वर्णचिकित्सा : विविध रंगांच्या प्रकाशकिरणांच्या साहाय्याने पदार्थांमध्ये किंवा परिसरामध्ये इष्ट असे बदल घडवून त्यांचा उपयोग रोगांचे निदान व त्यांच्यावरील उपचार करण्यासाठी केला जातो. औषधे किंवा इतर रासायनिक द्रव्ये टाळून शक्य तेवढ्या हानिरहित मार्गांनी रुग्णचिकित्सा करण्याच्या या पद्धतीस वर्णचिकित्सा असे नाव आहे. एडविन डी. बॅबिट यांनी ही चिकित्सापद्धती प्रथम वापरली व द प्रिन्सिपल्स ऑफ लाइड ॲड कलर हा त्यांचा ग्रंथ या पद्धतीचा आधारभूत ग्रंथ मानतात. ही ⇨निसर्गोपचारातील एक पद्धती आहे.
हजारो वर्षांपूर्वी ईजिप्त, चीन, मेसोपोटेमिया येथील प्राचीन संस्कृतीमध्ये रोगनिवारणासाठी रंगांचा उपयोग करण्यात येत असावा, असे दिसते. रंगांच्या सुसंवादी अशा आकृतिबंधावर दृष्टी लावून ठेवल्यास काही रोग बरे होऊ शकतात, असे पायथॅगोरस यांनी म्हटले होते. विश्रामकारक रंगांच्या परिसरामुळे निर्माण झालेले सौंदर्य प्रकृतीस शुद्ध करते, उलट म्लान, उदासीन रंगाच्या वातावरणात निर्माण होणारी कुरूपता ही हिंसा व गुन्हेगारीस प्रवृत्त करते.
वर्णचिकित्सेच्या व्यावहारिक उपयोजनास जी शास्त्रीय बैठक या पद्धतीचे पुरस्कर्ते मांडतात, तिचे स्वरूप काहीसे अस्पष्ट आहे. ज्ञानेंद्रियांना विविध संवेदना (ध्वनी, रंग, प्रकाश, चव इ.) प्राप्त झाल्यावर त्यांची मेंदूच्या विशिष्ट भागात जाणीव होते. नंतर या जाणिवेचा मनाकडून अर्थ लावला जातो व सहजप्रेरणेने या अर्थाला आत्म्याकडून प्रतिसाद मिळतो. अशी साखळी वर्णचिकित्सेच्या पुरस्कारार्थ केलेल्या विवेचनात आढळते. काही चिकित्सकांच्या मते आपण नैसर्गिक रीत्या विशिष्ट रंगांकडे किंवा रंगसंगतींकडे आकर्षिले जातो, कारण त्यांमुळे आपले काही आत्मिक किंवा आध्यात्मिक गुणधर्म जास्त प्रबल होतात. रंगतरंगांच्या विशिष्ट तरंगलांबीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा हे प्रबलन घडवून आणते. याउलट अन्य रंगांच्या तरंगलांबींच्या आपल्या आत्मिक तरंगांशी तीव्र संघर्ष होतो आणि त्यामुळे आपण अशा रंगांपासून दूर राहतो. मानवी शरीरापासून निर्माण होणाऱ्या किरणप्रसारणाच्या तत्त्वाशी सुसंगत असे हे गृहीतक आहे, असे म्हणता येईल. शरीरातील निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशाचे न्यूनाधिक्य होऊन त्यामुळे रोग निर्माण होतात, असे मत या पद्धतीत व्यक्त केले जाते व त्यासाठी प्रत्येक रंगाचे काही विशिष्ट गुणधर्म वर्णन केले आहेत. उदा., काळा रंग खिन्नता व गुप्त शक्तींशी संबंधित आहे तर लाल रंगाचे आक्रमकता, हिंसा हे गुणधर्म आहेत. पांढरा रंग शुद्धतेशी तर निळा बुद्धिमत्तेशी जोडलेला आहे परंतु आधुनिक भौतिक शास्त्रांच्या आधारे अशा गुणधर्मांचे स्पष्टीकरण देणे कठीण आहे.
