डायनोसॉर : डायनोसॉर हे मध्यजीव महाकल्पामध्ये (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळामध्ये) अस्तित्वात असलेले पृष्ठवंशी सरीसृप (पाठीचा कणा असलेले सरपटणारे) प्राणी होत. हे प्राणी मध्यजीव महाकल्पात उदयाला आले. त्या महाकल्पात त्यांचा विकास व प्रसार झाला व त्याच महाकल्पाच्या शेवटी ते निर्वंश झाले. डायनोसॉर या (ग्रीक) शब्दाचा अर्थ भयंकर सरडा असा असून हे नाव सुरुवातीला सापडलेल्या त्यांच्या मोठाल्या सांगाड्यांवरून देण्यात आले. आजपर्यंत जगात निर्माण झालेल्या प्राण्यांत बरेचसे डायनोसॉर सर्वांत मोठे होते म्हणून त्यांना हे नाव देण्यात आले. मात्र सर्वच डायनोसॉर अगदी मोठे होते असे नाही, त्यांच्यापैकी काही कोंबडीच्या पिलाएवढे लहानही होते. ते विविध प्रकारच्या परिसरांमध्ये राहू शकत. हल्ली सरीसृपांच्या आर्कोसॉरिया या महागणात डायनोसॉरांचा समावेश करतात. रेप्टिलिया या मुख्य वर्गाचा डायॉप्सिडा हा उपवर्ग असून डायॉप्सिडातील आर्कोसॉरिया हा महागण आहे. डायनोसॉरांचे सॉरिशिया व ऑर्निथिशिया हे दोन गण आर्कोसॉरिया महागणात येतात.काहींच्या मते डायनोसॉरांची उत्पत्ती पुढीलप्रमाणे झाली. उत्तर कार्‌बॉनिफेरस (सु. ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात अस्तित्वात असणाऱ्या लॅबिरिंथोडोंट या उभयचराचा (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्याचा) क्रमविकास (उत्क्रांती) होऊन कॉटिलासॉर हा सरीसृप प्राण्यांचा मूळ पूर्वज निर्माण झाला. त्यापासून पुढे कासवे, सस्तन सरीसृप व थेकोडोंट निर्माण झाले. थीकोडोंटांपासून डायनोसॉर निर्माण झाले. अगदी नमुनेदार थीकोडोंट म्हणजे ओर्निथोसूचस हा होय. तो आकारमानाने लहान होता. त्याची लांबी एक ते सव्वा मीटर इतकीच होती. त्याचे मागचे दोन पाय लांब, मांसल व मजबूत आणि पुढचे दोन पाय आखूड व लहान होते आणि त्यास शेपटी होती, हे त्याचे वैशिष्ट्य होते. ओर्निथोसूचसाच्या देहाची सर्वसाधारण ठेवण व शरीररचना यांची छाप डायनोसॉरांच्या देहामध्ये अगदी स्पष्ट दिसते. यामुळे थेकोडोंट हे डायनोसॉरांचे पूर्वज आहेत असे समजतात. मूळचे आर्कोसॉर व इतर सरीसृप प्राणी यांच्यापासून डायनोसॉरांना वेगळे ओळखण्याचा मार्ग म्हणजे डायनोसॉरांचे पाय सरळ उभे होते त्यामुळे त्यांचे देह जमिनीपासून वर उचललेले असत. शिवाय सुसरींपेक्षा किंवा सरड्यांपेक्षा त्यांची पावले लांब लांब अंतरावर पडत असत.सॉरिशिया व ऑर्निथिशिया या दोन्ही गणांत द्विपाद व चतुष्पाद प्राणी होते. द्विपादांचे मागचे पाय लांब, भरीव, मजबूत व पुढचे पाय हातांसारखे आखूड असत. त्यांचे शेपूट लांब व जड असल्यामुळे श्रोणी-अस्थींच्या (सांगाड्यातील ज्या भागाशी मागचे पाय सांधलेले असतात त्या भागातील हाडांच्या) टेकूवर हे प्राणी आपल्या देहाचा पुढचा भाग तोलून धरू शकत. त्यांच्या श्रोणी-अस्थी व पाठीचा कणा हे घट्टपणे जोडलेले असत. चतुष्पाद डायनोसॉर मोठ्या व जड देहांचे होते आणि त्यांचे सर्वच पाय आखूड पण भरीव असत. पुढचे पाय जवळजवळ मागच्या पायांइतकेच मजबूत असत.सॉरिशिया व ऑर्निथिशिया या दोन गणांतील डायनोसॉरांतील फरक त्यांच्या श्रोणी-अस्थींच्या रचनेवरून केला जातो. सॉरिशिया या शब्दाचा अर्थ सरीसृप श्रोणी असा आहे. ऑर्निथिशिया याचा अर्थ पक्ष्याची श्रोणी असा असून या गणातील डायनोसॉरांच्या श्रोणी-अस्थी पक्ष्यांच्या श्रोणी-अस्थींप्रमाणे जोडलेल्या असत. या रचनेत जघनास्थी (जांघेतील हाडे) आसनास्थीच्या मागच्या बाजूस समांतर असते व जघनास्थीचा पुढचा भाग लांबट झालेला असतो. त्यांच्यातील फरक इतरही काही बाबतींत दिसून येतो. सॉरीशियनांचे दात इतर सरीसृपांप्रमाणे साध्या रचनेचे, अणकुचीदार व तीक्ष्ण असत आणि हे दात जबड्याच्या कडेने संपूर्ण जबडाभर असत. ऑर्निथिशियनांना पुढचे दात नसत, त्याऐवजी त्यांना पक्ष्यासारखी चोच असे. तसेच त्यांचे गालांच्या बाजूचे दात पानाच्या आकाराचे असत. बहुसंख्य सॉरिशियन मांसाहारी होते, तर सर्व ऑर्निथिशियन शाकाहारी होते.