किरात – २ : (२ जुलै १८६५ — २१ फेब्रुवारी १९४५). एक मराठी ग्रंथकार. मूळ नाव कृष्णाजी लक्ष्मण सोमण. जन्म बेळगाव जिल्ह‌्यातील खानापूर येथे. शिक्षण खानापूर, निपाणी व पुणे येथे. लेखनाची आवड लहानपणापासूनच होती. काही काळ सरकारी नोकरी केल्यानंतर सारे आयुष्य लेखनालाच वाहून घेतले. काव्य, नाटक, टीका, निबंध इ. विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले ते मुख्यतः केसरी, पुणे वैभव, जगद्धितेच्छु, नाट्यकथार्णव आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांपैकी पानिपतचा दुर्दैवी मोहरा . . . (१८९८) आणि पन्हाळगडचा किल्लेदार (१८९९) ही विशेष प्रसिद्ध आहे.  भासकवीच्या नव्याने उपलब्ध झालेल्या तेरा नाटकांचे मराठीत भाषांतर (. . .  भासकवीचा मराठींत अवतार, १९३१) व त्यास जोडलेली विवेचक प्रस्तावना ही त्यांची महत्त्वाची वाङ्‌मयीन कामगिरी होय.  हिंदोल टिळकगीत (१९२९) आणि शिवराज्याभिषेक-राष्ट्रीय कीर्तन (दुसरी आवृ. १९२५) ही त्यांची पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली काव्यरचना. त्यांच्या निबंधांपैकी ‘संभाजीच्या पश्चात मराठ्यांची स्थिती’ हा विशेष उल्लेखनीय होय.  अतिलेखन आणि वाचन यांमुळे आयुष्याच्या अखेरीस त्यांना अंधत्व आले होते.

जोग, रा. श्री.