टिटवी : या पक्षाचा समावेश कॅरॅड्रीइडी या पक्षिकुलात केलेला आहे. टिटवीच्या दोन जाती आहेत : पहिली रक्तमुखी टिटवी व दुसरी पीतमुखी टिटवी.

रक्तमुखी टिटवी (व्हॅनेलस इंडिकस)

रक्तमुखी टिटवी : हिचे शास्त्रीय नाव व्हॅनेलस इंडिकस. भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया आणि सुमात्रात ही आढळते. हिमालयात ही १,८३० मी. उंचीपर्यंत सापडते. लागवडीखालच्या शेतात, कुरणात व तलाव, नद्या यांच्या आसपास ही राहते. दाट अरण्य किंवा रेताड प्रदेशात मात्र ही नसते. ही तित्तिरापेक्षा मोठी असून हिची लांबी ३३ सेंमी. असते डोके, मान आणि छातीचा वरचा भाग काळा पोटाकडची बाजू पांढरी डोळ्यांच्या मागून एक पांढरा पट्टा निघून मानेच्या बाजूवरून खाली जातो पाठ आणि पंख तपकिरी शेपटी पांढरी पण टोकाजवळ काळा पट्टा डोळे तांबडे त्यांच्या पुढे लाल रंगाची मांसल गलुली (गळ्याखाली लोंबत असणारी वाढ) चोच ताबंडी पण टोक काळे पाय लांब पिवळे असतात. टिट्-टिट्-ट्यू टिट् किंवा टिट्-ट्यू-ट्यू-टिट् असा आवाज हा पक्षी लागोपाठ अनेकदा काढतो. त्याचा हा आवाज रात्रीदेखील पुष्कळदा ऐकू येतो. टिटवी घरावरून ओरडत जाणे अशुभ समजतात. किडे, सुरवंट आणि गोगलगाई हिचे भक्ष्य होय. नेहमी ह्यांची जोडपी भक्ष्य शोधीत असलेली दिसतात.

टिटवीला झाडांवर बसता येत नाही. जमिनीवर ही तुरूतुरू चालते किंवा धावते. ही उडत पुष्कळ लांब जाऊ शकते. सदैव जागरूक असल्यामुळे संकटाचा संशय येताच ओरडून ही सगळ्यांना सावध करते.

विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्ट असतो. उघड्या जमिनीवर पायाने थोडीशी जागा उकरून मादी तेथे चार अंडी घालते. अंडी कारड्या तपकिरी रंगाची असून त्यांवर काळसर ठिपके असतात. अंड्यांचा रंग भोवतालच्या परिस्थितीशी इतका एकरूप असतो की, ती सहसा दिसत नाहीत.

पीतमुखी टिटवी : शास्त्रीय नाव व्हॅनेलस मलबारिकस. आसाम सोडून सबंध भारत आणि श्रीलंकेत ती आढळते. रुक्ष उघडा प्रदेश, माळराने आणि पडीक जमिनी या ठिकाणी ही राहते. ही जवळजवळ तित्तिराएवढी असते. हिच्या डोक्याचा माथा काळा असून डोक्यावर काळी टोपी घातल्याप्रमाणे दिसते मान काळी डोळे पिवळे डोळ्यांच्या मागे एक पांढरा पट्टा डोळ्यांच्या पुढे पिवळ्या रंगाची मांसल गलुली असून दोन्ही बाजूंच्या गलुल्या चोचीवर मिळतात पाठ, पंख, छातीचा वरचा भाग तपकिरी छातीचा खालचा भाग, पोट व शेपटी पांढरी शेपटाच्या टोकाजवळ काळा पट्टा पाय लांब, पिवळे चोच काळी पण तिचे बूड पिवळे असते.

हिची राहणी, सवयी, भक्ष्य इ. रक्तमुखी टिटवीप्रमाणेच असतात. विणीचा हंगाम एप्रिलपासून जुलैपर्यंत असतो.

कर्वे, ज. नी.