मोआमोआ : निर्वंश झालेला व उडता न येणारा हा मोठा पक्षी मूळचा न्यूझीलंडमधील असून एके काळी तेथे तो मोठ्या प्रमाणावर आढळत असे. त्याचा समावेश डायनॉर्निथिफॉर्मिस गणात होतो. त्याच्या १३–२५ जाती असाव्यात, असा अंदाज आहे. मोआ हे नाव न्यूझीलंडमधील मूळच्या रहिवासी असलेल्या माओरी लोकांनी कोंबडी या अर्थाच्या शब्दावरून या पक्ष्याला दिलेले आहे. या लोकांनी मांसासाठी त्याची बेसुमार शिकार केल्यामुळे तो निर्वंश झाला. सु. पाच ते सात शतकांपूर्वी तो निर्वंश झाला असावा असा अंदाज आहे. दलदल, गुहा इत्यादींमध्ये सापडलेली त्याची हाडे, पिसे, अंडी, डोके व पाय यांच्या शुष्क अवशेषांवरून मोव्याची माहिती मिळाली आहे. हे अवशेष प्लायोसीन (सु. १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळातील आहेत. सर्वांत मोठ्या जातीचा (डायनॉर्निस रोबस्टस) मोआ शहामृगापेक्षा मोठा (उंची ३ मी.) होता, तर सगळ्यांत लहान जातीचा पक्षी टर्की पक्ष्याएवढा होता. मोआ उत्तम धावणारा असून त्याची कोंडी केल्यास तो लाथा मारून प्रतिकार करीत असावा. तो शाकाहारी असून झाडपाला खाऊन, तसेच चरून आपला उदरनिर्वाह करीत असावा, कारण हाडे व इतर अवशेषांवरून तो फळे, बिया, पाने व गवत खात असे, हे अनुमान करता येते. ह्याचे १८ सेंमी. व्यासाचे व २५ सेंमी. लांब एवढे मोठे अंडे जमिनीतील खळग्यात आढळले आहे. संशोधनावरून असे दिसते की, ज्या पक्ष्यांच्या अंगी उड्डाणक्षमता मुळीच नव्हती अशा पक्ष्यांतले मोआ हे मागे राहिलेले आद्य पक्षी होत. उरोस्थीची (छातीच्या हाडाची) आकृती व पिसांची आद्य संरचना यांवरून वरील तर्काला पुष्टी मिळते. ⇨ किवी या पक्ष्याशी त्याचा निकटचा संबंध असावा. 

माओरी लोक मांसासाठी त्याची शिकार करीत व त्याच्या हाडांपासून भाल्याचे फाळ, आकडे व दागिने बनवित, तसेच त्यांच्या अंड्याच्या कवचापासून पाणी साठविण्यासाठी भांडी बनवीत.

पहा : पक्षि वर्ग.

कर्वे, ज. नी.