सॉरिशिया : शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारचे डायनोसॉर या गणात होते. द्विपाद सॉरिशियनांचे पाय पक्ष्यांच्या पायांसारखे असत. पायाचे पहिले बोट मागच्या बाजूस वळलेले व टाचेसारखे आधारक असे. तीन बोटे पुढच्या दिशेत असत व त्यांना पाचवे बोट नसे. पायांची सर्व बोटे मिळून तीक्ष्ण अशी नखी तयार होई. या द्विपादांना ‘थेरोपोडा’ हे ‘पशुंचे पाय असलेले’ या अर्थाचे अयोग्य असे नाव देतात. बहुतेक थेरोपॉड मांसाहारी असत. त्यांच्या जबड्याच्या कडेने तीक्ष्ण, अणकुचीदार व मजबूत, घट्ट बसलेले चाकूसारखे दाट असत. कित्येकदा दातांची टोके करवतीसारखी दंतुर असत.सर्वांत मोठे, भव्य, अजस्त्र असणारे डायनोसॉर हे चतुष्पाद सॉरिशियन होते. त्यांचे देह आणि पाय हत्तीसारखे होते. त्यांना लांब, सडपातळ, निमुळती मान व चाबकासारखे शेपूट असे. त्यांच्या केवळ मधल्या बोटाचीच नखी झालेली असे. हे प्राणीदेखील सॉरोपोडा या ‘सरड्यांसारखे किंवा सरीसृपांसारखे पाय असणारे’ या अर्थाच्या अयोग्य नावाने ओळखले जातात. ट्रायासिक कालीन (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) प्रोसॉरोपोडा या मुळ प्रकाराबरोबर सॉरोपोडा मिळून सॉरोपोडोमॉर्फा हा उपगण तयार होतो.थेरोपोडा : उत्तर ट्रायासिक काळात दोन प्रकारचे थेरोपॉड आढळतात. (१) सील्युरोसॉरिया : हे प्राणी लांब मानेचे व हलक्या देहाचे होते. (२) कार्नोसॉरिया : हे आखूड मानेचे व लांबट डोक्याचे होते.सील्युरोसॉरिया : उत्तर ट्रायासिक ते उत्तर क्रिटेशस (सु. २० ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील मोठ्या थरांत या सापेक्षतः लहान आकारमानाच्या द्विपाद प्राण्यांची माला आढळली आहे. अगदी सुरुवातीला सापडलेल्या या प्राण्यांपैकी सर्वांत सुपरिचित म्हणजे सीलोफिसिस हा होय. याच्या शरीराचे संपूर्ण व अखंड असे कित्येक सांगाडे उत्तर अमेरिकेत व न्यू मेक्सिकोच्या उत्तर भागात उत्तर ट्रायासिक कालीन खडकांत सापडले आहेत. हा २·५ मी. लांब, कमी वजनाचा आणि चपळ होता. त्याची कवटी लांब, अरुंद व टोकदार होती व मान सापेक्षतः लांब होती. त्याला तीन लांब बोटे असणारे आखूड हात असत व लांब, सडपातळ परंतु मजबूत असे पाय असत. यामुळे तो पळू शकत असे. हा चपळ प्राणी भूपृष्ठावर वावरत असे. या प्रकारातील काँप्सॉग्नॅथस हा लहान आकारमानाचा म्हणजे कोंबडीच्या पिलाएवढा होता. तो बव्हेरियामध्ये उत्तर जुरासिक (सु. १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात तडागांच्या किनाऱ्यावर राहात होता. यातील आणखी एक प्रकार हा अधिक कुतुहलाचा असून त्याच्या शरीराची काही रचना भिन्न होती. या प्रकारचे प्रतीक म्हणजे स्ट्रुथिओमायमस हा होय. तो ४ मी. लांबीचा होता. त्याच्या शरीराची सामान्य रचना बरीचशी इतर द्विपाद डायनोसॉरांसारखी होती. आकर्षक देहयष्टी, हालचाल द्विपाद पद्धतीने, लांब निमूळती शेपटी, मात्र त्याची मान लांब व वक्र होती, डोके लहान होते. त्याचा जबडा चोचीसारखा होता व त्यात दात नव्हते. या प्रकारच्या प्राण्यांना सर्वसामान्यपणे ‘ऑस्ट्रिच (शहामृग) डायनोसॉर’ हे नाव देतात. स्ट्रुथिओमायमस कीटक, फळे आणि कदाचित इतर डायनोसॉरांची अंडी खाऊन राहत असत. त्यांना भक्ष्यावर झडप घालून अगदी वेगाने पळता येत होते. याला ऑर्निथोमायमस असेही म्हणतात. तो क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात अस्तित्वात होता. 