परिसरातील रंगांच्या शरीरावर होणाऱ्यास परिणामांबद्दल बरीचशी एकवाक्यता दिसून येते. मस्तिष्क (मेंदू), स्नायू, तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था), अंत्यस्त्ये यांच्या शरीरक्रियात्मक गुणधर्मावर रंगांच्या बदलामुळे बराचसा परिणाम घडून येतो, असे आधुनिक संशोधनात आढळते. मनःस्थिती, कार्यक्षमता, शीणक्षमता, भावनात्मक प्रतिक्रिया, बौद्धिक कार्य, एकाग्रता, स्वस्थता या मानसिक घटकांमध्ये इष्टानिष्ट फेरबदल रंगसंगतीने घडवून आणता येतात, हे औद्योगिक क्षेत्रात आता ज्ञातच आहे. कार्यालये, कार्यशाळा यांमध्ये याचा उपयोगही करून घेतला जातो. उदा., पिवळा, नारिंगी, लाल हे उत्तेजक रंग समजले जातात तर फिकट निळा, हिरवा हे शामक, मन:क्षोभ कमी करणारे रंग गणले जातात. मनोरुग्णालये, मतिमंदांच्या शाळा यांमध्य अनुकूल अशा वर्णपरिसराचे महत्त्व आता समजून येत आहे. १८६८ मध्ये इंग्लंडमधील ऑगस्टस प्लेझंटन यांनी निळ्या काचेतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाची इतकी प्रशंसा केली होती की, त्या वेळी देशातील हजारो खिडक्यांना निळी तावदाने बसवण्यात आली होती. वय, बुद्धिमत्ता, मानसिक विकास, सांस्कृतिक गट, स्वभाव यांनुसार रंगाची आवड बदलते. तरी पण मनोरुग्णावस्थांचेही विशिष्ट रंगांच्या आवडीनिवडीशी संबंध जोडता येतात. अपस्मार, मनोमज्याविकृती, ⇨चित्तविकृती यांमध्ये रंगांना अतिरिक्त प्रतिसाद देण्याची वृत्ती आढळते. ⇨उद्दीपन-अवसाद चित्तविकृतीच्या रुग्णांना लाल रंगासारखे ‘उष्ण’ रंग आवडतात. छिन्नमानसांना निळा, हिरवा हे ‘शीत’ रंग आणि संभ्रमविकृतीने पछाडलेल्याना पिंगट रंग प्रिय असतात, असे आढळून आले आहे.
प्रत्येक रंगाच्या विशिष्ट कंपनामुळे निराळा परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक रंगाशी निगडित गुणधर्म व उपयोग सुचविले हेत. तो विशिष्ट रंग वापरण्यासाठी अनेक माध्यमे वापरता येतात. त्यांतील काही अशी आहेत : (१) शुद्ध पाणी रंगीत काचेच्या बाटलीत भरून, तीन-चार तास उन्हात ठेवून नंतर त्याचा वापर पोटात घेण्यासाठी वर्णजल म्हणून करतात. (२) खडीसाखरेची पूड किंवा लॅक्टोजाच्या होमिओपॅथिक गोळ्या वरीलप्रमाणे पाण्याऐवजी वापरतात. (३) खिडक्यांना रंगीत काचा बसवलेल्या खोलीत रुग्णांना ठराविक काळ बसवले जाते (उदा., जामनगरचे सूर्यकिरण चिकित्सालय). या काचांतून येणारा सूर्यप्रकाश सरळ किंवा परावर्तकांच्या साहाय्याने शरीराच्या विशिष्ट भागावर पडू दिला जातो. रंगीत भिंगे असलेले दिवेही यासाठी वापरतात. (४) विशिष्ट रंग दिलेल्या खोल्यांमध्ये मुलांना शिक्षण देता येते. मतिमंद मुले पिवळ्या भिंतींच्या खोलीत चांगली प्रगती करतात, असे एका अभ्यासात आढळले आहे. (५) कापडी पिशव्यांमध्ये रंगीत लवणे भरून त्यांचे सूर्यप्रकाशात अगर दिव्याखाली ठेवून सक्रियण (अधिक क्रियाशील करण्याची क्रिया) केले जाते. एक तास सक्रियण झाल्यावर या पिशवीचा उपयोग व्याधिग्रस्त भाग चोळण्यासाठी केला जातो. (६) १९८५-९० दरम्यान इंग्लंडमध्ये ऑरोसोमा या नावाची उपचार व निदान पद्धत वापरात आली आहे. हिच्यात रंगीत तेलांचा व दोन तेलांच्या मिश्रणाचा उपयोग मर्दनासाठी केला जातो. तसेच या तेलांपैकी रुग्ण कोणत्या रंगाचे व किती स्वच्छ तेल स्वतःसाठी निवडतो, यावर विकृतीचे निदान करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो, असा दावा करण्यात आला आहे.
वर्णचिकित्सेचे शास्त्रीय अधिष्ठान व तिच्यापासून होणारी फलप्राप्ती यांबाबत एकूण संदिग्धता आहे, असे म्हटले पाहिजे.
पहा : निसर्गोपचार.
संदर्भ : 1. Amber, R. R. Colour Therapy, Calcutta, 1964.
2. Shrceve, C. M. Alternative Dictionary of Symptoms and Cures, London, 1986.
3. Walker, B. Encyclopedia of Metaphysical Medicine, London, 1978.
श्रोत्री, दि. शं. आपटे, ना. रा.