जातो.

पावसाळा संपल्यानंतर हे माजावर येतात. समागमाचा काल डिसेंबराच्या सुमारास असतो. गर्भधारणेचा काल ९ महिने आहे. ऑगस्टच्या सुमारास मादी एका वासरास जन्म देते. ते एक वर्षाचे होईपर्यंत आईबरोबर हिंडते. हे रानटी प्राणी कित्येक शतकांपूर्वी माणसाळविले गेले आहेत. यांच्यापासून संकरित जाती निर्माण केल्या गेल्या आहेत.

हिमालयाच्या डोंगराळ प्रदेशात ओझे वाहण्याकरिता यांचा उपयोग केला जातो व अजूनही प्रवासाचे साधन म्हणून याकचे महत्त्व कमी झालेले नाही. पाठीवर एक क्विंटल ओझे घेऊन ताशी दोन ते तीन किमी. गतीने दिवसभरात २० किमी. अंतर हा सहज चालून जातो. याचे ताजे दूध पिण्यासाठी व लोणी किंवा दुधाची भुकटी करण्यासाठी वापरले जाते. या दुधात अंदाजे १२% स्निग्धांश असतो. याचे मांस खाण्यास रुचकर असते. याचे केस खरबरीत व लांब असतात यामुळे थंडीपासून याचे संरक्षण होते. मऊ, बारीक केस पश्मिना शाली, ट्‌वीड कापड किंवा ब्लँकेटे करण्यास वापरले जातात. यामुळे या उबदार कापडास चकाकी येते. याकच्या झुपक्यासारख्या शेपटीची चौरी बनवितात. कातडीचा उपयोग जोडे, अंगरखे, जाकिटे वगैरे बनविण्याकरिता केला जातो.

 याक हे जनावर संकरित जाती निर्माण करण्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. स्पिती व प्यांगी या हिमाचल प्रदेशातील पठारावर संकरित जातींची पैदास करण्याकरिता याकचे कळप पाळले आहेत. संकरित जाती निरनिराळ्या नावांनी ओळखल्या जातात. यांपैकी जीबू, झोमो, गारजो, डीमजो, गारमो, गार, टॉल्मो, टॉल, ज्वाम-जीबू, झो व झुम ही काही नावे होत. झो या जातीला शिंगे असतात, तर झुमला तो नसतात.

 डोंगरी गाय व याक नर यांच्या संकरास कुमाऊँ टेकड्यांत जीबू म्हणतात आणि लडाखमध्ये झोम म्हणतात. जीबू मादी दिवसास तीन किग्रॅ. दूध देते. जीबू पुष्कळ वजन वाहून नेतात आणि थंड व उष्ण हवेस प्रतिकार करण्याची त्यांची शक्ती जास्त असते. जीबूचे याक नराशी जास्त साम्य असते. या संकरापासून होणाऱ्या नरास नर जीबू किंवा झो म्हणतात. हा वंध्य (वांझोटा) असतो व शेतकामास जास्त उपयोगी पडतो. जीबू मादी व डोंगरी बैल यांच्या संकरास ज्वाम, टॉल किंवा टॉल्मो म्हणतात. टॉल्मो मादी गाईसारखी तर नर बैलासारखा पण आकाराने मोठा असतो. जीबू मादी व याक नर यांच्या संकरास कुमाऊँ टेकड्यांत डीमजो व लडाखमध्ये गारमो किंवा गार म्हणतात. गारमो मादी दररोज एक किग्रॅ. दूध देते. गारमो नर वंध्य असतो व याकसारखा दिसतो. ओझे वाहण्यास याचा उपयोग होतो.

याक मादी व डोंगरी बैल यांच्या संकरास गारजो म्हणतात. सर्व संकरित जनावरांत जीबू किंवा झोम हाच जास्त उपयुक्त प्राणी आहे.

 कॅनडात याक मादी व रेडा यांचा संकर करून झालेल्या प्राण्यास याकेल हे नाव देण्यात आले आहे.

 रानटी याकची संख्या दिवसेंदिवस घटत आहे व यांना कायद्याने संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.

संदर्भ: 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI. Supplement to Investock including Poultry, New Delhi, 1970.

            2. Prater, S. H. The Book of Indian Animals, Bombay, 1965.

इनामदार, ना. भा. कानिटकर, बा. मो.