कार्नोसॉरिया : स्कॉटलंडमधील ऑर्निथोसूचस या डायनोसॉराबरोबर उत्तर ट्रायासिक काळात मोठे व हिंस्र परभक्षी असे कार्नोसॉर नावाचे थेरोपॉड अस्तित्वात होते. कार्नोसॉर व सील्युरोसॉर यांतील मुख्य भेद म्हणजे कार्नोसॉरांच्या कवट्या मोठ्या व मजबूत होत्या, माना आखूड आणि पुढचे पाय म्हणजे हात अगदी आखूड होते. त्यांचे मागचे पाय त्यांचे वजन तोलून धरण्यासाठी अधिक भरीव व जाड होते. ऑर्निथोसूचस ४ मी. लांबीचा होता. त्याच्या हाताला पाच बोटे असत. युरोपातील जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी 

उत्तर जुरासिकमधील ॲल्लोसॉरस

वर्षांपूर्वीच्या) काळातील मेगॅलोसॉरस व इतर वंशांचे प्राणी ३ ते ७ मी. लांबीचे होते, परंतु त्यांची पूर्ण माहिती नाही. उत्तर जुरासिक काळात  उत्तर अमेरिकेत सापडलेला ॲल्लोसॉरस (आ. १) हा जवळजवळ ११ मी. लांबीचा होता आणि त्याला फक्त तीनच बोटे होती. अमेरिकेतील जुरासिक कालीन सेरॅटोसॉरस हा ॲल्लोसॉरसच्या निम्म्या आकारमानाचा होता. त्याच्या नाकावर एक शिंग (टोकदार उंचवटा) होते. क्रिटेशस काळातील सुरुवातीचे काही प्राणी ईजिप्तमधील स्पायनोसॉरसाप्रमाणे होते. या प्राण्यांच्या पाठीवर वरपासून खालच्या भागापर्यंत लांब, कशेरुकी कंटक (मणक्यांवरील काट्यांसारख्या संरचना) असत. थेरोपॉडांपैकी सर्वांत मोठा डायनोसॉर टायरॅनोसॉरस (आ. २) हा होता. त्याची कवटी १·५ मी. लांब आणि नाकापासून शेपटीपर्यंतचा देह १६ मी. लांब होता. तो सु. ६·५ मी. उंच होता. त्याचा देह भरदार असून शेपूट लांब व जड होते. मागचे पाय अगदी मांसल, भरीव व मजबूत असून

टायरॅनोसॉरस.

तळपायावर मोठाल्या नख्यांचे आवरण होते. याउलट त्याचे पुढचे पाय म्हणजे हात अगदी लहान व आखूड होते, हातावरील बोटांची संख्या कमी होती. प्रत्येक हाताला फक्त दोनच नख्या होत्या. त्याचा जबडा मोठा व मजबूत असून त्यात मोठाले दात होते. मजबूत जबडा व दात आणि पंजासारखे मागचे पाय यांच्या साहाय्याने हे हिंस्र मांसाहारी प्राणी आपले भक्ष्य असणाऱ्या इतर प्राण्यांना ठार मारीत व त्यांची चिरफाड करीत. तसेच हेच अवयव त्यांचे संरक्षणही करीत.सॉरोपोडोमॉर्फा : लांब, भरीव व मजबूत पाय असलेले चतुष्पाद सॉरिशियन प्राणी ट्रायासिक (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात थेरोपॉडांच्या पूर्वी उदयाला आले होते.प्रोसॉरोपोडा : या प्रकारातील प्राणी शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारचे असावेत असे वाटते परंतु प्रोसॉरोपोडांच्या सांगाड्यात मांसाचे तुकडे करणारे तीक्ष्ण दात बहुतेक ठिकाणी सापडले नाहीत. प्लॅटिओसॉरसाचे व इतर चांगल्यापैकी माहीत असलेल्या उत्तर ट्रायासिक कालीन प्रोसॉरोपोडांचे दात चपटे व बोथट होते. हे प्राणी बहुधा शाकाहारी असावेत व ते कधीकधी दोन पायांवरही चालत असावेत. यामुळे काही वेळा त्यांना थेरोपॉडांच्या वर्गात घालण्यात येते. मात्र त्यांचे बोथट दात, पुढचे पाय सापेक्षतः लांब, पुढच्या पायाच्या पहिल्या बोटावरील मोठ्या नख्या, त्यांच्या श्रोणी-अस्थींचा आकार, घोट्याची रचना, मागच्या पायाच्या पहिल्या बोटाचे स्थान इत्यादींवरून ते नंतरच्या फक्त चतुष्पाद असणाऱ्या सॉरोपोडांशीच अधिक संबंधित होते, असे दिसते. उत्तर ट्रायासिक खडकात जर्मनीत सापडलेला प्लॅटिओसॉरस हा ६ मी. लांबीचा होता. चीनमधील ल्युफेंगासॉरस हा त्याच्यासारखा होता. यांच्यापेक्षा लहान असलेला अँचिसॉरस हा उत्तर अमेरिकेत समकालीन होता. मांसाहारी प्रोसॉरोपोडांमध्ये कदाचित यूरोपातील पॅलिओसॉरस, आफ्रिकेतील ग्रायपोनिक्स व चीनमधील सिनोसॉरस हे प्राणीदेखील येतात.सॉरोपोडा : आजपर्यंतच्या चतुष्पाद प्राण्यांत सॉरोपोडा या उपगणातील उभयचर डायनोसॉर सर्वात मोठे होते. मात्र द्विपाद डायनोसॉरांच्या मानाने सॉरोपोडांचे प्रकार कमी होते. जुरासिक काळात हे प्राणी मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होते. या काळातील खडकांत अमेरिकेतील वायोमिंग व उटा या राज्यांत आणि पूर्व आफ्रिकेत त्यांचे कित्येक उत्कृष्ट नमुने सापडले आहेत. क्रिटेशस काळात ते काही ठराविक भागात व अल्प प्रमाणात अस्तित्वात होते. सॉरोपोडांची मान लांब व कवटी सापेक्षतः लहान असे. मोठ्या देहाचा भार तोलून धरण्यासाठी त्यांच्या पायांच्या अस्थी भरीव व खांबासारख्या आणि पुढचे पाय लांबट आणि मोठे झालेले होते. ब्रॅकिओसॉराचे पुढचे पाय तर मागच्या पायांपेक्षा लांब होते. त्यांचे जास्त वजन काही प्रमाणात समतोल करण्यासाठी त्यांच्या कशेरुकांमध्ये (मणक्यांमध्ये) फक्त दाब पडणाऱ्या भागातच हाडे तयार झालेली होती. ज्याप्रमाणे पक्ष्यांच्या पंखांच्या हाडांमध्ये हवेने भरलेल्या पोकळ्या असतात, त्याप्रमाणे सॉरोपोडांच्या कशेरुक-कायातील काही पोकळ्या या हवेच्या पिशव्या असणे शक्य आहे. 


