क्रासीट्स्की, ईग्नाट्सी: (३ फेब्रुवारी १७३५–१४ मार्च १८०१). पोलिश कवी व कादंबरीकार. पोलंडमधील द्यूबिएको येथे एका खानदानी कुटुंबात जन्म. लाव्हॉव्ह येथील जेझुइट कॉलेजात शिक्षण. पोलंडचा राजा स्टॅनिस्‍लस दुसरा ऑगस्टस (कार. १७६४ – ९५) ह्याच्या निकटवर्तीयांपैकी तो एक होता. १७६६ मध्ये तो एर्मलांटचा बिशप झाला. पुढे एर्मलांट प्रशियाला जोडले गेल्यानंतर तो प्रशियन नागरिक झाला व फ्रीड्रिख द ग्रेटची मर्जी त्याला लाभली. १७९५ मध्ये तो गनेझ्नोचा (सध्याचे गनेझन) आर्चबिशप झाला.

पोलिश साहित्यातील नव-अभिजाततावादी युगाचा तो सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी. महाकाव्य-विडंबिका (प्राचीन महाकाव्याचा घाट व भारदस्त शैली वापरून एखादा सामान्य विषय त्यात चित्रित केला जातो), उपरोधिका, बोधकथा (फेबल्स), कादंबरी ह्यांसारखे विविध साहित्य प्रकार त्याने हाताळले. पोलंडमधील तत्कालीन सांस्कृतिक उणिवा त्याने आपल्या साहित्यातून दाखवून दिल्या. Monachomachia (१७७८) ही महाकाव्य-विडंबिका, Satyry (१७७९, इं. शी. सटायर्स), Bajki i przypowiesci (१७७९, इं. शी. फेबल्स अँड टेल्स) हे काव्यग्रंथ त्या दृष्टीने उल्लेखनीय होत. Mikolaja Doswiadczynskiego przypadki (१७७६, इं. शी. द अड्व्हेंचर्स ऑफ मिकॉलाय डॉस्विऑड्सझिन्स्की) ही पहिली पोलिश कादंबरी त्याचीच. तिच्यावर ⇨ जॉनाथन स्विफ्ट आणि ⇨ रूसो  ह्यांचा प्रभाव जाणवतो. रेखीव रचना व सुभाषितसंपन्न घोटीव शैली त्याने आपल्या साहित्यकृतीतून जपलेली दिसते. बर्लिन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.