पतंग : (१) संयुक्त पानांचा भाग, (२) फुलाफळांसह फांदी, (३) फळ शिंबा.

पतंग –३: (हिं. बुकुम, बकम गु. बाकम इं. जपान वुड ट्री, सॅप्पन वुड ट्री लॅ सीसॅल्पिनिया सॅप्पन कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-सीसॅल्पिनिऑइडी). सुमारे ६–९ मी. उंचीचा हा वृक्ष मूळचा मलाया व भारत येथील असून बंगाल, द. भारत, ब्रह्मदेश इ. प्रदेशांत लावलेला आढळतो. शेतात व बागेत हा कुंपणाच्या कडेने लावतात. याचे खोड काटेरी, १५–२५ सेंमी. व्यासाचे असून फांद्यांवर लव व तुरळक लहान काटे असतात. याची पाने संयुक्त, पिसासारखी, एकाआड एक व दोनदा विभागलेली असून दले ८–१२ जोड्या आणि प्रत्येक दल १०–१५ सेंमी. लांब व तळाशी काटेरी असते दलके १०–१८ जोड्या प्रत्येक दलक दोन्ही टोकांस गोलसर, वर गुळगुळीत व खाली कमीअधिक लवदार असते. फांद्यांच्या टोकांस किंवा वरच्या पानांच्या बगलेत पिवळ्या फुलांच्या परिमंजऱ्या सप्टेंबर ते ऑक्टोबरात येतात. फुलांतील वरच्या पाकळीच्या तळास लाल ठिपका असतो. शिंबा (शेंग) ७·५–१० x ४–५ सेंमी., कठीण, गुळगुळीत, तिरपी थोडी चपटी, न तडकणारी, टोकास गोलसर परंतु एका बाजूस वाकलेली असते बिया ३–४ इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलाची संरचना ⇨लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

  

पतंगाचे लाकू़ड मध्ये पिवळट नारिंगी, बाहेर पांढरे व कठीण असून त्याला चांगली झिलई करता येते. ते हातातील काठ्या, कपाटे आणि जडावाचे काम यांकरिता फार चांगले असते. लाकूड व शेंगा यांपासून उत्तम तांबडा रंग (ब्राझिलीन) व गुलाल बनवितात. चटया रंगविण्यास तुरटीबरोबर हा रंग वापरतात. तसेच त्यापासून तांबडी शाई बनवितात आणि सूत, रेशीम व लोकर रंगवितात. खोडाची साल व शेंगांच्या सालीतील ४०% टॅनिनाचा उपयोग लोखंडाबरोबर करून काळसर छटांचे रंगही बनवितात. हे रंग ताप्तुरते (कच्चे) असतात. पतंगाचा काढा रक्तस्राव बंद करण्यास पोटात देतात. पांढरी धुपणी बंद करण्याकरिता काढ्याची पिचकारी देतात. अतिसार व संग्रहणी यांवर ही वनस्पती उपयुक्त आहे. ती काही चर्मरोगांवरही पोटात घेण्यास देतात. पानांत ०·१६–०·२५% सुगंधी, बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल असते.

परांडेकर, शं. आ.