सॉरोपोडांपैकी सर्वांत मोठा प्राणी उत्तर जुरासिक व पूर्व क्रिठेशस कालीन खडकांत पूर्व आफ्रिकेत टेंडागुरू येथे व उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागातील मॉरिसन शैलसमूहात सापडला. त्याचे नाव ब्रॅकिओसॉरस (आ. ३) असून त्याच्या देहयष्टीची मापे अगदी अजस्त्र आहेत. बर्लिन विद्यापीठाच्या संग्रहालयामध्ये या 

ब्रॅकिओसॉरस

प्राण्याचा सांगाडा आहे. त्याची लांबी सु. २७ मी., मान ६ मी., एकूण उंची सु. १४ मी., देहाचा घेर ३ मी.हून अधिक आहे. जिवंतपणी या प्राण्याचे वजन ५० टनांपर्यंत असावे. या ब्रॅकिओसॉरसाच्या हाडांपेक्षा अधिक जड व लांब अशी इतर ब्रॅकिओसॉरसांची हाडेही सापडली आहेत. त्याचे पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा लांब होते, देह पुढच्या बाजूकडून मागच्या बाजूकडे कललेला व निमुळता होता. त्याचे शेपूट थोडे आखूड होते मात्र मान अधिक लांब आणि जड होती. डोके लहान होते. नाकपुड्या डोक्यावरील एका घुमटाकर उंचवट्यावर होत्या. या शरीररचनेवरून तो खोल पाण्यात राहत असावा असे दिसते. तो इतका उंच होता की, त्याने उभे राहून मान सरळ वर उंच केली, तर काहीही आयास न करता त्याला तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून आतले सर्व पाहता आले असते.अजस्त्र सॉरोपोडांपैकी सर्वात अधिक परिचयाचा म्हणजे ब्राँटोसॉरस (अपेटोसॉरस, आ. ४) हा होय. ब्राँटोसॉरस व डिप्लोडोकस या दोन डायनोसॉरांचे पुनर्रचित सांगाडे कित्येक संग्रहालयांत आहेत. डिप्लोडोकस सु. २९ मी. लांबीचा पण सडपातळ होता. ब्राँटोसॉरस त्याच्यापेक्षा थोड्या कमी लांबीचा पण अधिक जाड होता. त्याचे वजन ३५ टनांपर्यंत असावे. तो नाकाच्या शेंड्यापासून शेपटाच्या टोकापर्यंत सु. २६ मी. लांब होता. मान बरीच लांब होती मात्र शेपूट मानेपेक्षा लांब होते. देह भरदार होता. पाय, विशेषकरून मागचे पाय, फार जाड आणि मजबूत होते. या भव्य देहावर विसंगत असे अगदी लहान डोके होते. शरीररचनेची ही वैशिष्ट्ये या प्रकारातील सर्वच प्राण्यांत होती. तसेच लहान डोके, आखूड व अशक्त जबडे,

ब्राँटोसॉरसकमी व दुर्बल दात यांमुळे हे प्राणी पाण्यातील मऊ वनस्पती खाऊन उदरनिर्वाह करीत होते, असे दिसते. त्यांचा मेंदू लहान होता. डोळे व नाकपुड्या कवटीच्या वरच्या टोकाकडे उंचावर होत्या. अशा प्रकारच्या शरीररचनेमुळे हे प्राणी डोके उंचावर पाण्याबाहेर ठेवून, बाकीचा देह पाण्यात बुडला असताना, सहज श्वासोच्छ्‌वास करू शकत आणि डोळे उघडे ठेवून पाहू शकत. या प्रकारचे सॉरोपॉड त्यांचा बहुतेक वेळ दलदलींत, सरोवरांत व नद्यांत घालवीत असत. तेथे त्यांना वनस्पतीचे मऊ, लुसलुशीत खाद्य मिळत असे. अशा जागी त्यांचे मांसाहारी प्राण्यांपासून आपोआपच रक्षण होई.उत्तर अमेरिकेत उत्तर जुरासिक कालीन खडकांत सापडलेला डिप्लोडोकस (आ. ५) ३० मी. लांब होता

