एल्क : हा सस्तन प्राणी आर्टिओडॅक्टिला गणातील मृगकुलातला आहे. याचे एल्क हे नाव यूरोपात प्रचारात आहे पण अमेरिकेत याला मूस म्हणतात. उत्तर अमेरिका, नॉर्वे, स्वीडन, रशिया इ. प्रदेशांत हा आढळतो. वाळुंज (विलो) आणि बहान (पॉप्लर) या झाडांचे दाट व दमट जंगल हे याचे रहाण्याचे ठिकाण होय. मृगकुलातला हा सगळ्यांत मोठा प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव ॲल्सेसॲल्सेस  असे आहे.

एल्क

शरीर डोक्यासकट ५ मी. लांब शेपटी ५० ते ७५ मिमी. लांब खांद्यापाशी उंची सु. २ मी वजन ८२५ किग्रॅ. पर्यंत असते उन्हाळ्यात वरचा रंग काळा किंवा गर्द अथवा तांबूस तपकिरी खालची बाजू व पायांचा खालचा भाग फिक्कट. हिवाळ्यात शरीराचा रंग करडा असतो. रुंद, मांसल मुसकट मोठी अवजड मृगशृंगे (भरीव, शाखायुक्त व वर्षातून एकदा गळून नवीन येणारी शिंगे) भरदार आयाळ आणि गळ्यापासून खाली लोंबत असलेला कातडीचा झोळ या विशेष लक्षणांमुळे हा भव्य प्राणी सहज ओळखता येतो. याची दृष्टी जरी मंद असली तरी घ्राणेंद्रिय व कर्णेंद्रिय तीक्ष्ण असतात. पाय लांब असून तो ताशी २५ – ३५ किमी. वेगाने धावू शकतो. तो झाडाझुडपांची पाने आणि पाणवनस्पती खातो.

प्रजोत्पादनाचा काळ सप्‍टेंबर किंवा ऑक्टोबर असतो. या काळात मादीवरून नरांच्या झुंजी होतात आणि त्यावेळी ते आपल्या अवाढव्य मृगशृंगांचा व खुरांचा सर्रास उपयोग करतात. मादीला दर खेपेस १–३ पिल्ले (सामान्यत: दोन) होतात. ती दोन वर्षांची होईपर्यंत मादी त्यांना आपल्याबरोबर वागविते.

या प्राण्यांची बेसुमार हत्या झाल्यामुळे त्यांची संख्या फारच घटली होती. सुदैवाने या प्राण्यांचा नाश होऊ नये असे लोकांना वाटू लागले आणि त्यांची शिकार करण्यास कायद्याने बंदी घातली गेल्यामुळे ती पुन्हा वाढू लागली आहे.

भट, नलिनी