हिंडेन बुर्ख, पॉल फॉन : (२ ऑक्टोबर १८४७ – २ ऑगस्ट १९३४). प्रसिद्ध जर्मन सेनानी व दुसरा राष्ट्राध्यक्ष (कार. १९२५–३४). त्याचे पूर्ण नाव पॉल लूटव्हिख हान्स आंटोन फॉन बेनकनडॉर्फ अण्डफॉन हिंडेनबुर्ख. जन्म पूर्व प्रशियातील लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात पॉझनान (पोलंड) येथे. त्याने डॅन्झिग येथे प्रशियनसैन्यात सेकंड लेफ्टनंट म्हणून प्रवेश केला (१८६६). ऑस्ट्रो-प्रशियन युद्धात (सेव्हन वीक्स वॉर) त्याने पराक्रम दाखविला. त्याबद्दल त्याला ऑर्डर ऑफ द रेड ईगल हे बिरुद प्राप्त झाले. त्यानंतर १८७०-७१ च्या फ्रँको-जर्मन युद्धात तो सहभागी झाला. युद्धातील पराक्रमामुळे त्याला आयर्न क्रॉस मिळाला आणि क्रमाक्रमाने बढती मिळून तो जनरल(सेनापती) या पदावर पोहोचला (१८९६). मॅग्डेबर्गच्या चौथ्या पलटणीचे नेतृत्व त्याने केले (१९०३). जवळजवळ पंधरा वर्षांनंतर तो या पदावरून स्वेच्छानिवृत्त झाला (१९११).  

पॉल फॉन हिंडेनबुर्ख
 

 

जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले (२२ ऑगस्ट १९१४) आणि रशियन फौजांनी पूर्व प्रशियात प्रवेश केला, तेव्हा हिंडेनबुर्खला परत सैन्यात बोलावून घेण्यात आले आणि त्यास आठव्या सैन्य दलाचे आधिपत्य देण्यात आले. त्या वेळी मेजर जनरल इरिक लूडेन्डोर्फ त्याच्या सैन्य दलाचा मुख्य मदतनीस होता. लूडेन्डोर्फची सहकार्यवृत्ती आणि स्वतःची चतुर बुद्धिमत्ता व अनुभव यांमुळे त्याने टॅननबर्गच्या (स्टिंबार्क) युद्धात रशियन सैन्याचे दोन ताफे नष्ट करून त्यांविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळविला (सप्टेंबर १९१४). रशियाच्या शरणागतीनंतर त्याच्याशी केलेल्या ब्रेस्त-लिटॉफ्स्कच्या तहातील बऱ्याच अटी हिंडेनबुर्खने सुचविल्या होत्या. हिंडेनबुर्ख आणि लूडेन्डोर्फ यांनी रशियन सैन्यास घेऱ्यात पकडण्यासाठी अनेक योजना आखल्या, त्यामुळे रशियन सैन्य पराभूत झाले पण नष्ट झाले नव्हते. 

 

या विजयानंतर पश्चिम आघाडीवरील विरोधकांची कोंडी मोडून काढण्यासाठी हिंडेनबुर्खची नियुक्ती झाली. त्याला पदोन्नती देण्यात येऊन जर्मन सैन्याचा फील्ड मार्शल (सरसेनापती) करण्यात आले (१९१६). या मोहिमेसाठी त्याने लूडेन्डोर्फला सोबत घेतले. हिंडेनबुर्खने जर्मनीमधील एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ख्याती मिळविली होती. त्याने आपल्या कर्तृत्वाने दुसऱ्या विल्यम राजाची मर्जी संपादन केली. त्यामुळे त्याला सर्व जर्मन सैन्याचा सर्वोच्च सेनानी बनविण्यात आले. हिंडेनबुर्ख व लूडेन्डोर्फ यांनी पश्चिम आघाडीवरील मित्र राष्ट्रांचा हल्ला रोखून ‘झिगफ्रीड-स्टेलिंग’ संरक्षण क्षेत्राची उभारणी केली. त्याला ‘हिंडेनबुर्ख लाइन’ असे नाव देण्यात आले. ते संरक्षणक्षेत्र मित्र राष्ट्रांना मोडून काढता आले नाही. नंतर मार्च १९१८ मध्ये त्याने मित्र राष्ट्रांविरुद्ध मोठी आघाडी उघडली आणि त्यात तो बराच यशस्वी झाला पण मित्र राष्ट्रांची फळी फुटली नाही. निराश न होता जर्मनीने हिंडेनबुर्ख आणि लूडेन्डोर्फ ह्या कर्तृत्ववान शिलेदारांच्या मदतीने युद्ध चालू ठेवले. जर्मनीची सर्व सत्ता लष्कराच्या हातात जाऊ लागली. जर्मनीने आपल्या पाणबुड्या महासागरात उतरवून हालचाली सुरू केल्या. त्यामुळे अमेरिका व इंग्लंड हे देश फ्रान्सच्या बाजूने युद्धात उतरले. जुलैमध्ये मित्र राष्ट्रांनी जर्मनीवर हल्ला सुरू केला. याच वेळी जर्मनीत युद्धविरोधी अंतर्गत चळवळी सुरू झाल्या. युद्धात मित्र राष्ट्रांचे पारडे जड झाले आणि जर्मनी युद्धात पराभूत झाला (१९१८). युद्धानंतर हिंडेनबुर्खने पुन्हा स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली (१९१९). तो काही काळ अज्ञातवासात हॅनोव्हरला राहत होता. तो प्रसंगोपात्त रिपब्लिकच्या विरोधी विचार व्यक्त करी. राजेशाहीबद्दल त्याला सहानुभूती होती परंतु एकूण तो पक्षातीत होता आणि जर्मन राष्ट्राबद्दल त्याच्या मनात नितांतप्रेम होते. फ्रीड्रिख एबर्टच्या मृत्यूनंतर (१९२५) हिंडेनबुर्खची प्रजा-सत्ताकाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याने व्हर्सायच्या तहात मित्र राष्ट्रांनी लादलेल्या अटी झुगारून सैन्याच्या उभारणीला सुरुवात केली. १९३२ मध्ये त्याची अध्यक्षपदी फेरनिवड झाली परंतु जर्मनीतील हिटलरच्या नाझी पक्षाच्या वाढत्या प्राबल्यामुळे त्याने हिटलरची जर्मनीचा पंतप्रधान म्हणून निवड केली. हिटलरने खोटी वचने देऊन दहशतीचे वातावरण निर्माण केले व सर्व राजकीय सूत्रे आपल्या हाती घेतली. अखेर सर्व सत्ता बळकावून तो जर्मनीचा हुकूमशहा बनला. 

 

न्यूडेक (पोलंड) येथे हिंडेनबुर्खचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

 

संदर्भ : 1. Dupuy, Trevor N. The Military Lives of Hindenburg and Ludendorff of Imperial Germany, London, 1970.

           2. Wheeler-Bennet, John W. Hindenburg : The Wooden Titan, New York, 1967. 

चाफेकर, शं. ग.