उत्तर जुरासिकमधील डिप्लोडोकस

व त्याची मान बरीच लांब होती. त्याच्या नाकपुड्या डोळ्यांच्या मधल्या भागात बऱ्याच मागच्या बाजूस होत्या. यावरून तो जलचर असावा हे दिसून येते. त्याची कवटी मजबूत व सापेक्षतः लांब होती. त्याच्या मुखात फक्त पुढच्या बाजूला थोडे दात होते.डिप्लोडोकसापेक्षा थोड्याशा लहान असणाऱ्या कॅमेरासॉरसाला लहान, कमी वजनाची कवटी होती व त्याच्या मुखात अनेक मोठे, बोथट, चमच्यासारखे चपटे दात होते. त्याच्या नाकपुड्या चांगल्या वाढलेल्या व कवटीच्या पातळीपेक्षाही वरच्या बाजूस उंचावलेल्या असत. हे पण जलचराचे लक्षण होय. ब्रॅकिओसॉरस व चीनमधील पूर्व क्रिटेशस काळातील हेलोपस यांच्या कवट्या कॅमेरासॉरसाच्या कवटीप्रमाणे होत्या. दक्षिण अमेरिकेतील अंटार्क्टोसॉरसाची पुनर्रचित कवटी डिप्लोडोकसाच्या कवटीसारखी दिसते.सॉरोपोडाची अत्युच्च भरभराट उत्तर जुरासिक काळात झाली. क्रिटेशस काळात शाकाहारी ऑर्निथिशियन प्रामुख्याने होते. मात्र काही सॉरोपॉड मध्यजीव महाकल्पाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात होते.


ऑर्निथिशिया : या गणातील सर्व प्राणी शाकाहारी होते. या गणातील डायनोसॉरांचा सॉरिशिया गणातील प्राण्यांपेक्षा पुष्कळ बाबतींत क्रमविकास झाला होता. मुख्यत्वेकरून त्यांच्या श्रोणि-अस्थींमध्ये बरेच फरक झालेले होते. अनुकूलनात्मक प्रसाराच्या दृष्टीनेही या गणात बरीच विविधता आली होती. त्यांचे अनेक स्पष्ट असे प्रकार आढळतात. ऑर्निथिशियनांचा अत्युच्च विकास जुरासिक काळात झाला. क्रिटेशस व उत्तर ट्रायसिक (सु. २१·५ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातही द. आफ्रिका, चीन, अर्जेंटिना आणि नोव्हास्कोशा येथे ते अस्तित्वात होते. या गणात विचित्र दिसणारे भिन्न प्रकारचे डायनोसॉर होते. उदा., डकबिलसारखी रचना असलेला डायनोसॉर. त्यांची शरीरे निरनिराळ्या प्रकारची होती. काहींचे देह चिलखती होते काहींच्या शरीरांवर धारदार, तीक्ष्ण असे संरक्षक काटे किंवा चकत्या होत्या काहींना तथाकथित शिंगे होती आणि इतरही प्रकार होते. या गणात (१) द्विपाद ऑर्निथोपॉड किंवा पक्ष्यांच्या पायांसारखे पाय असणारे डायनोसॉर, (२) चतुष्पाद स्टेगोसॉर, (३) चिलखती देह असणारे अँकिलोसॉर, (४) सेराटॉप्सिशियन किंवा शिंगे असलेले डायनोसॉर आणि (५) हाडांच्या उंचवट्यांनी युक्त डोकी असलेले पॅचिसेफॅलोसॉरस हे प्राणी येतात.

या प्राण्यांच्या तोंडाच्या पुढच्या भागात शिंगाच्या आकाराची चोच तयार झाली होती. या चोचीच्या आत पूर्व-हन्वस्थी व खालच्या जबड्यात वैशिष्ट्यपूर्ण असलेले असे मध्यस्थ हाड (पूर्व दंतिकास्थी) हे असत. जबड्याच्या अधिक आतल्या बाजूला चाकूच्या पात्यासारखे तीक्ष्ण व दंतुर दात होते.द्विपाद ऑर्निथोपॉड : हे प्राणी अंशतः द्विपाद होते. ते शाकाहारी होते. त्यांच्या शरीररचना मांसाहारी थेरोपॉडांसारख्या होत्या. मात्र त्यांचे पुढचे पाय सापेक्षतः लांब व प्रबल होते. त्यांचा उपयोग ते हळूहळू चालण्यासाठी किंवा खाद्य गोळा करण्यासाठी व खाण्यासाठी करीत. तसेच द. आफ्रिकेत हेटरोडोंटोसॉरसाचा लहान सांगाडा सापडला आहे. ज्यांना पूर्व-हन्वस्थी दात होते असे आद्य ऑर्निथोपॉड, हिप्सिलोफोडॉन (पूर्व क्रिटेशस) व थेस्केलॉसॉरास (उत्तर क्रिटेशस) मध्यजीव महाकल्पाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात होते. ऑर्निथिशियन डायनोसॉरांचे विचित्र व भिन्न असे सर्व प्रकार अगदी साध्या व कुठलेही वैशिष्ट्य नसलेल्या कँप्टोसॉरसापासून (आ. ६) निर्माण झाले असे समजतात. तो ४ मी. लांबीचा होता. मागचे पाय भरीव व मोठे आणि पुढचे पाय त्यांच्यापेक्षा थोडे लहान परंतु जरूर पडल्यास चारी पायांवर चालता

