मगर

मगर : (सुसर). ⇨ॲलिगेटर, ⇨केमन व ⇨घडियाल यांच्याबरोबरच मगराचा क्रोकोडिलिया या प्राणिगणात समावेश केलेला आहे. मगर आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडांत आढळतो. मगराच्या अनेक जाती आहेत. त्यांपैकी भारतात दोनच आढळतातः एक क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस ही गोड्या पाण्यात राहणारी आहे आणि दुसरी क्रो. पोरोसस ही खाऱ्या पाण्यात राहणारी असून खाड्यांत व समुद्रकिनाऱ्यावर आढळते.

मगर हा मोठा प्राणी असून त्याची सरासरी लांबी ४.५ मी. असते. खाडीत राहणारा मगर ६ मी. पेक्षाही कधीकधी जास्त लांब असतो. मगर उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारा) प्राणी आहे. शेपटीचा उपयोग त्याला पोहण्याच्या कामी होतो. शेपूट दोन्ही बाजूंनी चपटे असते. क्रोकोडिलिया गणातील इतर प्राण्यांचे शेपूटही अशाच प्रकारचे असते. शेपूट डाव्या व उजव्या बाजूंना वरचेवर वळवून तो पाण्यात वेगाने पोहू शकतो. पोहताना पाय शरीराला चिकटून धरलेले असल्यामुळे पोहण्याच्या कामी त्यांचा काही उपयोग होत नाही. याच्या मागच्या पायांची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात. पाण्याच्या पृष्ठाजवळ तो तरंगत राहू शकतो तरंगत असताना डोक्याचा वरचा थोडा भाग, डोळे व नाकपुड्या पाण्याबाहेर असतात. जमिनीवर साधारणतः तो फरफटत जातो पण क्षुब्ध झाल्यावर चारही पायांवर शरीर उचलून धरून तो बऱ्याच वेगाने धावू शकतो.

मगराचे तुंड (जबडे व नाक असलेला आणि पुढे आलेला डोक्याचा भाग मुस्कट) माफक लांबीचे असून चपटे तिकोनी अथवा गोलाकार असते. खालच्या जबड्याच्या अस्थींचा आठव्या दातापर्यंत एकजीव झालेला असतो. प्रत्येक डोळ्यामागे एक झडप असून पाण्यात बुडी मारताना तिने कान बंद करता येतो. जीभ रूंद व जाड असून तिचे अधर (खालचे) पुष्ठ खालच्या जबड्याला जोडलेले असते. ती खालीवर करता येत असल्यामुळे तोंड उघडल्यावर पाणी घशात जाऊ नये म्हणून तिचा झडपेसारखा उपयोग होतो. दोन्ही जबड्यांवर मजबूत, तीक्ष्ण व लहानमोठे दात असतात. ते वरचेवर गळून पडतात व त्यांच्या जागी नवीन येतात. खालच्या जबड्यावरील चौथा दात वरच्या जबड्याच्या बाजूवर असलेल्या एका खाचेत बसतो. ॲलिगेटराप्रमाणे यांनाही गंध ग्रंथींच्या दोन जोड्या असतात. नासिका-छिद्राचे नासास्थींनी दोन भाग झालेले असतात.

पाठ वगळून मगराचे सगळे शरीर कठीण, चामट तकटांनी आच्छादिलेले असते उदरावरची तकटे लांबट व बाजूवरील गोलाकार असतात. व्यापारी दृष्टीने चामड्याचा हा भाग जास्त मौल्यवान असतो. पाठ व मानेचा वरचा भाग अस्थिपट्टांनी झाकलेला असतो. अस्थिपट्ट एकमेकांना चिकटून असून खालच्या चामट त्वचेला जोडलेले असतात आणि त्यांच्या पद्धतशीर ओळी असतात. बहुतेक पट्टांवर ओबडधोबड कटक (कंगोरा) असतो.

मासे हे जरी मगरांच्या उपजीविकेचे मुख्य साधन असले, तरी ते इतर प्राणीही खातात. वयाने लहान असलेले मगर मासे खाऊनच राहतात पण बयस्क प्राणी जलचर पक्षी व इतर प्राणीदेखील पकडून खातात. पाण्यात तरंगत असताना, एखादा बेसावध पशू अथवा पक्षी आटोक्यात आल्याबरोबर ते त्याला पकडून पाण्याखाली ओढत नेतात व त्याचा फडशा पाडतात. भक्ष्य खाताना मगर अश्रू ढाळतात अशी समजूत आहे, त्यावरून ‘नक्राश्रू’ हा शब्द ‘खोटे दुःख करणे’ या अर्थी मराठी भाषेत रूढ झाला आहे.

विणीच्या हंगामात नर व मादी आवाज व वास यांच्या साहाय्याने परस्परांचा माग काढतात. मादी जमिनीवर अंडी घालते ती पांढऱ्या रंगाची व लंबवर्तुळाकृती असून त्यांचे कवच जाड व कॅल्शियमयुक्त असते. आफ्रिकेतील नाईल नदीतील मगर (क्रो.निलोटिकस) वाळूत सु. ६० सेंमी. खोल खड्डा खणून त्यात ३०–१०० अंडी घालते व तो बुजविते. इतर मगरी अँलिगेटराप्रमाणेच घरटे तयार करून त्यात अंडी घालतात. पिल्ले बाहेर पडण्यास दीड ते तीन महिने लागतात. बाहेर पडण्याच्या सुमारास ती एक प्रकारचा आवाज काढतात. तो ऐकल्यावर मादी घरट्याचा पालापाचोळा बाजूस करते व पिल्लांना पाण्यात घेऊन जाते. पिल्लांच्या तुंडाच्या टोकावर एक ‘अंड-दंत’ उत्पन्न होतो व त्याच्या साहाय्याने अंड्याचे जाड कवच फोडून ती बाहेर येतात. अंड-दंत लवकरच नाहीसा होतो.

मगर पाण्यात राहणारा असला, तरी तोंडाचा आ वासून किनाऱ्यावरील वाळूत, दगडावर किंवा खडकावर उन्ह खात पडून राहण्यात त्याचा बराच वेळ जातो. काही जातींच्या मगरी हिवाळ्यात शितसुप्तीत (हिवाळ्यात येणाऱ्या अर्धवट वा पूर्ण गुंगीत) जातात, तर इतर काही उन्हाळ्यात पाणी आटले म्हणजे चिखलात पुरून घेऊन ग्रीष्मसुप्तीत (उन्हाळ्यात येणाऱ्या अर्धवट वा पूर्ण गुंगीत) जातात परंतु अवर्षणाच्या वेळी आपले शुष्क झालेले स्थान सोडून मगरांचे थवे पाण्याच्या शोधार्थ स्थानांतर करीत असल्याचे दाखले आहेत.

माणूस अतिशय अविचारीपणाने या प्राण्यांची त्यांच्या मौल्यवान चामड्यासाठी सातत्याने हत्या करीत असल्यामुळे पुष्कळ जातींची संख्या उत्तरोत्तर कमी होत आहे. ज्या देशांत मगरांची नैसर्गिक वस्ती आहे अशा बहुतेक देशांनी त्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजना कार्यवाहीत आणलेल्या आहेत. मगरांच्या शरीरापासून मिळविण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या व्यापाराचे नियमन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रयत्न करण्यात येत आहेत.

पहा : ॲलिगेटर केमन घडियाल सरीसृप वर्ग.

कर्वे, ज. नी.