आ. १. कायलोपोडा वर्गातील लिथोबियस प्रजातीची गोम (पृष्ठीय दृश्य)मीरिॲपोडा: अपृष्ठवंशी प्राण्यांच्या (पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांच्या) आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील प्राण्यांशी वरकरणी साम्य असलेल्या काही प्राण्यांचा समूह. पूर्वीच्या वर्गीकरणात या समूहास वर्गाचा दर्जा देण्यात आला होता पण सध्याच्या वर्गीकरणात ह्या समूहातील प्राणी चार वर्गांत विभागले आहेत व मीरिॲपोडा या शब्दात केवळ वर्णनात्मक व ऐतिहासिक महत्त्व उरले आहे.

वर्ग कायलोपोडा : यात गोमांचा समावेश आहे. हे प्राणी हिंस्त्र व मांसाहारी आहेत. यांच्या डोक्यावर शृंगिकांची (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रियांची) एक जोडी, जंभाची (भक्ष्य पकडण्यासाठी व त्याचे तुकडे करण्याकरिता आहारनालाच्या-अन्नमार्गाच्या-पुढच्या टोकाशी असणाऱ्या संरचनांची ) एक जोडी आणि जंभिकांच्या (निरनिराळ्या कार्यांकरिता ज्यांचे अनेक प्रकारे रूपांतर होते अशा जंभामागे असणाऱ्या उपांगांच्या) दोन जोड्या असतात. धडावर कमीतकमी पायांच्या १६ जोड्या असतात. यांपैकी पहिल्या पायाची नखी विषारी असते व त्यात नांगी असते. पायांच्या जोड्यांची संख्या दीडशेपर्यंत असू शकते. डोळे संयुक्त, साधे [→ डोळा] किंवा नसतातही. श्वासरंध्र पृष्ठीय किंवा पार्श्वीय (बाजूला) श्वासनलिका फाटे फुटलेली व जननरंध्र धडाच्या पश्च बाजूस असते. अंड्यातून भ्रूण बाहेर येतो त्या वेळी त्याला पायाच्या सात जोड्या असतात. स्कुटीजेरा, लिथोबियस, स्कोलोपेंड्रा या गोमांच्या निरनिराळ्या प्रजाती होत. [→  गोम].

आ. २. सिम्फायला वर्गातील स्कुटीजेरेला प्रजातीय प्राणी (पृष्ठीय दृश्य)वर्ग सिम्फायला : गोमेसारखे, दमट जमिनीत, उकिरड्याच्या जागी किंवा दलदलीच्या जागी आढळणारे प्राणी. यांचे डोके गोमेसारखे असते. यांना फक्त एकच श्वासरंध्र असते. धडावर पायांच्या १२ जोड्या, जननरंध्र अग्नीय व अंड्यातून बाहेर पडणाऱ्या भ्रूणास पायांच्या किंवा सहा सात जोड्या असतात. यांत स्कुटीजेरेला या प्रजातीतील प्राण्याचा समावेश आहे.

आ. ३. डिप्लोपोडा वर्गातील इयुलस प्रजातीच्या प्राण्याच्या डोक्याचा भाग : (१) डोके, (२) अक्षिका, (३) धड, (४) शृंगिका, (५) जंभ, (६) जननरंध्र. वर्ग डिप्लोपोडा : या वर्गात मोडणाऱ्या प्राण्यास ⇨ मिलिपीड (सहस्त्रपाद) म्हणतात. हे शाकाहारी प्राणी उकिरड्यावर किंवा घाणीच्या जागेत आढळतात. पावसाळ्यात ते रस्त्यावरून हिंडता नाही दिसतात. डोक्यावर शृंगिका, जंभ व जंभिका यांची एकएक जोडी असते. धडाचे

पहिले चार खंड एकेकटे असतात. यापुढील दुहेरी व सायुज्यित (एकत्र झालेले) असतात. या खंडावर अक्षिका [प्रकाशग्राही कोशिका (पेशी)] असतात. श्वासनलिकांना फाटे नसतात. जननरंध्रे धडाच्या तिसऱ्या खंडावर असतात. अंड्यातून बाहेर पडताना भ्रूणास पायांच्या तीन जोड्या असतात. इयुलस, ग्लोमेरीस या प्रजाती या वर्गात मोडतात.

वर्ग पावरोपोडा: थोड्या फार गोमेप्रमाणे दिसणाऱ्या या वर्गातील प्राण्याचे डोके मिलिपीडप्रमाणे असते. याच्या शृंगिकांना फाटे असतात. याच्या धडात १२ खंड असतात. त्यावर पायाच्या नऊ जोड्या असतात. याला डोळे नसतात, तसेच श्वसन तंत्र व अभिसरण तंत्रही नसते. जननरंध्र धडाच्या अग्रभागी असते. अंड्यातून बाहेर पडताना भ्रूणास पायांच्या तीन जोड्या असतात. पावरोपस या प्रजातीचे प्राणी या वर्गात मोडतात.

आ. ४. पावरोपोडा वर्गातील पाषरोपस प्रजातीचा प्राणी (पार्श्व दृश्य).या चारही वर्गातील प्राणी भूचर असून ते सर्व जगभर पसरले आहेत. त्यातल्या त्यात उष्ण प्रदेशात व त्यातील दमट भूभागात हे जास्त संख्येने आढळतात. सिम्फायला व पावरोपोडा या दोन्ही वर्गात फार थोड्या म्हणजे ६० जाती आढळतात. डिप्लोपोडा वर्गातील प्राण्यांना पुष्कळ पाय असले, तरी त्यांचा धावण्याचा वेग त्यामानाने कमी आहे. शाकाहार हे कदाचित, याचे कारण असू शकेल. हे प्राणी लपून राहतात व जेव्हा त्यांना बाहेर काढले जाते तेव्हा आपल्या शरीराची गुंडाळी करतात. यांच्या ८,००० जातींचे वर्णन केले गेले आहे पण सर्व मिळून २५,००० तरी जाती असाव्यात. गोमांत पायांची संख्या थोडी असते. १५ पासून १८० पर्यंत पायांच्या जोड्या आढळल्या आहेत. हे प्राणी पुष्कळ वेळा कात टाकतात. दिवसा ते कानाकोपऱ्यात लपून बसतात. काही गोमा ३० सेंमी. लांबीच्या आढळल्या आहेत. यांच्या २,५०० जाती असाव्यात.

इनामदार, ना. भा. चिन्मुळगुंद, वासंती