कँप्टोसॉरस

येण्यापुरते लांब असेलेला हा मुख्यत्वेकरून द्विपाद प्राणी होता. त्याच्याच आकारमानाच्या सॉरिशियन डायनोसॉरापेक्षा तो अधिक वजनदार होता. त्याची कवटी काहीशी लांबट व चपटी होती. जवळजवळ सर्व ऑर्निथिशियनांची वैशिष्ट्ये त्यामध्ये होती. उदा., त्याला पुढचे दात नव्हते, त्याऐवजी जबड्याचा पुढचा भाग पक्ष्याच्या चोचीप्रमाणे होता. बाजूचे दात चपटे, पात्यासारखे व झुडपे तोडून खाता येण्यास योग्य असे होते. जबड्याचे दोन भाग, खालचा आणि वरचा, अशा रीतीने जोडलेले होते की, तोंड बंद केले असता सगळे दात एकमेकांवर येऊन बसत. त्यामुळे झाडाझुडपांचे खाद्य एका सपाट्यात सगळ्या मुखात चावले जाई.

कँप्टोसॉरसाप्रमाणेच देहाची कुठल्याही प्रकारची विशिष्ट रचना नसलेला दुसरा साधा ऑर्निथिशियन डायनोसॉर इग्वानोडॉन (आ. ७) हा होय. १० मी. हून अधिक लांबीचे त्याचे सांगाडे सापडले आहेत. तो ४·३ मी. उंच होता. या प्राण्याच्या हाताच्या पहिल्या बोटाच्या किंवा अंगठ्याच्या जागी एक जाड खिळ्यासारखा

 इग्वानोडॉन

कंटक (काटा) होता. या कंटकाचा त्याला स्वसंरक्षणासाठी उपयोग होत असावा, असे दिसते. ॲनाटासॉरस या योग्य नावाने व ट्रॅकोडॉन (आ. ८) या दुसऱ्या नावाने माहीत असलेला क्रँप्टोसॉरस व इग्वानोडॉन यांच्यासारखा एक मोठा द्विपाद प्राणी होता. तो १० ते १३ मी. लांब होता, पण त्याच्या तोंडाच्या पुढच्या भागात बदकासारखी चोच होती. या चोचीने तो झाडांच्या फांद्यांवरील पाने खुडून खात असे. त्याच्या जबड्यात २,००० पर्यंत दात होते. हे दात अनेक

उत्तर क्रिटेशसमधील ट्रॅकोडॉन

रांगांत मांडलेले असत. त्याची पुढची बोटे एकत्र गुंफलेली (विणलेली) असत. त्याचे मागचे पाय मजबूत व पळण्यासाठी योग्य असे होते. ॲनाटासॉरसाशी अगदी जवळचे संबंधित असे अनेक डकबिल होते. त्यांच्या कवट्यांवर हॅटसारखे किंवा खिळ्यांसारखे तुरे (कळस) होते. हे उंचवटे त्यांच्या श्वासनलिकेची वाढ होऊन तयार झालेले होते. त्यांचा उपयोग माहीत नाही, मात्र त्यांमध्ये सरीसृपांमध्ये क्वचितच असलेला गंधवाही अवयव विकसित झालेला असावा, असे पुराव्यांवरून दिसते.


स्टेगोसॉर : स्टेगोसॉर अथवा चिलखती देह असणारे डायनोसॉर चतुष्पाद होते मात्र त्यांचे मागचे पाय मोठे आणि पुढचे पाय लहान व आखूड असल्यामुळे त्यांचे डोके जमिनीच्या अगदी जवळ असे. चटकन लक्षात येणारे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पाठीच्या मध्यावरून डोक्यापासून ते जवळजवळ शेपटीच्या टोकापर्यंत 

स्टेगोसॉर

जाणाऱ्या चकत्यांच्या दोन रांगा असत. या चकत्या भरीव हाडामांसाच्या बनलेल्या असून त्या त्रिकोणी आकाराच्या व तीक्ष्ण असत. तसेच शेपटीच्या टोकाच्या भागात मोठ्या खिळ्यांसारखे चार मोठे कंटक असत. स्टेगोसॉरसाचे डोके अगदी लहान होते व दंतसंच दुर्बल होता. हा प्राणी सु. ७ मी. लांबीचा होता. त्यामानाने त्याचा मेंदू अगदी लहान होता. त्याच्या श्रोणींच्या व खांद्यांच्या भागात पाठीचा कणा विस्तृत आणि रुंद झालेला होता. श्रोणींची वाढ मेंदूच्या आकारमानाच्या वीसपट झालेली होती. यामुळे डायनोसॉरांना दोन मेंदू असतात अशी कल्पना झाली होती. इंग्लंडमधील पूर्व जुरासिक कालीन स्केलिडॉसॉरस, उ. अमेरिकेतील उत्तर जुरासिक कालीन स्टेगोसॉरस  व त्रिकोणी चकत्यांपेक्षा जास्त प्रमाणात काटे असलेला आफ्रिकेतील उत्तर जुरासिक कालीन केन्ट्रुरासॉरस  हे यांपैकी सुपरिचित प्राणी (वंश) होत.अँकिलोसॉर : यांच्या शरीरावर हाडामांसाच्या चकत्यांचे आवरण असे. ते क्रिटेशस काळात उदयास आले. ते बैठे व रुंद होते. त्यांच्यापैकी मोठे प्राणी ७ मी.पर्यंत लांबीचे होते. त्यांच्या शरीरावरील जड चिलखताव्यतिरिक्त त्यांच्या देहाच्या दोन्ही बाजूंवर अनेक मोठे, अणकुचीदार व तीक्ष्ण कंटक असत आणि त्यांच्या शेपटीच्या टोकाच्या भागात सामान्यतः सोट्यासारखी हाडांची वाढ असे. या सर्व गोष्टी त्यांच्या संरक्षणासाठी होत्या. या प्रकारच्या डायनोसॉरांपैकी हायलिओसॉरस इंग्लंडमध्ये पूर्व क्रिटेशस कालीन खडकांत सापडला. अमेरिकेतील कॅन्झस राज्यात सापडलेल्या मध्य क्रिटेशस काळातील सिल्व्हिसॉरस हा अँकिलोसॉर आणि स्टेगोसॉर यांतील दुवा वाटतो. पोलाकँथसाच्या देहाच्या पुढच्या भागात रुंद कंटकांच्या जोड्या होत्या आणि त्याच्या टेऱ्यांवर लहान लहान चकत्यांचे आवरण होते. अँकिलोसॉरस उ. अमेरिकेत व मंगोलियात उत्तर क्रिटेशस काळात होते. एडमंटोनियाला द्वितीयक टाळू व इतर अवयव तसेच दुर्बल दंतसंच होते. त्यावरून तो मुंग्या किंवा किडे खाऊन राहत होता असे दिसते. अँकिलोसॉर ऑर्निथिशियन असल्यामुळे ते शाकाहारी होते असेच समजतात, परंतु याची निश्चिती नाही.सेराटॉप्सियन : शिंगे असलेले किंवा सेराटॉप्सियन हे (सर्वांत) शेवटी उदयाला आलेल्या डायनोसॉरांपैकी होत. डायनोसॉरांची अगदी प्रथम सापडलेली अंडी या गटातील प्राण्यांची असून ती मंगोलियातील उत्तर क्रिटेशस कालीन जाडोख्टा स्तरात आढळली. काही अंड्यांमध्ये पूर्ण वाढ न झालेल्या गर्भांची हाडे सापडली. जीवाश्मांनी (जीवांच्या शिळारूप अवशेषांनी) समृद्ध असलेल्या उत्तर क्रिटेशस कालीन खडकांत आशिया व उ. अमेरिकेत सेराटॉप्सियनांची संपूर्ण मालिका सापडली आहे. त्यांच्यापैकी सुरुवातीचे प्राणी द्विपाद होते. त्यांची शरीररचना साधी व जवळजवळ कँप्टोसॉरिड पूर्वजांच्या शरीररचनेसारखी होती. सुरुवातीच्या प्राण्यांच्या कवट्या अरुंद व खोलगट होत्या. हे प्राणी मंगोलियातील पूर्व क्रिटेशस कालीन सिट्टाकोसॉरसापासून निर्माण झाले असावेत, असे समजतात. या चतुष्पाद प्राण्यांना लहान मान, लहान शेपूट आणि पोपटासारखी चोच असलेले लांबट डोके असे. त्यांच्या मानेपासून मागच्या बाजूला वाढलेल्या हाडाची झालर असे. मानेवर हाडाची झालर असलेला पहिला सेराटॉप्सियन म्हणजे प्रोटोसेराटॉप्स (आ. १०) हा होय. तो २ मी. पेक्षा कमी लांबीचा होता. त्याला शिंग नव्हते व त्याच्या मुखात काही पूर्व-हन्वस्थीचे दात होते. त्याच्या डोक्याच्या पुढचा भाग अरुंद व खोल होता आणि डोक्याच्या अगदी पुढच्या भागात अणकुचीदार चोच होती. डोक्याचा मागचा भाग रुंद, पसरट अशा सुपासारख्या हाडाचा तयार झालेला होता. त्यामुळे त्याच्या मानेवर एक प्रकारची संरक्षक ढाल किंवा झालर तयार झाली होती. हे प्राणी अंडी घालीत. या प्रकारापासून सेराटॉप्सियनांचे इतर प्रकार निर्माण झाले. क्रमविकासामुळे त्यांच्या आकारमानामध्ये वाढ झाली, त्यांना मोठी व भीतीदायक शिंगे आली. उ. अमेरिकेतील मोनोक्लोनिअसाच्या नाकावर एकच लांब शिंग होते. ट्रायसेराटॉप्सला (आ. ११) त्याच्या नावाप्रमाणे तीन मोठी शिंगे होती. त्याच्या डोळ्यांजवळ दोन मोठी व नाकावर एक आखूड अशी शिंगे होती. डोक्याच्या मागच्या बाजूची त्याची हाडामांसाची ढाल किंवा झालर फारच मोठी होती. हा प्राणी ७ ते १० मी. लांबीचा व श्रोणीजवळ ३ मी. उंच होता. त्याचे डोके शरीराच्या एक तृतीयांश आकारमानाचे होते. ट्रायसेराटॉप्स व टायरॅनोसॉरस हे एकाच वेळी अस्तित्वात होते, हे लक्षात घेतल्यास त्यांच्या डोक्यावरील ढालीचे व शिंगांचे महत्त्व व संरक्षक कार्य

प्रोटोसेराटॉप्स

लक्षात येते. उत्तर क्रिटेशस काळात सेराटॉप्सियनांचे इतरही प्रकार होते. त्यांची शरीरे सर्वसाधारणपणे सारखीच होती, मात्र ढालींचा आकार व शिंगांची रचना यांत फरक होते. एका प्रकारच्या प्राण्याच्या नाकावर एकच मोठे शिंग होते. पॅचिरायनॉसॉरसाच्या डोक्याच्या पुढच्या भागात एकच ऐरणीसारखा उंचवटा होता. दुसऱ्या एका प्रकारच्या सेराटॉप्सियनाच्या ढालीची रचना व आकारमान हे ट्रायसेराटॉप्सियनाच्या ढालीप्रमाणे होते, मात्र ढालीच्या काठावर सर्वत्र मोठाली शिंगे होती तसेच डोळ्यांच्या वरच्या बाजूस एक लहान शिंगांची जोडी व नाकावर एक मोठे शिंग होते. सेराटॉप्सियन फक्त उत्तर क्रिटेशस काळात अस्तित्वात होते पण थोड्या कालावधीत त्यांचा बराच क्रमविकास झाला.

पॅचिसेफॅलोसॉरस : यांपैकी स्टेगोसॉरस हा लहान डायनोसॉर वैचित्र्यपूर्ण होता. त्याची कवटी सु. २० सेंमी. लांब होती. त्याच्या कवटीचा वरचा भाग जाड होता व कवटीत मेंदूच्या पोकळीच्या वरच्या भागात सु.

ट्रायसेराटॉप्स

२५ सेंमी. जाडीचे हाड होते. त्यामुळे डोके घुमटासारखे दिसत असे म्हणून हे नाव पडले. त्याच्या नाकावर व डोक्याच्या मागच्या बाजूस निरनिराळ्या आकारांचे व आकारमानांचे भिन्न तीक्ष्णतेचे खिळ्यांसारखे कंटक व उंचवटे होते. त्याचा दंतसंच दुर्बल होता. याच्याशी संबंधित असलेल्या उत्तर अमेरिकन डायनोसॉरांचे आकारमान दुप्पट होते.

भारतातील डायनोसॉर : भारतात उत्तर क्रिटेशस काळातील लॅमेटा मालेच्या खडकांत जबलपूर (मध्य प्रदेश) व पिजदुरा (चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र) या ठिकाणी डायनोसॉरांचे जीवाश्म सापडले आहेत. येथील जीवाश्मांमुळे भारतीय डायनोसॉरांबद्दल बरीच माहिती उपलब्ध झाली. या ठिकाणी स्टेगोसॉरिया व सील्युरोसॉरियांचे जीवाश्म सापडले. लॅमेटांच्या युगात भारतात डायनोसॉरांचा अत्युच्च विकास झाला होता. जीवाश्मांत सापडलेल्या कवट्या, कशेरुक, हातापायांची हाडे, चिलखती चकत्या, दात व विष्ठाश्म यांवरून डायनोसॉरांचे अंटार्क्टोसॉरस, टायटॅनोसॉरस, इंडोसॉरस, लॅमेटोसॉरस, जबलपोरिया, लाप्लाटासॉरस, मेगॅलोसॉरस हे वंश वरील ठिकाणी होते, असे आढळले. या ठिकाणच्या प्राण्यांची मॅलॅगॅसी, ब्राझील वगैरे ठिकाणच्या डायनोसॉरांशी तुलना करून त्यांचा काळ ट्युरोनियन म्हणजे उत्तर क्रिटेशस ठरविण्यात आला. डायनोसॉरांचा ऱ्हास व अंत : मध्यजीव महाकल्पातील अगदी शेवटच्या म्हणजे क्रिटेशस काळाच्या अगदी अखेरपर्यंत डायनोसॉरांचे बहुतेक प्रकार अस्तित्वात होते. तसेच या वेळेपर्यंत त्यांचा विकास आणि प्रसारही होत गेला. मात्र या काळाच्या अखेरीस ते एकदम व संपूर्ण नाहीसे झाले. अगदी ताबडतोब नंतरच्या नवजीव महाकल्पाच्या अगदी सुरुवातीच्या (सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत त्यांचा लवलेशही सापडत नाही. तापमानातील फरक, रोगराई व साथींचा फैलाव, डायनोसॉरांची अंडी इतर प्राण्यांनी खाऊन टाकणे इ. त्यांचा अंत होण्याची कारणे दिसतात पण ती पूर्णपणे समर्थनीय नाहीत. क्रिटेशस काळात सुरू झालेली गिरिजननाची (पर्वत निर्माण होण्याची) प्रक्रिया डायनोसॉर निर्वंश होण्यास प्रामुख्याने कारणीभूत झाली असावी, असे समजतात. गिरिजननामुळे डायनोसॉर राहत असलेल्या जमिनी उंचावल्या गेल्या, हवामानात बदल झाले, त्यामुळे ज्या वनस्पती खाऊन डायनोसॉर जगत असत त्यांच्यात बदल झाले वा त्या नाहीशा झाल्या. या कारणांनी शाकाहारी डायनोसॉर कमी झाले, परिणामी शाकाहारी डायनोसॉरांचे भक्षण करणारे मांसाहारी पण कमी झाले अशी कारणांची मालिका सापडते परंतु डायनोसॉर एकदम व संपूर्ण निर्वंश का झाले असावेत, याचे योग्य आणि समाधानकारक कारण समजलेले नाही.

संदर्भ :

1. Beerbower, J. R. Search For the Past, New Delhi, 1965.

2. Stokes, W. L. Essentials of Earth History, Englewood Cliffs, N. J., 1960.

3. Watson, F. W. Dianosaurs and Other Prehistoric Reptiles, New York, 1960.    

            आगस्ते, र. पां.